' तुमच्याही घरात शाळीग्राम आहे? मग हे नियम तुम्ही वाचायलाच हवेत

तुमच्याही घरात शाळीग्राम आहे? मग हे नियम तुम्ही वाचायलाच हवेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

हिंदू संस्कृतीनुसार अनेक देवी देवतांची मूर्ती रूपात आणि त्यांच्या नैसर्गिक रूपात ही पुजा केली जाते. अनेक शास्त्र-पुराणे यात या पूजाविधीचे संदर्भ आपल्याला पहायला मिळतात. अनेक हिंदू मंदिरामधील देवतेच्या मूर्ती किंवा विकसित केलेली पुजा यंत्रे ही एका विशिष्ट प्रकारच्या दगड अथवा शिळेपासून बनवलेले आपल्याला दिसून येतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विशिष्ट प्रकारच्या दगडांमधून एक विशिष्ट प्रकारचा किरणोत्सर्ग होतो असेही अभ्यासांती सिद्ध झाले आहे.

 

shaligram inmarathi

 

या शीळा जीवाश्म पद्धतीच्या असून केवळ भारत आणि नेपाळच्या काही भागातच आढळतात असे तुम्हाला कळले तर? या शीळा ‘गंडकी पाषाण’ म्हणून ओळखल्या जातात. यांचे लहान रूप म्हणजेच ‘शालिग्राम, सालाग्राम किंवा शाळीग्राम’. आपल्याला माहितीच असेल की बहुसंख्य हिंदू घरांमध्ये खासकरून दाक्षिणात्य घरांमध्ये शाळीग्राम विष्णु स्वरुपात पूजला जातो, त्याच स्वरूपात त्याची उपासना होते. तुमच्याही दैनंदिन पूजेत जर शाळीग्राम असेल तर तुम्ही काही गोष्टी माहिती करून घ्यायलाच हव्यात. कोणत्या आहेत या गोष्टी? चला जाणून घेऊ.

शाळीग्रामबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी

शाळीग्रामचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते ज्याचा परिणाम घरावरही होतो. त्यामुळे घरात पावित्र्य आणि सकारात्मक वातावरण असणे महत्त्वाचं आहे.

शाळीग्राम दुधात किंवा तांदुळात ठेवतात. तसे केल्याने जर त्याचा आकार व वजन वाढल्यास तो नित्य पूजेला योग्य समजला जातो अशी समजूत आहे.

दक्षिणेतल्या बर्‍याच विष्णू मंदिरामधून विष्णूच्या गळ्यात शाळीग्रामांची माळ घातलेली असते. माध्व संप्रदायाचे वैष्णव लोक शाळीग्रामाला प्रत्यक्ष विष्णूच्या मूर्तीपेक्षाही श्रेष्ठ समजतात. पंचायतन पूजेतही विष्णूचा प्रतिनिधी म्हणून शाळीग्रामच असतो. माध्व लोक प्रायश्‍चितासाठी पंचगव्याऐवजी शाळीग्रामाचे तीर्थ घेतात.

 

shaligram 1 inmarathi

 

शाळीग्रामात विश्‍वातील सर्व पूज्य वस्तूंचा अंतर्भाव होतो. शाळीग्राम फुटला तरी अपूज्य ठरत नाही.

नेपाळमध्ये पशुपतीनाथापासून साधारणतः १५० कि.मी. अंतरावर असलेल्या मुक्तनाथ येथे गंडकी नदीमध्ये ‘शाळीग्राम’ नावाचे दगड सापडतात. त्याशिवाय या ठिकाणी अशा दगडांचा मोठा डोंगरच (हरिपर्वत) असून या दगडापासून मूर्तीसुद्धा तयार करण्यात येतात तसेच या दगडांवर यंत्रे कोरण्याची प्रथाही प्रचलित आहे. विशिष्ट प्रकारची चक्रे आणि मुखे यावरून या दगडांची परीक्षा केली जाते. या दगडावर लहानशी सोन्याची रेखाही असते.

 

shaligram nepal

 

शाळीग्राम कसा तयार होतो याविषयी एक कल्पना सांगितली जाते, ती अशी हरि पर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचे एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामाचा दगड एक हजार वर्षे राहिल्यानंतर श्रीविष्णू वज्रकीट या किड्याच्या रुपाने त्यात शिरून तेथे चक्राची आकृती कोरतो. अशा शाळीग्रामांचे असे ८९ निरनिराळे प्रकार असून त्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत.

शालिग्रामचे निरनिराळ्या प्रकारानुसार त्याचे उपयोग :

१) वामन शाळिग्राम – हा छोटा आणि गोलाकार दगड असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास अहं, काम, क्रोध यासारख्या विकारांमधून मुक्ती मिळते.

 

vaman shaligram

 

२) अनंतक शाळिग्राम – विविध रंग-रुप आणि ज्यावर नागाच्या फण्यासारखे चिन्ह असतात. या शाळिग्रामची उपासना कुटुंबाला संकटापासून वाचवणारी तसेच दरिद्रता दूर करणारी मानली गेली आहे.

३) कृष्ण शाळिग्राम – गोलाकार आणि मागील भाग झुकलेला असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास श्रीकृष्णाप्रमाणे ज्ञान आणि विवेकतेच्या बळावर यश प्राप्त होते.

