' एक अशी नदी जी समुद्राला जाऊन मिळतच नाही… मग तिचं नक्की होतं तरी काय?? – InMarathi

एक अशी नदी जी समुद्राला जाऊन मिळतच नाही… मग तिचं नक्की होतं तरी काय??

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नदी म्हटलं की तिचा उगम असतो आणि ती कुठल्यातरी संगमावर समुद्राला जाऊन मिळते. जगातील बहुतांश नद्यांचा प्रवास असाच असतो. कुठल्यातरी डोंगरदऱ्यांत लहानश्या झऱ्यातून, दलदलीतून, सरोवरातून किंवा ओहोळ-ओढ्यांतून नदीचा उगम होतो. हळूहळू लहानशा ओहोळांचे निर्झर आणि ओढे तयार होतात आणि ते एकत्र होऊन त्यांची मोठी नदी तयार होते.

नदी ही शेवटी समुद्राला जाऊन मिळते. काही नद्या मौसमी असतात. फक्त पावसाळ्यातच वाहतात, तर काही पावसाळ्यानंतर सुद्धा भूमिगत पाण्याच्या स्वरूपात अस्तित्वात असतात. मोठमोठ्या नद्या या बारमाही असतात.

 

ganga river inmarathi

 

जर भूप्रदेशातील जमीन ओबडधोबड असेल, तर तिथल्या नद्यांचे खोरे लहान असते आणि जर भूप्रदेश सौम्य उताराचा असेल आणि तिथल्या भूपृष्ठावर दोन्ही बाजूंनी दाब पडून खडक दुमडला गेला असेल तर त्या प्रदेशातील नद्यांचे खोरे मोठे असते.

आपल्या भारतात लहान मोठ्या अशा एकूण ४०० हुन अधिक नद्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजाच्या विकासात नद्यांचा मोठा वाटा आहे.

भारतात नद्यांच्या तीरावरच कित्येक गावे-शहरे वसलेली आहेत. आपल्याकडे लहान-मोठ्या अशा वेगवेगळ्या नद्या आहेत ज्या पुढे जाऊन तीन बाजूंना असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या समुद्राला जाऊन मिळतात. काही नद्या अशाही असतात ज्या समुद्राला जाऊन मिळत नाहीत आणि वाळवंटातच मुरतात किंवा वाळून जातात.

 

sand dessert inmarathi

 

अशीच एक नदी भारतात देखील आहे जिचा उगम डोंगरावर होतो पण ही नदी समुद्राला जाऊन मिळत नाही. राजस्थानमधील अजमेर येथे उगम पावणारी लुनी नदी देशातील एकमात्र अशी नदी आहे जिचा कुठल्याही समुद्राशी संगम होत नाही.

लुनी नदीचा उगम अजमेर प्रदेशातील अरावली श्रेणीच्या नागा पर्वतरांगांमध्ये होतो. समुद्रसपाटीपासून ७७२ मीटरच्या उंचीवर नागा पर्वतावर लुनी नदीचा उगम आहे. लुनी हे नाव संस्कृतोद्भव आहे. लवणाद्रि किंवा संस्कृत शब्द लवणगिरी यापासून लुनी हे नाव आले आहे. लुनी म्हणजे खाऱ्या पाण्याची नदी होय. या नदीच्या पाण्यात असणाऱ्या अत्याधिक प्रमाणातील क्षारांमुळे नदीला हे नाव पडले.

प्राचीन काळात कवी कुलगुरू कालीदासांच्या साहित्यात देखील या नदीचा उल्लेख वाचायला मिळतो. त्यांनी या नदीला ‘अंत:सलिला’ असे म्हटले आहे. या नदीचे प्राचीन नाव लवणवती असे होते. अजमेर क्षेत्रात या नदीला ‘सागरमती’ असेही म्हणतात.

 

luni river inmarathi

 

अजमेर जिल्ह्यात उगम पावून ही नदी पुढे दक्षिण-पश्चिम दिशेला गुजरात राज्याकडे वळते. नागौर, जोधपूर, पाली, बाडमेर आणि जालोर या जिल्ह्यांतून प्रवास करीत लुनी नदी अखेर कच्छच्या रणात येऊन थांबते. कच्छच्या वाळवंटात अखेर ही नदी लुप्त होते आणि पुढे कुठल्याही नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळत नाही.

