' IIT साठीच्या जीवघेण्या स्पर्धेत धावणाऱ्या विद्यार्थ्यांचं अचूक चित्रण करणारी 'कोटा फॅक्टरी'

IIT साठीच्या जीवघेण्या स्पर्धेत धावणाऱ्या विद्यार्थ्यांचं अचूक चित्रण करणारी ‘कोटा फॅक्टरी’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

गेल्या काही वर्षांपासून भारतीय मनोरंजन विश्वात कसली उणीव भासली असेल तर ती लेखकांची, चांगले लेखक नसल्याने आपल्या प्रेक्षकांना ‘राधे’सारखे स्कॅम सिनेमा म्हणून स्वीकारायला लागतात, पण जेव्हापासून ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकांना सवय झालीये तेव्हापासून लेखकांची उणीव भरून निघायला सुरुवात झाली आहे.

यामध्ये अग्रेसर आहेत ते TVF (The Viral fever). बऱ्याच आयआयटीयन्सनी एकत्रित येऊन निर्माण केलेला ब्रॅंड आज साऱ्या मनोरंजन सृष्टीला त्यांची दखल घ्यायला भाग पाडतोय!

युट्यूबसारख्या छोट्या माध्यमातून आज त्यांनी जे साम्राज्य उभं केलंय ते इथल्या कोणत्याही सुपरस्टारला उभ्या आयुष्यात जमणार नाही. युट्यूबपासून थेट नेटफ्लिक्स अशी मजल मारणाऱ्या याच टिव्हिएफचा कोटा फॅक्टरी या सिरिजचा दूसरा सीझन नेटफ्लिक्सवर कालच रिलीज झाला, आणि लोकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांना या मनोरंजन सृष्टिकडून काय अपेक्षित आहे.

 

kota factory season 2 inmarathi

याच सिरिजचा पहिला सीझन ५ एपिसोडसह युट्यूबवर मोफत उपलब्ध करून दिला होता, तेव्हा ही सिरिज अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतली आणि मग प्रेक्षकांचे डोळे लागले होते ते याच्या दुसऱ्या सीझनकडे.

याचा दूसरा सीझन नेटफ्लिक्सवर येणार अशी जेव्हा घोषणा झाली तेव्हाच या सीझनच्या प्रोडक्शन व्हॅल्यूचा अंदाज लावला होता आणि नेटफ्लिक्सवर सिरिज येणार म्हणजे ती सर्वार्थाने उत्कृष्ट प्रॉडक्ट बनणार याची खात्री होती.

अगदी याच अपेक्षा पूर्ण करणारा हा दूसरा सीझन बघताना तुम्हाला पहिला सीझन जास्त चांगला वाटू शकेल पण नुकताच आलेला दूसरा सीझन हा जास्त परिपक्व आहे असं मला वाटलं.

पहिल्या सीझनमध्ये आयआयटी करणाऱ्यांसाठी मक्केसारखं पवित्र ठिकाण म्हणजेच कोटा या शहराचा इतिहास आपल्यासमोर मांडला होता, ते मांडताना या शहरात आयआयटीचं स्वप्न घेऊन आलेल्या ३ मित्रांची गोष्ट आपल्याला बघायला मिळाली.

वैभव, मिना, उदय यांच्यासोबतच कोटामध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या बऱ्याच पैलूंवर या सिरिजने प्रकाश टाकला, आणि एकंदरच तिथलं वातावरण, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, त्यांच्यातली चढाओढ, विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं आणि एकंदरच आयआयटीच्या स्वप्नात धुंद असलेलं कोटा शहर हे सगळं आपल्याला फार बारकाईने बघायला मिळालं होतं.

 

kota factor cast inmarathi

 

ज्या कोचिंगमधून वैभवच्या वडिलांना अपमानित करून बाहेर काढण्यात आलं होतं त्याच कोचिंगमध्ये वैभव मेहनतीने अॅडमिशन मिळवतो, आपल्या जुन्या मित्रांना सोडून तो आपल्या भविष्याचा विचार करून एक मोठा निर्णय घेतो आणि तिथे पहिला सीझन संपतो.

