' मनसे-भाजप युती: आशाळभूत स्वप्नाळूंना पडद्यामागच्या 'या' खेळींची जाणीवच नाही

मनसे-भाजप युती: आशाळभूत स्वप्नाळूंना पडद्यामागच्या ‘या’ खेळींची जाणीवच नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – केतन जोशी, माध्यम सल्लागार

===

युतीच्या प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक कार्यकर्ते आणि माझे अनेक मित्र एकमेकांना फोन करून भाजप आणि मनसे युती होणार का विचारत आहेत. जर उत्तर नाही असं आलं तर खट्टू होत आहेत आणि उत्तर हो आलं तर आनंदी होत आहेत. किमान निवडणुकीचं राजकारण जिंकायचं असेल तर हा ‘संगम’ व्हायलाच हवा अशी अत्यंत इच्छा असलेला हा वर्ग आहे आणि अशी इच्छा असणं चुकीचं नाही. पण ही युती होणं कठीण दिसतंय होऊ शकत नाही तशी अपेक्षा करून आशेने न पाहणं हेच हिताचं नाही.

का ते सांगतो. (पण त्या आधी हे पूर्णपणे माझं मत आहे. माझी अफिलिएशन्स आणि इतर कोणत्याही गोष्टींच्या चष्म्यातून ह्याकडे पाहू नये हीच विनंती.)

 

bjp and mns inmarathi

 

१) हिंदुत्व या विषयावर युती होईल असं भाकीत सध्या सुरु आहे आणि त्यासाठी २३ जानेवारी २०१९ च्या महा-अधिवेशनात घेतलेली भूमिका ह्याचे दाखले दिले जातात. पण मुळात राज ठाकरे हे हिंदुत्ववादी राजकारण अगदी आधीपासून करत होते. त्यामुळे आत्ताच त्यांनी काही वेगळं केलं आणि म्हणून आता भाजपला साक्षात्कार होईल असं मानणं मलातरी अपुरं वाटतं.

भाजप आणि शिवसेनेची जेंव्हा युती झाली तेंव्हा दोन्ही पक्ष चाचपडत होते आणि भाजपला त्यांचा हिंदुत्वाच्या राजकारणातून पाया विस्तार करताना एक असा साथीदार हवा होता की, जर काही चुकलंच किंवा अंगावर येऊ शकतं असं दिसलं तर ते बिनदिक्त स्वतः अंगावर घेईल असा पार्टनर हवा होता. जो त्यांना शिवसेनेच्या रूपाने मिळाला.

 

devendra udhhav inmarathi

 

आज भाजपचा महाराष्ट्रात पाया विस्तारला आहे. भाजप किमान महाराष्ट्रात तरी १००% हिंदुत्व मुद्दा घेऊन राजकारण करणार नाही कारण त्या मुद्द्याच्या मर्यादांची जाणीव त्यांना आहे. त्यात शेतकरी, कष्टकरी वर्गामध्ये पसरत चाललेली अस्वस्थता ह्याला हॅन्डल करण्यासाठी भाजप हिंदुत्वाचा आधार घेईल अशी शक्यता नाही कारण असं झालं तर सामाजिक-आर्थिक गटांमधले वंचित आपल्यापासून दूर जातील ह्याची जाणीव भाजपला आहे.

२) संख्याबळ हा मुद्दा भाजपसाठी महत्वाचा असतो. कोणाकडे कुठल्या जातसमूहाची, कुठल्या धर्माची मतं आहेत ह्याची पक्की गणितं मांडल्याशिवाय भाजप युती करत नाही. आजच्या घडीला त्यांचं संख्याबळ, त्यांचं संघटनात्मक बळ हे उत्तम आहे आणि भाजप कधीच ‘जाऊ दे थोडंसं दुसऱ्याला असा विचार करत नाही’. किमान नव-भाजप तर नाहीच नाही. तसा विचार ते जर करणारे असते तर माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांनी २०१७ ला फक्त आणि फक्त नाशिक शहरात जाऊनच ‘शहर दत्तक’ घेण्याची घोषणा का केली असेल?

