अख्खी क्रिकेट मॅच खरच फिक्स होते का? हे नक्की वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

मॅच फिक्सिंग – खासकरून क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग हा नेहेमीच फॅन्स मधील चर्चेचा विषय. हातात आलेली मॅच बघता बघता हरणे किंवा  अगदी पूर्वनियोजित असल्यासारख्या विकेट्स/रन्स चा पाऊस पडणे असं काही घडलं की क्रिकेट चाहत्यांचा राग अनावर होतो आणि मॅच फिक्सिंग चे आरोप होतात.

पण खरंच असं अख्खी मॅच फिक्स होणं शक्य आहे का? पाहूया एका जुन्या मॅचच्या उदाहरणाने…!

===

२०१७ च्या आयपीएल फायनलचा सामना अतिशय अटीतटीचा झाला आणि अवघ्या एका धावेने रायजिंग पुणे सुपरजायंट्सला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले आणि ज्यांच्या हातातून सामना गेला असे वाटत होते, त्या मुंबई इंडियन्सने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

पुणे संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल ३ वेळा मुंबई सारख्या बलाढ्य संघाला हरवले. त्यांना थेट फायनल मध्ये जाण्यापासून रोखले आणि स्वत: फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.

फायनल मध्ये पुन्हा एकदा मुंबईचा संघ समोर आला असता, पुण्याने अवघ्या १२९ रन्समध्ये मुंबईला थोपवत पुन्हा एकदा कमाल करून दाखवली.

 

superjaints inmarathi
Sportskeeda.com

फक्त १३० रन्सचे लक्ष्य ते देखील रायजिंग पुणे सुपरजायंट्स सारख्या संघाला पेलवणार नाही असे कोणालाच वाटले नव्हते, कारण त्यांच्याकडे देखील स्फोटक खेळाडू आहेत.

इतरांचं जाऊं द्या त्यांच्याकडे भरवश्याचा मॅचविनर महेंद्रसिंग धोनी होता, त्यामुळे मुंबईने कितीही प्रयत्न केले तरी ते जिंकणार नाही हे पुणेकरांनाच काय तर असंख्य मुंबईकरांना देखील वाटत होते.

पण जस जशी पुण्याची इनिंग सुरु झाली, क्षणाक्षणाला मॅच पालटू लागली आणि पुण्याच्या धावांच्या घोड्याला पायबंद बसला तेव्हा मात्र मुंबई जिंकणार अश्या आशा पल्लवित झाल्या आणि शेवटी तेच झाले, मुंबई इंडियन्सने फक्त १ रन्सने पुण्याला नमवले.

झालं आणि इथून खरी क्रिकेट रसिकांच्या मनात हळूहळू संशयाने जागा घेण्यास सुरुवात केली.

ही संपूर्ण मॅच फिक्स होती, मुंबई जिंकणार हे आधीच ठरलं होतं, पुण्याने पैसे खाल्ले, मुंबईने चीटिंग केली, अंबानीचा पैसा यात लागला होता..वगैरे वगैरे आरोपांना अगदी उधाण आले.

 

ipl-fixing-marathipizza01
deccanchronicle.com

पण खरंच असं होऊ शकतं का हो? संपूर्ण मॅच खरंच फिक्स करता येऊ शकते का? तर नाही.. संपूर्ण IPL मॅच फिक्स करता येऊच शकत नाही.

हो, पण हे खरं आहे की मॅच मधील प्लेयर फिक्स करता येतात, पण संपूर्ण मॅच फिक्स करण्यासाठी काहीच चान्स नाही.

इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंग यांमध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. यापूर्वी आयपीएलमधून स्पॉट फिक्सिंगची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्यांना त्याची शिक्षा देखील झाली आहे.

पण एक-दोन खेळाडू जर फिक्स असतील, तर याचा अर्थ संपूर्ण मॅचच फिक्स आहे असा घेता येत नाही.

संपूर्ण मॅच फिक्स करायची म्हटली तर खेळणारे सगळे २२ खेळाडू, अम्पायर्स आणि एकंदर सगळी परिस्थिती विकत घ्यावी लागेल/फिक्स करावी लागेल, आता तुम्हीच विचार करा की असे होणे कसे शक्य आहे?

