' धोनी आणि विराटसाठी शेवटची संधी! CSK आणि RCB हे आव्हान पेलू शकणार का?

धोनी आणि विराटसाठी शेवटची संधी! CSK आणि RCB हे आव्हान पेलू शकणार का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

संकल्पना आणि विचार – हिमांशू वाढवणकर

शब्दांकन – ईशान पांडुरंग घमंडे

===

विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेतला. टी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाच्या आणि यंदाच्या वर्षानंतर आयपीएल संघाच्या कर्णधारपदाचा काटेरी मुकुट खाली ठेवण्याचा निर्णय घेतला. यावर क्रिकेट विश्वात उलट सुलट चर्चाही झाल्या. यात एक गोष्ट  अगदी प्रकर्षाने चर्चेत आली, ती म्हणजे धोनी आणि विराटसाठी ही शेवटची संधी असू शकते.

हे दोघेही आज भारतीय कर्णधारांच्या यादीत सर्वाधिक यशस्वी आणि उत्तम कर्णधार म्हणून गणले जातात. अशा या कप्तानांची शेवटची संधी, म्हणजे चाहत्यांसाठी फारच मोठी गोष्ट, नाही का…

विराटने कर्णधार म्हणून एकदाही आयपीएल जिंकलेली नाही आणि धोनीची सुद्धा ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.

 

dhoni and virat inmarathi

 

धोनी सर्वाधिक ट्रॉफीज आणि सगळ्या प्रकारच्या स्पर्धा जिंकणारा कर्णधार ठरणार असला, तरीही त्याच्या आयपीएल कारकिर्दीचा शेवट गोड व्हावा, अशी इच्छा माझ्यासारखे चाहते नक्कीच व्यक्त करत आहेत. याच निमित्ताने मनात काही विचार येऊन गेले, ते मांडण्याचा हा प्रयत्न…

विराट आता तरी जिंकणार का?

विराट हा एक चांगला कर्णधार आहे, हे त्याच्या कप्तानीच्या आकडेवारीतून दिसून येतं. त्याने मिळवलेलं यश, त्याचा मैदानावरचा वावर याबद्दल अनेकजण त्याची स्तुती करतात. पण असं असतानाही एकही मोठी ट्रॉफी जिंकण्यात त्याला यश मिळवता आलेलं नाही हेदेखील खरंय.

आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून त्यांच्यासोबत असणारा विराट गेली अनेक वर्षं त्यांचा कर्णधार म्हणूनही काम पाहतो आहे. असं असताना सुद्धा एकदाही त्याला आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे कर्णधार म्हणून तर ही त्याच्यासाठी शेवटची संधी आहे.

 

virat kohli rcb captain inmarathi

खेळाडूंना पाठिंबा देण्यात अपयशी?

अर्थात, चांगला कर्णधार असला तरी नेहमीच तो त्याच्या खेळाडूंना शंभर टक्के पाठिंबा देत नाही, असं मला वाटतं. RCB आणि भारतीय संघातही असलेला त्याचा एका हुकुमी एक्का म्हणजे चहल; पण त्याला वगळून वरूण चक्रवर्तीला भारतीय संघात घेण्याचा निर्णय विराटने घेतलेला दिसतोय.

अगदी कालचंच उदाहरण द्यायचं झालं, तर सिंगापूरचा टीम डेविड याला काल संघातून वगळण्यात आलं. एका सामन्यात दिली गेलेली संधी आणि त्यानंतर त्याला संघात स्थान न मिळणं हे खेळाडूचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पुरेसं असतं.

 

tim david inmarathi

 

संघ मात्र पूर्ण प्रयत्न करतोय…

विराटने काल संघात तीन बदल केले. डॅनियल क्रिश्चनला सुद्धा संधी दिली. मात्र तोदेखील सपशेल अपयशी ठरला. अर्थात त्याचे काही निर्णय चुकत असताना, संघातील त्याचे मुख्य शिलेदार मात्र आयपीएल जिंकण्यासाठी जीवाचं रान करतायत म्हणा ना…

हर्षल पटेल, मॅक्सवेल आणि स्वतः विराट यांनी उत्तम कामगिरी बजावत काल मोठं विजय मिळेल याची काळजी घेतली. विराटची ही कप्तान म्हणून आयपीएल जिंकण्याची शेवटची संधी असल्याने त्याच्यासाठी ही कामगिरी बजावायचीच असंच जणू काही टीमने ठरवलेलं दिसतंय.

