शिक्षण : धोरण, उद्दिष्ट आणि गफलती! भाग २

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: शिक्षण: धोरण आणि उद्दिष्ट ! भाग १

===

सांस्कृतिक उद्दिष्ट म्हणजेच सांस्कृतिक तसेच मूल्य शिक्षण –

आतापर्यंत आपण पाहिलेली उद्दिष्ट हि तशी वैयक्तिक किंवा कौटुंबिक अशी होती, पण आताचे हे उद्दिष्ट समष्टी करता असून ते मुलभूत उद्दिष्टांमध्ये का समाविष्ट केले आहे? असा प्रश्नदेखील कुणाला पडू शकतो. आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून हे लक्षात आलेलं असेलच की शिक्षण आणि शैक्षणिक धोरण म्हणजे केवळ अभ्यासक्रम त्याची आखणी आणि लोकांना किमान साक्षर करण्याचा एक सरकारी कार्यक्रम एवढच त्याच स्वरूप असून चालत नाही. प्रत्यक्षात ते तस कधी असतं असं ही नाही.

विशेषतः भारतासारख्या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या आणि लोकशाही अजून पुरेश्या प्रमाणात न रुजलेल्या महाकाय देशाला शिक्षण आणि सांस्कृतिक शिक्षण ह्यांची सांगड घालावीच लागेल. “जवळपास ६००० वर्षांपासून अस्तित्वात असलेली आपली संस्कृती विविधतेने नटलेली आहे.” असे एक तद्दन गल्लाभरू, टाळ्या खेचणारे वाक्य आपण नेहमी ऐकतो आणि त्यात खोटे असे काहीही नाही. पण विविधते बरोबर पुष्कळशी विस्कळीत अशी हि आपली संस्कृती/ समाज रचना आहे. राष्ट्र हि संकल्पना मूळची युरोपियन, तशी बरीच अर्वाचीन पण आपण धर्म, संस्कृती, वंश अशा इतर बऱ्याच जुन्या गोष्टींच्या आधारावर सुद्धा कधी एकसंध राहिलेलो नाही. जगातले इतर बरेच देश आधी वंश, धर्म, भाषा अशा गोष्टींच्या आधारे एकजूट होऊन पुढे त्याचे रुपांतर एक राष्ट्रात झालेले आढळून येईल. एक ‘चंद्रगुप्त- चाणक्य’ ह्याचे अपवादात्मक उदाहरण सोडले तर अखिल भारतीय एकछत्री राज्ययंत्रणेचे एकही उदाहरण आपल्याकडे नाही. त्यातून ७ व्या शतकातल्या मुस्लीम आक्रमणापासून गेली जवळपास १४०० वर्षे आपला समाज सतत संघर्षरत राहिलेला आहेच, पण जवळपास तेव्हापासूनच संक्रमणशीलही आहे. हि संक्रमणाची प्रक्रिया गेली १४ शतकं सतत चालू आहे आणि अजून पुढची काही शतक तरी चालूच राहील असे सद्यस्थितीच्या होणारया आकलनावरून मला तरी वाटते.