४) कूर्म शाळिग्राम – निळा रंग, तीन रेषा आणि बिंदूने अंकित असते ही शीळा. या शाळिग्रामची पूजा शांती, धैर्य, सुख, ताकद प्रदान करणारी मानली गेली आहे.

५) वराह शाळिग्राम शीळा – विषम आकार आणि मध्ये दोन चक्राचे चिन्ह असणारी ही शीळा लवकर लक्ष्य आणि कार्यसिद्धी करून देणारी आहे.

६) हयग्रीव शाळिग्राम शीळा – या शिळेवर पाच रेषा आणि अंकुशाचा आकार असतो. भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराप्रमाणे ही शीळा संकटमोचक आहे.

७) दामोदर शाळिग्राम – निळा रंग आणि यामध्ये निळ्या रंगाची चक्रकार शिळा, याच्या केवळ दर्शनाने जीवनात चमत्कारिक बदल घडून येतात.

 

damodar shaligram inmarathi

 

८) लक्ष्मीनारायण शाळिग्राम – दोन चक्र असलेल्या या शिळेची उपासना वैभव आणि शांती प्रदान करणारी आहे.

९) मत्स्य शाळिग्राम शिळा – ही शिळा कमळाच्या आकाराची असते. या शाळीग्रामची पूजा केल्याने अमाप धन, सुख व अपत्याची इच्छा पूर्ण होते.

शाळीग्रामाविषयी पद्मपुराणात एक कथा सांगितली आहे ती अशी

विष्णूने नवग्रह निर्माण केले आणि माणसाचे बरे वाईट करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. शनि या पापग्रहाला हे सामर्थ्य मिळताच तो ब्रह्मदेवाच्या राशीलाच गेला. ब्रह्मदेवाने त्याला विष्णूकडे पाठविले. विष्णूने शनिला ‘उद्या ये’ असे सांगितले.

 

shani dev inmarathi

 

दुसर्‍या दिवशी शनि गेल्यावर विष्णू जागेवर दिसला नाही. शोध घेतला असता विष्णू गंडकी शीळेचा पर्वत होऊन राहिल्याचे समजले. शनिने वज्रकीट नावाच्या किड्याचे रुप घेतले आणि पर्वताच्या पोटात शिरून पोखरू लागला. विष्णूला हे पोखरणे सहन होईना त्याच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर आल्या. त्याच पुढे कृष्ण गंडकी व श्‍वेत गंडकी म्हणून दोन नद्या झाल्या.

बारा वर्षानंतर विष्णू शनिच्या त्रासातून मुक्त झाला. त्याने निजरुप घेतले. आपले प्रतीक म्हणून गंडकीतल्या शाळीग्रामांची लोकांनी पूजा करावी असे त्याने सांगितले.

शाळीग्राम पुजा करताना काही नियम तुम्हाला पालवे लागतात ते असे :

१. शाळीग्रामच्या पूजेचा क्रमात खंड पडू देऊ नये. म्हणजेच नियमितपणे शाळीग्रामाची पूजा करावी. गंध,फुले वहा. शक्य असल्यास दररोज एक तुळशीचं पानं अर्पित करावे.

२. घर स्वच्छ ठेऊन ज्या स्थानावर शाळीग्राम असेल ते स्थान घरामध्ये वेगळे ठेवा.किंवा वेगळे देवघर घरात असु द्या. त्याची पुजा करताना आपले आचार आणि विचार शुद्ध ठेवावे.

 

shaligram pooja inmarathi

 

३.  शाळीग्रामावर कधीही अक्षता अर्पण करु नका. आवश्यकता असेल तरच अक्षतांना हळदीत पिवळ्या करुन घ्या त्यानंतर अर्पण करा.

४. शाळीग्रामाची पुजा स्त्रियांनी करू नये असे ही मानले जाते.

५. शाळीग्रामला नेहमी मेहनतीच्या कमाईतून मिळवलेल्या पैशांनी खरेदी करुन घरी आणावे. कुठल्याही गृहस्थ व्यक्तीकडून शाळीग्राम घेऊ नये तसेच, कुठल्या गृहस्थ व्यक्तीला ते देऊ नये. पण, कोणा सिद्ध व्यक्तीने तुम्हाला शाळीग्राम प्रसाद स्वरूप दिला तर तो तुम्ही स्वीकारू शकता. जर तुमच्या घरात शाळीग्राम असेल आणि तुम्ही त्याची व्यवस्थित पूजा करु शकत नसाल तर तुम्ही त्याला नदीत प्रवाहित केलेलं जास्त उत्तम ठरतो असेही सांगितले जाते.

शाळीग्रामचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो. जर तुम्ही त्याची उपासना योग्य नियमात केली नाही तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या कुटुंबावर दिसू शकतो. घरातील निगेटिव्ह ऊर्जा वाढलेली दिसेल. तसेच, गृहकलह आणि घटना-दुर्घटना वाढू शकतील त्यामुळे जर तुम्ही शाळीग्रामच्या नियमांचे पालन करु शकत नसाल तर त्यांना घरात ठेवू नये.

 

shaligram pooja 1 inmarathi

 

विष्णुस्वरूप मानले जाणार्‍या ‘शालिग्राम’ ची ही माहिती काशी वाटली आम्हाला जरूर कळवा.

===

कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा या लेखाचा उद्देश नसून शालिग्राम या विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. वरील लेखात दिलेली माहिती ही इतर माहिती स्त्रोतांच्या आधारावर देण्यात आली असली तरी प्रत्येकाने याबाबत निर्णय घेताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?