' खरं वाटणार नाही, पण इथे दूध पिण्यासाठी लोकं बारमध्ये जातात, कारण...

खरं वाटणार नाही, पण इथे दूध पिण्यासाठी लोकं बारमध्ये जातात, कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही वर्षांपूर्वी आणि आजही सातारा -सांगली- कोल्हापूर भागात संध्याकाळी ‘म्हशींच्या कट्ट्यांवर’ निरसे दूध पिण्यासाठी झुंबड उडते. तालिम करणे आणि मग दुधाची अख्खी चरवी रिचवणे हा पैलवानांचा रतिब असायचा.

चौकाचौकात असे पैलवानांचे गट घोळका करून पैजा लावून दुधाच्या चरव्या फस्त करताना दिसायचे. दुधाच्या खुराकावर पोसलेली त्यांची देहयष्टी भक्कम आणि उत्साही दिसे.

मधल्या काळात दुधाची जागा शीतपेये आणि मद्य यांनी घेतली होती पण आता पुन्हा तो आणि तसाच चरवीने दूध पिण्याचा ट्रेंड परत आलाय..इतकेच नाही तर मिशांचे आकडे वाढवून पिताना मिशीत अडकलेल दूध, मूठ पालथी करून पुसत मिशीला पीळ देण्याची फॅशनही सध्या इन आहे.

हे झाले आपल्या इथे. परदेशांत, खास करून आफ्रिकन देशांमध्ये जर दूध लोकप्रिय आहे आणि तिथे दारूच्या गूत्यांसारखे दुधाचे बार आहेत असे तुम्हाला संगितले तर? तर तुम्ही नक्कीच डोळे मोठे करत विचाराल, काय राव खरंच का?

 

ravanda milkybar inmarathi.jpg1

 

होय, मित्रांनो खरंच आहे ते. आफ्रिकन देश ‘रवांडा’ मध्ये चक्क बीयरबार सारखे दुधाचे बार आहेत जिथे आपण कुटुंबासोबत जाऊन दुधाचा आणि लस्सीचा आस्वाद घेवू शकतो.

रवांडा मधल्या बार मध्ये नळ सुरू केला, की बीयर ऐवजी नळातून दूध येते आणि तिथले लोक आनंदाने त्या दुधाचा आस्वाद घेतात. त्यांची सकाळच मुळी या मिल्कबार मधील गरम किंवा थंड दुधासोबत होते. काय असेल बरे ही ष्टोरी? तुम्हाला तर प्रश्न पडला असेल ना?

रवांडाची राजधानी किगाली अशा दुधाच्या बारनी भरलेली आहे. लोक आपल्या कुटुंबासह, मित्रांसह या बारमध्ये येतात आणि दुधाचा आस्वाद घेतात. तृप्त तर होतातच, पण आपले आरोग्यही सुरक्षित ठेवतात.

 

ravanda milk inmarathi

 

बारचे पिचर जे पूर्वी बीयरने भरलेले असायचे ते आता दुधाने भरलेले असतात आणि अशा बार मधे जाऊन दुधाचा आस्वाद घेणे हा तिथल्या तरुणवर्गात ही ट्रेंड बनला आहे.

कुरुहिम्बी आणि रवांडातील अशा इतर शेकडो बारमध्ये केवळ एकच पेय मिळतं ते म्हणजे दूध. रवांडामधील या अनन्य स्वरूपाच्या दुग्धालयांमुळे या देशातील अनेक समुदाय एकमेकांशी जोडले गेले आहेत.

 

ravanda milkybar inmarathi

 

नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी एकत्र येण्याकरता, भिन्न पार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये मिसळण्याकरता या दुग्धालयांचा उपयोग होतो.