नंतर वैभवच्या प्रवासातल्या अडचणी वाढतात आणि त्यातून तो कशाप्रकारे मार्ग काढतो हे आपल्याला दुसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळतं. त्याचे मित्र मीना, उदय हे वेगळ्या कोचिंगमध्ये जरी शिकत असले तरी तेसुद्धा या पुढच्या प्रवासात कसे भरडले जातात हेसुद्धा आपल्याला बघायला मिळतं.

पहिल्या सीझनमध्ये वैभव आणि वर्तिकामधली लव्ह स्टोरी जशी मच्युअर पद्धतीने हाताळली आहे तशीच ती लव्ह स्टोरी या दुसऱ्या सीझनमध्ये पुढे सरकताना आपल्याला दिसते पण त्यावर मुख्य फोकस न ठेवता कोटा फॅक्टरीचे मेकर्स प्रेक्षकांना विचलित करत नाहीत हीच खासियत आहे या सिरिजची.

खासकरून The Aspirants सारखी सिरिज दिल्यानंतर कोटा फॅक्टरीकडून आणखीन अपेक्षा होत्या ज्या ही सिरिज पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होते. सिरिजमध्ये काही त्रुटीसुद्धा आहेत पण त्यामुळे तुमचा सिरिज बघायचा अनुभव नक्कीच खराब होणार नाही.

 

the aspirants inmarathi

 

खासकरून या दुसऱ्या सीझनमधल्या काही पात्रांच्या बाबतीत लिखाणात तुम्हाला कमतरता जाणवेल, जसं की उदय या वैभवच्या मित्राला फक्त काही कॉमेडी सिक्वेन्ससाठीच या सीझनमध्ये वापरलं आहे, वर्तिका या पात्राला म्हणावा तसा न्याय देता आला नाहीये.

पण सिरिजची २ मुख्य पात्रं म्हणजे वैभव पांडे आणि जितू भैय्या या दोघांचं पात्रं खूप वेगळ्याच पद्धतीने या सीझनमध्ये एक्सप्लोर केलं आहे. ३५ ते ४५ मिनिटांचे ५ एपिसोड बघताना कुठेही सिरिज तुम्हाला रटाळ वाटणार नाही.

तुम्ही आयआयटी किंवा इंजिनियरिंग करा अथवा नका करू या सिरीजमधल्या विद्यार्थ्यांच्या पात्राशी आपण सगळेच कनेक्ट होतो कारण आपणही त्याच फेजमधून कधीतरी गेलेलो असतो.

विद्यार्थीदशेत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचं चित्रण अचूक केल्यानेच आपण या सिरिजशी जोडले जातो. आयआयटी किंवा कोटा हे फक्त निमित्त आहे, या सिरिजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा स्ट्रगल हा आपलासा वाटतो.

मग ते करियरच्या दृष्टीने फोकस राहण्याबाबतीत असो किंवा मुलामुलींना एकमेकांबद्दल वाटणारं आकर्षण असो, या सगळ्या गोष्टी इतक्या नाजुकतेने या सिरिजमध्ये हाताळल्या आहेत की आपल्याला त्या विद्यार्थ्यांमध्ये आपलंच प्रतिबिंब दिसतं.

 

vartika and vaibhav inmarathi

 

संवाद आणि पटकथेच्या बाबतीत तर ही सिरिज म्हणजे एक मास्टरपिस आहे. वैभव जेव्हा सुरुवातीला महेश्वरीमध्ये शिकायला सुरुवात करतो आणि ऑडिटोरियममध्ये जेव्हा महेश्वरी भाषण द्यायला येतात तो सीन आणि ते भाषण ऐकतान वैभवच्या चेहऱ्यावर दिसणारा आमूलाग्र बदल हे सगळं बघताना तो सीन अंगावर येतोच.

खासकरून त्याच सीनमध्ये आपल्याला कोटामधल्या जीवघेण्या स्पर्धेची प्रकर्षाने जाणीव होते.

