ब्रिटिश साम्राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला संकटात पाडणारे २ क्रूर सिंह – नरभक्षक – भाग ३

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ह्या लेखमालेतील पहिले दोन भाग –

नरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या रंजक कथा – भाग १

नरभक्षक वाघ – कुप्रसिद्ध “चंपावतची वाघीण”, रुद्रप्रयाग चा बिबट्या आणि T24 उर्फ “उस्ताद” – भाग २

===

1896 साली ब्रिटिशांनी एक त्याकाळचा एक सर्वात मोठा प्रकल्प हातात घेतला होता. केनियाच्या मोम्बासा बंदरापासून ते आफ्रिकेच्या मध्यभागी असलेल्या युगांडामधल्या “लेक व्हिक्टोरिया”पर्यंत एक रेल्वे लाईन अंथरायचा हा प्रकल्प होता. त्यामागचा हेतू असा की आफ्रिकेतल्या आतल्या भागापर्यंत व्यापाऱ्यांना सहज पोचता यावं आणि व्यापाराला वाव मिळावा. तसेच तिथे ब्रिटिश कॉलोन्या बनाव्यात हे मुख्य कारण. फ्रेंच-डच लोकांपेक्षा 2 पावलं पुढे राहण्यासाठी हा खटाटोप होता. मोम्बासा ते लेक व्हिक्टोरिया अंतर दोन एक हजार किलोमीटर आहे आणि प्रकल्पासाठी वेळ निश्चित करण्यात आला होता 30 वर्षे. यावरून याची भव्यता आणि इंग्रजांची इच्छाशक्ती लक्ष्यात येते. हा प्रकल्प तडीस नेताना एक भयानक घटना घडली आणि इतिहासात कायमची नोंदवली गेली.

मोम्बासा बंदरावरून सुरु झालेली रेल्वे लाईन जसजशी आफ्रिकेतल्या आतल्या भागात सरकू लागली तसतसं दाट जंगल, नद्या, नाले आडवे येऊ लागले.”सावो” (tsavo) च्या घनदाट अरण्यातल्या ह्या भागात काम करायला स्थानिक आफ्रिकन मजुरांनी नकार दिल्याने बहुतांश मजूर भारतातून नेले गेले आणि ह्या कामाची जबाबदारी दिली गेली लेफ्टनंट कर्नल जॉन हेन्री पॅटरसनला. हा हि भारतातूनच तिकडे गेलेला. मुख्य जबाबदारी रस्त्यात लागणाऱ्या सावो नदीवर पूल बांधण्याची होती.

हजारो मजूरांनी रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला छावण्या बनवल्या. रेल्वेलाईन लांबलचक पसरली असल्याने आणि मजूर हजारोच्या संख्येत असल्याने 20 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांचे लहान लहान तंबू आणि छावण्या बनल्या. पूल बनवण्याचं काम जोरात सुरु असताना अचानक एका रात्री तंबूत झोपलेल्या एका कामगाराच्या किंकाळ्यांनी छावण्या हादरून गेल्या. सगळे दचकून जागे झाले. पाहतात तर एका मजुराला 2 सिंह पायाला धरून फरफटत नेत होते. सोबतच्या कामगारांनी ओरडून सिंहांना हकलण्याचा प्रयत्न केला. पण सिंह त्याला ओढत जंगलात घेऊन गेले. मजुरांमध्ये घबराट पसरली. हि गोष्ट तात्काळ पॅटरसनच्या कानावर घातली गेली. दुसऱ्या दिवशी काही लोकांना घेऊन पॅटरसन जंगलात गेला असताना काही अंतरावर त्याला त्या दुर्दैवी मजुराची फक्त कवटी सापडली!

केनियामध्ये सावो नावाची नदी आणि जंगल आहे. जंगल हजारो चौरस किलोमीटर आहे. या भागात सिंह मुबलक प्रमाणात आज ही राहतात. पण हे सिंह बाकीच्या सिंहांपेक्षा वेगळे असतात. जास्त आक्रमक, आकाराने मोठे तर असतातच पण सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्या सिंहांना आयाळ नसते!!

 

tsavo lion marathipizza
सावोच्या अरण्यात ढळणारा एक सर्वसाधारण आयाळ नसणारा सिंह.

