नरभक्षक वाघ – कुप्रसिद्ध “चंपावतची वाघीण”, रुद्रप्रयाग चा बिबट्या आणि T24 उर्फ “उस्ताद” – भाग २

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

ह्या लेखमालेतील पहिला भाग – नरभक्षक वाघ – जंगलाच्या राजाच्या रंजक कथा – भाग १

===

विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातली गोष्ट. ठिकाण, आजचा उत्तराखंड आणि नेपाळचा सीमावर्ती इलाखा. नेपाळ मधलं एक छोटंसं गाव. गावातले लोक शेती करून किंवा जंगलात जाऊन लाकडे, औषधी वनस्पती गोळा करून बाजारात विकून उदरनिर्वाह करत. सगळं अलबेल चाललं असताना एक दिवस अचानक जंगलात गेलेल्या एक माणसावर एका जनावराने हल्ला केला. त्याच्या सोबत असणाऱ्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. माणसाचा पत्ता नव्हता पण जागोजाग रक्ताचे डाग दिसले. शोधाशोध केल्यानंतर त्या माणसाचे अर्धवट खाल्लेले प्रेत दिसून आले. लोक गडबडून गेले. मात्र एखाद्या वन्य जनावराने हल्ला करणे साधारण समजले जायचे म्हणून फारसा गाजावाजा झाला नाही. पण काही दिवसांनी पुन्हा असाच एक माणूस गायब झाला…मग पुन्हा पुन्हा असं व्हायला लागलं. जंगलात गेलेली माणसे गायब व्हायची आणि त्यांची खाल्लेली छिनविछिन्न प्रेतं सापडायची. हे जनावर म्हणजे एक वाघीण होती!

हळू हळू आजूबाजूच्या गावातल्या लोकांवरही हल्ले चालू झाले. पंचक्रोशीतली जनता घाबरून गेली. लोकांनी सरकार(ब्रिटिश)कडे साकडे घातले. सरकारने अनेक शिकारी नियुक्त केले. पण काही उपयोग झाला नाही. हल्ले चालूच राहिले. रोज उठून कोणाला ना कोणाला हि वाघीण गच्चकन मानेला धरून जंगलात ओढून घेऊन जायची. लोकांना जंगलात जाण्याची चोरी झाली. एक नाही दोन नाही..तब्बल 200च्या जवळपास जीव वाघिणीची शिकार बनले! शेवटी इरेला पेटून अक्खं नेपाळी सैन्य वाघिणीवर सोडण्यात आलं! इतिहासात सैन्य नरभक्षक वाघाच्या शिकारीवर पाठवण्याची हि पहिली आणि शेवटची घटना! फायदा? शून्य. वाघीण चलाख होती. अनुभवी होती. एक छोटसं यश नेपाळ्यांच्या हाती लागलं, ते म्हणजे त्यांच्या चिवट पाठलागामुळे वाघीण सरहद्द ओलांडून भारतात दाखल झाली!

उत्तराखंडमध्ये कुमाऊच्या जंगलात हल्दवानी जिल्ह्यात चंपावत नावचं गाव आहे. चोहो बाजूनी जंगलाने वेढलेलं. वाघीण तिथे अवतरली आणि तिथली माणसं गायब व्हायला सुरु झालं. रात्री खळ्यावर झोपलेली माणसं असोत कि झोपडी बाहेर झोपलेली माणसं असोत, शेतात काम करणारी असोत कि पहाटे जंगलात कामावर जाणारी असोत. लोक झोपडीबाहेर पडायला घाबरू लागले. इतकी माणसे मारून खाल्ल्यावर हळू हळू वाघीण इतकी धिटावली कि भर दिवसा गावात झोपडयांबाहेर चकरा मारायला लागली…कुडाच्या झोपडीचे दरवाजे तोडून माणसं उचलून न्यायला लागली. लोक घाबरून घराबाहेर पडायचे बंद झाले. अक्षरशः वाघ झोपडीबाहेर फिरतोय हे जाणवायचं. बाजूच्या जंगलातून किंवा घराबाहेरून डरकाळ्यांचे, गुरगुरण्याचे आवाज ऐकत थरथर कापत घरात बसून राहावं लागे. लोकांवर तहान भुकेने मारायची वेळ अली. ही वाघीण मनुष्य जातीला घाबरेनाशी झाली…

अनेक शिकारी नियुक्त करून देखील अपयश पदरात पडल्यामुळे शेवटी एक जण स्वतःहून पुढे आला. जेम्स एडवर्ड कॉर्बेट उर्फ जिम कॉर्बेट. जिमचा जन्म भारतातलाच. नैनितालचा. उभं आयुष्य उतरखंडच्या जंगलात घालवलेला हा अवलिया. याने आयुष्यात अनेक नरभक्षक वाघ बिबळे मारले. तिकडे देवापेक्षा कमी मानत नाहीत कॉर्बेटला. जंगलाचं आणि वन्य प्राण्यांचं कॉर्बेटला प्रगाढ ज्ञान होतं. त्यांच्या सवाई, स्वभाव त्याला चांगलेच ठाऊक होते. भल्या भल्या वाघानं तो ठसे, खाणा-खुणा ओळखत पायी पाठलाग करून मारत असे. नंतर कॉर्बेटने बंदूक ठेवून कॅमेरा उचलला आणि वन्यप्राण्यांच्या जतनासाठी आयुष्य वाहून घेतलं. नंतर उतरखंडच्या जंगलाला कॉर्बेटचेच नाव देण्यात आले. हेच ते “कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान”.

