' स्टार्ट अप - बिझनेस - स्वयंरोजगार - ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय? वाचा!

स्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय? वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतीच एका चार्टर्ड अकाउंटन्ट मित्राने नोकरी सोडली आणि स्वतःची CA Firm सुरू केली. बोलता बोलता ह्या नव्या उद्योगाला ‘स्टार्ट अप’ म्हणून गेला. मागे एका डॉक्टर मैत्रिणीने खाजगी इस्पितळातील नोकरी सोडून स्वतःचं क्लिनिक सुरू केलं, तेव्हा ती “मी आता स्वतःचाच व्यवसाय सुरू केलाय” असं म्हणाली होती.

ह्या दोन्ही घटनांमधून आपल्याकडे एकंदरीत बिझनेस, सेल्फ एम्प्लॉयमेंट (स्वयंरोजगार) आणि आताशा चलनात आलेल्या “स्टार्ट अप” – ह्या तिन्ही प्रकारांबद्दल प्रचंड गोंधळ आहे हे लक्षात येतं.

हा गोंधळ फक्त “संज्ञा वापरण्यातील चूक” एवढ्या पुरता मर्यादित नाही. तिन्हींमधील फरक स्पष्ट नसल्यामुळे आपली पुढची वाटचाल नीट/हवी तशी नं होण्याचा धोका ह्यातून संभवतो.

त्यामुळे ह्या संज्ञा समजून घेऊन, विविध व्यवसाय-उद्योग प्रकारातील फरक लक्षात घेणं आवश्यक असतं.

सर्वप्रथम व्यवसाय/बिझनेस आणि स्वयंरोजगार/सेल्फ एम्प्लॉयमेंट ह्यातील फरक समजून घेऊ.

नोकरी आणि स्वयंरोजगार ह्यात फरक फक्त इतकाच असतो की नोकरीत तुमच्या कामावर लक्ष ठेवणारा आणि अडलं तर मदत करणारा बॉस असतो, तुमच्या कामाव्यतिरिक्त इतर अडचणींमध्ये सपोर्ट करणारी यंत्रणा असते (ऑफिस चा एसी चालत नाहीये, लॅपटॉप हँग होतोय, वॉटर कूलरमधलं पाणी संपलंय…इत्यादी!). त्या यंत्रणेचा आणि तुमचा काहीही संबंध नसतो. परंतु स्वयं रोजगारात अशी सोय नसते. तुम्हाला रोजच्या रोज तुमचं काम करावं लागतंच शिवाय इतर गोष्टीदेखील निस्तराव्या लागतात. इतर कामांसाठी तुम्ही लोक जरी ठेवले तरी तुम्हाला त्यात वैयक्तिक लक्ष द्यावंच लागतं.

 

freelancer-marathipizza01
tomorrowmakers.com

परंतु “व्यवसाय” असा नसतो. व्यवसायात तुमचं कामापुरतं, जुजबी लक्ष असलं – हाय लेव्हल निर्णय घेण्यापुरताच सहभाग असला तरी पुरेसा असतो. म्हणूनच –

बिझनेसमध्ये तुम्ही पंधरा दिवस सुटीवर गेलात तरी कमाईचं मीटर सुरूच असतं. ही सोय सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये नाही!

एका उदाहरणाने समजून घेऊया.

त्या डॉक्टर मैत्रिणीने स्वतःचं क्लिनिक सुरू केलंय. हा बिझनेस नव्हे. कारण तिला रोजच्या रोज क्लिनिकला जावं लागणारच. त्याशिवाय तिचं अर्थार्जन होणार नाही. शिवाय तिथली साफ सफाई वगैरेची काळजी तिला घ्यावी लागणार. त्यासाठी कुणी माणूस जरी ठेवला तरी त्या माणसाच्या कामाकडे लक्ष देणे, त्याचा पगार काढणे, तो सुटीवर गेला तर स्वतः ते काम करणे किंवा पर्यायी व्यवस्था लावणे – हे सर्व तिलाच करावं लागणार.