नाशिक, तिथली सत्ता आणि तिथली विकास कामं हा मनसेच्या विस्ताराचा पाया होता, जर नाशिकमध्ये मनसे सत्तेत किंवा सत्तेच्या जवळ राहिली असती तर मनसेचं विस्ताराचं इंजिन पुढे जात राहिलं असतं, त्याचा फायदा मनसेला झाला असता… आणि जे गृहीतक कायम मांडलं जातं की शिवसेनेला चेकमेट करायला मनसेला पुढे करता येईल असं भाजपला वाटतं इत्यादी हे गृहितकच चुकीचं वाटतं कारण मुळात खरंच शिवसेनेला चेकमेट करण्यात भाजपला इच्छा आहे का? हाच विचार आधी करावा लागेल.

 

raj devendra inmarathi

“गेल्या ७ वर्षांत राज ठाकरेंची खिल्ली उडवण्यातच मराठी माणसाने धन्यता मानली!” – वाचा परखड मत

राजसाहेब…कृपया आम्हाला आमचे जुने राज ठाकरे परत द्या ही कळकळीची विनंती!

३) बरं भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतला आहे असं वरवर दिसतंय… पण त्यांची गरज ही लोकसभेला आणि भविष्यात राज्यात लागणार आहे हे भाजपला माहित आहे. आणि दोघांची समसमान ताकद नसेल कदाचित, कारण आयातीमुळे भाजपला सूज आली आहे त्यामुळे ते जरा मसल फुगलेल्या पैलवानासारखे दिसत आहेत हे मान्य. पण शिवसेना हा त्यांचा आधीचा पार्टनर पण बऱ्यापैकी सशक्त आहे. त्यामुळे सेनेबरोबर जेंव्हा केंव्हा भाजप जाईल तेंव्हा त्यांना एक माहिती आहे की ह्या संघटनेची इलेक्टॉराल ताकद आहे आणि त्यामुळे फार मेहनत न करता यश मिळतं.

४) ओबीसी इम्पिरिकल डेटाबद्दल सुप्रीम कोर्टात जी भूमिका केंद्राने घेतली आहे. नितीश कुमार ह्यांनी ओबीसी जातगणना व्हावी अशी मागणी थेट पंतप्रधानांकडे केली आहे. ह्या सगळ्याचा विचार करता अगदीच नितीश कुमार उद्या ओबीसींच्या मुद्द्यावर एनडीए बाहेर पडले (जी शक्यता नाही. कारण नितीश कुमार सत्ता सोडणाऱ्यातले नाहीत) पण कुठल्याही केसमध्ये महाराष्ट्रात ताकद दिली तर १९ खासदार निवडून आणू शकेल आणि बऱ्यापैकी नगरसेवक आणि आमदारांच जाळं असणारा पक्ष भाजप मागे टाकून पुन्हा नव्याने सुरुवात करेल?

५) युती होईल असं वातावरण निर्माण करायचं, वरपासून खालपर्यंत छान भेटीगाठी, मानसन्मान देऊन एकूणच फील गुड द्यायचा, कदाचित सट्ली मदत करायची ठरलं आहे असा भास निर्माण करून ५ जणांच्या खेळात पाचव्या प्लेयरला गाफील ठेवायचं आणि त्याची जी काही ताकद आहे ती हळूच आपल्याकडे आणायची असं असू शकत नाही? कारण २०१९ ला ज्या मोजक्या ठिकाणी युतीच्या प्रतीक्षेतील पक्ष नंबर २ ला होता त्यात बहुतांश ठिकाणी तो भाजपच्या अगेन्स्ट होता.

 

mns bjp inmarathi

 

थोडक्यात तुमची ताकद तुम्हाला न कळताच काढून घ्यायची असा प्रयत्न होणार नाही?

६) युतीचे निर्णय हे खूप वरती होतात आणि हे वरचे नेते राज्यातील ज्या एका प्रबळ नेत्याला, म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना आज देखील मानतात तो नेता ठामपणे नाही नाही नाही असं सांगतोय ह्याचा सिग्नल घ्यायचाच नाही का?

 

devendra inmarathi

 

७) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला ५९ आमदार आणि २५ खासदार असं संख्याबळ असलेल्या पक्षाला का आणि कशासाठी दुखावलं जाईल?

