' देवाच्या माथी आपला भार घाला, हा देह अगदी त्याच्यावर ओवाळून टाका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २०

देवाच्या माथी आपला भार घाला, हा देह अगदी त्याच्यावर ओवाळून टाका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २०

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १९

===

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

नारायणभटाची ती गोंधळलेली अवस्था तशीच ठेवून तुकोबा आबाला म्हणाले,

आबा, आता मी काय म्हणतो ते नीट ऐका. तुम्ही आज नारायणाबरोबर कीर्तनाला जा. तिकडून ते रामेश्वरभटांकडे जायचे आहेत. तुम्हीही त्यांच्याकडे जा. काही दिवस राहा. तुमचे प्रश्न चांगले असतात पण त्याला थोड्या रीतसर अभ्यासाची जोडही मिळाली पाहिजे. रामेश्वर तुम्हाला उत्तम शिकवतील. विषयाचा थोडा अंदाज आला की मग पुन्हा इकडे राहायला या.

हे ऐकून आबाच्या डोळ्यात टचकन् पाणी आले. ते पाहून कान्होबा म्हणतात,

अहो आबा, काय हे? दादा तुमच्या चांगल्यासाठीच सांगत आहेत ना?

आबा म्हणाला,

त्ये माजं चांगलं हुन्यासाठीच बोलले पन म्यां ह्ये पाय सोडून कसं जाऊ म्हनता? माजे काई बी प्रश्न न्हाईत. माला काशाची बी उत्तरं नगत. म्या इतंच ऱ्हातू. माला न्हाई म्हनू नका. येक दिवस माजा म्यां जाईन. तुम्हास्नी लय त्रास द्याचया न्हाई.

कान्होबांनी चटकन पुढे होऊन आबाला जवळ घेतले व म्हणाले,

काही काय बोलता आबा? आता तुम्ही ह्या घरातले झालात. तुकोबा तुमच्या शिक्षणाची व्यवस्था करीत आहेत आणि ती देखील थोडे दिवसांकरिता. तुम्ही रीतसर शिकलं पाहिजे आबा. बाकी विचार मनातून काढून टाका आणि वळकटी बांधा बरं.

कान्होबांनी इतके निक्षून सांगितल्यावर मात्र आबाने धीर केला आणि आपले आवरण्यास गेला. तोच आवलीबाई आल्या आणि तुकोबांना म्हणू लागल्या,

अहो, हे दोघे, तो गाडीवाला, तिघे आत्ताच निघाले तर दुपारच्याला कुठे असतील? तुम्ही त्यांना सांगितलंय, आसगावांत काही खायचं प्यायचं नाही. हे उपाशी राहतील की. त्यापरीस, त्यांना इकडून जेवून खाऊन निघू दे. कीर्तनाच्या वेळी पोहोचतील ते.

तुकोबा म्हणाले,

त्या आबाचं आत्ता काय झालं ते पाहिलंत ना? चांगल्या कामाला उशीर नको.

तरी आवलीबाई रेटून म्हणाल्याच,

अहो, जेवणाचं म्हणते मी!

तुकोबा उत्तरले,

ती काळजी तुम्ही का करता? थोडी परीक्षा होऊ दे की त्यांची! पांडुरंग समर्थ आहे त्यांचे पाहायला! जाऊ देत त्यांना लगेच!

तुकोबांचे हे बोलणे आवलीबाईंना काही आवडले नाही. थोडे रागावल्यासारखे दाखवून त्या आत निघून गेल्या. हा सारा प्रकार पाहात उभा असलेला नारायण इतक्या वेळात सावरला. तुकोबा आपली परीक्षा पाहणार हे त्याच्या लक्षात आले.
तोच तुकोबा त्याला म्हणाले,

माणसाला भूक लागते आणि त्याने वेळी नीट जेवले पाहिजे हे बरोबर. पण प्रसंगी ह्या देहाचे लाड आपल्याला आवरताही आले पाहिजेत. पांडुरंग आपल्याला जेवू घालीलच असे मनात म्हणावे आणि त्याने न घातल्यास ते भोगायची तयारीही ठेवावी.

 

देवाचिये माथे घालूनिया भार । सांडीं कळिवर ओंवाळूनि ।।
नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ।।
करूणावचनीं लाहो एकसरे । नेदांवे दुसरे आड येऊं ।।
तुका ह्मणे सांडी लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ।।

 

नारायणा, देहाने जे जे भोगता येते ते काही सत्य नव्हे. ते लटिकेच म्हणायचे. आजपासून, नव्हे, आत्तापासूनच त्याचा संग सुटेल यासाठी जमेल तसा प्रयत्न करा. मग आनंद आपोआप प्रकटेल. आपला भार आपल्यावर नाही अशी धारणा करा, देवाच्या माथी आपला भार घाला, हा देह(कळीवर) अगदी त्याच्यावर ओवाळून टाका. आपल्या अंगच्या अभिमानाला वेसण घाला (नाथिला). तसे होण्यासाठी सारे ओझी वाहायची तयारीही लगेच करा. देवाकडे ते एकच मागणे मागा आणि त्यात सफल होण्यासाठी दुसरे काही आड येणार नाही यासाठी दक्ष राहा.

