' चित्रपटसृष्टीतल्या दादामुनींनी ‘त्या’ घटनेनंतर कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही! – InMarathi

चित्रपटसृष्टीतल्या दादामुनींनी ‘त्या’ घटनेनंतर कधीच स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक महान कलाकार होऊन गेले. त्यांच्या अजरामर कलाकृतींच्या स्मृती आजही रसिकांच्या मनात ताज्या आहेत. अश्याच महान कलाकारांपैकी एक म्हणजे गांगुली कुटुंब होय. आजही ह्या गांगुली कुटुंबियांचे वंशज भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्या पूर्वजांचा वारसा चालवत आहेत.

गांगुली कुटुंबातील प्रसिद्ध सदस्य म्हणजेच कुमुदलाल गांगुली उर्फ अशोक कुमार ज्यांना संपूर्ण चित्रपटसृष्टी दादामुनी या नावाने ओळखते.

 

ashok kumar inmarathi

 

अशोक कुमार यांचा जन्म भागलपूर (ब्रिटिशकालीन बंगाल प्रेसिडेन्सी) येथे १३ ऑक्टोबर १९११ रोजी एका बंगाली हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे एक प्रख्यात वकील होते तर आई गौरी देवी गृहिणी होत्या.

अशोक कुमार हे चार भावंडांत सर्वात थोरले! त्यांना दोन लहान भाऊ तर एक लहान बहीण होती. त्यांच्या भगिनीचे नाव सती देवी होते. सती देवी यांचा विवाह त्या काळच्या प्रथेप्रमाणे लहान वयातच शशधर मुखर्जी ह्यांच्याशी झाला.

हेच शशधर मुखर्जी म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते होते. प्रसिद्ध अभिनेते जॉय मुखर्जी, शोमू मुखर्जी, देब मुखर्जी ही ह्यांचीच मुले!

तर अशोक कुमार यांच्यापेक्षा १४  वर्षांनी लहान असे त्यांचे बंधू कल्याण उर्फ अनुप कुमार हे देखील प्रसिद्ध अभिनेते होते आणि सर्वात धाकटे हे आभास म्हणजेच किशोर कुमार होते. अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार या बंधूंनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला आहे.

या भावंडांचे चित्रपट बघत अनेक जुन्या पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या. अशोक कुमार हे सर्वात थोरले असल्याने साहजिकच त्यांचा त्यांच्या सगळ्याच भावंडांवर जीव होता.

 

ashok kishore and anoop inmarathi

 

यश आणि कीर्ती मिळवून देखील कायम जमिनीवर पाय ठेवून राहणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांसारखे आयुष्य जगलेल्या अशोक कुमार यांच्या आयुष्यात एक घटना अशी घडली की त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करायचे सोडून दिले.

अशोक कुमार आणि किशोर कुमार यांच्या वयात १९ वर्षांचे अंतर होते. असे असले तरीही दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते. म्हणूनच किशोर कुमार यांच्या निधनानंतर अशोक कुमारनी त्यांचा वाढदिवस साजरा करणे कायमचे सोडून दिले.

ज्या दिवशी म्हणजेच १३ ऑक्टोबर अशोक कुमार यांचा जन्मदिवस असतो त्याच दिवशी दुर्दैवाने किशोर कुमार यांचे अकस्मात हार्ट अटॅकने निधन झाले.

१३ ऑक्टोबर १९८७ रोजी अशोक कुमार यांचा ७६वा वाढदिवस होता. पण अचानक त्यांना बातमी कळली की त्यांचे लाडके धाकटे बंधू किशोर कुमारचे अचानक अकाली निधन झाले. या बातमीमुळे त्यांना इतका धक्का बसला की पुढच्या आयुष्यात त्यांनी कधीही स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही.

 

kishore kumar 2 inmarathi

 

मृत्यू येण्यापूर्वी माणसाला काही संकेत मिळतात असे अनेकांना वाटते. ३४ वर्षांपूर्वी १३ ऑक्टोबर १९८७ रोजी किशोर कुमार यांनादेखील काहीतरी जाणवले असावे. कारण कदाचित याच कारणामुळे त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला सुमितला पोहायला जाण्यापासून थांबवले.

त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की आज घरातच थांब. कुठेही जाऊ नको. त्यांना जाण्यापूर्वी कदाचित त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणजेच अमितला देखील शेवटचे भेटून घ्यायचे होते. त्यावेळी अमित कुमार कॅनडामध्ये होते आणि त्याच दिवशी त्यांचे परतीचे विमान देखील होते.