पण – पुढील काही वर्षांत, तिने तिच्या प्रॅक्टिसमध्ये प्रचंड यश कमावून मोठं हॉस्पिटल सुरू केलं – तिच्यासारखे बरेच डॉक्टर्स नोकरीला ठेवले व हॉस्पिटलचा कारभार बघणारी अक्खी यंत्रणा उभी केली – तर तो एक बिझनेस असेल. कारण तिला स्वतःला पेशन्ट्स ची तपासणी, हॉस्पिटलचं दैनंदिन कार्य ह्यात फार जास्त लक्ष देण्याची गरज नसेल. अर्थात, बिझनेवर सतत लक्ष ठेवावंच लागतं. दुर्लक्ष करून चालत नाही. परंतु काही काळ सुटी घेतली, दुर्लक्ष केलं तरी काम थांबत नाही — कारण – काही अडचण आलीच तर ती दूर करण्यासाठीसुद्धा माणसं ठेवलेली असतात, यंत्रणा उभी असते.

एखादी व्यक्ती एकाचवेळी सेल्फ-एम्प्लॉईड आणि बिझनेसमन देखील असू शकते.

शाहरूख खान एक अभिनेता म्हणून सेल्फ-एम्प्लॉईड आहे. परंतु त्याच्या चित्रपट निर्माण करणाऱ्या कंपनीचा – रेड चिलीज चा – मालक ह्या नात्याने तो बिझनेसमन सुद्धा आहे. कारण रेड चिलीजच्या दैनंदिन कारभारावर फक्त देखरेख करण्याचं काम तो करतो. कारभार चालवण्यासाठी यंत्रणा उभी केली गेली आहे.

हे चित्र आपण अधिक खोलात बघितलं तर गुंतागुंत वाढते जाते.

एखाद्या भल्या मोठ्या बिझनेसचा मालक – त्याच कंपनीचा नोकरदार देखील असतो. मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज चे चेअरमन आहेत. ग्रुपचे सर्वाधिक शेअर्स त्यांच्या मालकीचे आहेत. परंतु ते कंपनीचे पगारदार नोकर आहेत. भरपूर नफा कमावत असलेल्या कंपनीतून नफा उचलण्याचा तो एक अधिकृत (आणि भरपूर कर वाचवणारा!) मार्ग आहे.

असो – ही गुंतागुंत नं वाढवता – सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि बिझनेसमधील फरक समजून घेऊन आता पुढे सरकू या.

 

businessman-marathipizza
portalacepg.com.br

माझा चार्टर्ड अकाऊंटंट मित्र – त्याने सुरू केलेल्या प्रॅक्टिसला “स्टार्ट-अप” म्हणाला – हे चुकीचं होतं, हे आता एव्हाना लक्षात आलं असेलच. त्याने खरंतर नोकरी सोडून, स्वयंरोजगार सुरू केला आहे.

यथावकाश, त्याची प्रॅक्टिस भरभराटीस येईल आणि तो इतर चार्टर्ड अकाऊंटंट कामावर ठेऊन आपली CA फर्म मोठी करेल. त्यावेळी तो उद्योजक झालेला असेल. परंतु – तेव्हासुद्धा तो उद्योग – बिझनेसच असेल. स्टार्ट-अप नव्हे. स्टार्ट-अप हे काहीतरी वेगळं आहे.

प्रत्येक स्टार्ट-अप हा असा स्वयंरोजगार असतो जो “भविष्यात कधीतरी” खूप मोठा बिझनेस होणार असतो. परंतु – म्हणून प्रत्येक स्वयंरोजगार किंवा नवा बिझनेस हा “स्टार्ट-अप” नसतो.

