' शरीर खंगलं, प्राण कंठाशी आला: स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीची ५६ वर्षांची झुंज.. – InMarathi

शरीर खंगलं, प्राण कंठाशी आला: स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीची ५६ वर्षांची झुंज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

शरीर थकलं, नव्हे तर ते खंगलं. वर्षानुवर्ष ‘त्या’ एका कागदाची वाट पहाताना दृष्टी आणि आशा दोन्हीही मावळल्या. खरंतर हे अठरा विश्व दारिद्र्य केंव्हाच संपायला हवं होतं, मात्र शासकीय यंत्रणेने शालिनी आजींवर असा काही सूड उगवला की वयाच्या नव्वदीतही ‘कधीतरी न्याय मिळेल’ या एकाच वेड्या आशेवर ती माऊली प्राण कंठाशी आणून वाट पहातीय.

 

grandmother inmarathi

 

खरं तर रोह्याच्या लहानश्या घरात राहणारी शालिनीआजी कुण्या बड्या नेत्याची किंवा सेलिब्रिटीची कुणीच नाही, मात्र स्वतःच्या हक्कासाठी तब्बल ५६ वर्ष अहोरात्र लढणा-या आजींची दखल जेंव्हा प्रत्यक्ष मुंबई उच्चन्यायालयाने घेतली आणि आजींना दाखला देत जेंव्हा न्यायव्यवस्थेने शासनाची कानउघडी केली तेंव्हातरी आजींच्या मागील शुक्लकाष्ट संपेल असं वाटलं होतं, मात्र त्यानंतरही आजींची व्यथा काही संपली नाही.

कोण आहेत शालिनीताई?

स्वातंत्र्य सैनिकांची पत्नी म्हणून ताठ मानेने जगणा-या शालिनीताई! रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहणा-या शालिनीताईंचे पती लक्ष्मण चव्हाण अनेक वर्ष सैन्यात कार्यरत होते,

१९६५ साली पतीचं निधन झालं आणइ शालिनी यांचा आधारच संपला. दुःखाने त्या खचल्या, मात्र थांबल्या नाहीत. पतीच्या माघारीही त्यांनी आपल्या आयुष्याची घडी पुन्हा बसवली. याचदरम्यान त्यांना परिचितांकडून त्यांना पतीच्या पेन्शनबद्दल माहिती मिळाली.

खरंतरं देशातील लाखो महिलांना पतीच्या निधनानंतर फॅमिली पेन्शन सहजरित्या मिळते. मात्र शालिनीताईंचा हाच प्रवास अत्यंत खडतर ठरला.

 

pension inmarathi

 

नियमानुसार त्यांनी प्रक्रिया पुर्ण केली. कागदपत्रही जमवली. स्थानिक कार्यालयांचे उंबरे झिजवले आणि आता अखेर हाती रक्कम मिळले याची वाट पहात राहिल्या. रोज दार वाजलं की याच आशेने त्या धावत दाराबाहेर यायच्या आणि पुन्हा निराश मनाने परतायच्या.

अनेक वर्ष सरूनही पेन्शन मिळेना हे लक्षात आल्यावर त्यांनी हा लढा पुढे सुरु ठेवण्याचा निर्धार केला. फारशी माहिती नसतानाही त्यांनी अनेकांशी संपर्क साधला, पदरचे पैसे खर्च करत तत्कालीन मुख्यमंत्री ते थेट तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्याकडेही दाद मागितली. आजही त्यांच्या उशाखाली ही सगळी कागदपत्र, लिफाफ्यांच्या प्रती सापडतील.

लाल दिव्याची गाडी आली पण…

शासकीय अनास्थेचा कहर म्हणजे यापुर्वी आजींना अनेकदा झेंडावंदनाला बोलवण्यात आलं, स्वातंत्र्यसैनिकाच्या पत्नीच्या हातून झेंडा फडवण्यासाठी उत्सुक असेलल्या शासनाने आजींचा लढा मात्र सहज दुर्लक्षित केला.

घरापुढे लाल दिव्याची गाडी आली, शासकीय कार्यक्रमांसाठी आजींना घेऊन गेली. हे एकदा नव्हे तर तब्बल ३ वेळा घडलं. या तिन्ही वेळा आजींनी कार्यक्रमाच्या निमित्तानेही पेन्शनचा मुद्दा लावून धरला मात्र त्याकडेही सरकारने दुर्लक्ष करत ‘कामापुरती आजी’ ही म्हण सार्थ ठरवली.

 

freedom inmarathi

 

२०१६ सालापासून कुटुंबियांनी, गावातील परिचितांनीही आजींचा हा लढा सुरु ठेवला. अलिबागचे ज्येष्ठ समाजसेवक आहिरे गुरुजी यांच्याकडे मदत मागितली. त्यांनीही आजींची ही मागणी अनेकांपर्यंत पोहोचवली मात्र गुरुजींच्या निधनानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न वा-यावर पडला.

आता वयोमानानुसार आजीही थकल्या, हात-पाय चालेनासे झाले. दृष्टी अधू झाली मात्र तरिही आजही अंथरुणावर खितपत पडलेला देह पतीच्या हक्काच्या पेन्शनची वाट पाहतोय.

न्यायव्यवस्थेने जाब विचारला

‘सामान्य नागरिक काय करू शकतो?’ हा प्रश्न विचारणा-या प्रत्येकासाठी शालिनीआज हे उदाहरण आहेत. पतीच्या पेन्शनसाठी लढणा-या आजींची मागणी थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली.

 

 

court 1 inmarathi

‘पेन्शन’ घेण्याच्या वयात हा अवलिया आपली ‘पॅशन’ जपतोय, खुद्द मोदींनी केले कौतुक!

धमक्या-दबावाला न जुमानता, शेवटपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम होते कॉन्स्टेबल रवींद्र पाटील!

चव्हाण यांच्या निधनानंतर शालिनी यांनी भायखळा कारागृहात अर्ज करून सन १९६५ मध्ये प्रमाणपत्र मिळविले आहे. सन १९९३ मध्ये त्यांनी पेन्शनसाठी अर्ज केला. सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर शालिनी स्वतः सन २००२ मध्ये सरकारच्या संबंधित समितीपुढे हजर झाल्या होत्या. आणि पेन्शन मंजूर झाली आहे असे त्यांना सांगण्यात आले होते. पण अजून त्यांना पेन्शन सुरू झाली नाही.

पेन्शनसह त्यांनी दहा लाख रुपये आर्थिक सहाय्याची मागणी देखील केली होती.

 

order inmarathi

 

आजींनी दाखल केलेल्या याचिकेवरून उच्च न्यायालयाने शासनाला दट्ट्या दिला होता. स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीची पेन्शनसाठी कधीही अडवणूक केली जाऊ नये. कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीची कागदपत्रांअभावी पेन्शन रोखणं किंवा त्यासाठी त्यांना वारंवार शासनाच्या खेपा मारायला लावणं योग्य नाही असंही कोर्टाने निक्षून सांगितलं, मात्र सुचनेच्या या बाताही हवेत विरल्या.

शालिनीआजींसारख्या कित्येक स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. किमान शालिनीताईंचे डोळे  उघडे असेपर्यंत तरी त्यांच्या हाती एकदा तरी हक्काची ही रक्कम नव्हे तर त्यांचा मानसन्मान मिळावा ही आशा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?