Integrated-India-marathipizza
dunklinfire.com

ह्या सगळ्याचा एक दुष्परिणाम म्हणजे आपल्या मध्ये अंगभूत असलेला एकीचा किंवा एकीच्या भावनेचा अभाव. (दुसरा दुष्परिणाम म्हणजे असमानता आणि उच्च-नीच, स्पृश्य अस्पृश्य अशा समाज विघातक गोष्टींना मिळालेले धार्मिक / सांस्कृतिक अधिष्ठान.) राष्ट्र ह्या आधुनिक संकल्पनेला घेऊन जगायचे आणि जगात वावरायचे असेल राष्ट्रीय एकात्मता हि अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपली संस्कृती गेल्या दीड हजार वर्षाच्या संघर्षात तरी नष्ट झालेली नाही. उलट आज कधी नव्हे ती आज एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था म्हणून विजीगिषु वृत्तीने हुंकार भरत आहे. आजपर्यंतच्या इतिहासात कधी नव्हती एवढी लोकसंख्या भारतीय संस्कृती मध्ये तुलनात्मक दृष्ट्या शांततेत आणि गुण्या गोविंदाने नांदतेय. त्यामुळे मी तिच्या अस्तित्वाची चिंता अजिबात करीत नाही. पण हीच धर्म आणि संस्कृती आजपर्यंत तरी आपल्यात एकीची भावना प्रदीप्त करू शकलेली नाही, त्यामुळे कुठल्याही पक्षाचे असो पण भारतात राज्य करणाऱ्या कुठल्याही शासनाला राष्ट्रीय एकात्मतेच्या अखिल भारतीय कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी राष्ट्रीय शिक्षण आणि शैक्षणिक धोरणाकडे एक हत्यार म्हणून पाहावेच लागते. राष्ट्रीय एकात्मता हि काही एक दोन वर्षात साध्य होणारी गोष्ट नाही. तो किमान २-३ शतकांचा कार्यक्रम असू शकतो. (आज ७०-८० वर्षानंतर आपला समाज जशा प्रकारे एकसंध झालेला दिसतो आहे त्यावरून तरी हा कार्यक्रम खूपच लांबणार आहे असं वाटतं)

तुम्ही खाजगी शाळात मुलांना पाठवा किंवा शासकीय, ह्या गोष्टी पासून तुमची, तुमच्या मुलांची सुटका नाही आणि का असावी? हि काही कैद नाही. माणूस हा कोशात जगणारा प्राणी नाही. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची दिशा एकांगी असत नाही. (पालक तशी करायचा प्रयत्न करतात आणि घोळ होतात) आपण जिथे जन्मलो तिथल्या सांस्कृतिक, धार्मिक रुढींचा प्रभाव आपल्यावर पडत असतोच. मग तो प्रभाव काही विधायक बाबी/गुण मुलांमध्य रुजवेल असे पाहणे जास्त योग्य नाही का?! तंत्रज्ञानातल्या विकासाच्या स्फोटामुळे जग जवळ आल्यापासून हि माणसा-माणसातील सांस्कृतिक वीण अधिकाधिक घट्ट आणि कमालीची गुंतागुंतीची होऊ लागली आहे. गल्ली बोळातले अभिनिवेश आम्ही जागतिक पातळीवर नेऊन नाचवू लागलो आहोत. माकडाच्या हाती कोलीत मिळण्याचाच हा प्रकार काहीसा आहे पण त्याला आता तरी इलाज नाही.

आमच्या काळी शाळेत एखादा मारवाडी किंवा उडुपी आणि एखाद दुसरा मुसलमान अन् जैन ( जैनांना आम्ही हिंदूच समजत असू फक्त मुसलमान आपल्याहून वेगळा धर्म आहे हे माहिती होते.) मुलगा /मुलगी असे आणि ते उत्तम मराठी बोलत माझ्या मुलीच्या वर्गातले किमान ५५ ते ६० % विद्यार्थी अमहाराष्ट्रीय आहेत. त्यांच्या भाषा, त्यांचे सण उत्सव  चालीरीती सगळं सगळ तिला माहिती होतंय.तिचा सांस्कृतिक जीवन समृद्ध होतंय, पण त्याच बरोबर अनेक गोंधळ, अपसमज वाईट अनिष्ट चालीरीती तिच्या वर कळत नकळत संस्कार करताहेत. तिची आणि तिच्या पिढीची सांस्कृतिक जडण घडण सर्वसमावेशक तर होतेय पण त्याला विधायक वळण मिळेलच हे सुनिश्चित कोण करणार ? प्रचलित शिक्षण पद्धतीकडे ह्याची उत्तरं नाहीत. असतील तर मला ती माहित नाहीत. जसे मित्र मैत्रीणी मिळतील तशी आजची पिढी हे शिक्षण घेत पुढे जात आहे. भारतातल्याच नव्हे तर जगातल्या निरनिराळ्या धर्म पंथ भाषा वंश राष्ट्रीयत्व ह्यामध्य विभागलेल्या लोकासमुहांमधल्या वैमनस्याचा त्यांच्या वर काहीही अनिष्ट परिणाम होणार नाही अशी फक्त अशा करणे आणि काही एक व्यवस्थित शैक्षणिक धोरण न आखणे हे अत्यंत घातक आहे आणि आज तेच होतंय.

