' ...आणि ह्या तरुण डॉक्टर मुलीने एका चिमुकल्याचे प्राण अबॉर्शन होण्यापासून वाचवले!

…आणि ह्या तरुण डॉक्टर मुलीने एका चिमुकल्याचे प्राण अबॉर्शन होण्यापासून वाचवले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

बरेच दिवसांपासून व्हॉट्स ऍपवर एक पोस्ट फिरत आहे. एक दाम्पत्य अबॉर्शन करून घेण्यासाठी येतं. कारण त्यांनी दुसऱ्या राज्यात तपासणी केली आहे आणि पोटातील गर्भ “मुलगी” आहे. आधी एक मुलगी झालेली आहे, दुसरी नको – म्हणून अबॉर्शन हवंय.

हा डॉक्टर वस्ताद असतो. म्हणतो तुम्हाला २ मुली नकोत, एक हवीये – असं असेल तर तुमची ही जन्मलेली मुलगी मी मारून टाकतो, पोटातली राहू द्या! – पण पालकांच्या त्या पोरीवर, स्वाभाविकच, जीव जडलेला असतो – त्यांना चूक जाणवते आणि ते निर्णय बदलतात.

त्यापुढे डॉक्टर म्हणतो – आमच्या व्यवसायात काही जण इतके थराला गेलेत की एकतर गर्भलिंग निदानाचं मोठं पाप करतातच. शिवाय अबॉर्शनचे पैसे कमावता येतील म्हणून गर्भ मुलाचा असला तरी मुलीचा आहे असं सांगतात.

थोडक्यात, इतर सर्वच व्यवसायांमध्ये आहे – तशी डॉक्टरकीमध्ये कीड पसरलेली आहे. पण अगदी तसंच, ह्या पेशात एकाहून एक बावनकशी सोन्यासारखे लोक ही आहेत. वरील व्हॉट्स ऍप मेसेजमधला प्रामाणिक डॉक्टर हे एक उदाहरण झालं. नुकतंच फेसबुकवर आणखी एक उदाहरण वाचायला मिळालं.

योग्य काऊन्सलिंग केल्यामुळे एक अबॉर्शन कसं वाचलं – ह्याची सत्यकथा सूरज उदगीरकर ह्यांनी त्यांच्या फेसबुकपोस्टद्वारे समोर आणली आहे.

आवर्जून वाचावा असा हा प्रसंग आहे. सूरजच्या लिखाणातील काही कच्चे दुवे, पुढे डॉक्टर बिपीन कुलकर्णी ह्यांनी एका कमेंटमध्ये स्पष्ट केले आहेत. ती कमेंटसुद्धा देत आहोत. नक्की वाचा!

सूरजची पोस्ट :

===

प्रेग्नंसीमध्ये दर १२ आठवड्यानंतर म्हणजेच ३ महिन्यानंतर ज्याला ट्रायमिस्टर म्हणतात, गरोदर स्त्रीची सोनोग्राफी टेस्ट केली जाते. होणाऱ्या बाळाची वाढ व्यवस्थित होतेय की नाही ते पाहिलं जातं.

एक स्त्री १४ आठवड्यांनंतर अशीच टेस्ट करायला गेली. टेस्टमध्ये असं कळलं की बाळाचे vital organs म्हणावे तसे विकसित होत नाहीयेत. डॉक्टरांनी अबॉर्शनचा सल्ला दिला. लहानश्या गावातली ती पोरगी घाबरून गेली. नवरा देखील भांबावला. आघात असतो हा!

दोघेही मग गावातल्या दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले. रिपोर्ट्स पाहून त्या दुसऱ्या डॉक्टरांनी देखील अबॉर्शनचा सल्ला दिला! आता मात्र नवरा बायको पूर्ण कोसळले.

 

abortion-marathipizza
southernafrican.news

नवऱ्याची बहीण मुंबईत राहते. त्याने बहिणीला फोन करून कळवलं. त्या बहिणीच्या शेजारी एक तरुण डॉक्टर मुलगी राहते. बहिणीने ही गोष्ट तिच्या कानावर घातली. त्या डॉक्टर मुलीने ताबडतोब रिपोर्ट मागून घेतले. तपासले.