तुकोबा असे इकडे नारायणाशी बोलत असता आबाने आपली वळकटी बैलगाडीत नेऊन टाकली सुद्धा. आबा व नारायण सर्वांच्या पाया पडले आणि गाडी निघाली!
—-
रस्त्यात नारायण काही बोले ना. आबाला त्याच्या मनस्थितीचा अंदाज आला पण बोलावे कसे हे त्यालाही कळे ना. बराच वेळ गेला, एक एक गांव हळूहळू मागे पडत होते, सूर्य माथ्यावर आला. शेवटी न राहवून आबाने धाडस केले आणि म्हणाला,

बुवा, काई बी बोलत न्हाई तुमी! नाराज जाला व्हंय?

नारायण म्हणाला,

नाही हो, नाराज नव्हे हो पण आज कीर्तन कसं होईल याची काळजी लागली. आज गायचं कमी आणि बोलायचं जास्ती! बोलायचं ते ही विचार करून. अशी सवय कुठे आहे मला? आता तुम्हीच तुकोबांचा इतका सहवास केलात, तुम्हीच काहीतरी सांगा मला.

 

म्यां काय सांगतु? माला न्हाई काई सांगता यीत. पन येक प्रश्न हाय. इचारू का?

 

विचारा की. पण उत्तर देऊ शकेन असे नाही हो. तरी विचारा.

 

येक अभंग हाय तुकोबांचा. अर्थ म्हनून लागं ना. त्ये म्हनतात,

 

आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।।
आवडी आवडी कळिवराकळीवरी । वरिली अंतरी ताळी पडे ।।
अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ।।
तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरे आहाचाचे आहाच ।।

हे ऐकल्यावर नारायण म्हणतो,

आबा, अजून एकदा म्हणा ना.

आबाने अभंग पुन्हा म्हणून दाखविला. मग नारायणाने म्हटला आणि तो गप्पच झाला. ते पाहून आबा म्हणाला,

बुवा, लय कठीन हाय न्हवं?

 

पहिले कडवे तरी सोपे आहे. पुढचे मग लावू.

 

आवो, मी पह्यल्यालाच की आडकलुं. तुमाला सुटलं म्हनता? सांगा की मग आमाला.

 

अहो आबा, किती सोपं आहे बघा. तोंडाने म्हणायचं देव आहे आणि मनात म्हणायचं नाही! किती सोपं आहे! उगीच अडलात तुम्ही.

 

तुमी गंमत करू नका वो माजी. लय डोस्कं खाल्लंया त्यानं. समजलं म्हनता तर समजावा की आमाला.

 

आबा, नीट एेका. अर्थ फार सोपा आहे. आता दुपारची वेळ झालेली आहे. आपण पुढल्या गावाला निघालो आहोत. ऊन खूप वाढलंय. भाजतंय नुसतं. अशा वेळी देव आहे, देव आहे असे म्हणत राहायचे. तसे म्हणून वेळ काढायचा. आणि अनुभव असा घ्यायचा की देव नाही, कारण आज जेवणाचा काही पत्ता नाही! जगाला पोसतो म्हणून देव आहे आणि आपल्याला आज भुके ठेवतो म्हणून देव नाही. समजलं?

हे ऐकून आबा आणि गाडीवान दोघे मोठ्याने हसूं लागले. मग त्यात नारायणही सामील झाला. आबाच्या लक्षात आलं, बामनाला भूक लागली! त्याच्या गावात लोक म्हणत बामनाला भूक धरत नाही. जरा उशीर झाला की बेचैन होतात. आपण कितीही वेळ उपाशी राहू शकतो. आपली तर तयारीच होती की आज पुरा उपास. पण ह्याचं कठीण दिसतंय.

इतके होईतोवर एक घोडेस्वार मागून आला. त्याने नारायणबुवाला बघितले आणि तो घोड्यावरून उतरला. गाडीवानाने कासरा खेचला, बैलं थांबली. घोडेस्वार नारायणाच्या पाया पडला आणि म्हणाला,

बुवा, कालचं कीर्तन लय चांगलं झालं. आज येनार हाये मी आंसगांवला. आपन भेटलात, बरं वाटलं. येतो मी. कामं हायीत.

अाणि चटकन घोड्यावरून निघून गेला सुद्धा!

गाडीवान म्हणाला,

जरा पुढं चलू. चार झाडं दिसत्यात. तिथं थांबू थोडा वेळ. आनी बुवा, आमच्यासाठी देव हायेच. आपण निघायच्या आधी वयनींनी चटणीभाकरी संग दिली हाय. माझी न् आबाची सोय झाली बघा. त्या माऊलीनं तुमच्या तुकोबांचं काही ऐकलं नाही. ह्ये गाठोडं गुपचूप आणून ठेवलं आनी कुनाला बोलू नगं म्हनाली. तुकोबा विठ्ठल हायीत तर ही पन अशी रखमाई हायंच की!

हे ऐकून आबाला मोठा प्रश्न पडला,

ह्या गाडीवाल्याला बी जेवायचं दिसतंय! तो म्हणणार संग जेवू या. आन् आता ह्या बुवाचं कसं? ह्यो बामन आपल्यासंग कसा ज्येवनार?

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.d.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?