' “हिंदी येत नाही, मग Refund मिळणार नाही…” लोक म्हणू लागलेत “रिजेक्ट झोमॅटो”! – InMarathi

“हिंदी येत नाही, मग Refund मिळणार नाही…” लोक म्हणू लागलेत “रिजेक्ट झोमॅटो”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

“स्विगी, झोमॅटो ही केवळ चैन राहिली नसून, आता गरज बनली आहे” असं म्हटलं तरी ते कदाचित वावगं ठरणार नाही. हॉटेलला जाण्याऐवजी घरीच हॉटेलमधील खाद्य मागवून घ्यायचा पर्याय हल्ली अनेकजण निवडतात. बॅचलर मंडळींसाठी तर ‘झोमॅटो’सारखा पर्याय म्हणजे जीव की प्राणच!

याच झोमॅटोला नाही म्हणा, असं आता नेटकरी म्हणू लागलेत. “हिंदी येत नाही, मग रिफंड मिळणार नाही” असं जर कुणी म्हणत असेल, तर मग कुणालाही राग येणं साहजिक आहे. पण झोमॅटोने थेट असं म्हटलं आहे का? नक्की काय घडलंय, की नेटकऱ्यांनी ‘रिजेक्ट झोमॅटो’ हा हॅशटॅग ट्रेंडिंग केलाय? बघा तुम्हालाही रुचतंय का, आणि पटतंय का?

 

zomato app inmarathi

 

घडलंय असं की…

तामिळनाडू राज्यात या सगळ्याची सुरुवात झाली. तामिळनाडूमधील विकास या व्यक्तीने झोमॅटोचा प्लॅटफॉर्म वापरून एका हॉटेलातून खाद्यपदार्थ मागवले. यात एक पदार्थ कमी असल्याचं लक्षात येताच, त्याने त्याची किंमत परत करण्याची मागणी केली. त्याची भाषा कळत नसल्याने, ही मागणी अमान्य करण्यात आली. त्याला हिंदी आलंच पाहिजे, अशी झोमॅटोमधील व्यक्तीची अपेक्षा होती.

 

tweet inmarathi

 

“हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, ती सगळ्यांना आलीच पाहिजे” असं झोमॅटोमधील व्यक्ती म्हणत असल्याने, नेटकरी अधिक चिडले आहेत. भारतीय संविधानात अथवा कायद्यात कुठेही हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचा अधिकृत उल्लेख नाही. त्यामुळे झोमॅटोमधील लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, अशी टीकादेखील नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

विकासने यावर केलेली मागणी अगदीच रास्त आहे. तामिळनाडूमध्ये झोमॅटो काम करत असेल, तर त्यांनी आमची भाषा समजणारी व्यक्ती तिथे कामासाठी ठेवायला हवी. त्या व्यक्तीला भाषा कळत नसेल, तर हा त्यांचा अंतर्गत मुद्दा ठरतो. त्यासाठी ग्राहकाला हिंदी येणं आवश्यक आहे, अशी अपेक्षा अत्यंत चुकीची आहे.

 

vikash tweet zomato inmarathi

झोमॅटोने मागितली माफी…

घडलेल्या प्रकाराबद्दल विकासने तक्रार दाखल केली. झोमॅटोचं अधिकृत अकाउंट टॅग करून त्याने ट्विट सुद्धा केलं. हे ट्विट पाहिल्यानंतर, झोमॅटोने या प्रकरणात योग्यप्रकारे लक्ष घातलं. ग्राहक दुखावला जाणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. झोमॅटोशी योग्य संभाषण झाल्यानंतर विकास संतुष्ट आहे, असं सुद्धा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.

माफी मागितली तरीही…

झोमॅटोने माफी मागितली, विकासचा राग सुद्धा कमी झाला असेल मात्र तोवर विकासचं हे ट्विट लोकांनी उचलून धरलं होतं. त्याच्या म्हणण्याला दुजोरा देऊन, ‘रिजेक्ट झोमॅटो’ अशी मागणी जोर धरू लागली होती. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हा मुद्दा तर फारच उचलून धरला गेला. झोमॅटोला लक्ष्य करून नेटकऱ्यांनी त्यांचा राग व्यक्त केलाय असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये.

 

zomato tweet inmarathi

 

या सगळ्याचा थेट परिणाम झोमॅटोच्या सुविधेवर, त्यांच्या ग्राहकसंख्येवर होईलच असं आज म्हणता येणार नाही. पण यापुढे भाषेचा वापर करताना, अशा मोठ्या कंपन्या काळजी घेतील अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.

अशीच मराठी भाषेची मागणी वेगवेगळ्या अॅप्ससंदर्भात महाराष्ट्रातही होताना दिसते. याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय? हेदेखील कमेंटमधून नक्की कळवा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?