' सलमान, संजू, रिया, आर्यन खान: बॉलिवूडकरांचा तारणहार मराठी स्टार वकील! – InMarathi

सलमान, संजू, रिया, आर्यन खान: बॉलिवूडकरांचा तारणहार मराठी स्टार वकील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘कानून के हात लंबे होते है’ हे जरी खरं असलं तरी कायद्याच्या हातातून कसं निसटायचं? हे सांगणाऱ्या व्यक्तीही जगात आहेत. अर्थात कायद्याच्याच आधारे आरोपींना सहीसलामत सोडवणाऱ्यांशिवाय बॉलिवूडला गत्यंतर नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

आता हेच बघा ना, सलमान खानवर असलेले आरोप सगळ्या जगाला तोंडपाठ असतानाही ‘तो मी नव्हेच’ म्हणत सलमान नामानिराळा झाला. देशद्रोहाच्या आरोपालाखाली गजाआड असणारा संजुबाबा कमीत कमी शिक्षा भोगून आज उजळ माथ्याने फिरतोय. पण हे सगळं कशाच्या जोरावर?

 

salman sanju inmarathi

 

पैसा? प्रसिद्धी? प्रतिष्ठा? याहूनही महत्वाचं म्हणजे या सेलिब्रिटींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे वकील!

आपल्या अशिलाचे सगळे गुन्हे पोटात घेत त्यांना कायद्याच्या चक्रव्युहातून सोडवणाऱ्या स्टार वकीलांची कमतरता नाही, मात्र त्यातील एक नाव गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत आहे.

बॉलिवूडचा दबंग, संजुबाबा, या सगळ्यांच्याच गुन्ह्यांवर पडदा टाकणारे मराठमोळे वकील अर्थात सतीश मानशिंदे! यापुर्वी अनेक सेलिब्रिटींच्या पाठीशी उभे राहणा-या मानशिंदेंनीच आता शाहरुखचा मुलगा आर्यन खान याचं वकीलपत्र घेतल्याने इतरांप्रमाणेच आर्यनही सहीसलामत सुटणार आणि कायद्यापेक्षा पैसा आणि पॉवर मोठी ठरते हे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध होणार का? हा प्रश्न विचारण्यात येत आहे.

कोण आहेत मानशिंदे?

मुळचे धारवाडचे रहिवासी असलेले सतीश मानशिंदे १९८३ साली मुंबईत आले. नुकतीच वकीलीची पदवी मिळवून आलेले मानशिंदे हे कामाच्या शोधात असतानाच ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्याशी ओळख झाल्याने त्यांचं स्वप्न पुर्ण झालं. त्यानंतर तब्बल १० वर्ष ते जेठमलानी यांचे सहाय्यक म्हणून कार्यरत होते, त्यामुळे गुन्हेगारी, माफिया, ड्रग्स या विषयांत त्यांनी अनेक केसेस जवळून अभ्यासल्या.

 

satish manshinde inmarathi

 

परिणामी अनेक राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी यांच्याशी त्यांचा निकटचा परिचय झाला. यामुळे जेठमलानी यांच्यानंतर सेलिब्रिटींच्या बहुतांश सगळ्या केसेससाठी मानशिंदे यांचाच आग्रह धरला जाऊ लागला.

संजुबाबाचा तारणहार

१९९३ साली मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला अटक झाली आणि त्याच्या बचावपक्षाचे वकीलपत्र मानशिंदे यांना मिळालं. ही त्यांची पहिली हायप्रोफाईल केस. यावेळी मानशिंदेंनी आपल्या हुशारीच्या बळावर संजुला तेंव्हा जामीनही मिळवून दिल्याने ते चर्चेत आले होते.

 

sanju baba inmarathi

 

पुढे २००७ साली अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणीही जेंव्हा संजय दत्तला अटक झाली तेंव्हाही त्यांच्याच नेतृत्वाखाली संजुबाबाला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.

दबंगचा पाठीराखा

२००२ साली दारुच्या नशेत गाडी चालवल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याला अटक करण्यात आली, मात्र त्यावेळीही मानशिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला. असंही बोललं जातं, की मानशिंदेंंनीच आपली केस लढावी असा सलमान खानने हट्ट धरला होता.

 

salman khan inmarathi 1

 

यावेळी सगळे पुरावे असूनही सलमान खानला जामीन मिळवून देण्यात मानशिंदे यशस्वी झाल्याने बॉलिवूडमध्ये मानशिंदेंची चांगलीच चर्चा रंगली होती.

सुशांत सिंग प्रकरणात रियाची बाजु सावरली

अभिनेता सुशांत सिंग राजपुत याच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली. मात्र तेंव्हाही सतीश मानशिंदे यांनी या केसची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली.

रिया आणि तिच्या भावाचे वकीलपत्र घेतल्यानंतर पुढील काही दिवसातच त्यांनी रियाला जामीन मिळवून दिला. याप्रकरणी माानशिंदे यांना प्रचंड विरोध होत असतानाही त्यांनी शेवटपर्यंत आपली बाजू लढवली.

 

riya inmarathi

 

सत्य हे सत्यच राहतं, त्यामुळे रिया निर्दोष सुटणारच असा ठाम विश्वास त्यांनी माध्यमांपुढे व्यक्त केला होता. रियासह तिच्या कुटुंबियांच्याही ते पाठीशी उभे राहिले होते.

पालघर प्रकरणात सरकारी वकील 

हाय प्रोफाईल केसेस सह मानशिंदे यांनी सरकारी वकील म्हणूनही काम केलं आहे. पालघर येथील साधु हत्याकांडात सरकारच्या बाजूने मानशिंदे यांनी युक्तीवाद केला. यावेळी विविध पुराव्यांआधारे त्यांनी ही केस लढवली होती.

आता मिशन आर्यन

अनेक सेलिब्रिटींचा हा तारणहार आता आर्यन खानसाठी लढणार आहे. मानशिंदे यांनी हे वकीलपत्र घेतल्याचं रविवारी जाहीर होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. मानशिंदे यांचा आतातपर्यंतचा इतिहास लक्षात घेता आर्यनला या प्रकरणातून सोडवण्यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतील हे वेगळं सांगायलाच नको.

 

satish m inmarathi

 

शाहरुखची प्रसिद्धी, मुलासाठी पाण्यासारखा पैसा ओतण्याची तयारी आणि सोबतीला मानशिंदेच्या नेतृत्वाखाली काम करणारी तरबेज वकीलांची फौज अशी परफेक्ट स्ट्रॅटर्जी असताना आर्यन खान निर्दोष सुटला तरी आश्चर्य वाटायला नको.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?