मग त्या डॉक्टर तरुणीने बहिणीला आणि तिच्या गरोदर भावजयीला सल्ला दिला की अबॉर्शन करायला तुमच्याकडे अजून ८-१० आठवडे हातात आहेत. दुसऱ्या ट्रायमिस्टरचा रिपोर्ट येऊ द्या. अबॉर्शनची घाई नका करू. कधी कधी vital organs(किडनी, हृदय, फुफ्फुसे) विकसित व्हायला उशीर लागतो.

गरोदर स्त्री आणि तिची नणंद दोघीना ही गोष्ट पटली. त्यांनी वाट पाहायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे २३ आठवडे झाले. तेंव्हा मुंबईमध्ये येऊन दुसरी सोनोग्राफी टेस्ट केली गेली आणि बाळाची वाढ अतिशय व्यवस्थित झाल्याचं दिसून आलं! ती तरुण डॉक्टर मुलगी अचूक निघाली…

आत्ता परवा त्या गरोदर स्त्रीची प्रसूती झाली आणि तिला गोंडस मुलगा झालाय! तिने पहिला फोन त्या तरुण डॉक्टर मुलीला धन्यवाद करण्यासाठी केला!

ह्या सगळ्या प्रकरणात गावातल्या त्या डॉक्टरांची चूक म्हणावी की वाढीव खबरदारी? त्यांचं ऐकून अबॉर्शन केलं गेलं असतं तर?

टीप : ही पोस्ट डॉक्टर कसे चुकीचे असतात हे दाखवण्यासाठी अजिबात नाहीय.

टीप २ : ती तरुण डॉक्टर मुलगी आहे डॉ. मयुरी हरयाण!

===

ह्या पोस्टवर डॉ बिपिनची कमेंट :

===

थोडं सविस्तर लिहीत आहे. मसुद्यामध्ये काही टेक्निकल त्रुटी आहेत म्हणून.

११-१३ आठवड्यास NT स्कॅन केला जातो जो मुख्यतः काही अनुवांशिक रोग असण्याची रिस्क किती आहे ते पाहायला. या स्कॅनच्या वेळी मेंदू, स्पाईन यांच्या काही ग्रॉस त्रुटी असतील तर लक्षात येतात.

पण बाकीचे बरेचशे ऑर्गन्स अजून व्यवस्थित तयार झालेले नसतात. त्यामुळे ते तसे नाहीत यावरून ऍबॉर्शनचा सल्ला दिला जात नाही. NT स्कॅनचे रिपोर्ट ऍबनॉर्मल असतील तर गर्भजल परीक्षा सुचवली जाते (amniocentesis).

ऍनोमली स्कॅन साधारण १८-२० आठवड्यात केला जातो. ज्यावेळी बहुतेक सर्व व्हायटल ऑर्गन्स डेव्हलप झालेले असतात आणि त्यात काही मेजर प्रॉब्लेम ( जे बाळाच्या जीवाला धोका करू शकतात ) आढळले तर ऍबॉर्शन करावे लागते.

कायद्यानुसार २० आठवड्याच्या आतच ऍबॉर्शन करता येते. २३ व्या आठवड्यातील स्कॅनचा त्या दृष्टीने उपयोग नाही. मात्र हृदयाशी संबंधित काही डीफेक्टस २० आठवड्याच्या नंतर डिटेक्ट होतात त्यामुळे इतर काही रिस्क फॅक्टर्स असतील तर एक ऍडिशनल फिटल कार्डियाक इको केला जातो २२-२४ आठवड्याच्या दरम्यान.

स्कॅन मध्ये सापडलेल्या अनेक छोट्या मोठ्या डीफेक्टस (किडनीवर सूज, फुफ्फुसाचे काही आजार, हृदयातील छोटे छिद्र) ज्यांनी बाळाला जीवाचा धोका नाही त्याबद्दल बाळाच्या पालकांना कौन्सिल करून त्यानुसार निर्णय घेतला जातो.

प्रसंगावधान दाखवल्याबद्दल डॉ. मयुरी चे अभिनंदन. रीडिंग बिटवीन द लाईन ही एक कला आहे जी प्रत्येक क्षेत्रात फार मोजक्या लोकांना जमते. त्याबद्दल तिचे विशेष कौतुक.

===

आपल्या समाजात अशी कळकळ असणारे डॉक्टर्स आहेत हा फार मोठा दिलासा ह्या छोट्याश्या पोस्टमधून मिळतो.

डॉ मयुरीचं हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा – एक चिमुकलं बाळ, त्याचे आई-बाबा-आजी-आजोबा…असं अनेकांचं जीवन मोठ्या आघातापासून वाचवलं तिने…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?