' वजनवाढ ते थकवा…! ‘ही’ ६ लक्षणं सुद्धा थायरॉईडच्या त्रासाची असू शकतात… – InMarathi

वजनवाढ ते थकवा…! ‘ही’ ६ लक्षणं सुद्धा थायरॉईडच्या त्रासाची असू शकतात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

थायरॉईड ग्रंथी ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाची ग्रंथी आहे. आपले मेटाबॉलिजम, शारीरिक वाढ आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण शारीरिक क्रिया या ग्रंथीवर अवलंबून असतात. या ग्रंथीतून स्त्रवणारे हार्मोन्स आपल्या शरीरातील अनेक कार्ये नियंत्रित करतात.

थायरॉईड ग्रंथीतून सतत शरीरात थायरॉईड हॉर्मोन्स रक्तात स्रवले जातात. जर शरीराला जास्त ऊर्जेची गरज असेल, उदाहरणार्थ शारीरिक वाढ होत असताना किंवा बाहेरील तापमान अत्यंत थंड असेल तर किंवा गर्भावस्थेच्या काळात थायरॉईड ग्रंथी अधिक हॉर्मोन्स तयार करते.

थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत चालण्यासाठी आयोडीनच्या योग्य मात्रेची शरीराला आवश्यकता असते. म्हणूनच आपल्या आहारातून योग्य प्रमाणात आयोडीन शरीरात जाणे गरजेचे आहे. शरीरात योग्य प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन्स तयार होण्यासाठी थायरॉईड ग्रंथीला पिट्युटरी ग्रंथीच्या मदतीची आवश्यकता असते.

 

table salt inmarathi

 

पिट्युटरी ग्रंथी थायरॉईड ग्रंथीला संकेत देते की हॉर्मोन्स किती प्रमाणात रक्तात स्रवले जावेत. टी-थ्री आणि टी-फोर हॉर्मोन्सवर आपल्या शरीराचे मेटाबॉलिजम अवलंबून असते. जर शरीरात जास्त प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन्स स्रवले गेले, तरी शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि कमी स्रवले गेले तरी त्याचे विपरीत परिणाम दिसतात.

हायपोथायरॉडिजम किंवा हायपरथायरॉईडीजम हा एक विकार आहे. याची लक्षणे पटकन लक्षात येत नाहीत. थकवा वाटणे, निरुत्साह , वजनात वाढ, अंगावर सूज, थंडी सहन न होणे, बद्धकोष्ठता, चिडचिड किंवा नैराश्य, त्वचा कोरडी पडणे, अनियमित मासिक पाळी, आवाज घोगरा होणे, अंगदुखी, रक्तात कोलेस्टेरॉल-ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण वाढणे, हृदयाचे ठोके कमी होणे ही लक्षणे हायपोथायरॉईडीजमची आहेत.

म्हणजेच तुमच्या शरीरात जर थायरॉईड हॉर्मोन्स कमी प्रमाणात स्रवले जात असतील तर तुम्हाला यापैकी कुठली तरी लक्षणे नक्कीच जाणवतील.

 

thyroid inmarathi

 

आपले शारीरिक कार्य सुरळीत चालण्यासाठी या ग्रंथीचे सुरळीत काम करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच जरी कुठली लक्षणे जाणवत असतील तरी त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला गेलाच पाहिजे. तुम्हालाही जर पुढील लक्षणे जाणवत असतील तर लगेच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

१. थकवा

श्रम केल्यानंतर प्रत्येकालाच थकवा येतो. पण हायपोथायरॉईडीजम किंवा इतर थायरॉईडच्या विकारांमध्ये येणारा थकवा वेगळा असतो.

सामान्य माणसाला थकवा आला, तर त्याला एक दिवस संपूर्ण आराम केल्यावर बरे वाटते. पण ज्या व्यक्तीला थायरॉईड डिसऑर्डर्स असतील त्या व्यक्तींना असा थकवा कायम जाणवतो. खास करून मध्यमवयीन महिलांमध्ये तर हे लक्षण कॉमन आहे.

मेनोपॉजच्या काळात देखील थकवा जाणवतो आणि थायरॉइडच्या विकारांमध्ये देखील थकवा जाणवतो. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या घरातील स्त्रियांना जर सतत थकवा जाणवत असेल तर तो कुठल्या कारणामुळे आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने जाणून घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचे आहे.

