' टी-२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेला, ‘कॅप्टन कोहलीचा लाडका’ आर्किटेक्ट! – InMarathi

टी-२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेला, ‘कॅप्टन कोहलीचा लाडका’ आर्किटेक्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

यंदा होणार असलेल्या टी-२० विश्वचषकाचा भारतीय संघ जाहीर झाला त्यावेळी काही अनपेक्षित खेळाडूंचं नाव संघाच्या यादीत पाहायला मिळालं. त्यातलंच एक नाव होतं वरुण चक्रवर्ती! हा वरुण चांगला खेळाडू नाही, असं काही नाही; पण चहलला वगळून त्याला संधी मिळणं काहीसं आश्चर्यचकित करणारं होतं.

त्यानंतर विराटने सुद्धा त्याची तारीफ केली आणि मग मात्र एका वेगळ्याच नजरेतून क्रिकेटप्रेमी त्याच्याकडे पाहायला लागले.

विराट कोहलीचा लाडका झालेला वरुण चक्रवर्ती हा क्रिकेट खेळायला येण्याआधी अर्किटेक्ट झालेला आहे, हे किती जणांना ठाऊक आहे? आज याच क्रिकेटरबद्दल थोडंसं जाणून घेऊया.

 

varun chakravarthy surprised inmarathi

 

आज तीस वर्षांचा असणारा वरुण, तामिळनाडूच्या रणजी संघाचा एक भाग होता. पण त्याला खरी ओळख मिळाली ती आयपीएलमुळेच! कोलकत्ता नाईट रायडर्सचा गोलंदाज म्हणून आजही तो त्याचं नाव टिकवून आहे. त्याच्या दर्जेदार लेगस्पिनसमोर भल्याभल्यांची तारांबळ उडते हे आज पाहायला मिळतं.

आर्किटेक्ट म्हणून केलंय काम

वयाच्या १३ व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात तर केली. सुरुवातीला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून तो खेळत असे. त्याच्या वयाच्या मानाने उत्तम खेळ तो करत होता. पण १७ व्या वर्षी त्याने आर्किटेक्टचा अभ्यासक्रम हाती घेतला आणि क्रिकेट काहीसं मागे पडलं.

क्रिकेटची आवड आणि मानगुटीवर बसलेलं भूत मनातून जाणं शक्य नव्हतं. ग्रॅज्युएट झाल्यावर त्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सोबतीने फ्रीलान्सर आर्किटेक्ट म्हणून सुद्धा काम सुरु होतं. अर्थात, तो फार काळ तिथे रमणार नाही आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीचा पाया डळमळीत करणारा, गोलंदाजीचा आर्किटेक्ट ठरेल, असं त्यावेळी कुणालाही वाटलं नसेल.

 

varun chakravarthy wicket celebration inmarathi

 

पुन्हा एकदा स्वप्नाची इमारत कोसळली असती पण…

क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याने आर्किटेक्ट म्हणून काम करण्याला सोडचिठ्ठी दिली. फास्ट बॉलिंग ऑलराउंडर म्हणून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यष्टिरक्षणाची जागा जलदगती गोलंदाजीने घेतली पण नियतीला तेही मान्य नव्हतं. गुडघ्याला दुखापत झाली आणि वेगवान गोलंदाजीची विकेट गेली.

वरुण खचला नाही, थांबलाही नाही. त्याने स्वतःच्या गोलंदाजीची शैली बदलली. तो लेगस्पिनर झाला आणि पुन्हा मैदानावर उतरला. चेन्नई लीगच्या लोवर डिव्हिजनमध्ये खेळताना त्याने ७ सामन्यात ३१ गडी बाद केले. ३ च्या जवळ असलेला इकॉनॉमी रेट आणि ९ च्या आत असलेलं ऍव्हरेज खास छाप पाडून गेलं.

 

varun chakravarthy inmarathi

 

आयपीएलमध्ये एंट्री…

सुरुवातीला वरुणला केकेआर आणि सीएसकेच्या संघात नेट्समध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. तिथून त्याचा मोठा प्रवास सुरु झाला असंही म्हणता येईल. कारण त्यामुळेच नंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. २०१९ च्या वर्षी पहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.

 

varun chakravarthy inmarathi

 

नशीब नेहमीच साथ सोडत नाही हे मात्र खरं… पंजाबने त्याला संघातून डच्चू दिल्यावर सुनील नरीन आणि कुलदीप यादव संघात असतानाही केकेआरने वरुणला ४ करोडला विकत घेतलं. कुलदीप जायबंदी झाला आणि वरुणला संधी मिळाली. आयपीएल २०२० च्या स्पर्धेत मग त्याने छाप पाडली. १३ सामन्यात १७ बळी घेत त्याने स्वतःला सिद्ध केलं.

 

varun chakravarthy inmarathi

 

भारतीय संघातून छाप पाडण्यास सज्ज

हाच शिलेदार आता भारतीय संघाकडून विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज झालाय. कोहलीने त्याची तारीफ करणं हे त्याचा आत्मविश्वास वाढवणारं नक्कीच ठरेल. नशिबाने सगळे चढ-उतार दाखवले आहेत. पण आता हे नाव सगळ्या क्रिकेट प्रेमींना ठाऊक झालंय. त्याच्या गोलंदाजीचे फॅन्स सुद्धा नक्कीच सापडतील.

 

varun chakravarthy in action inmarathi

 

हा खेळाडू भारताचा हुकुमी एक्का ठरावा आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्याने सळो की पळो करून सोडावं अशी अपेक्षा करूया. नियतीने वरुणच्या पारड्यात यशही टाकलंय आणि त्याची मेहनत सुद्धा फळ देतेय. असंच यश त्याला वर्ल्डकपमध्येही मिळो अशी अपेक्षा करूयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?