जितू भैय्या हे पात्र तर ज्याने लिहिलंय त्याला त्रिवार वंदन, म्हणजे जितू भैय्यासारखा शिक्षक जर आम्हाला मिळाला असता तर आम्हीसुद्धा आयआयटी पास केलं असतं इतका आत्मविश्वास ते पात्र आपल्यासमोर आल्यावर येतो.

परीक्षांच्या दरम्यान तो विद्यार्थ्यांना निरोगी राहण्यासाठी एक कानमंत्र देतो तो एपिसोड आणि त्या एपिसोडच्या शेवटी आईचं महत्व ज्या पद्धतीने अधोरेखित केलं आहे ते बघताना तुमच्या डोळ्यात हमखास पाणी येईलच.

 

jeetu bhaiya inmarathi

 

शिक्षकी पेशा आणि बिझनेस या दोन्हीच्या बाबतीत आपल्या कॉन्सेप्ट अगदी क्लियर असणारा जितू भैय्या जेव्हा महेश्वरीची ऑफर सोडून स्वतःच्या कोचिंग संस्था सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम राहतो तो सीन आणि त्या सिनच्या मागे ऐकू येणारा जितू भैय्याचा डायलॉग हे बघताना प्रकर्षाने जाणवतं की टिव्हिएफच्या सिरिज काय काय शिकवून जातात!

वैभव हे पात्र साकारणारा मयूर मोरे असो, वर्तिका साकारणारी रेवती असो, मिना हे पात्र साकारणारा रंजन राज असो किंवा उदय साकारणारा आलम खान असो, प्रत्येकानेच यात स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलंय हे नक्की. बाकी एहसास, समीर सक्सेना, जितेंद्र कुमार यांनी खूप सुंदर साथ दिली आहे.

सिरिजमधले संवाद जितके काळजाला भिडणारे आहेत तितकीच सिनेमॅटोग्राफी आणि संगीत, प्रत्येक सीन आणि त्यामागचं गांभीर्य चपखल मांडणाऱ्या काही फ्रेम्स आणि गाणी तर तुम्हाला निशब्द करतील. पहिल्याच एपिसोडचं अमित त्रिवेदिचं गाणं तर खूप हटके आहे.

सिरिज शेवटाकडे येताना JEE Advance चा निकाल आणि त्यादरम्यान कोटा शहरातला माहोल दाखवताना मानवी भावनांचे विविध कंगोरे ज्याप्रकारे आपल्यासमोर उलगडते ते बघताना मिश्र भावना आपल्या मनात दाटून येतात.

आणि त्यांनंतर समोर येणारा क्लायमॅक्स आणि त्याचं एकंदरच चित्रीकरण सुन्न करणारं आहे. आयआयटीच्या स्वप्नामागे घोड्यासारखी झापडं लावून धावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारा तो शेवट बघून तोंडातून शब्दच फुटत नाहीत.

 

kota factory 2 scenes inmarathi

 

तो शेवट बघून जितू भैय्याचा स्वप्नं आणि लक्ष्य यातला फरक सांगणार एकच डायलॉग सतत डोक्यात घोळत राहतो “सपने देखे जाते है और एम (aim) अचीव्ह किये जाते है.” ज्याला हा फरक समजला तोच या कोटाच्या स्पर्धेत टिकून राहतो आणि तोच यातून तावून सुलाखून बाहेर पडतो!

मनोरंजनाच्या या रेसमध्ये प्रेक्षकांची नस अगदी अचूक ओळखणारं टिव्हिएफ त्यांच्या कंटेंटमधून मनोरंजन तर करतंच पण आपल्या तरुण पिढीला एकप्रकारे मौलिक मार्गदर्शनसुद्धा देतं.

मग ते स्टार्ट-अपच्या कॉन्सेप्टवर भाष्य करणारं पिचर्स असो, सिव्हिल सर्व्हिसेच्या विद्यार्थ्यांवर  बेतलेली The Aspirants असो किंवा आयआयटी आणि कोटामधली जीवघेणी स्पर्धा दाखवणारी कोटा फॅक्टरी असो, टिव्हिएफच्या कंटेंटमधून प्रत्येकालाच काहीतरी नवीन शिकायला मिळतं!

 

tvf series inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?