' खिल्ली उडवल्या जाणाऱ्या, या फोटोतील तरुणाच्या संघर्षाची कहाणी थक्क करणारी आहे! – InMarathi

खिल्ली उडवल्या जाणाऱ्या, या फोटोतील तरुणाच्या संघर्षाची कहाणी थक्क करणारी आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – विक्रम एडके

===

आपल्यापैकी अनेकांनी हे छायाचित्र पाहिले असेल. कधी “सरकारी नोकरीचे फायदे” म्हणून तर कधी “लंगूर के हाथ अंगूर” म्हणून. प्रत्येकवेळी त्यातला सूर काळ्या, कुरूप पोराची खिल्ली उडवण्याचाच असणार. इतक्या विद्रुप पोराला एवढी सुंदर, गोरीपान पोरगी कशी मिळाली याबद्दल पोटदुखी व्यक्त करणारा.

 

priya-atlee InMarathi

 

गोऱ्या चमडीचे लोक आमच्यावर राज्य करून निघूनसुद्धा गेले, पण अजूनही गोरा रंग म्हणजेच सौंदर्य, हा वेडगळ विचार काही आमचा जात नाही. त्यातून टिव्हीवर रोज त्या बिनकामाच्या फेअरनेस क्रिम्सचा मारा असतोच!

अमुक क्रिम लावा, यशस्वी व्हाल. तमुक क्रिम वापरा, सगळं काही मनासारखं घडून येईल! क्रिम्स नव्हे, अलादिनचा दिवाच जणू काही!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यातून गोऱ्या, पण अक्कल गुडघ्यात असणाऱ्यांना जो माज यायचा तो येतोच, पण त्याहून वाईट म्हणजे भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात बहुतांश असलेल्या सावळ्या लोकांचा आत्मविश्वास अश्या प्रकारांमुळे उणावतो.

मग सुरू होते ती घुसमट, जिचे रुपांतर न्यूनगंडापासून पार अवसादापर्यंत होऊ शकते.

 

priya-atlee 3 InMarathi

 

वैयक्तिक मी जिथे जिथे या जोडप्याची खिल्ली उडवताना पाहिलीये, त्या त्या प्रत्येक ठिकाणी त्याला कडाडून विरोध केलाय.

त्याच्या दिसण्यावरून त्याची खिल्ली उडवणं वा ती कोण आहे हे देखील ठाऊक नसताना तिने कोणत्यातरी लालसेपायी त्याच्याशी लग्न केल्याचा निष्कर्ष काढणं अन्यायकारक आहे, म्हणून तर मी विरोध करतोच.

पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला त्या तथाकथित कुरूप चेहऱ्याच्या पोराचं कर्तृत्व आणि त्या पोरीचा त्याग, जिद्द, निष्ठा आणि त्या मुलावरचा विश्वास माहितीये, म्हणूनही मी विरोध करतो.

छायाचित्रात दिसत असलेल्या या मुलाचं नाव आहे, अरुणकुमार! तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला “अॅटली” म्हणून ओळखतात.

 

atlee 1 InMarathi

 

अॅटली हा एकेकाळी जगद्विख्यात दिग्दर्शक शंकरकडे मदतनिस म्हणून कामाला होता. शंकरचा मेगाब्लॉकबस्टर “यन्धिरन” (२०१०) आणि त्यापाठोपाठ आलेला “नन्बन” (२०१२) दोन्हींसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेय. शंकरसोबत घालवलेल्या ५ वर्षांनी त्याला स्टोरीटेलिंगचे अनेक बारकावे शिकवले.

दरम्यान तो स्वतःचीही एक प्रेमकथा लिहितच होता. एकेदिवशी ती कथा त्याने मास्टर-डिरेक्टर ए. आर. मुरुगादोसला ऐकवली. त्याला ती ऐकताक्षणीच आवडली. मुरुगादोसने प्रोड्युस करण्यासाठी होकार दिल्यावर, अॅटलीने अजूनच जोमाने काम सुरू केले.

आर्या, नयनतारा, जय, नजरिया, सत्यराज वगैरे उत्तम कलाकार मंडळी घेऊन अॅटलीने त्याचा पहिलावहिला चित्रपट बनवला, “राजा राणी” (२०१४).

