'अर्णबचे रिपब्लिक - विश्वासार्हतेच्या कसोटीत उत्तीर्ण होईल?

अर्णबचे रिपब्लिक – विश्वासार्हतेच्या कसोटीत उत्तीर्ण होईल?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अर्णब गोस्वामींचा रिपब्लिक टीव्ही ६ मे २०१७ रोजी सकाळी १० वाजता सुरू झाला. गेली १० वर्ष निर्भिड, सडेतोड आणि अनेकदा कर्णकर्कश्य शैलीमुळे अर्णब घराघरांतून परिचित झाला; रोज बातम्या बघितल्या जाणाऱ्या घरांतील एक सदस्य बनला. “द न्यूज अवर” लागले की, जेवायला बसायचे असा अनेक घरांत शिरस्ता बनला. प्रादेशिक तसेच हिंदी वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत इंग्रजी वाहिन्यांचा टीआरपी कमी असला, तरी देशाच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव सर्वाधिक असतो. आदर्श घोटाळा, राष्ट्रकूल स्पर्धांच्या आयोजनातील भ्रष्टाचार, २जी आणि कोळसा घोटाळा, निर्भया प्रकरण असो वा लोकपाल विधेयकासाठी अण्णांचे आंदोलन… या सगळ्यात अर्णबच्या “द न्यूज अवर”ने घेतलेली भूमिका देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे थेट मुलाखतीत वस्त्रहरण करण्याचे धैर्य अर्णब वगळता देशातील किती पत्रकार दाखवू शकले असते याबाबत शंका आहे. त्यामुळे व्यवस्थापनाशी झालेल्या मतभेदांतून टाइम्स नाऊ सोडणाऱ्या अर्णब गोस्वामींची नवीन एंट्री कशी असेल याबद्दल कमालीची उत्सुकता होती.

arnab-republic-marathipizza01
dailyo.in

कामाच्या निमित्ताने दर दोन-चार महिन्यांतून एकदा अर्णबची भेट व्हायची आणि प्रत्येक भेट त्याच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू उलगडवून दाखवायची. कदाचित आसामचा असल्यामुळे बांग्लादेशी घुसखोरी आणि वाढता कट्टरतावाद याबद्दल त्याच्या मनात असलेली चीड, देशात सर्वत्र बोकाळलेल्या आणि पत्रकारांनाही आपल्यातील एक भाग बनवणाऱ्या व्हिआयपी संस्कृतीला असलेला त्याचा विरोध, तरूण पत्रकार असताना केवळ भारतीय असल्यामुळे बीबीसीत नोकरीची संधी हुकल्याने (तेव्हा बीबीसीत फक्त दक्षिण अशिया विभागासाठी भारतीयांना विचार केला जात असे) झालेल्या अपमानाची भळभळती जखम ताजी ठेवण्याची त्याची इच्छा, बातम्या तसेच टीव्हीवरील वादविवादाला त्यांनी दिलेले नवीन रूप, लुटियन दिल्लीतील साटेलोट्याच्या पत्रकारितेबद्दल त्याच्या मनात असलेला राग आणि मुंबईला जागतिक वृत्तमाध्यमांचे एक आघाडीचे केंद्र बनवण्याची त्याची महत्त्वाकांक्षा यामुळे त्याच्याशी झालेली प्रत्येक भेट दीर्घकाळ स्मरणात राहिली.

