' अल्ताफ राजाची कॅसेट विकत घेण्यासाठी लोकं भल्या पहाटे दुकानाबाहेर रांगा लावायचे! – InMarathi

अल्ताफ राजाची कॅसेट विकत घेण्यासाठी लोकं भल्या पहाटे दुकानाबाहेर रांगा लावायचे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

९० चं दशक हे संगीत आणि एकूणच मनोरंजन क्षेत्राला एक नवीन वळण देणारं होतं. आशिकीची गाणी, नदीम-श्रवणचं मधुर संगीत, कुमार सानू यांचा आवाज, रोमँटिक सिनेमे यामध्ये लोक चिंब भिजले होते. कमालीची गोष्ट म्हणजे ज्यावेळी प्रेमगीत लोकप्रिय होत होते त्याच वेळी विरह असलेले गाणे, विश्वासघात झालेले गाणे सगळ्याच प्रकारच्या गाण्यांना रसिक दाद देत होते.

१९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘बेवफा सनम’ या सिनेमाच्या गण्यातून बॉलीवूडला सोनू निगमसारखा हिरा सापडला.

बेवफा सनमची गाणी प्रत्येक टपरी, रिक्षात वाजतच होते आणि त्याच वेळी १९९७ मध्ये ‘तुम तो ठेहरे परदेसी’ हा अल्बम येऊन धडकला. नागपूरमध्ये राहणाऱ्या अल्ताफ राजा या कवाली गायकाने त्याच्या गाण्यांचा अल्बम तयार करून आपलं नशीब आजमवलं आणि रातोरात तो स्टार झाला.

 

altaf raja inmarathi

 

आज हे गाणं ऐकणाऱ्या किंवा त्याबद्दल वाचणाऱ्या लोकांसाठी हे गाणं थोडं कमी दर्जाचं वाटू शकतं. पण, आजच्याच सारखं जर आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर ७० लाख कॅसेट विकून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये ‘तुम तो ठेहरे परदेसी’चं नाव आहे ही त्याची महती आपण त्या गायकपासून हिरावून घेऊ शकत नाही.

सोशल मीडिया, डिजिटल माध्यम उपलब्ध नसलेल्या त्या काळात लोकांनी ही कॅसेट भल्या पहाटे कॅसेटच्या दुकानासमोर रांग लावून खरेदी केली होती.

साधे शब्द, थोडा नाकातून असलेला आवाज, गाण्यातील कथा सांगतांना स्वतः अल्ताफ राजाचं लोकांना दिसणं हे सगळंच लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं.

आजच्या ट्वेंटी ट्वेंटी च्या फास्ट काळापेक्षा प्रेमकथा यशस्वी न होण्याचं प्रमाण त्या काळात अधिक होतं, म्हणूनही हे गाणं लोकांना खुप आवडलं असावं असं संगीत क्षेत्रातील जाणकार सांगत असतात.

काय कथा होती या गाण्यात?

एका शहरातील मुलाचा गावातील घरासमोर अपघात होतो. त्या घरातील मुलगी त्याची खूप काळजी घेते. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण, शहरातील मुलगा त्याची प्रकृती बरी झाली की परत शहरात जातो आणि आपल्या आधीच्या गर्लफ्रेंडला भेटतो.

त्याला जाणवतं की आपण गावातील मुलीच्या प्रेमात पडलो आहोत. इकडे गावातील लोक त्या मुलीला सांगत असतात की, “आता तो मुलगा काही परत यायचा नाही, तू वाट बघणं सोडून दे.”

हे सगळं सुरू असतांना अल्ताफ राजा हा वॉटर पार्कमध्ये उभं राहून एकापेक्षा एक ‘शेर’ अर्ज करून प्रेमात धोका झालेल्या लोकांची सहानुभूती यशस्वीपणे कमवत असतो.

 

altaf raja inmarathi 2

 

मुलगी शहरात येते आणि त्या नायकाचा शोध घेते. तो तिला सापडतो, पण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत. तो तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. ती त्याला जाब विचारते. पण, तो तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. नायिकेला तो धक्का सहन होत नाही आणि ती आत्महत्या करते.

नायकाला जेव्हा त्याच्या प्रेमाची जाणीव होते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. गाण्यात एकीकडे हे सगळं घडत असतं आणि दुसरीकडे अल्ताफ राजा आपल्याला मागच्या बारा महिन्यात काय घडून गेलंय याची उजळणी करून सांगत असतो.

लोक हे गाणं आणि त्यातील कथा प्रत्येकवेळी टीव्हीवर लागले की ऐकायचे, बघायचे. एका ठराविक वर्गातील लोकांना का होईना, पण हे सगळं इतकं कनेक्ट झालं की, आज २ मिनिटांचे गाणे फॉरवर्ड करणारे तेच लोक तेव्हा हे १४ मिनिटांचं गाणंपरत परत बघत, ऐकत होते.

 

tum to thehere pardesi inmarathi

 

तुम तो ठेहरे परदेसी हे गाणं केवळ भारतातच नाही तर परदेशातसुद्धा खूप लोकप्रिय झालं होतं. आज प्रत्येक आठवड्यात बदलणाऱ्या गाण्यांच्या स्पर्धेत हे गाणं त्या काळात सलग ७ महिने लोकप्रिय गीतांच्या टॉप लिस्टवर होतं.

१९९७ चं सर्वात लोकप्रिय गीत म्हणूनसुद्धा काही वाहिनीने या गाण्याची निवड केली होती. ७० लाख कॅसेट्स विकल्या गेलेल्या या अल्बमची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला सुद्धा घ्यावी लागली होती.

गझल गायक म्हणून प्रसिद्ध होऊ पहाणाऱ्या अल्ताफ राजाने आपल्या आईचं म्हणणं ऐकून बॉलीवूडमध्ये पार्श्वगायक होण्याचं ठरवलं हे विशेष आहे.

 

altaf raja 3 inmarathi

 

बॉलीवूडमध्ये आपली एक ओळख निर्माण केल्यानंतर अल्ताफ राजाने ‘शपथ’ या सिनेमात मिथुन चक्रवर्ती आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत अभिनय सुद्धा केला आहे.

या सिनेमात घेण्यात आलेलं ‘थोडा इंतजार का मजा लिजीए’ हे गाणं सुद्धा खूप लोकप्रिय झालं होतं. या व्यतिरिक्त, ‘आवारा हवा का झोका हूं’, ‘यारो मैने पंगा ले लिया’ ही अल्ताफ राजाची इतर लोकप्रिय गाणी होती.

अरिजित सिंग, हनी सिंग भोवती फिरणाऱ्या आजच्या काळात एखाद्या गाण्याची चाल, शब्द लक्षात राहणं हीच फार मोठी गोष्ट आहे.

त्या काळात कमी माध्यम असतांना अल्ताफ राजा ने ‘तुम तो ठहेरे परदेसी’, आलिशा चिनॉयने ‘मेड इन इंडिया’, सोनू निगमने ‘दिवाना’, दलेरी मेहंदी, सिल्क रूट, युफोरिया सारख्या अल्बमने लोकांपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात पोहोचणं ही संगीताची खरी जादू म्हणता येईल.

 

90s pop singers inmarathi

आजच्या व्ह्यूज, लाईक्स, शेअरच्या स्पर्धेत या गायकांना पडावं लागलं नाही, म्हणून लोकांनी त्यांच्या गाण्यांना पसंती दिली, त्यांच्या लोकप्रियतेला नाही. ही संगीत क्षेत्रासाठी झालेली चांगली गोष्ट आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?