' ‘फॉर्म्युला वन’मध्ये भारतीयांना जे आजही जमत नाही, ते त्याने २५ वर्षांपूर्वीच साकार केलंय – InMarathi

‘फॉर्म्युला वन’मध्ये भारतीयांना जे आजही जमत नाही, ते त्याने २५ वर्षांपूर्वीच साकार केलंय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नरेन कार्तिकेयन हे नाव ऐकले नाही असा भारतीय माणूस सापडणे कठीणच! फॉर्म्युला वन रेसिंग हा खेळ आपला नाही, ते श्रीमंत खेळ विदेशी लोकच खेळू जाणे असा आपला समज असतो. या फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये भारतीय नावे देखील आपण फारशी पाहिलेली नसतात. सर्वसामान्य भारतीय लोकांना फॉर्म्युला वनबद्दल माहिती मिळते, ती मायकल शूमाकर, सेबॅस्टियन वेटेल, ल्युईस हॅमिल्टन इतपतच असते.

भारतीय मुले देखील मोठी होताना क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ अशाच खेळांमध्ये रस घेतात. फॉर्म्युला वनमध्ये रस घेऊन त्यात करियर करण्याचे स्वप्न फार कमी मुले बघतात. पण वयाच्या दहाव्या वर्षापासून हे स्वप्न बघणारा आणि ते स्वप्न सत्यात उतरवून फॉर्म्युला वनमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय म्हणजे नरेन कार्तिकेयन होय.

 

narain karthikeyan inmarathi

 

नरेन कार्तिकेयन  हा पहिला आणि एकमेव भारतीय फॉर्म्युला वन रेसर आहे. कोईम्बतूरचा हा मुलगा एक स्वप्न बघतो काय आणि त्याच्यामुळे मोटर स्पोर्ट्सची दारं भारतासाठी उघडतात काय! नरेनचा हा सगळा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. फॉर्म्युला वन रेसर होणे हे आजही भारतीयांसाठी कठीण आहे पण नरेनने हे २५ वर्षांपूर्वी साकार करून दाखवले आहे.

स्वतःच्या या प्रवासाविषयी बोलताना नरेन सांगतो की, तो लहान असतानापासून त्याचे स्वप्न होते की फॉर्म्युला वन रेसिंग ड्रायव्हर व्हावे. अर्थात हे स्वप्न पूर्ण होणे खूप कठीण होते आणि तरीही त्यासाठी वाटेल ती मेहनत घेण्याची त्याची तयारी होती

त्याने ठरवले होते, की काहीही झाले तरीही तो त्याच्या ध्येयापर्यंत पोचेल. त्या मार्गात कितीही अडथळे आले तरीही मागे हटायचे नाही असे त्याने मनाशी पक्के ठरवले होते. या प्रवासात, त्याचे स्वप्न पूर्ण होण्यामागे त्याच्या आईवडिलांचे खूप मोठे योगदान आहे. त्याच्या पाठीशी ते कायम खंबीरपणे उभे राहिले.

 

narain karthikeyan winner inmarathi

 

नरेनचे हे स्वप्न साकार होणे म्हणजे खायचे काम नव्हते. सुरुवातीला त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला.

रेसिंगपर्यंत पोहचण्याचा प्रवास…

कुमार राम नरेन कार्तिकेयनचा जन्म १४ जानेवारी १९७७ रोजी तामिळनाडूच्या कोईम्बतूरला झाला. त्याने त्याचे शालेय शिक्षण स्टेन्स अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कुलमध्ये घेतले. मोटर स्पोर्ट्समध्ये त्याला लहानपणापासूनच रस होता कारण नरेनचे वडील स्वतः एकेकाळी इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियन होते. त्याच्या वडिलांनी साऊथ इंडिया रॅली सात वेळा जिंकली होती. म्हणूनच नरेनला सुद्धा यातच करियर करायचे होते.

भारतातील पहिला फॉर्म्युला वन ड्रायव्हर होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी श्रीपेरुंपुदुर येथे झालेल्या ‘फॉर्म्युला मारुती’मध्ये भाग घेतला होता आणि ही त्याची पहिली रेस असून देखील त्याने ती जिंकली होती.

 

formula maruti inmarathi

 

नरेनच्या पंखांना बळ देण्यासाठी नरेनच्या आईवडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि नंतर नरेन फ्रान्सच्या एल्फ विनफिल्ड रेसिंग स्कुलमध्ये गेला. तिथेही त्याने त्याचे टॅलेंट सिद्ध केले. १९९२ सालच्या फॉर्मुला रेनॉ कार्सच्या पायलट एल्फ कॉम्पिटिशनमध्ये तो उपांत्य फेरीत पोचला. १९९३ सालच्या फॉर्म्युला मारुतीसाठी तो भारतात परत आला आणि त्याच वर्षी त्याने ग्रेट ब्रिटन येथे झालेल्या फॉर्म्युला वॉकसॉल जुनिअर चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला.

यामुळे त्याला युरोपियन रेसिंगचा अनुभव मिळाला आणि त्याने पुढच्या वर्षी देखील त्याच स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले.

१९९४ साली तो युकेला परत गेला आणि त्याने फॉर्म्युला फोर्ड झीटॅक सिरीजमध्ये भाग घेतला. या सिझनमध्ये त्याने पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळवले. पोर्तुगीज ग्रांप्री साठीची ती सपोर्ट रेस होती. त्याने ब्रिटिश फॉर्म्युला फोर्ड विंटर सिरीजमध्येही भाग घेतला आणि युरोपमध्ये चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

 

narain karthikeyan style inmarathi

 

१९९५ साली नरेनने फॉर्म्युला आशिया चॅम्पियनशिपमध्ये चार स्पर्धांत भाग घेतला आणि शाह आलम ,मलेशियाच्या रेसमध्ये त्याने दुसरा क्रमांक पटकावला. १९९६ साली त्याने संपूर्ण सीझनमध्ये भाग घेतला. फॉर्म्युला एशिया इंटरनॅशनल सिरीज जिंकणारा तो पहिला भारतीय आणि पहिला आशियाई रेसर ठरला.