टाइम्स नाऊमधून बाहेर पडल्यावर २६ जानेवारीच्या मुहूर्तावर रिपब्लिक लॉंच करायचे असा बेत असताना कुठेतरी माशी शिंकली. रिपब्लिक हे नाव कायद्याच्या कचाट्यात सापडले. ते बदलून रिपब्लिक टीव्ही असे करेपर्यंत काही महिन्यांचा काळ वाया गेला. मे महिन्याच्या सुरूवातीपासून रिपब्लिक टीव्हीच्या जाहिराती सुरू झाल्या. आजकाल जवळपास महत्त्वाची सर्व वृत्तमाध्यमं मोठ्या उद्योगसमुहांची किंवा काही विशिष्टं हितसंबंध असलेल्या लोकांच्या हातातल्या बाहुल्या झाली असून त्यातून त्यांना बाहेर काढायचे, तर पत्रकारांची मालकी असलेल्या वृत्तवाहिनीची आवश्यकता आहे. ‘रिपब्लिक हे पत्रकारांची मालकी असलेलं चॅनल आहे. त्यात भ्रष्टाचाराशी तडजोड नाही, राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड नाही’.. अशा प्रोमोंनी त्याच्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. रिपब्लिक टीव्हीमध्ये अर्णब आणि त्यांच्या पत्नीची गुंतवणूक असली तरी भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे खासदार असलेले राजीव चंद्रशेखर सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे रिपब्लिक टीव्हीची भूमिका निष्पक्ष असेल का याबाबतही कुतुहल होते.

arnab-republic-marathipizza02
indiasamvad.co.in

पहिल्याच दिवशी रिपब्लिकने लालू प्रसाद यादव यांच्या कुख्यात गुंड महंमद शहाबुद्दीन याच्याशी झालेल्या कथित संभाषणाच्या ऑडिओ टेप प्रसिद्ध करून, कशाप्रकारे बिहारमध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे आणि गुन्हेगार लालू प्रसादांना काय करायचे याच्या सूचना देत आहेत हे दाखवून लालूंना भूमिगत व्हायला भाग पाडले. दुसऱ्या दिवशी आपमधून नुकतीच हाकालपट्टी झालेले माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर लाचखोरीचे आरोप. ते झाल्यानंतर सुनंदा पुष्कर यांच्या कथित हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कशा प्रकारे दिरंगाई केली आणि कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांच्याविरूद्ध असलेले प्रथमदर्शनी पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर लष्कर ए तोइबाच्या सायबर सेलचे काम काश्मीरमध्ये कशा प्रकारे चालते आणि कशाप्रकारे बाहेरून दिशाभूल झाले आहेत असे वाटणारे आंदोलक अप्रत्यक्षपणे दहशतवादी संघटनेच्या कारवायांत सहभागी असतात याचे स्टिंग ऑपरेशन, मग राहुल आणि सोनिया गांधींना अडचणीत आणणारे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण, डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च संस्थेकडून भारतात आणि मलेशियात केले जाणारे धर्मांतर आणि अशा धर्मांतरितांना सिरिया आणि इराकमध्ये पाठवण्याचे कथित षडयंत्र… थोडक्यात काय, तर दिवसाला एक किंवा दोन नवीन प्रकरणं रिपब्लिक टीव्हीच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत.

अर्णबचे हे नवीन रूप पाहून आपला मार्केट शेअर किंवा टीआरपी कमी होण्याच्या भीतीने टाइम्स नाऊनेही दिवसागणिक भ्रष्टाचाराची एक-दोन प्रकरणे बाहेर काढायचा चंग बांधला आहे. त्यामुळे सकाळ असो वा संध्याकाळ, सोमवार असो वा रविवार, या चॅनलवर कधीही कुठलीतरी “ब्रेकिंग न्यूज” असतेच.

