' जगातली पहिलीवहिली साडी जी चक्क खाता येते! भारतीय महिलेने केला चमत्कार… – InMarathi

जगातली पहिलीवहिली साडी जी चक्क खाता येते! भारतीय महिलेने केला चमत्कार…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

अलिकडे एक दोन वर्षात पैठणी, दागिने असे देखणे आयसिंग केलेले केक तुम्ही पाहिले असतील. मात्र केरळमधील होम बेकर ॲना एलिझाबेथनं यापुढे एक पाऊल पुढे टाकत, चक्क खाण्यायोग्य अशी साडी बनवून जगातील एका आश्चर्यात भर टाकली आहे. जगभरातून तिच्या साडीचं कौतुक होत आहे.

दाक्षिणात्यांचा महत्त्वाचा सण म्हणजे ओणम. संपूर्ण दक्षिण भारतात ओणम मोठ्या उत्साहात साजरा होतो, विशेषतः केरळमध्ये!

 

onam inmarathi

 

ॲना एलिझाबेथ जॉर्ज यांना दरवर्षी या सणाच्या दिवशी काहीतरी हटके करण्याची सवय आहे. ॲना एक चतुरस्त्र स्त्री आहेत. होम बेकर, फ्लोरिस्ट असणार्‍या ॲना यांना फॅशन डिझायनिंगचीही आवड आहे. तसेच त्या सध्या कॅन्सर आणि न्यूरोबायोलॉजीमध्ये पीएचडी करत आहेत.

अॅना यांना पहिल्यापासूनच स्वयंपाकाची तसेच बेकिंगची खूप आवड आहे. ही आवड त्यांना त्यांच्या आजोळहून लाभली आहे. त्यांचे आजोबा उत्तम स्वयंपाक करत असत. ॲना यांच्या मते आजोबांचं हे कौशल्य आणि आवड त्यांच्यात उतरली आहे. म्हणूनच त्यांनी त्यांच्या फ्लोरल आणि बेकिंग व्यवसायाला आजोबांचं “जेकब” हे नाव दिलेलं आहे.

बेकिंगमधे त्यांना सातत्यानं नवनवीन प्रयोग करायला आवडतं. यंदाचा ओणमही त्यांनी जरा हटके साजरा करायचा ठरवलं. आपल्या बेकिंग कौशल्याचा वापर करून घेत काहीतरी वेगळा पदार्थ बनवावा असा विचार त्यांच्या मनात आला.

 

baking inmarathi

‘काही तरी हटके म्हणजे काय?’ हे मात्र काही केल्या सुचत नसताना, एक दिवस त्यांनी आईला साडी वाळवताना पाहिलं आणि एक जगावेगळी कल्पना मनात रुंजी घालू लागली.

केकवर साडीचं आयसिंग काही नवीन गोष्ट नाही, मात्र आपण जर संपूर्ण साडीच खाण्यायोग बनविली तर? हा विचार त्यांच्या मनात डोकावला आणि मग त्यादृष्टीनं, काय साहित्य वापरता येईल याचा विचार सुरू झाला.

अर्थात खाण्यायोग कापड ही संकल्पना नवीन नाही. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत मात्र साडीचा प्रयोग ॲना यांनीच प्रथम केला.

 

edible fabric inmarathi

 

साडीसाठी काय वापरता येईल याचा विचार करताना एक गोष्ट त्यांना लक्षात आली, की साडेपाच मीटर लांबीची साडी बनवणं आव्हानच होतं.

केरळची ओळख आणि खासियत असणारी कसावू या साडीची त्यांनी निवड केली. ही साडी दुधट पांढर्‍या रंगाची असते आणि त्याला सोनेरी काठ असतात. अंगावर विरळ बुट्ट्या आणि पदरावर माफक डिझाईन असतं.

अशी ही कसावू साडी कशी बनवता येईल यावर चांगलं महिनाभर विचारमंथन केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. दोन किलोची ही साडी बनवायला ॲना यांना संपूर्ण आठवडा लागला. पीएचडीचा अभ्यास सांभाळत त्यांनी हे काम केलं हे विशेष. दिवसभर अभ्यासात घालवल्यानंतर रात्री त्या साडीच्या डिझाईनवर काम करत असत.

 

edible saree inmarathi

 

साडीसाठी त्यांना खाण्यायोग्य असा स्टार्च बेस्ड वेफर पेपर वापरला. हा वेफर पेपर बटाटा किंवा तांदूळ यांच्यातील स्टार्चपासून बनवलेला असतो. ही साडी बनवायला ॲना यांना तब्बल ३० हजार इतका खर्च आला आहे. यासाठी ए-फोर आकाराचे शंभर कागद त्यांना लागले.

यावरच्या सोनेरी जरी वेलबुट्टीसाठी त्यांनी गोल्ड डस्ट लस्टरचा वापर केला. केकवर ज्याप्रमाणे रंग वापरतात त्याप्रमाणेच हे रंग वापरण्यात आले.

पाच मीटरची ही साडी बनवणं अजिबातच सोपं नव्हतं. यासाठी त्यांनी खास प्लॅटफॉर्म बनवला. यावर सर्व पेपर पसरून ते जोडून साडीचं रूप त्यांना देण्यात आलं. मात्र ही साडी बघताना जाणवतं ती त्यातली एकसलगता. कोठेही असं वाटत नाही की हे आठवडाभर चाललेलं काम आहे. अगदी एका बैठकीत बनविल्यासारखा एकसारखेपणा त्यात आहे. यांनी घडवलेला हा चमत्कार अभिनंदनपर आहे, हे अगदी निश्चित!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?