 

atlee-kumar-marathipizza02

 

बरेच दिवसांत तमिळमध्ये एखादी लव्हस्टोरीच नव्हती आली. “राजा राणी”ने ती पोकळी भरून काढली, तीसुद्धा नवरा-बायकोच्या नात्याचे अलवार पदर उलगडताना! अॅटलीचा हा पहिलाच चित्रपट त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा ५व्या क्रमांकाचा तमिळ चित्रपट ठरला. त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, पुनर्निर्मिती झाली.

या चित्रपटाने दुंदुभि वाजवून सांगितले, अॅटली आलाय!!

“राजा राणी”च्या यशाने अॅटलीचा मार्ग सुकर करून दिला. तो सहजपणे पुढेही लव्हस्टोरी बनवून सेफ खेळू शकत होता. पण अॅटलीने निवडली एक सूडकथा! त्याच्यावर विश्वास दाखवणाऱ्या कलैपुली एस. धनूने हा चित्रपट प्रोड्युस करायचे ठरवले आणि हिरो म्हणून साईन करण्यात आले, विजयला! विजय म्हणजे तमिळ इंडस्ट्रीतले रजनीकांत, अजित वगैरेंच्या खालोखाल मोठे नाव.

तो अभिनेता म्हणून सूर्या, धनुष वा विक्रमच्या आसपासदेखील पोहोचत नाही, पण त्याच्याइतकी जबरदस्त फॅनफॉलोईंग नवीन पिढीत क्वचितच कुणाची असेल. तोही रूढार्थाने काळा आणि कुरुपच बरं का, पण त्याच्यासारखं नृत्य केवळ तोच करू शकतो.

अतिशय शैलीदार, वीजेच्या चपळाईने नाचतो तो. चाहते त्याला आदराने “इलयदळपति” म्हणतात!

पण मुरुगादोसकडे केलेले “दुप्पाकी” (२०१२) आणि “कत्ती” (२०१४) सोडता विजयच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक वर्षांत म्हणावं असं यश पाहिलं नव्हतं. मोठ्या महत्त्वाकांक्षेने बनवलेला त्याचा “पुली” (२०१५) तर चक्क आपटलाच होता! त्यामुळे विजयला साईन करणं ही तशी जोखिमच होती.

तरीही त्यालाच घेऊन अॅटलीने काम सुरू केलं. चित्रपटाला आधी “विजय ५९” अर्थात विजयचा ५९वा चित्रपट म्हणून ओळखलं जात होतं.

यथावकाश त्याचं नामकरण झालं, “थेरी” (२०१६)!!

 

theri-marathipizza

 

१५८ मिनिटे लांबीचा “तेरी” १४ एप्रिल २०१६ ला प्रदर्शित झाला आणि केवळ सहाच दिवसांत त्याने १०० कोटी कमावले! ही काही लहानसहान गोष्ट नव्हे.

हिंदी चित्रपट हजारो थिएटर्समध्ये प्रदर्शित होतात, त्या तुलनेत प्रादेशिक चित्रपटांचे प्रदर्शन बहुतेककरुन मर्यादितच असते. अर्थात आता “बाहूबली”नंतर (२०१७) गणिते बदलतील, पण आपण त्याच्या पूर्वीची गोष्ट पाहात आहोत.

संस्कृतमध्ये म्हणतात, “शिष्यादिच्छेत्पराजयम्”; “तेरी”ने अॅटलीचा गुरू असलेल्या शंकरच्या “यन्धिरन”ने पहिल्या आठवड्यातील कमाईचा केलेला विक्रम साफ मोडला! फ्लॉप जात असलेल्या विजयची एकट्याची ही जादू नव्हती, ही कमाल विजयपेक्षा अधिक अॅटलीचीच म्हणायला हवी.

 

atlee InMarathi

विजयसुद्धा हे पुरेपूर जाणून आहे. त्यामुळेच आपल्या कारकीर्दीतला ६१वा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी त्याने पुन्हा एकवार अॅटलीचीच निवड केलीये. त्याची कथा लिहिताहेत “बाहूबली”चे लेखक व राजमौलीचे वडील असलेले के. व्हि. विजयेंद्र प्रसाद आणि संगीत आहे साक्षात ए. आर. रहमानचे!

छायाचित्रात जी गोड हसणारी मुलगी दिसतेय ना, जिला पाहून लोकांनी अॅटलीच्या दिसण्याची वाट्टेल तशी टर उडवली, ती आहे त्याची धर्मपत्नी प्रिया!