अन्य वाहिन्यांच्या तुलनेत रिपब्लिक टीव्हीने निवडलेली “लाल” रंगसंगती खूपच भडक आणि बटबटीत आहे. टाइम्स नाऊमध्ये असल्यापासून अर्णबवर मोठ्या संख्येने पाहुण्यांना – प्रवक्त्यांना बोलवून कोणालाच बोलण्याची पुरेशी संधी न देणे किंवा त्यांच्या अंगावर ओरडणे असे आरोप होत आहेत. ज्यांना अर्णब आवडतो तो बहुदा त्याच्या या शैलीमुळेच आवडतो. पण रिपब्लिक टीव्हीच्या वाद चर्चांत अर्णबसह ११ जणांची टीम असते. हे जरा जास्तच होत असल्यासारखे वाटते. भ्रष्टाचाराची प्रकरणे फोडणे महत्त्वाचे आहे पण त्याहून महत्त्वाचा आहे त्यांचा पाठपुरावा. आपल्या भांडाफोडीमुळे पहिल्या दिवशी लालू प्रसाद यादव यांना घराबाहेर पडण्याची सोय उरली नाही असा दावा केला गेला, पण दोन-तीन दिवसात लोक ते विसरले आणि प्रकरण पुन्हा मूळपदावर आले. तीच गोष्टं आता इतर प्रकरणांच्या बाबतीतही घडताना दिसत आहे. सुनंदा पुष्कर प्रकरणात रिपब्लिकवर दाखवण्यात आलेले पुरावे (रेकॉर्डिंग) प्रेमा श्रीदेवी या पत्रकाराकडे गेली अनेक वर्षं उपलब्ध असताना टाइम्स नाऊमधील अर्णबने ते का उघड केले नाहीत? किंवा सुनंदा पुष्कर यांचा जर खून झाला असेल तर तो कोणत्या कारणासाठी झाला? त्याबद्दल कोणीच का बोलत नाहीये? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहातात. लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटनेला टीव्हीवर उघडं पाडल्याने काय तिचं मनःपरिवर्तन होणार आहे का? तिला शिक्षा केली जाणार आहे? या सगळ्या विषयांवरील आक्रस्ताळ्या भूमिकेमुळे आणि दर दिवसाआड नवीन विषय हाताळल्यामुळे रिपब्लिकची विश्वासार्हतेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

arnab-republic-marathipizza03
adageindia.in

स्वतःला डावे-उदारमतवादी म्हणवून घेण्याची फॅशन असताना आजवर देशातील एकाही महत्त्वाच्या इंग्रजी वृत्तवाहिनीने, आपली उजव्या-मध्यम विचारांची म्हणून ओळखली निर्माण करण्याचा प्रयत्न केला नव्हता. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत कॉंग्रेस आणि खासकरून गांधी कुटुंबियांची जमेल तशी पाठराखण करणे, धार्मिक किंवा जातीय असहिष्णुतेच्या मुद्याची बातमी शंभरपट मोठी करून भाजपा-संघाची बदनामी करणे, हिंदू धर्मातील कर्मठतेवर टीका करताना अन्य धर्मांतील फोफावलेल्या कट्टरतावादाबद्दल बोटचेपी भूमिका घेणे या सगळ्या प्रकारात एकटा अर्णब उठून दिसून येत होता. पण तो त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे.

रिपब्लिक टीव्हीची गेल्या ८ दिवसांतली आणि टाइम्स नाऊची त्यापूर्वीच्या काही महिन्यांपासूनची वाटचाल बघितली तर अमेरिकेप्रमाणे देशातील इंग्रजी वृत्त वाहिन्यांतही डावे आणि उजवे असे गट पडणार की काय अशी शक्यता वाटत आहे. असे झाल्यास काही चुकीचे नाही. अमेरिकेत अनेकदा वर्तमानपत्रे निवडणुकीत आपण कोणाला समर्थन करतोय आणि का ते जाहीर करतात. स्वतःला तटस्थ म्हणवून घेऊन छुपा प्रचार करण्यापेक्षा ते अधिक चांगलं आहे. आजवर स्वतःला राष्ट्रवादी-उजव्या विचारसरणीची म्हणवून घेणारी एकही इंग्रजी वृत्तवाहिनी नसल्याने रिपब्लिक टीव्हीने स्वतःला तसे सादर केल्यास ती पोकळी भरून निघू शकेल. पण असे करून लोकांच्या पसंतीस उतरायचे असल्यास आधी स्वतःच्या नवीन ब्रॅंडबद्दल विश्वासार्हता निर्माण करावी लागेल.

अर्णबच्या नवीन इनिंगची सुरूवात दमदार झाली असली तरी समोर आलेल्या त्रुटी लवकरच सुधाराव्या लागतील.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?