 

weakness inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

२. वजनात वाढ

आपल्या वजनाचा थायरॉईडशी खूप जवळचा संबंध असतो. कारण, थायरॉईड हॉर्मोन्सवरच आपल्या शरीराचे मेटाबॉलिजम अवलंबून असते. ज्यांच्या शरीरात थायरॉईड हॉर्मोन्स कमी प्रमाणात स्त्रवले जाते त्यांच्या शरीराचे मेटाबॉलिजम कमी होते आणि त्यामुळे वजनात वाढ होते.

fat-couple-inmarathi

 

जर तुमचा बेसिक मेटाबॉलिक रेट तपासला, तर तुम्हाला हायपोथायरॉइडिजम आहे की नाही याचे डॉक्टर निदान करू शकतात. समतोल आहार घेऊन, व्यायाम करून देखील तुमचे वजन वाढत असेल तर नक्कीच चिंतेची बाब आहे. आणि म्हणूनच तुम्ही लवकर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.

३. वजनात घट

थायरॉईड ग्रंथीचे काम सुरळीत नसेल तर जसे वजन वाढते तसेच ते अचानक कमी देखील होऊ शकते. हायपरथायरॉइडिजममध्ये शरीरात अतिरिक्त प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन्स स्रवले जातात आणि त्यामुळे शरीराचे मेटाबॉलिजम वाढते. परिणामी वजन कमी होऊ लागते.

तुम्हाला खूप भूक लागत असेल आणि तुम्ही पोटभर खाऊन देखील तुमचे वजन कमीच होत असेल तरीही ते नॉर्मल नाही.

 

weight loss inmarathi

 

४. हृदयाचे ठोके कमी होणे

थायरॉइडचा आपल्या हृदयाशी सुद्धा संबंध आहे. जर थायरॉईड हॉर्मोन्स कमी प्रमाणात स्रवले जात असतील तर आपल्या हृदयाचे ठोके कमी होतात. असे बराच काळ होत राहिले तर आपल्या धमन्यांची लवचिकता कमी होते.

यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. तसेच जर थायरॉईड हॉर्मोन्स कमी असतील तर शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील वाढू शकते.

 

cholesterol inmarathi

 

५. हृदयाचे ठोके वाढणे

ज्यांना हायपरथायरॉईडीजमचा त्रास आहे त्यांच्या हृदयाची गती वाढते. हृदयाचे ठोके जलद होतात. यामुळे Atrial fibrillation म्हणजेच हृदयामधील चेंबर्समध्ये ठोके अनियमित पडण्याचा त्रास होऊ शकतो.

हृदयाचे ठोके नेहमी जाणवत नाहीत परंतु अशावेळी आपल्याला छातीत प्रचंड धडधडल्यासारखे वाटते. हृदयाचे जलद पडणारे ठोके तीव्रपणे जाणवतात. जर शरीरात थायरॉईड हॉर्मोन्सचे प्रमाण जास्त झाले, तर उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. तसेच धमन्यांची लवचिकता कमी झाल्याने हृदयाला रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे छातीत कळा येऊ शकतात.

 

heart-attack-inmarathi

 

६. तापमानातील बदलांचा त्रास होणे

जर शरीरात थायरॉईड हॉर्मोन्स कमी स्रवले गेले, तर त्या व्यक्तींच्या शरीराचे तापमान कमी होते. त्यांचे हात पाय गार पडतात. जरी इतरांना उकाडा जाणवत असेल तरी त्यांना थंडी वाजते. वातावरण थोडे जरी थंड झाले तरी त्यांना थंडीचा त्रास होतो कारण त्यांच्या शरीराचे मेटाबॉलिजम बिघडलेले असते आणि शरीराचे नॉर्मल तापमान कायम ठेवण्यासाठी आवश्यक तेवढी ऊर्जा शरीरात तयार होत नाही.

याउलट तर शरीरात थायरॉईड हॉर्मोन्स जास्त प्रमाणात स्रवले गेले असतील तर त्या व्यक्तीच्या शरीराचे मेटॅबोलिजम प्रमाणापेक्षा जास्त असते. यामुळे अशा व्यक्तींना सतत उकाडा जाणवतो. जरी इतरांना वातावरण गार वाटत असले तरी त्यांना उष्णतेचा त्रास होतो आणि घाम येतो.

 

sweating-inmarathi

 

तुम्हालाही यापैकी कुठली लक्षणे जाणवत असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार सुरु करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?