 

ipl-fixing-marathipizza02
sportskeeda.com

अनेक जण म्हणतात की wwe प्रमाणे आयपीएल देखील स्क्रिप्टेड आहे. पण ही देखील निव्वळ अफवा आहे, कारण बॉलर सर्वच्या सर्व बॉल कितीही प्रॅक्टीस करून एका ठिकाणी टाकूच शकत नाही.

बॅट्समन कितीही प्रॅक्टीस करून त्याला हव्या त्या खेळाडूच्या हातात कॅच देऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये कोणत्या बॉलला काय होईल हे सांगता येणे अशक्य आहे.

जे क्रिकेट खेळतात त्यांना तर ही गोष्ट अगदीच माहित असेल. म्हणून तर म्हणतात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, येथील कोणताही बॉल तुमच्या ताब्यात नाही. सगळं काही रियल टाइम आहे.

जे खेळाडू फिक्स असतात ते मुद्दामहून तसे बॉल टाकतात, किंवा मुद्दामहून आपले विकेट फेकतात किंवा कॅचेस सोडतात. आता जर संपूर्ण मॅच फिक्स असेल आणि सगळेच खेळाडू मुद्दामहून ‘गोष्टी’ करायला लागले, तर ते न समजण्याइतपत आपण प्रेक्षक अजिबात मूर्ख नाही.

मुख्य म्हणजे बुकीज आणि फिक्सर देखील कधीही पूर्ण मॅच फिक्स करत नाही, कारण ते त्यांच्या फायद्याचे नाहीच. ते एखादी ठराविक ओव्हर, थ्रो, नो-बॉल किंवा वाईड बॉल फिक्स करतात.

 

ipl-fixing-marathipizza03
indianexpress.com

सध्या अशीही बातमी आहे की हे महाभाग पीच बनवणाऱ्या ग्राउंड स्टाफना फिक्स करतात, पैसे देऊन ज्या टीमला त्यांना जिंकवून द्यायचे आहे त्यांना उपयुक्त होईल असा पीच बनवून घेतात.

या अश्या गोष्टी खेळाडूंना बिलकुल माहित नसतात, ते खेळायला उतरतात आणि परिस्थितीच त्यांच्या विरोधात असल्याने टीम सपोर्टर्सच्या अपेक्षेवर ते उतरू शकत नाही, मग त्यांच्यावर मॅच फिक्सिंगचे वगैरे आरोप होतात.

आयपीएल टीम्समध्ये अनेक मोठी नावे आहेत आणि हे सर्वजण स्वत:च्या खेळानेच पुढे आलेले आहेत, याच खेळाने त्यांना गडगंज पैसा देखील मिळवून दिला आहे.

एवढा पैसा असताना केवळ काही जास्त पैश्यांसाठी एवढे मोठे खेळाडू स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणे शक्य नाही.

तरीही ही शक्यता नाकारता येत नाही की, काही जण पैश्याच्या हव्यासापोटी स्वत:ची निष्ठा विकतात आणि मुद्दाम समोरच्या टीमला फायदा करून देतात.

यंदाच्या आयपीएलमध्ये देखील स्पॉट फिक्सिंग झाली असेल, नाही असे नाही, पण याचा अर्थ आपण प्रेक्षकांनी सर्वच्या सर्व टीमला त्यासाठी जबाबदार धरणे योग्य नाही. आता ही गोष्ट तुम्ही देखील नाकारू शकत नाही की आयपीएल मध्ये कितीतरी विस्मयकारक कॅचेस पकडल्या गेल्या आहेत.

 

ipl-fixing-marathipizza04
quora.com

 

ipl-fixing-marathipizza05
twitter.com

 

ipl-fixing-marathipizza06
zeenews.india.com

या सर्व कॅचेस म्हणजे मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे असे जर कोण म्हणत असेल तर त्याला कोपरापासून नमस्कार!