निघण्यापूर्वी अमित कुमार aआणि किशोर कुमार यांच्यात फोनवर बोलणे झाले. अमित कुमारच्या विमानाला उशीर तर होणार नाही ना असे किशोर कुमार यांना टेन्शन आले होते. त्यांनी पत्नीशी म्हणजेच लीना ह्यांच्याशी हार्ट अटॅकच्या प्राथमिक लक्षणांविषयी चर्चा देखील केली.

किशोर कुमारला टेन्शन आलेले बघून लीनाने त्यांना विचारले की , “डॉक्टरांना बोलवायचे का?” परंतु किशोर कुमारांनी हसून डॉक्टरांना भेटणे टाळले. ते म्हणाले की, “डॉक्टर आले तर मला खरंच हार्ट अटॅक येईल.”

 

kishore kumar happy inmarathi

 

त्यादिवशी दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी किशोर कुमारांना खरंच त्रास होऊ लागला आणि त्यांना हार्ट अटॅक आला. किशोर कुमार यांचा खोड्या काढण्याचा स्वभाव असल्याने सुरुवातीला लीनाला वाटले की ते त्यावेळेला देखील मजा करत आहेत. परंतु त्यावेळी मात्र खरंच किशोर कुमारना हार्ट अटॅक आला होता.

किशोर कुमार आणि अशोक कुमार यांच्यात जरी १८ वर्षांचे अंतर असले तरीही त्यांच्यात मित्रत्वाचे नाते होते. म्हणूनच मोठ्या भावाच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त किशोर कुमार यांनी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. त्यांनी अशोक कुमारना फोनवर सांगितले होते की ते त्यांच्या वाढदिवसाला त्यांना एक खास भेट देतील.

नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. नियतीने अशोक कुमार यांच्या वाढदिवशी त्यांना अशी क्रूर भेट दिली की तो दिवस त्यांच्यासाठी कायमचा अशुभ ठरला.

वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची आणि त्यांच्या लाडक्या भावाची कायमची ताटातूट झाली. वाढदिवसाच्या पार्टीला सगळी निमंत्रित मंडळी वेळेत पोहोचली होती आणि किशोर कुमारांची वाट बघत होती पण ज्यांनी ती पार्टी आयोजित केली होती ते मात्र हे जग कायमचे सोडून गेले होते.

बराच वेळ वाट बघून देखील किशोर कुमार आले नाहीत हे बघून अखेर अशोक कुमार यांनी फोन करून चौकशी करायचा निर्णय घेतला. किशोर कुमार यांचा स्वभाव गमतीशीर होता. त्यांना खोड्या काढायला आवडायचे. मोठ्या भावाच्या खोड्या देखील ते अनेकदा काढत असत.

 

ashok kumar 3 inmarathi

 

अनेकदा ते स्वतःच्या निधनाची खोटी बातमी पाठवून अशोक कुमार यांना त्रास देत असत. यावेळीस अशोक कुमारांनी फोन केला तर त्यांना हीच बातमी मिळाली.

सुरुवातीला अशोक कुमार ह्यांना वाटले की किशोर नेहेमीप्रमाणे त्यांची खोडी काढत आहेत त्यामुळे त्यांचा ह्या बातमीवर विश्वास बसला नाही. पण जेव्हा त्यांना सत्य कळले की किशोर कुमार खरंच ह्या जगात नाहीत, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

त्यांना तो धक्का सहन झाला नाही आणि ते सुन्न होऊन खाली बसले. जेव्हा पार्टीत आलेल्यांना ही दुःखद बातमी कळली तेव्हा प्रत्येकालाच धक्का बसला.

ज्या किशोर कुमारांनी मोठ्या भावाचा ७६वा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करायचे ठरवले होते, त्यासाठी उत्साहाने सगळी तयारी केली होती तेच वयाच्या ५८व्या वर्षी आपल्यातून निघून गेले. एका भावासाठी यापेक्षा मोठे दुःख काय असेल?

अशोक कुमार त्याकाळात त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या दुःखातून सावरले नव्हते. त्यात त्यांना हा दुसरा धक्का मिळाला. या दुःखातून ते कधीही बाहेर येऊ शकले नाहीत. म्हणूनच त्यांनी हा दिवस अशुभ आहे असे ठरवून परत कधीही स्वतःचा वाढदिवस साजरा केला नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?