कामावर असणारे मजूर बहुतकरून मध्य-पश्चिमी भारतातले असल्याने ह्यांचा संबंध कधी वाघ-सिंहांशी आलेला नव्हता. तुलनेने अडाणी असल्याने त्यांनी आपापली बुद्धी चालवली. झोपड्यांभोवती काटेरी तारांचे कुंपण बनवले, रात्रभर आगट्या पेटत ठेवल्या. आगीला वाघ थोडेसे दबकतात, पण सिंह नाही. वाघापेक्षा सिंह जास्त उत्सुक प्राणी असतो. सिंह पुन्हा आले. रात्री झोपेत असणाऱ्या दोन मजुरांना सर्वांसमोर नरडं धरून झाडीत घेऊन गेले. कुंपणाचा-आगीचा काही एक उपयोग झाला नाही. मजुरांनी पॅटरसनकडे तक्रार केली. दुसऱ्या दिवशी रात्री पॅटरसन ठासणीची दूनळी बंदूक घेऊन झाडावर सिंहांची वाट पाहत बसला. सिंहानी हल्ला तर केला पण दुसऱ्याच छावणीवर. त्यानंतर हे सत्र चालूच राहिलं. पॅटरसन जिथे असेल त्याच्या बरोब्बर विरुद्ध बाजूला हे सिंह हल्ला करून गरीब मजुरांना फाडून खायचे. कंटाळून पॅटरसनने वरिष्ठांकडे मदत मागितली. ‘वरून’ पॅटरसनला एक जास्त ताकदीची सेमी-ऑटोमॅटिक रायफल पाठवण्यात आली.

मजुरांसाठी दवाखान्याची सोय एका मोठ्या तंबूत करण्यात आली होती. एका मध्यरात्री सिंह तिथे पोचले आणि पुन्हा दोन मजूर बळी पडले. पॅटरसनने लागोलाग तो तंबू रिकामा करवला आणि दुसऱ्या जागी दवाखाना हलवला. जुन्या तंबूत 2-3 शेळ्या बांधून तो बाहेरच्या एका झाडावर दोन रात्री बसला. तिसऱ्या रात्री सिंहांनी दवाखान्याच्या नव्या तंबूतून एका माणसाला उचलला आणि बाकीच्या मजुरांसमोर त्याला जिवंत असतानाच खायला सुरुवात केली. आता मात्र मजुरांचे धाबे दणाणले. हे साधेसुधे सिंह नसून सैतान आहेत असा त्यांचा समाज झाला. मजूर काम सोडून परत जायची भाषा करायला लागले. पॅटरसन जे काही करायचा त्याचा जणू काही आधीच त्या सिंहांना सुगावा लागत होता. पॅटरसन हवालदिल होऊन गेला.

एके दिवशी त्याने एक युक्ती ठरवली. एक पिंजरा बनवायचा. एका बाजूला माणूस बसण्याची जागा, मध्ये जाडजूड गज आणि दुसऱ्या बाजूने सिंह आत येण्यासाठी रस्ता. सिंह आत आला की मागचा दरवाजा बंद होऊन सिंह अडकणार आणि गजाआड बसणारा माणूस सुरक्षित रित्या सिंहावर गोळ्या झाडून त्याला खतम करणार. यावर लगेच अंमलबजावणी केली गेली. सापळा रचून आत 3 तीन भारतीय शिकारी बसायला तयार झाले. रात्रीच्या किर्र अंधारात तिन्ही शिकारी चिडीचीप पिंजऱ्यात बसले…माणसाच्या वासाने दबत कानोसा घेत दोहोंपैकी एक भलामोठा सिंह मिशा फेंदारून पिंजऱ्यात घुसला! मागचा दरवाजा बंद झाला. मधले गज आणि त्यामुळे समोर असणाऱ्या माणसाला खाता येत नाही हे पाहून सिंह संतापला आणि मोठ्याने गर्जना करत गज तोडायला पाहू लागला. त्याचा तो अवतार पाहून आत बसलेले शिकारी गर्भगळीत झाले. एक तर ठार बहिराच झाला. त्यांनी गडबडून अनेक गोळ्या झाडल्या पण एकही सिंहला लागली नाही. एक गोळी मागच्या दरवाज्याच्या कडीला बसून दरवाजा उघडला आणि सिंह निसटला!! 10 फुटांवर असणाऱ्या सिंहाला पट्टीचे 3 शिकारी एक गोळी मारू शकले नाही!! पॅटरसनला देखील आता सिंहात सैतान दिसू लागले. काम करणाऱ्या प्रत्येक भारतीय आणि ब्रिटिश माणसाला भयानक दहशत बसली.