१९९७ च्या सिझनसाठी तो परत ब्रिटनला गेला आणि त्याने ब्रिटिश फॉर्म्युला ओपेल चॅम्पियनशिपमध्ये नेमेसिस मोटरस्पोर्ट टीमकडून भाग घेतला. पोल पोझिशन घेऊन त्याने डॉनिंगटन पार्कची स्पर्धा जिंकली आणि पॉइंट्सच्या शर्यतीत त्याने सहावे स्थान मिळवले.

१९९८ साली नरेनने पहिल्यांदा फॉर्म्युला थ्री चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. यात तो कार्लीन मोटरस्पोर्ट टीमकडून खेळला. तिथेही त्याने चांगली कामगिरी केली. १९९९ साली सुद्धा त्याने या चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि पाच वेळा पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवले. ब्रॅण्ड्स हॅचमध्ये तर दोन वेळा त्याने रेस जिंकली.

या सीझनमध्ये त्याने दोन वेळा पोल पोझिशन, तीन फास्टेस्ट लॅप्स आणि दोन लॅप रेकॉर्ड्सची कमाई केली. सीझनमध्ये त्याने सहावे स्थान मिळवले. त्यानंतर त्याने मकाऊ ग्रांप्रीमध्येही भाग घेतला. ब्रिटिश फॉर्म्युला थ्रीमध्ये कार्लीन टीमला त्यांचे पहिले विजेतेपद मिळवून देणारा नरेनच आहे.

त्यानंतर याच स्पर्धेत कार्लिन टीमचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने २००० सालानंतर कोरिया प्री आणि Spa-Francorchamps या दोन्ही इंटरनॅशनल फॉर्म्युला थ्री रेस जिंकल्या.

 

narain karthikeyan inmarathi

 

नरेनने २००१ साली फॉर्म्युला निपॉन एफ ३००० चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. त्यावर्षी जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा क्रमांकांत त्याने स्थान मिळवले. याच वर्षी त्याने जॅग्वार रेसिंग टीमसाठी सिल्व्हरस्टोन येथे फॉर्म्युला वनसाठी टेस्टिंग केले. अशा रीतीने फॉर्म्युला वन कार चालवणारा तो पहिला भारतीय ठरला.

लोक त्याची कामगिरी बघून प्रभावित झाले आणि त्याला जॉर्डन-होंडा इजे-११ मध्ये टेस्ट ड्राइव्ह करण्याची संधी मिळाली. २००२ साली त्याने टीम टाटा आरसी मोटरस्पोर्टकडून टेलिफोनिका वर्ल्ड सिरीजमध्ये भाग घेतला आणि ब्राझीलच्या इंटरलेगोस सर्किटमध्ये पोल पोझिशन मिळवून फास्टेस्ट नॉन फॉर्म्युला वन लॅप करून दाखवली.

त्यानंतर २००३ साली त्याने सुपरफन्ड वर्ल्ड सिरीजमध्ये दोन रेस जिंकल्या आणि तीन वेळा पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवले. यामुळे त्याला मिनार्डी टीमसाठी फॉर्म्युला वन टेस्ट ड्राइव्ह करण्याची संधी मिळाली. २००४ साली त्याला रेस ड्राइव्हची संधी मिळत होती पण प्रायोजक न मिळू शकल्याने तो भाग घेऊ शकला शकला नाही.

२००५ साली मात्र अखेर त्याने फॉर्म्युला वनमध्ये पदार्पण केले. त्याने जॉर्डन फॉर्म्युला वन टीम बरोबर करार केला आणि २००५ सालच्या फॉर्म्युला वन सीझनमध्ये तो जॉर्डन टीमचा प्रमुख ड्रायव्हर झाला. अशा रीतीने भारताचा पहिला फॉर्म्युला वन ड्रायव्हर होण्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले.

 

karthikeyan inmarathi

 

या सीझनमध्ये त्याने १८ वे स्थान मिळवले. २००७ साली चीनमध्ये झालेल्या एवनजीपी रेसमध्ये त्याने विजेतेपद मिळवले. हे भारताचे पहिले विजेतेपद होते. २००९ साली त्याने 24 hours Le Man मध्ये त्याने तीन वेळा पहिला क्रमांक प्राप्त केला. यावर्षी त्याने तब्बल २२ रेस जिंकल्या.

२०१० साली त्याने Kroger 250 Camping World Truck Series मध्ये पदार्पण केले आणि तेरावे स्थान पटकावले. या स्पर्धेसाठी त्याला “NASCAR Camping World Truck Series Most Popular Driver” हा किताब मिळाला. त्याच्या या कामगिरीसाठी भारत सरकारने त्याचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

त्यानंतर २०१३ च्या ऑटो जीपी सिरीजमध्ये त्याने ५ वेळा जेतेपद, ४ पोल पोझिशन्स मिळवल्या आणि चौथे स्थान मिळवले. त्यानंतर देखील त्याने लक्षणीय कामगिरी करत फॉर्म्युला वन आणि फॉर्म्युला थ्री मध्ये भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावले.

अशा रीतीने नरेन कार्थिकेयनने वेगळे स्वप्न बघत ,त्यासाठी स्वतःला झोकून देऊन मेहनत घेत त्याचे स्वप्न पूर्ण केले आणि देशाचे नाव उंचावले. त्याचा हा प्रवास प्रत्येक भारतीय तरुणासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?