 

priya-atlee 2 InMarathi

 

तिने अॅटलीची तथाकथित सरकारी नोकरी पाहून लग्न केलं का? अॅटलीकडे असलेला पैसा पाहून तिने हावरटपणाने त्याच्या गळ्यात माळ घातली का? अश्याच नाही नाही त्या शंका घेतल्या गेल्याहेत ना प्रियाबद्दल?

पण ते ही खरे नाही!

तिचे खरे नाव कृष्णप्रिया मोहन.

 

atlee-kumar-marathipizza03

 

काही काही सिनेमांमध्ये तिने लहानसहान भूमिका केलेल्या आहेत. सूर्याच्या ब्लॉकबस्टर “सिंगम”मध्ये (२०१०) तिने अनुष्का शेट्टीच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती. त्याहीपूर्वी “विजय टिव्ही”वरील “कना कानूम कानंगळ” (२००६) या गाजलेल्या मालिकेत तिने काम केलेय. तिची आणि अॅटलीची ओळख तेव्हापासूनची आहे.

अॅटली तेव्हा कोण होता? एक शॉर्टफिल्म बनवली होती त्याने केवळ! त्याकाळात प्रिया त्याच्यापेक्षा अधिक कमवत होती. ज्याकाळात अॅटली कुणीच नव्हता, त्याकाळात तिने त्याचे बाह्यरूप नव्हे तर जिद्द पाहिली होती.

तिने त्याच्या पैश्यांकडे वा नोकरीकडे पाहून नाही लग्न केलेले, तर त्याचे लखलखीत कर्तृत्व पाहून लग्न केलेय. तिचा नवरा आज तमिळ इंडस्ट्रीतल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पंगतीत मानाने बसलाय!

 

priya-atlee 1 InMarathi

 

आणि तो तसा बसेलच, यावर इतर कुणाच्याही आधी तिने विश्वास दाखवला म्हणून ती आज त्याची बायको आहे.

गोष्ट फार साधी आहे. आपण सगळेच जरा जास्तच जजमेंटल होऊ लागलो आहोत हल्ली. सोशलमिडियासारखे कोलित हाती लागल्यामुळे आपल्यातल्या असुराला बाहेर पडायला नुसती वाटच मिळते असं नाही, तर चकाट्या पिटणारे व पिटलेल्या चकाट्यांवर टाळ्या देत खिदळणारे समव्यसनीसुद्धा चटकन मिळतात.

एखाद्याच्या दिसण्यावरून त्याची खिल्ली उडवायला ना आपल्याला काही कर्तृत्व लागते ना आपण स्वतः सौंदर्याचे पुतळे असणं गरजेचं असतं. एखाद्याला जरा बरी बायको मिळाली की मनात वेगवेगळ्या स्टोऱ्या रचणाऱ्यांची संख्या काही कमी नाही! आणि आपणच कश्याला, ज्या तमिळनाडूत अॅटली माहिती आहे त्यांनीसुद्धा त्याच्या व प्रियाच्या लग्नाची चेष्टाच केली होती.

तमिळनाडूत सामान्यतः सगळेच काळे असूनसुद्धा!

 

atlee-kumar-marathipizza04

 

ही अशी विरोधाभासात जगणारी माणसं बनलो आहोत आपण. काळे म्हणजे वाईट आणि गोरे म्हणजे परमेश्वराचे अवतार, ही इंग्रजांनी आमच्यावर राज्य करण्यासाठी रुजवलेली कल्पना आपण अजूनही मूर्खासारखी घट्ट कवटाळून बसलो आहोत. त्यामुळेच पोराने गोरीच बायको शोधण्याचा अट्टाहास आपण धरत असतो.

पोरीने जरासा सावळा नवरा केला की एकतर तिच्यात काहीतरी कमतरता असली पाहिजे वा तिने पैसा पाहून लग्न केले असले पाहिजे, हे छातीठोकपणे सांगण्यात आमच्याकडे अनेकांना भूषण वाटतं. अॅटली आणि प्रिया अश्या सर्वच लोकांसाठी सणसणीत चपराक आहेत.

मात्र प्रश्न असा उरतो की, आता तरी तुम्ही आम्ही एखाद्याला त्याच्या बाह्यरूपावरून जोखणे थांबवणार आहोत का?

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?