त्यांनी सिंहांचं नाव ठेवलं “द गोस्ट” आणि “द डार्कनेस”…!!

अर्ध्याहून अधिक मजूर मिळेल त्या मार्गाने सावो सोडून जाऊ लागले. राहिलेल्या मजुरांवर सिंह हल्ले करत राहिले. भर दिवसा सिंह छावणीत घुसून माणसं खायला चटावले! पॅटरसनला ‘वरून’ खरपूस शिव्या पडायला लागल्या. अखेरचा उपाय म्हणून एके रात्री पॅटरसन जंगलाच्या तोंडाशी झाडावर बसला. अमिश म्हणून त्याने एक गाय बांधली. मध्य रात्र उलटून गेल्यावर सिंह अवतरले. त्याना गाय नको होती, माणूस हवा होता! पॅटरसनच्या वासाने आलेल्या आणि त्यालाच शोधणाऱ्या एका सिंहावर पॅटरसन ने 2 गोळ्या झाडल्या आणि एक सिंह गतप्राण झाला. आतंक अर्धा संपला. 18 दिवसांनी दुसऱ्या सिंहाला अशाच प्रकारे मारायला जाऊन पॅटरसनने त्याला जखमी केलं. दुसऱ्या दिवशी काही लोकांना सोबत घेऊन त्याचा जंगलात शोध घेऊन त्याला संपवलं. दुसऱ्या सिंहाला मारायला 9 गोळ्या लागल्या!!

 

the ghost john john peterson marathipizza
द गोस्ट. सोबत जॉन पॅटरसन.

 

the darkness marathipizza
द डार्कनेस. सोबत सिंह मेल्यामुळे आनंदित झालेला एक भारतीय कंत्राटदार.

 

1898 मध्ये दोन्ही सिंहांना मारल्यावर पॅटरसनला दाट जंगलात त्यांच्या गुहेचा शोध लागला! आत जाऊन पाहिलं तेंव्हा तो नखशिखांत हादरून गेला. गुहेत सर्वत्र माणसांच्या हाडांचा आणि कवट्यांचा खच पडलेला होता. द गोस्ट आणि द डार्कनेस दोघे भाऊ होते. इतिहासात सर्वात भयंकर नरभक्षकांपैकी एक म्हणून त्यांची नोंद झाली. पॅटरसनची एकूण 135 माणसे या सिंहांनी फाडून खाल्ली. पॅटरसनने दोन्ही सिंहांच्या कवट्या स्वतःकडे ठेवल्या आणि कातडी कमावून घेतली. पुढे काही वर्षांनी त्याने त्या गोष्टी शिकागो संग्रहालयाला विकल्या. शिकागो संग्रहालयाने त्यात पेंढा भरून त्यांना प्रदर्शनार्थ ठेवलं आहे! 1996 मध्ये या कथेवर एक सिनेमाही आला होता. The Ghost and The Darkness नावाचा. आवर्जून पाहण्यासारखा आहे.

आजही द गोस्ट आणि द डार्कनेस शिकागो संग्रहालयात पाहायला मिळतात.

 

the ghost and the darkness in chicago museum
शिकागो मधल्या संग्रहालयात पेंढा भरून ठेवलेले “द गोस्ट” आणि “द डार्कनेस”

आयाळ नसणाऱ्या ह्या नरभक्षक सिंहांकडे पाहून एक विचित्र फील येतो. आणि हो – सावो (tsavo) ह्या स्थानिक भाषेतल्या शब्दाचा अर्थ आहे –

“कत्तल करण्याची जागा”!

क्रमशः

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 27 posts and counting.See all posts by suraj

2 thoughts on “ब्रिटिश साम्राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला संकटात पाडणारे २ क्रूर सिंह – नरभक्षक – भाग ३

  • May 27, 2017 at 2:10 pm
    Permalink

    तिनही लेख अप्रतिम….
    यापुढेही असे लेख वाचायला मिळाले तर उत्तम….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?