वाघाच्या मागावर कॉर्बेट चंपावतमध्ये दाखल झाला. त्याला देखील लगेच यश आलं नाही. पण 1907 साली एक दिवस एका 16 वर्षाच्या मुलीला वाघिणीने तिच्या आई-बापासमोर झोपडीतून फरफटत नेलं. पोरगी जिवाच्या आकांताने हात पाय झाडून आणि बापाने वाघाला मारण्याचा प्रयत्न करून देखील वाघीण तिला दाट झाडीत घेऊन गेली…थोड्याच वेळात धडपडीचे आणि मुलीचे आवाज बंद झाले!
हि गोष्ट कळताच कॉर्बेट त्वरेने तिथे पोचला. रक्ताचे डाग, पावलांचे ठसे इत्यादींचा मागोवा काढत काढत काढत एका पुलापाशी पोचला. तिथेच ती अजस्त्र वाघीण बसलेली आढळून आली. कॉर्बेटला पाहताच ती दात विचकून डरकाळ्या फोडत कॉर्बेटच्या अंगावर झेप घ्यायला उठली तोच कॉर्बेटने तिच्या डोक्यात फाडकन् गोळी मारली!! पोस्ट मॉर्टेममध्ये दिसून आलं कि वाघिणीचा डावा वरचा सूळा अर्धवट आणि खालचा सूळा पूर्णपणे मोडलेला होता. कोणत्यातरी अडाणचोट शिकार्याने कमी ताकदीची बंदूक वापरल्याचा हा परिणाम होता! वाघिण शिकार करण्यास असमर्थ होती. वाघीण दहा फूट लांब होती. वजन पावणे तीनशे किलो!

 

Jim-Corbett-Tiger-Hunter-marathipizza
चंपावतची 436 लोकांना खाणारी वाघीण. सोबत जिम कॉर्बेट. सहा फूट उंचीच्या कॉर्बेट समोर वाघिणीच्या आकाराचा अंदाज येतो.

भारतातल्या सर्वात भयानक नरभक्षक जनावराचा अंत झाला. पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या वाघिणीचं सर्वात खुंखार नरभक्षक म्हणून नाव सामील झालं. तिने एकूण माणसे मारली होती 436!! अक्षरी- चारशे छत्तीस. आणि हा सरकारी आकडा आहे.

या नंतर कुमाऊच्याच जंगलात रुद्राप्रयागला एक बिबळ्या असाच माणसे मारायला चटावला होता. केदारनाथ-बद्रीनाथच्या यात्रेला जाणाऱ्या लोकांवर हल्ले करून 130च्या वर माणसाना खाणाऱ्या ह्या नरभक्षकाला देखील जिमने मारलं.

jim-corbett-and-the-rudraprayag-leopard-marathipizza
रुद्रप्रयागचा बिबळ्या. सोबत जिम कॉर्बेट.

पोवालगडचा ‘बॅचलर’ देखील जिमचा बळी ठरला. भारतात अनेक नरभक्षक होऊन गेले. भीमाशंकरच्या जंगलात 100च्या जवळपास माणसाना क्रूरपणे मारून खाणाऱ्या वाघाला किनिथ अँडरसनने मोठ्या मुश्किलीने यमसदनी पाठवलं. जुन्या गोष्टी कशाला? 2011 साली रणथंभोर अभयारण्यातला ‘T24’ असाच धिटावला. लोकांनी दिलेलं नाव ‘उस्ताद’. एक फॉरेस्ट गार्ड, एक गाईड आणि 2 गावकऱ्यांना त्याने भरदिवसा फाडला! वन अधिकाऱ्यांनी कसं बसं त्याला पाकडलं! हा वाघ अत्यंत चिडखोर आहे. सफारीसाठी फिरणाऱ्या जीपवर हा सरळ हल्ले करायचा. माणूस दिसला कि अंगावर धावून जायचा. साडे दहा फूट लांबीचा हा भलामोठा वाघ सध्या उदयपुरच्या प्राणीसंग्रहालयाची शोभा वाढवतोय.

t24 ustad marathipizza
रणथंभोर अभयारण्यातला T24 उर्फ “उस्ताद”. उस्ताद समोर असताना गाड्या लांबवरच जागच्या जागी थांबवाव्या लागत. उस्ताद जंगलात आपल्या मार्गाने निघून गेल्यानंतरच गाड्या पूर्ववत पुढे जात.
स्रोत: sujanluxury.com | Anjali & Jaisal Singh

सुंदरबनच्या किचकट भयाण अरण्यात आजही नरभक्षक वावरतात. जंगलात लाकडं तोडायला जाणाऱ्या माणसाना भर दिवसा फरफटत नेतात. लाकडं तोडताना येणारा “खट खट्ट” आवाज म्हणजे भोजन हे त्यांना आता व्यावस्थित माहित झालंय…

माणसं मारणाऱ्या याहून भयाण 2 सिंहांची आणि कॅमेऱ्याने टिपलेल्या एका नरभक्षकाची विदारक गोष्ट पुढच्या भागात!

क्रमशः

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 27 posts and counting.See all posts by suraj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?