एखाद्या नव्या उद्योगाला “स्टार्ट-अप” म्हणावं का – हे पुढील महत्वाच्या गोष्टींवरून ठरतं –

१) धंदा कमीत कमी भांडवलात सुरू होऊ शकतो का / झाला आहे का

२) धंदा प्रचंड मोठी growth मिळवण्याची शक्यता आहे का

३) सध्या बाजारात अश्याच प्रकारचे इतर कुठले ही मॉडेल नाहीयेत ना, असतील तर ह्या मॉडेलमध्ये गेम चेन्जर अशी एखादी नवी गोष्ट दिली जात आहे का

४) प्रचंड growth मिळवल्यानंतर धंद्यातील नफा कधी सुरू होणार, किती असेल आणि तो sustainable असेल का

आता वरील चार प्रश्नांचा विचार करता – आपला CA मित्र व त्याची संभाव्य मोठी CA फर्म आणि डॉक्टर मैत्रीण व तिचं संभाव्य मोठं हॉस्पिटल – ह्याचा विचार करा. ह्या दोघांच्याही बाबतीत केवळ पहिल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळतं.

हे दोन्ही व्यवसाय “प्रचंड” वाढ होऊ शकणारे नाहीत. विविध शहरांमध्ये ऑफिसेस/हॉस्पिटल्स उभे करणे हे भयंकर किचकट आणि खर्चिक काम असेल. तसंच, त्यातून – प्रश्न ३ च्या हिशेबाने – नवं, वेगळं काही दिलं जाणार नाहीये. फार फार तर स्वस्त, दर्जेदार सेवा एवढाच काय तो फरक असेल – जो एकूणच इंडस्ट्रीचा गेम चेन्जर असू शकत नाही. त्यामुळे “स्टार्ट-अप” म्हणून हे दोन्ही उद्योग बघता येत नाहीत.

आजकाल वेबडिझाईनिंग आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात नव्या कंपन्या निघाल्या की ते लोक देखील स्वतःला स्टार्ट अप म्हणवतात. ते सुद्धा कसं चुकीचं आहे हे वरील मुद्द्यांवरून लक्षात येईल.

एखाद्या स्टार्ट-अपचं विश्लेषण करताना चौथा प्रश्न – हा त्या स्टार्ट अपचं एका प्रस्थापित व्यवसायात रूपांतर “कधी” होईल – ह्या अनुषंगाने असतो. छोटासा व्यवसाय, स्वयंरोजगार फार दिवस तोट्यात चालवता येत नाही. त्यातून लवकरात लवकर नफा निघणं आवश्यक असतं. परंतु स्टार्ट-अप मध्ये ३-४ वर्ष नफ्याच्या विचारही होत नाही – कारण – संपूर्ण लक्ष भराभर मोठं होण्यावर केंद्रित केलेलं असतं. जबरदस्त गतीने ग्रोथ मिळवायची आणि मग प्रचंड मोठा युजर/कन्ज्युमर बेस तयार झाला की पर युजर थोडासा पैसे कमावून नेट प्रॉफिट मात्र प्रचंड कमवायचं – असं गणित असतं.

 

startup-marathipizza
techdayhq.com

अनेकांच्या मते स्टार्ट अप साठी पाचवा एक फॅक्टरसुद्धा लक्षात घेतला जातो –

५) बिझनेसचा खर्च कमी करणे / मोठी ग्रोथ मिळवणे / खूपच वेगळी सेवा पुरवणे – ह्या पैकी कुठल्या हेतूसाठी टेकनॉलॉजीचा अधिकाधिक वापर करून घेतला जात आहे का

थोडक्यात – एखादा व्यवसाय “स्टार्ट अप” असण्यासाठी नवीन टेकनॉलॉजी हा त्या व्यवसायाचा कणा असावा – असा हा तर्क आहे.

खरंतर कमीत कमी खर्चात खूप मोठं व्हायचं असेल किंवा अत्यंत नाविन्यपुर्ण सेवा पुरवायची असेल तर टेक्नॉलॉजी लागणारच!