indian-schools-marathipizza01
bdmi.org

आजच्या घडीला अख्ख्या होल वर्ल्ड मध्ये ७ अब्ज लोक राहतात. ही संख्या आजपर्यंत ह्या जगाच्या पाठीवर नाचून गेलेल्या सर्व मानव, आदिमानवाच्या एकत्रित संख्येच्या कितीतरी पट अधिक आहे. विज्ञान तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने पुढे पुढे जात आहे कि भले भले त्याबरोबर धावता धावता उरी फुटूनमागे पडत जातायत. भारतात तलवार ढाली घेऊन युद्ध करणारे लोक बाबराने तोफा आणे पर्यंत आणि नंतरही अनेक शतकं तलवारी वापरत होते, पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झालेली दोन महायुद्ध एकमेकांपासून फक्त २१ वर्ष दूर असताना युद्ध तंत्रात किती प्रचंड फरक पडला होता ? आणि आज तर काय अवस्था आहे.

आम्ही दहावीत असताना काहीतरी नवे शिकायचे म्हणून कॉम्पुटर क्लास लावला तेव्हा विंडोज नुकतेच आलेले होते आणि आम्ही वर्ड स्टार, लोटस असली softwares शिकत होतो. आज ती कुणाला माहीतही नसतील. फोन, tv, कॉम्पुटर ह्या क्षेत्रात झालेली प्रगती उल्लेखनीय नाही तर झंझावाती आहे. दिल्लीच्या काकांना किंवा अमेरिकेत शिकायला गेलेल्या मुलाशी बोलायला STD ISD बूथ वर रांगा लावणारे लोक केव्हाच रांगा सोडून गेले. माझी पिढी १९८३ ते १९९३ ह्या काळात शाळेत गेली, तेव्हा आम्ही जसे जगत होतो तसे आज जगतो काय.?विचार करा आज पहिली ,दुसरी मध्ये शिकणारा मुलगा मुलगी साधारण २०७०-७५ मध्ये निवृत्त होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढीचा वेग हा त्यांच्या पुढे कोणती नवी आव्हान तयार करणार आहे, हे आपण आज इथे बसून कल्पना करून नाही सांगू शकतं, पण ह्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जडण घडणी वर प्रचंड ताण येणार आहेत (माझी आजी नऊवारी पातळ सोडून पाचवारी साडी नेसू लागली किंवा माझी आई M80 चालवू लागली, तेव्हा आमच्या नातेवाईकांमध्ये अरे बापरे आता आलीच जगबुडी अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.) कमीत कमी भारतात तरी (इतर देशांचे मला माहिती नाही पण मला वाटते तिथे काही फार वेगळी परिस्थिती नसेल, शेवटी माणूस इथून तिथून सारखाच, नाहीका?) माणसांच्या धार्मिक, सांस्कृतिक समजुती आणि अभिनिवेश फार कर्मठ असतात. शिवाय इतरांच्या चालीरीती परंपरांबद्दल ठार अज्ञान अन त्यावर आधारलेली टोकाची दुराग्रही मते ही तर आमच्या भारतीयत्वाचा पाया. “जिथे जाणार नाही साधी बैलगाडी तिथे पोहोचणार मारवाडी” हि आणि अशासारखी म्हण किंवा सर्व दक्षिण भारतीय म्हणजे मद्रासी आणि राजस्थानातले सगळे लोक मारवाडी हा आमच्या सांस्कृतिक विवेचनाचा आणि आकलनाचा पाया.

