' ब्रिटिश काळापासून भारतीय सैनिकांना संकटकाळी पावणारी ‘हाटकालिका माता’ – InMarathi

ब्रिटिश काळापासून भारतीय सैनिकांना संकटकाळी पावणारी ‘हाटकालिका माता’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्याकडे प्राचीन काळापासूनच शक्तीची उपासना केली जाते. अगदी श्रीराम-श्रीकृष्णाच्या काळापासून शक्तीची उपासना केल्याचे उल्लेख आपल्या ग्रंथांत सापडतात. रावणाबरोबर युद्ध करताना श्रीरामाने देखील शक्तीची उपासना केली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराज देखील तुळजाभवानीचे निस्सीम भक्त होते आणि ते जगदंबेचे नाव कायम घेत असत.

 

Tuljabavani-Temple-InMarathi

 

भारतात सगळीकडेच शक्तीची उपासना केली जाते आणि संपूर्ण भारतात असलेल्या विविध शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी लोक जातात. युद्धात विजय मिळावा तसेच शत्रूचा नाश करण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून देवीची उपासना केली जाते.

शारदीय नवरात्र तसेच चैत्र नवरात्र या दोन नवरात्रींमध्ये आवर्जून देवीची पूजा व उपासना केली जाते. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक सुख समृद्धी ,आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी तसेच दुष्ट शक्ती व व्यक्तींपासून रक्षण मिळावे म्हणून देवीची पूजाअर्चना करतो.

 

navratri-inmarathi
indianaarti.blogspot.com

 

आपले सैनिक बांधव देखील आवर्जून युद्ध किंवा मिशनला जाण्याआधी देवळात जाऊन देवीचे दर्शन आवर्जून घेतात. देशाचे रक्षण करण्यासाठी अधिक बळ मिळावे तसेच शत्रूचा विनाश करण्यासाठी अधिक शक्ती मिळावी म्हणून ते देवीचे दर्शन घेतात.

आपल्या देशात असलेल्या सगळ्याच शक्तिपीठांच्या मागे कुठली ना कुठली पौराणिक किंवा ऐतिहासिक कारणे आहेत. त्यात उत्तराखंड तर देवभूमी म्हणूनच प्रसिद्ध आहे.

केदारनाथ, बद्रीनाथ, जागेश्वर धाम अशी तीर्थस्थाने तसेच ज्योतिर्लिंग उत्तराखंडात आहेत. याच उत्तराखंड मध्ये असे एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे जिथे कालीमाता स्वयंभू प्रकट झाली असे म्हणतात. हे स्थळ हाट कालिका या नावाने प्रसिद्ध आहे. पिथौरागडच्या गंगोलीघाट येथे हे देवस्थान आहे.

 

haatkalika inmarathi 1

 

पौराणिकदृष्ट्या हे शक्तीपीठ खूप महत्वाचे आहे. स्कन्दपुराणातील मानस खंडात या स्थानी असलेल्या देवीचे वर्णन केले आहे. हाट कालिका मंदिराबाबतीत अशी मान्यता आहे की याठिकाणी कालीमाता विश्रांती घेते. म्हणूनच या देवळात शक्तिपीठाच्या जवळ महाकाली देवीचे अंथरूण घातले जाते.

रात्री नीट असलेले हे अंथरूण सकाळी मात्र असे दिसते कि त्यावर खरंच देवीने विश्रांती घेतली आहे. म्हणजेच सकाळी अंथरुण थोडे विस्कटलेले दिसते. भक्तांची अशी श्रद्धा आहे की देवी खरंच रात्री या ठिकाणी विश्रांती घेते. असे म्हणतात की या ठिकाणी जो देवीची मनापासून प्रार्थना करतो त्याला सगळ्या दुःखांपासून , रोगांपासून आणि दारिद्रयापासून मुक्ती मिळते.

कालिका देवी ही देवीचे रौद्ररूप आहे. म्हणूनच युद्धाला जाताना, किंवा लढाईला जाताना आपल्याकडे देवीची उपासना करण्याची पद्धत आहे. हाट कालिका येथे विराजमान असलेली महाकाली देवी ही भारतीय लष्कराच्या कुमाऊं रेजिमेंटची आराध्य देवता आहे. म्हणूनच या रेजिमेंटचे जवान जेव्हाही युद्धावर किंवा एखाद्या महत्वाच्या मिशनसाठी जातात तेव्हा या देवळात येऊन कालिका देवीचे दर्शन आवर्जून घेतात.

