' एकही संवाद नसलेल्या पुष्पक सिनेमाला चक्क कन्नड भाषिक म्हणून सेन्सॉरने पास केलं! – InMarathi

एकही संवाद नसलेल्या पुष्पक सिनेमाला चक्क कन्नड भाषिक म्हणून सेन्सॉरने पास केलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कमल हासनच्या प्रत्येक सिनेमाचा शेवट बघताना डोळ्याच्या कडा ओल्या होतात हे आपण कित्येकदा ऐकलं आहे, आपल्यापैकी कित्येकांनी ती गोष्ट अनुभवलीसुद्धा आहे.

वेळू नायकन, सदमा, चाची ४२०, हे राम, विश्वरूपम, इंडियन आणि असेच बरेच सिनेमे बघताना आपल्याला कमल हासन हा केवढा ताकदीचा नट आहे याची जाणीव पदोपदी होते.

 

kamal haasan inmarathi

 

सदमाच्या शेवटी श्रीदेवीला स्वतःची ओळख पटवून देतानाचा कमल हासन आज नुसता आठवला तरी गहिवरुन येतं.

आपल्याला दाक्षिणात्य भाषा येत नसूनही कमल हासनचे सिनेमे आणि त्यातल्या भावना आपल्याला नेमक्या कळतात आणि ते सिनेमे आपल्या काळजाला भिडतात. साऊथ आणि बॉलिवूड दोन्हीकडच्या चित्रपटसृष्टीत स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या या कलाकाराची कारकीर्द ही फार मोठी आहे.

याच करकीर्दीतला कमल हासनचा असा एक चित्रपट होता, ज्यामध्ये एकही संवाद न म्हणता कमलजी बरंच काही बोलून गेले. तुम्ही अगदी अचूक ओळखलंत, तो सिनेमा म्हणजे पुष्पक!

 

pushpak inmarathi

 

आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण सिनेमात एकही डायलॉग नव्हता तरी हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाने कन्नड भाषिक म्हणून पास केला, आता एकही संवाद नसूनही या सिनेमाला एका कॅटेगरीमध्ये टाकायचं काम फक्त आपल्याच देशात होऊ शकतं.

असो तर तामीळमध्ये पेसुम पदम, तेलुगूमध्ये पुष्पका विमानमू आणि हिंदीत ‘पुष्पक’ या नावाने प्रदर्शित झालेला कमल हासनचा सिनेमा सर्वार्थाने बदल घडवणारा सिनेमा होता.

डार्क कॉमेडी असलेल्या या सिनेमात एकही संवाद नव्हता आणि असा सिनेमा पुन्हा भारतीय चित्रपटसृष्टीत बनलाच नाही. कमल हासन, अमला आणि टीनू आनंद या मुख्य कलाकारांची भूमिका असलेला पुष्पकने प्रेक्षकांच्या मनाला हात घातला होता.

चित्रपट एक डार्क कॉमेडी होताच शिवाय या सिनेमात देशातल्या बेरोजगार तरुणांच्या व्यथासुद्धा खूप बारकाईने आणि प्रभावीपणे दाखवल्या होत्या.

 

pushpak 2 inmarathi

१९८७ सालचा उत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला. सुरुवातीला या सिनेमामध्ये कुणीच पैसे गुंतवायला तयार नव्हतं, पण बऱ्याच काळानंतर निव्वळ ३५ लाखात बनलेल्या या सिनेमाला श्रीनिवास राज यांनी प्रोड्यूस करायचं ठरवलं.

ज्या काळात सिनेमात गाणी असली की सिनेमा सुपरहीट व्हायचा त्या काळात संवाद नसलेला संपूर्ण सिनेमा बनवायचं धाडस या फिल्ममेकर्सनी केलं आणि त्यांच्यामुळेच हा सिनेमा आजच्या पिढीतली मुलंही वारंवार बघतात.

सिनेमात संवाद नसले तरी त्यातलं बॅकग्राऊंड म्युझिक हे इतकं चपखल बसणारं होतं की त्या संगीतामुळे संवादांची उणीव कोणालाच भासली नाही, उलट त्यातल्या म्युझिकने एक वेगळाच माहोल तयार केला जो सिनेमासाठी उपयुक्त ठरला.

सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत प्रथम निलम कोठारी आणि किडनॅपरच्या भूमिकेत अमरिश पुरी यांना घेण्याच्या विचारात दिग्दर्शक होता, पण ते जुळून न आल्याने अमला आणि टीनू आनंद यांची वर्णी लागली.

चित्रपट बॉक्स ऑफिसवर एवढा हीट ठरला की देशभरात त्याची चर्चा होऊ लागली. चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस.राव जेव्हा काही कारणानिमित्त कलकत्ता येथे गेले असताना त्यांची भेट सत्यजीत रे यांच्याशी झाली आणि त्यांनी या सिनेमाचे तोंड भरून कौतुक केले.

 

pushpak film inmarathi

 

या सिनेमातला कमल हासन यांचा रोल चार्ली चॅपलिनच्या सिटी लाईट्स सिनेमातल्या भूमिकेपासून प्रेरित होता हे दिग्दर्शकाने स्पष्ट केले.

सिनेमातले कित्येक सीन्स संवाद नसले तरी लोकांच्या आजही लक्षात आहेत. फुटपाथवर बसलेल्या भिकाऱ्याला जेव्हा रुग्णवाहिकेत नेताना जेव्हा त्या भिकाऱ्याने आयुष्यभर साठवलेले पैसे जेव्हा रस्त्यावर पडतात तेव्हा त्या मृत भिकाऱ्याला तसंच टाकून लोकं पैसे गोळा करायला लागतात तो सीन बघताना आजही मन विषण्ण होतं.

या सिनेमात असलेली लव्ह स्टोरीसुद्धा खऱ्या आयुष्याशी इतकी कनेक्टेड आहे की त्यात कुठलाही फिल्मीपणा तुम्हाला जाणवणारच नाही. बेरोजगार आणि श्रीमंत ही दरी सिनेमात खूप प्रभावीपणे अधोरेखित केली आहे.

शिवाय कमल हासनचे हावभाव बघताना आपण त्या पात्राशी जोडले जातोच इतका कमल यांचा अभिनय दांडगा आहे. खासकरून या सिनेमातल्या लव्ह स्टोरीचा शेवट बघताना तर हमखास डोळ्यात पाणी येतंच.

 

pushpak love story inmarathi

 

बरोजगारी, गरीब – श्रीमंत यांच्यातली दरी, लव्ह स्टोरी, सामाजिक प्रॉब्लेम, आणि एक सस्पेन्स थ्रिलर असे वेगवेगळे प्लॉट संवादाविना एका सिनेमातून मांडता येऊ शकतात आणि तो सिनेमा सुपरहीट ठरू शकतो याचं धडधडीत उदाहरण म्हणजे हा पुष्पक सिनेमा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?