आमच्या आई वडिलांनी (म्हणजे आधीच्या पिढीतल्या पालकांनी) हेच आम्हाला सांस्कृतिक शिक्षण दिले. आधीच्या पिढी पर्यंत ठीक होत (खरंतर नव्हत, पण आता काय इलाज!) पण आता हे चालणार नाही. एकमेकांबद्दल ठार अज्ञान आणि एक प्रकारचा वैरभाव, दुराग्रह घेऊन जगता येणार नाही. आपल्या मुलांना अधिक अधिक समजूतदार आणि संवेदनशील व्हावे लागेल. विज्ञान रोज नवी नवी सत्य आणि शोध मूल्य म्हणून प्रस्थापित करतेय आणि त्याभोवती अभावितपणे आपले हितसंबंध तयार होतात. पूर्वी नवरात्रीत आमच्या कंपनीत काही मुली आणि मुलं पायात चप्पल/जोडे न घालता येतं, त्यांच्या धार्मिक समजुतीचा भाग म्हणून, पण त्यांना सांगावे लागले कि कंपनीच्या सेफ्टी पोलिसी मध्ये हे बसत नाही. एक तर सेफ्टीशूज घाला किंवा घरी जा. सगळ्यांनी निमूट सेफ्टीशूज घातले, पण नोकरी एकानेही सोडली नाही. अनवाणी चालणे चूक कि बरोबर हा प्रश्न नाही. ते चूकच पण पूर्वी लोक ऐकत नसतं, आता पटो अथवा ना पटो निदान कामावर तरी शूज घालून येतात. धार्मिक अंधश्रद्धा पेक्षा शास्त्रीय ज्ञानावर आधारलेली सुरक्षा पॉलिसी त्यांना पटते असे नाही पण त्यांना मान तुकवावी लागते.. अनवाणी असताना देवी आमच्या पायाला काही लागू देणार नाही असे कोणी म्हटलं नाही.  स्वच्छता आणि सुरक्षितता एक संकल्पना नाही तर व्यवस्थित मूल्य म्हणून प्रस्थापित झालीये आणि तिथे तडजोड करणे अवघड होत जातेय.

indian-schools-marathipizza02

पुण्या मुंबईसारख्या शहरांमधून आपल्या मुलांचे भावी शेजारी पाजारी सहकारी आपल्या सारख्या वातावरणातूनच आलेले असतील असे नाही. आपली मुलंही पुढे त्यांना संपूर्ण नवख्या, अनोळखी समाजात जाऊन राहू शकतात. त्यांच्या आपल्या चालीरीती नुसत्या भिन्न असतील असे नाही तर त्यात विरोधाभासही असेल, एकमेकांना छेद देणाऱ्या समजुती असतील. तेव्हा आपली पुढची पिढी अधिक संवेदनशील अन सहिष्णू असणे गरजेचे आहे. त्यांना आपल्याला तसे बनवावे लागेल. जग सोडा आपण आपल्या भारतातील सगळ्या परंपरा, त्यांच्यातील अंतर्विरोध, त्यांची उपयुक्तता (आणि बऱ्याचदा निरुपयोगीता) सांगू शकणार नाही पण आपण त्यांना सहिष्णू, समजूतदार नक्कीच बनवू शकतो. समोरच्याला समजून घेऊन त्याच्यातल्या आपल्याला आवडत्या नावडत्या गोष्टीसकट स्वीकारणे त्यांना शिकवावे लागेल. प्रचलित शिक्षण पद्धती हे करेल असे वाटत नाही. खरेतर शाळेत म्हटल्या जाणाऱ्या  “भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत… “ ह्या प्रतिज्ञेत हा मुद्दा व्यवस्थित आलेला आहे, पण … हा पण महत्वाचा आहे.

आजची शिक्षण पद्धती भविष्यातील आव्हानं पेलण्यासाठी मुलांना नक्की कशी तयार करणार? ह्याचा conclusive algorithm माझ्याकडे नाही. ह्याचा विचार आता आपण पालकांनी केला पाहिजे की नको?! कारण ही आपली मुलं आहेत त्यांच्या भल्याचा विचार सरकार आणि शिक्षण तज्ञ करतील न करतील, पण आपल्याला मात्र तो केलाच पाहिजे. (त्या करता तर हा लेखन प्रपंच सुरु केला आहे.)

क्रमश:

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?