जर मॅच फिक्स असेल तर एवढी मेहनत हे घेतीलच कश्याला? किंवा यांना अश्या कॅचेस पकडण्यासाठी कोणी पैसे देतं का? किंवा त्यांना माहित असतं आपल्याकडे अशी कॅच येणार आहे, म्हणून ते तशी प्रॅक्टीस करतात?

बऱ्याचदा अश्या कॅचेस पकडून हे खेळाडू आपली फिटनेस धोक्यात घालत असतात.

जर मॅच फिक्स असते तर  जिथे कॅच नाही पकडायची, तिथे चुकून कॅच पकडली किंवा कॅच पकडायची होती, तेथे नाही पकडली तर पुढचं सगळं गणितचं बिनसेल की हो! हीच गोष्ट बॅटिंग, बॉलींग, फिल्डिंग यांना देखील लागू होते.

ज्या टीममध्ये आपण आहोत त्या टीमसाठी अगदी निष्ठेने खेळणाऱ्या या खेळाडूंवर केवळ पराभूत झाल्यामुळे मॅच फिक्सिंगचे आरोप आपण करत असू किंवा विजयी टीमला तुम्ही चीटिंग करून जिंकलात असे आपण म्हणत असू तर आपलं क्रिकेट प्रेम म्हणावं तितक निस्सीम नाहीये.

जिंकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा अगदी खराखुरा असतो, तो खूप काही सांगून जातो. जर तीच मॅच फिक्स असती आणि त्यांना आधीच माहित असते की आपण जिंकणार आहोत तर त्यात खोटेपणाची झालर नक्कीच दिसली असती.

 

ipl-fixing-marathipizza07
telanganatoday.com

तेच हरणाऱ्या टीमचं देखील… खरेपणाने खेळणाऱ्या त्या खेळाडूंना आपल्यापेक्षा वाईट वाटत असतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निराशेचे भाव बरंच काही व्यक्त करतात.

 

ipl-fixing-marathipizza08
hindustantimes.com

याला देखील काही जण अॅक्टिंग म्हणत असतील, तर त्यापेक्षा बिनडोकपणा दुसरा नाही, कारण एवढीच जर लीलया अॅक्टिंग सगळी टीम करत असेल तर गरज काय क्रिकेटर्सची?

मग तर कोणीही उत्तम अभिनेता क्रिकेट खेळू शकतो नाही का? त्यासाठी वर्षानुवर्षे मेहनतीची पण गरज नाही..!

असो, अशी असंख्य उदाहरणे देता येईल आणि संपूर्ण मॅच फिक्स असते, टीम पैसे खाते यांसारख्या थोतांडांना केराची टोपली दाखवता येईल.

अगोदर सांगितल्याप्रमाणे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने आणि आयपीएलचे फॉर्मेट फास्ट क्रिकेटचे असल्याने अनेक सामने अगदी अटीतटीचे होतात, शेवटच्या बॉलपर्यंत जातात, त्यामुळे तुमच्या आमच्या मनात ‘मॅच फिक्स होती का?’ यांसारख्या शंका येतात.

या शंका दूर सारा, कारण असं खरंच काही होत नाही, स्पॉट फिक्सिंगचा अपवाद वगळता संपूर्ण मॅच कधीही फिक्स होत नाही, कारण तसे करणे शक्यच नाही.

 

cricket-marathipizza
linkedin.com

ही गोष्ट केवळ आयपीएलचं नाही तर संपूर्ण क्रिकेटला लागू होते. आपण क्रिकेट रसिक आहोत, चौकार, षटकारांचा आस्वाद घेण आपलं काम!

आपल्या प्रोत्साहनाने मैदानाला मंदिर मानणाऱ्या सच्च्या खेळाडूंना हुरूप येतो, ते अधिक जोमाने खेळतात केवळ आपल्या मनोरंजनासाठी!

अश्या खेळाडूंना असाच पाठींबा देत राहूया, बाकी उगाच २-३ गद्दार खेळाडूंमुळे संपूर्ण टीमला मॅच फिक्सिंगच्या नावाखाली आरोपी बनवणे कितपत योग्य आहे याचा तुम्हीच विचार करा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 54 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?