८) समजा संगम झालाच तर जे देतील ते पुरेसं कशावरून असेल? आकड्यांचा जबरदस्त अभ्यास असणाऱ्यांचा पक्ष आहे सध्याचा भाजप मागील निवडणुकांमध्ये कुठल्या बुथवर किती मतदान झालं हे आकडे तपासूनच फॉर्म्युला ठरवणार नाही का? भाजप युती करताना एखाद्या पक्षाचा मास इलेक्टॉराल बेस आहे का? किंवा जातसमूह ह्यांच्या पाठी आहे का? किंवा एखाद्या पक्षाला घेतलं तर किमान उदाहरणार्थ शेतकरी, कामगार इत्यादी कोणी बरोबर येतील का हे बघतात. आणि त्यानंतर त्यांना तितकाच वाटा मग तो जागा वाटपात किंवा पुढे सत्तेत देतात. आणि जे देतात ते सट्ली काढून पण घेतात.

९) २०१७ लाच भाजपला मुंबईत स्वतःचा महापौर बसवणं शक्य होतं पण ते त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं आणि हा कुठलाही इमोशनल निर्णय नसणार.

सध्याची भाजप इमोशनली काहीच करत नाही. कदाचित मुंबई महापालिका भाजपच ध्येय नसेलच? ठाण्यात देखील भाजप सत्ता ह्या दिशेने २०१७ ला प्रयत्न झाले नाहीत आणि आत्ता देखील होतील असं वाटत नाही. २०१७ ला भाजपचा झेंडा ठाणे महापालिकेवर हे ध्येय असतंच तर ठाणे देखील दत्तक घेतो अशी घोषणा झाली असती, नाही का?

 

tmc inmarathi

 

नाशिक, पुणे तर नाशिकमध्ये तिन्ही आमदार भाजपचे आहेत. आणि पुण्यात तर ६ पैकी ५ आमदार भाजपचे, एक लोकसभा आणि राज्यसभा खासदार त्यामुळे ताकद भरपूर आहे. पुण्यात भाजपचे ९७ नगरसेवक आहेत. २०% लॉस जरी झाला तरी सत्ता टिकवणं अवघड नाही आणि तिनचा प्रभाग इत्यादी लॉजिक्स पुढे केली जात असली तरी ३ पैकी एका ठिकाणासाठी पार्टनर निवडायचा ठरला तर सरसकट ४८ सीट्स द्यायच्या म्हणजे उरलेल्या ११४ मधून स्वतःच नशीब आजमवायचं. त्यात २०१७ ला भाजपने फक्त पुण्याचा विचार केला तर ६०% चा स्ट्राईक रेट मेंटेन केला होता आता तो स्वतःसाठी पण मेंटेन करायचा आणि पार्टनरसाठी पण आणि त्यातुन हातात तोच आकडा येणार असेल तर हा अट्टाहास का करायचा असा विचार झाला नसेलच? आणि भाजप हुशार विद्यार्थी ओढून घेण्यात एक्स्पर्ट आहे त्यात त्यांना मेहनत आणि रिस्क कमी असते.

१०) संगम नाही झाला तर प्रतीक्षेतील पक्षाला भाजपकडून आपण कधी गिळलो गेलो हे न कळण्याचा अनुभव येणार नाही. शतप्रतिशत भाजप हे भाजपचं ध्येय आहे. त्यांना प्रादेशिक पक्षांची अडचण नकोच आहे त्यामुळे जिथे जो मिळेल त्यांना ते गिळंकृत करणार हे नक्की!

११) मुळात संगमाच्या आशेने का रहावं… मान्य इलेक्टॉराल सक्सेस महत्वाचं आहे पण त्यासाठी इतकं डेस्परेशन असावं का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक असा नेता आहे ज्याच्याकडे राजकीय अनुभव ३२ वर्षांचा आहे आणि तो अवघ्या पन्नाशीत आहे आणि तो राज्यव्यापी आहे. श्री. राज ठाकरे ह्यांचा राजकीय करिष्मा अबाधित आहे आणि कायम राहील.

स्वतःची ताकद कणाकणाने वाढवत पुढे जाणं हाच मनसे समोरचा मार्ग आहे. आज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी राज्यात सत्तेत आहेत तर भाजप केंद्रात आणि असंख्य महापालिकांमध्ये पुन्हा हेच चार पक्ष. ह्या सत्तेने ह्या पक्षांमध्ये नक्कीच शैथिल्य आलेलं असणार ते हेरून आपण हळूहळू त्या पोकळीत शिरणं हाच एकमेव मार्ग मनसेकडे आहे.

 

raj inmarathi

 

त्यामुळे संगम होणार का? माझं मत, पुन्हा एकदा सांगतो हे व्यक्तिगत मत सारासार विचार करून…. नाही होणार.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?