असं का घडतं?

राजस्थान जिल्ह्यात मुळातच पावसाचे प्रमाण कमी आहे. उन्हाळा तीव्र स्वरूपाचा आणि त्यामुळे तापमान सुद्धा जास्त! त्यामुळे लुनी नदीला मुळातच पाणी कमी आहे. राजस्थानमधील भूप्रदेशात वाळूचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे पाणी जमिनीत झिरपत नाही. तापमान जास्त असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते. त्यामुळे लुनी नदीत क्षारांचे प्रमाण जास्त आहे.

जालोर जिल्ह्यातील लुनी नदीच्या क्षेत्राला नेडा किंवा रेल असे म्हणतात. तर लुनी नदीच्या पात्राला गोडवाड क्षेत्र असे म्हणतात. अजमेर जिल्ह्यातील पुष्करमध्ये लुनी नदीला साक्री नदी असेही म्हणतात. राजस्थानमध्ये या नदीची लांबी ३३० किमी आहे आणि पुढे ही नदी गुजरातमध्ये जाते.

 

kutchh inmarathi

 

लुनी नदीच्या उगमापासून ते काही किलोमीटर अंतरारपर्यंत या नदीचे पाणी गोड आहे. परंतु बाडमेर प्रदेशातील जमिनीतच मिठाचे आणि क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने नदीचा प्रवाह या जिल्ह्यात आल्यानंतर नदीचे पाणी खारे होते. जरी या प्रदेशात नदीचे पाणी खारे असले तरी त्या प्रांतातील शेती याच पाण्यावर अवलंबून आहे.

निसर्गाची कृपा झाली आणि पाऊस चांगला झाला, तर नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागते. अनेक लोक पावसाळ्यात लुनी नदीचे दर्शन घेण्यासाठी येतात. जोधपूर आणि बाडमेर या जिल्ह्यात नदीचा प्रवाह खोल न होता अधिक विस्तृत होतो त्यामुळे पावसाळ्यात पाऊस चांगला झाल्यास बऱ्याचदा नदीला पूर येतो.

लुनी नदीचे जलग्रहण क्षेत्र ६९३०२.१० किलोमीटर इतके आहे. हे क्षेत्र सुमारे ११ जिल्ह्यांत विस्तारलेले आहे. या नदीवर दंतेवाडा आणि सिपु ही धरणे बांधलेली आहेत.

 

luni river inmarathi

 

उपनद्याही आहेत…

लुनी नदीच्या जवाई, जोजरी, खारी, बांडी, मिठडी, लिलडी आणि सुकरी ह्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीची एकूण लांबी ४९५ किलोमीटर आहे. या प्रदेशात ही एकमेव मोठी नदी आहे आणि म्हणूनच या भागातील लोकांसाठी लुनी नदी सिंचनाचा एकमेव स्रोत आहे. त्यामुळेच राजस्थानमधील लोकांसाठी ही नदी एखाद्या देवतेप्रमाणेच आहे.

आपण भारतीय लोक नद्यांची देवी म्हणून पूजा करतोच. गंगा, यमुना नदी, नर्मदा मैंया, गोदावरी नदी, कृष्णा-कोयना या नद्यांची आपण पूजा करतो तसेच लुनी नदीला या प्रदेशातील लोक देवता मानून तिची पूजा करतात.

पावसाळ्यात नदीचे रूप विलोभनीय असते. म्हणूनच नदीचे सुंदर प्राकृतिक रूप बघण्यासाठी अनेक लोक पावसाळ्यात येतात. तसेच मार्च महिन्यात या ठिकाणी थार महोत्सवाचे आयोजन केले जाते.

 

thar mahotsav inmarathi

हा महोत्सव बाडमेर जिल्ह्यांत तीन दिवस चालतो. या प्रदेशातील विविध कला आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी तसेच पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. महोत्सवाला अनेक देशी-विदेशी पर्यटक आवर्जून भेट देतात.

तर अशा या अद्वितीय लुनी नदीचे दर्शन एकदा तरी घ्यायलाच हवे. उत्सव चालू असताना गेलात, तर अधिक आनंद आणि मज्जा अनुभवण्याची संधी नक्कीच मिळेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?