वरील डॉक्टर किंवा CA च्याच उदाहरणाचा आधार घेतला तर – स्वतःची कंपनी किंवा हॉस्पिटल उभं करण्याऐवजी ह्यानी एखादा डिजिटल इंटरफेस तयार करून जगभरातील CA / डॉक्टर्स ना थेट ग्राहकांशी / रुग्णांशी जोडून दिलं – तर ते एक स्टार्ट अप म्हणता येईल. कारण –

१) कमी खर्च

२) प्रचंड मोठं मार्केट (पुणे/डोंबिवलीत बसून हा इंटरफेस तयार करता येईल – पण दिल्ली/अमेरिकेतील लोकसुद्धा ही सेवा वापरू शकतील)

३) नावीन्यपूर्ण सेवा

४) ग्राहक/रुग्णांकडून पैसे नं घेता CA/डॉक्टरांकडून पैसे घेण्याचं मॉडेल तयार करता येऊ शकतं – ज्यात प्रचंड मोठं पोटेंशिअल आहे

५) टेकनॉलॉजी हाच कणा असेल…!

आता “स्टार्ट-अप” म्हणजे काय हे समजून घेतल्यावर पुढील वाक्य परत वाचू या –

प्रत्येक स्टार्ट-अप हा असा स्वयंरोजगार असतो जो “भविष्यात कधीतरी” खूप मोठा बिझनेस होणार असतो.

स्वतःचा उद्योग सुरू केल्यावर दिवसरात्र मेहनत घ्यावीच लागते. कुणी पगार देणारा नसतो…आपणच आपले मालक असतो. त्यामुळे सुरुवातीला हा स्वयंरोजगारच असतो. सुरूवातीच्या काही वर्षात, कमीत कमी भांडवलावर प्रचंड मोठी वाढ साध्य करून – मग revenue वाढवत नेऊन नफा मिळवण्याच्या स्टेजपर्यंत हा स्टार्ट अप चा प्रवास असतो. एक वेळ अशी येते की वाढ कमी होते – किंवा खुंटते सुद्धा. त्यावेळी तुमचा स्टार्ट अप स्थिरस्थावर झालेला बिझनेस असतो.

अर्थात, बिझनेस मॉडेलमध्ये छोटे मोठे बदल घडवत असून नफा-growth वाढवता येऊ शकतेच. ती एक सतत सुरू रहाणारी प्रक्रिया असते.

स्वयंरोजगार – स्टार्ट अप – बिझनेस ह्यांतील फरक लक्षात येणं आवश्यक आहे. कारण “मला काही वर्षांत स्वतःचा बिझनेस उभा करून टेन्शन फ्री जगायचं आहे” असा विचार करणाऱ्याने सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या फेजमध्ये राहून चालत नाही.

“मला २ वर्षात भरपूर पैसे कमावणारा उद्योग उभा करायचा आहे” असं म्हणणाऱ्याने स्टार्ट-अप च्या फंदात पडू नये – कारण कुठलंच स्टार्ट-आपण ३-४ वर्षे तरी “भरपूर” पैसे कमावत नाही. उलट इन्व्हेस्टर्स शोधून, त्यांचे पैसे वापरून तोट्यातील धंदा अधिकाधिक मोठा करण्यावर भर द्यावा लागतो. आणि – विविध स्टार्ट अप्स चे आकडे बघून “माझा सध्या बऱ्यापैकी नफा देणारा व्यवसाय मला मल्टी-बिलियन बिझनेमध्ये बदलायचा आहे” असा विचार करून चालता येणार नाही – कारण एखाद्या व्यवसायाला झटपट मोठं होण्यासाठी, वरील ५ प्रश्नांची समाधानकारक उत्तरं द्यावी लागतात.

वेगळी वाट चालण्याची इच्छा असणाऱ्यांनी ह्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 171 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?