' मराठवाड्यात "भावा, जरा शेरवा वाढ" अशी मागणी होत असते! हा 'शेरवा' म्हणजे...

मराठवाड्यात “भावा, जरा शेरवा वाढ” अशी मागणी होत असते! हा ‘शेरवा’ म्हणजे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – अनुप कुलकर्णी 

===

एखादा नवीन शब्द ऐकल्यावर आपण आश्चर्याची प्रतिक्रिया देतो किंवा तो शब्द पहिल्यांदाच ऐकल्याने विनोदी सुद्धा वाटू शकतो. पण स्थानिक भाषेत तो रुळलेला शब्द असल्याने स्थानिकांना त्याचं काही विशेष वाटत नाही. आमच्या मराठवाड्यातला एका अशाच शब्दावर चर्चा सुरू झाली म्हणून ही पोस्ट… तो शब्द म्हणजे शेरवा

ढाब्यावर जेवताना किंवा कुणाच्या शेतात ढवारा असेल, कुणाची कंदुरी असेल तर “भावा, जरा शेरवा वाढ” अशी मागणी होत असते. मग वाढणारा ताटात हवा तेवढा शेरवा वाढतो किंवा आमच्याकडे ढाब्यावर तो अनलिमिटेड मिळत असल्याने वेटर टेबलवर शेरव्याची हंडी किंवा छोटे बकेटच ठेऊन जातो. आपण पळीने लागेल तसं घ्यायचं.

 

 

sherva plate inmarathi

 

शेरवा म्हणजे…

आता शेरवा म्हणजे काय? तर साध्या समजेल अशा भाषेत सांगायचं तर ग्रेव्ही. पण या शेरव्याचा तेवढाच लिमिटेड अर्थ नाही. शेरवा हा खास नजाकतीने बनवलेला पदार्थ असतो. तो काही खास डिशेससाठीच बनवतात. हा अगदी पातळ असतो पण अतिशय टेस्टी असतो.

मुळात आमच्या मराठवाड्यात जास्त तिखट खाल्लं जातं त्यामुळे साहजिकच शेरवा सुद्धा तर्रीदार, जहाल असतो. जहाल असला तरी तो बाधत नाही हे विशेष. आणि ज्यांना जास्त तिखट चालत नाही त्यांच्यासाठी वेगळा कमी तिखट असलेला शेरवा सुद्धा खास वेगळा बनवलेला असतो.

 

 

sherva bucket inmarathi

 

शेरवा हा शोरबा या शब्दाचा अपभ्रंश म्हणता येईल. शोरबा ही मूळ अफगाणी डिश आहे. व्हेजिटेबल स्टॉक किंवा नॉनव्हेज स्टॉक असं त्याचं मूळ रूप. नंतर हा शोरबा मिडल ईस्ट, युरोप आणि भारतीय उपखंडात पसरला आणि त्याने वेगवेगळी रूपे घेतली. पण मुख्य स्वरूप जे पातळ असायला हवं तेच कायम राहिलं.

भारतात मुघल काळात हा शोरबा भरपूर लोकप्रिय झाला. नंतर आदिलशाही, निजामशाही काळात त्याला राजेमहाराजांचा आश्रय लाभला. त्यानंतर सर्वसामान्यांनी सुद्धा आपलंसं केलं.

जेव्हा एखादा शब्द बोलीभाषेत रुळतो तेव्हा बऱ्याचदा बोलण्याच्या सोयीसाठी त्याचा अपभ्रंश केला जातो. निजामशाहीमध्ये शोरबा हा शेरवा नावाने प्रचलित झाला. त्याचे मूळ रूप सुद्धा बदलले. ही बिर्याणीसोबत सर्व्ह करण्याची साईड डिश ठरली. हैद्राबादी बिर्याणी शेरवा आणि रायता या दोन साईड डिश शिवाय अपूर्णच वाटेल.

 

 

biryani and sides inmarathi

 

आपल्याला कल्पना असेलच की स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही काही काळ आमचा मराठवाडा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला.

दीर्घकाळ निजामशाहीच्या अंमलाखाली असल्याने मराठवाड्यात, विशेषतः तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यातील बोलीभाषेवर तेलुगू, कानडी आणि उर्दू या भाषांचा प्रचंड प्रभाव आहे. आम्हाला पुणे, मुंबईपेक्षा हैद्राबाद जवळ आहे. साहजिकच तिकडची संस्कृती जास्त प्रभावी ठरते आणि त्यामुळे आम्ही पातळ ग्रेव्हीला ‘शेरवा’ म्हणतो.

 

 

sherva and bhakri inmarathi

 

शेरवा बिर्याणीसोबत सर्व्ह करतात किंवा चिकन, मटण, अंडाकरीमध्ये मेन डिश म्हणून सर्व्ह करतात. यात मस्त भाकरी वगैरे कुस्करून खायला मजा येते. या शिवाय हा शेरवा तुम्ही वाटीने भुरकून पिऊन एन्जॉय करू शकता. मात्र चिकन मसाला, मटन मसाला अशा शहरी अंगाच्या डिशेसमध्ये थिक ग्रेव्ही असल्याने त्यासोबत शेरवा वेगळा मागवावा लागतो. अर्थात, तो आमच्याकडे कितीही मागितला तरी त्याचे पैसे लावत नाहीत.

सोबतच्या फोटोमध्ये पहिल्या फोटोत मेन डिशमध्ये चिकन शेरवा आणि दुसऱ्या फोटोत मटन खिमा सोबत साईड डिश म्हणून शेरवा दिला आहे. प्रत्येक प्रांताचे खास पदार्थ असतात तशी या शेरव्याची खास टेस्ट तुम्हाला आमच्या भागातच मिळेल. या जमलं तर.

 

sherva collage inmarathi

 

 

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?