भल्यामोठ्या धातूच्या पिंपातून ग्लासमध्ये ओतलेलं थंडगार फेसाळ ‘इकिवुगुटो’ (आंबवलेलं दूध) आणि त्यावर मध वा साखर, किंवा मग कपातून समोर आलेलं गरम ‘इन्श्युश्यू’ (उकळवलेलं कच्चं दूध)- हे इथलं पेय.

रवांडातील ७० टक्के लोकसंख्या शेती करते, त्यामुळे ग्रामीण भागात तुमच्याकडे गाय असणे हे आर्थिक संपत्तीसोबतच सामाजिक प्रतिष्ठेचे मानले जाते. रवांडाच्या प्रत्येक सांस्कृतिक गोष्टीमध्ये ‘गाय’ हा महत्वाचा घटक आहे. इतके ते गायीला महत्व देतात.

रवांडातील अनेक पारंपरिक नृत्यप्रकार गाईंपासून स्फूर्ती घेणारे आहेत. रवांडातील बॅले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमुशयायो या नृत्यप्रकारामध्ये स्त्रिया गायींच्या सौम्य हालचालींचं अनुकरण करतात आणि गायींचं सौंदर्य व डौलही यात दाखवला जातो.

गायींना इथे इतका आदर दिला जातो, की लोक त्यांच्या मुलांची नावंही गायींवरून ठेवतात.पंधराव्या शतकापासून १९५४ सालापर्यंत रवांडा मध्ये गायींचा वापर चलन म्हणूनसुद्धा होत होता.

राजे रुदहिग्वा यांनी न्याबिसिन्दू दूध प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर दूधविक्रीचा व्यवसाय मोठा झाला. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प होता. ते लोकांकडून दूध विकत घेत, त्याचा साठा करत आणि विक्री करत. त्याचसोबत चीझ व दही यांसारखी इतर दुग्धजन्य उत्पादनही विकली जाऊ लागली.

ravanda milkbar 1 inmarathi

 

“सुमारे १९०७  च्या आसपास दुकानांमध्ये दूधविक्री सुरू झाली. आधुनिक काळातील मिल्क-बारचे हे पूर्वसुरी होते.पण दुर्दैवाने १९९४ च्या जनसंहारात रवांडातील ९० टक्के गुरांची कत्तल झाली.

ठार झालेल्यांपैकी बहुतांश तुत्सी जातीचे मेंढपाळ आणि गाई पाळणारे होते. ९० च्या दशकाअखेरीला रवांडाने स्वतःची पुनर्उभारणी सुरू केली, तेव्हा आधुनिक दुग्धालयांमध्ये घट्ट असणारं इकिवुगुतो आणि पिवळसर रंगाचं इन्श्युशू हे दुधाचे प्रकार विकले जाऊ लागले. 

देश नरसंहारातून सावरत असताना रवांडा सरकारने अर्थव्यवस्था वाढवण्याचा आणि कुपोषणाशी लढण्याचा मार्ग म्हणून पुन्हा गाईंचा पर्याय निवडला. पुढे येत गेलेल्या संकटातून सावरण्यासाठी रवांडाला दुग्ध व्यवसायाने सावरले.

रवांडा वासीयांना गाई आवडतात. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आखलेल्या गिरिंका योजनेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच इतर परदेशी नेते, संस्था यांनी ही मदत केली आहे, जेणेकरून रवांडा मधील कुपोषणाचे प्रमाण कमी होईल.

 

modi in ravanda inmarathi1

 

इथे सर्वत्र दिसणारे मिल्कबार या कुपोषणाविरुद्धच्या लढ्यातील शिलेदारचे काम करतात.

मित्रांनो..आपल्या भारतात ही अनेक ठिकाणी कुपोषणाची समस्या आहे. समजा तिथे जर दारूचे गुत्ते किंवा बीयर बार ऐवजी असे मिल्क बार सुरू झाले, तर पालथ्या मुठीने मिशीला ताव देत अडकलेल्या दुधाचे थेंब पुसणारे पैलवान पुन्हा दिसू लागतील..नाही का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?