 

ipl trophy 2021 inmarathi

 

यंदा सगळंच उत्तम चाललंय…

मागील वर्षीची आयपीएल स्पर्धा आणि यंदाची आयपीएल स्पर्धा याचा विचार केला, तर धोनीच्या CSK संघाच्या अंतिम ११ जणांमध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. मराठमोळा ऋतुराज चांगली कामगिरी करतोय. यंदा जडेजा सुद्धा जबरदस्त फॉर्मात असल्याचं पाहायला मिळालंय. ब्रावो सुद्धा मोका मिळाला की उत्तम कामगिरी करून दाखवतोय, मोईन चांगल्या अष्टपैलूची भूमिका पार पाडतोय.

थोडक्यात सांगायचं झालं, तर चेन्नई संघासाठी सगळं कसं जुळून आलंय. ही धोनीची शेवटची आयपीएल ठरणार असेल, तर त्याच्या पारड्यात पुन्हा एकदा विजेतेपदाचं दान टाकावं अशी नियतीचीच इच्छा दिसतेय.

 

dhoni ipl captain inmarathi

 

धोनीचा चाहता असल्याने, त्याच्या संघाने स्पर्धा जिंकावी असं तर नेहमीच वाटतं. पण यंदाची त्याची ‘शेवटची स्पर्धा’ ठरण्याची शक्यता असल्याने चेन्नईने ट्रॉफी जिंकायला हवी’च’ असं अजिबात वाटत नाही. त्याने जिंकली तर आनंद मात्र नक्कीच होईल.

जडेजाचा सध्याचा फॉर्म, नवोदित ऋतुराज गायकवाडने सुरु केलेला बहारदार खेळ आणि एकूणच संघाचा दर्जेदार खेळ अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या तर चेन्नईचे खेळाडू थालासाठी आयपीएल जिंकण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतायत हे नक्की!

धोनी आणि विराटची जादू…

हे सगळं तर झालं आयपीएलच्या बाबतीत, पण आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे धोनी आणि विराट यांची जोडी वर्ल्डकप स्पर्धेत एकत्र असणार आहे. विराटला हा मिडास टच मिळावा आणि त्याच्या संघाने विश्वचषकावर नाव कोरावं अशी सगळ्याच भारतीयांची इच्छा आहे.

 

dhoni ravi and virat inmarathi

 

रवी शास्त्री यांच्याकडे सुद्धा प्रशिक्षक म्हणून ही शेवटची संधी आहे, असंही म्हणता येईल. धोनीच्या खास टिप्सचा वापर करून कोहलीच्या संघाने विजय मिळवला, तर अखेर विराटला कर्णधार म्हणून इंटरनॅशनल ट्रॉफी हाती घेण्याची संधी मिळेल.

अर्थात, असं झाल्यास (त्यातही त्याने आधी आयपीएल स्पर्धा सुद्धा जिंकलेली असल्यास) त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेणं योग्य आहे का? असाही सवाल मग सगळेच जण विचारू लागतील.

माझ्या दृष्टीने मात्र, विराटने ही जबाबदारी त्यागण्याची हीच योग्य वेळ आहे. धोनी सुद्धा त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात केवळ खेलदु म्हणून खेळला. त्याच काळात विराट भविष्यातील कर्णधार म्हणून तयार होत गेला.

विराटनंतर रोहितने कप्तानीचा भार सांभाळला तरी उपकर्णधारपदी एखादा नवखा खेळाडू येईल हे निश्चित! मग विराट आणि रोहितच्या सानिध्यात तो भविष्यातील कर्णधार म्हणून तयार होईल. म्हणजेच, भारतीय संघाच्या आणि भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी हा निर्णय नक्कीच उत्तम ठरणार आहे.

 

virat and rohit inmarathi

 

सध्याच्या घडीला, श्रेयस अय्यर, रिषभ पंत हे नव्या दमाचे खेळाडू येत्या काळात भारताचा कर्णधार म्हणून दावेदार दिसतात. म्हणजे असं पहा, की रोहितला टी-२० चा कर्णधार केलं गेलं तर त्याचा डेप्युटी म्हणून कदाचित श्रेयस अय्यर काम पाहिल. म्हणजेच रोहित आणि विराट अशा आजी-माजी दोन्ही कर्णधारांकडून त्याला बरंच काही शिकायला मिळेल. मार्गदर्शन सुद्धा मिळेल.

बरं काय सांगावं, मेंटॉर म्हणून धोनी आणि कप्तान म्हणून विराट ही जादू चालून जाईल सुद्धा, विराटचं स्वप्न पूर्ण होईल सुद्धा! धोनी आणि विराट ही जोडी पुन्हा पाहायला मिळेल की नाही, हे आजच सांगता येत नाही पण यंदाच्या वर्ल्डकपला असणार हे नक्की… त्यामुळे विराटचं ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न पूर्ण होवो अथवा न होवो, त्याचा हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या हिताचा आहे, हे मात्र नक्की…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?