तुम्ही या परिसरात गेलात तर या ठिकाणी असणाऱ्या अनेक धर्मशाळांमध्ये कुठल्या ना कुठल्या आर्मी ऑफिसरचे नाव तुम्हाला नक्कीच दिसेल. १९७१ साली आपले पाकिस्तानशी युद्ध झाले होते.

 

haatkalika inmarathi 2

या युद्धानंतर कुमाऊं रेजिमेंटच्या सुभेदार शेर सिंह यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी महाकाली देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. भारतीय लष्कराद्वारे स्थापन केलेली ही पहिली मूर्ती होती.

यानंतर या देवळात १९९४ साली कुमाऊं रेजिमेंटने देवीच्या मोठ्या मूर्तीची स्थापना केली. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे देऊळ बघण्यासारखे आहे. देवळाच्या चारही बाजूला मोठी मोठी देवदारची झाडे आहेत.

या देवळाच्या घंटांपासून ते पाणपोईपर्यंत येथे तुम्हाला अनेक आर्मी अधिकाऱ्यांची नावे लिहिलेली दिसतील. भारतीय लष्करातील जवानांची या देवस्थानी श्रद्धा आहे. म्हणूनच मोठमोठे लष्कर अधिकारी आवर्जून या ठिकाणी देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

 

haatkalika inmarathi 3

 

हाटकालिका देवी कुमाऊं रेजिमेंटची आराध्य देवता असण्यामागे देखील एक रंजक कथा आहे. या ठिकाणचे पुजारी भीम सिंह रावल यांनी  दिलेल्या माहितीप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या बाजूने भारतीय सैन्य देखील युद्धात उतरले होते. (तेव्हा आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते.)

युद्धाच्या दरम्यान पाण्यातून प्रवास करताना जहाजात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने जहाज समुद्रात बुडू लागले. तेव्हा सैन्य अधिकाऱ्यांनी सैनिकांना आपापल्या देवाची प्रार्थना करण्यास सांगितले. कुमाऊं रेजिमेंटचे काही सैनिक या भागातील होते. आणि त्यांची हाटकालिका देवीवर श्रद्धा होती. त्यांनी पूर्ण श्रद्धेने देवीचा जयजयकार केला आणि त्यांचे जहाज किनाऱ्यावर सुखरूप आले.

 

Indian-Army-Operation-Meghdoot 3 InMarathi

 

तेव्हापासून कुमाऊं रेजिमेंटने कालीमातेला आराध्य दैवत मानून तिची उपासना सुरु केली. तेव्हापासून जेव्हाही कुमाऊं रेजिमेंटचे जवान युद्धाला जायला निघतात ते आधी या देवळात येऊन देवीचे दर्शन घेऊन ,तिची प्रार्थना करून मग पुढे जातात. प्रत्येक वर्षी माघ महिन्यात येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी सैनिक आवर्जून येतात. तसेच वर्षभर सुद्धा येथे जवान देवीच्या दर्शनासाठी येत असतात.

हाटकालिका मंदिराची स्थापना आदिगुरू शंकराचार्यांनी केली आहे. शंकराचार्य कूर्मांचलाच्या भ्रमणावर निघाले होते. जागेश्वर धामला पोचल्यानंतर त्यांना कळले की गंगोली येथे देवीचा प्रकोप झाला आहे. शंकराचार्यांच्या मनात विचार आला की देवी असे तांडव करून सृष्टी नष्ट करणार नाही, हे कुठल्यातरी असुरी शक्तीचे काम आहे.

 

haatkalika inmarathi 4

लोकांचे रक्षण करण्यासाठी म्हणून ते गंगोलीहाट येथे आले. असे म्हणतात की जेव्हा शंकराचार्य देवळाच्या जवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या पायांना जडत्व आले. ते एक पाऊलही पुढे टाकू शकत नव्हते. तेव्हा त्यांना तिथे एका शक्तीचे अस्तित्व जाणवले. त्यांनी देवीची आराधना केली व देवीचा कोप शांत व्हावा म्हणून क्षमायाचना केली.

देवीची प्रार्थना करत ते पुरातन देवळापर्यंत पोचले आणि त्यांनी पूजाअर्चना करून महाकालीचे रौद्ररूप शांत केले आणि गंगोली क्षेत्रात शांतता प्रस्थापित झाली. तर अश्या प्रकारे देवी आजही भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. म्हणूनच देशविदेशातील लोक आवर्जून या पवित्र स्थानाला भेट देतात. कालिकामाता सैनिकांसह आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि सगळ्या संकटांपासून आपले रक्षण करो हीच या नवरात्रीत देवीकडे प्रार्थना!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?