' बिग बॉसमधील युवा किर्तनकाराच्या नावामागचं गुपित माहित आहे का? – InMarathi

बिग बॉसमधील युवा किर्तनकाराच्या नावामागचं गुपित माहित आहे का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बिग बॉस मराठी ३ चा नवाकोरा सिझन कधी सुरु होणार याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या अनेक प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला आणि डोंगर पोखरून उंदीर निघाला अशा टिकेचा सूर सगळीकडे ऐकू येऊ लागला.

बिग बॉसच्या यंदाच्या नव्या सिझनमध्ये प्रसिद्ध, मात्तब्बर कलाकारांचा धिंगाणा अनुभवण्यासाठी टिव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आणि फारसे प्रसिद्ध नसलेल्या, नवख्या, काही कर अपरिचित चेहऱ्यांना पाहिल्यावर यंदाचा सिझन बघावा का? या प्रश्नासह अनेकांची आठवड्याची सुरुवात झाली.

 

bigg boss marathi inmarathi

 

या १५ व्यक्तीमत्वांबाबत प्रेक्षक साशंक असताना फेटा, टिळा आणि चेहऱ्यावरील गोड हास्यासह घरात पाऊल ठेवणारी किर्तनकार शिवलिला पाटील ही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली.

एकूणच छानछौकी, स्टायलिश अंदाज, मेकअपचा नखरा अशा बोल्ड अवतारात दाखल झालेल्या अभिनेत्रींच्या गर्दीत शिवलीलाचं साधेपण पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना भावलं यात शंका नाही. त्यामुळे सोमवारी बिगबॉसचा पहिलाभाग प्रसिद्ध झाला आण अनेकांना सोशल मिडीयावर शिवलिलाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी धडपड सुरु केली.

 

shivleela inmarathi

 

कोण आहे शिवलिला?

ह भ प शिवलिला पाटील अशी ओळख असलेली ही तरुणी सर्वात कमी वयोगटाची किर्तनकार म्हणून नावारुपास आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे जन्म झालेल्या शिवलिला हिने वयाच्या पाचव्या वर्षी किर्तन करण्यास सुरुवात केली.

शिवलिला हिचे वडील बाळासाहेब पाटील यांच्याकडून तिला किर्तनाचा वारसा मिळाला. अवघ्या पाचव्या वर्षी मंचावर उभी राहून ‘बोला पुंडलीक वरदे’ चा गजर करणाऱ्या शिवलिलाने आजपर्यंत तब्बल १००० किर्तन करण्याचा पल्ला गाठला आहे.

 

shivleela p inmarathi

 

विनोदातून प्रबोधन

तरुण वयात अध्यात्माची महती सांगणारी शिवलिला आपल्या खास विनोदी शैलीसाठी ओळखली जाते. विनोदी पद्धतीने, मनोरंजक उदाहरणं देत शिवलीला अनेक सामाजिक मुद्द्यांवर प्रबोधन करते.

सोशल मिडीयावर तिचे अनेक व्हिडिओ उपलब्ध असून तिच्या बिगबॉस प्रवेशामुळे हे व्हिडिओ प्रेक्षकांकडून पाहिले जात आहेत.

 

shivleela 1 inmarathi

 

बिगबॉसच्या घरातील पहिल्याच दिवसात साधी राहणी, वागण्यातील सालसपणा, घरातील इतर सगळ्या सहकलाकारांना दादा म्हणण्याची लकब यांमुळे शिवलीलाचं व्यक्तीमत्व छाप पाडणारं ठरतं आहे.

नावामागे दडलंय काय?

शिवलीला यांचं नाव इतरांपेक्षा थोडं वेगळं आहे, मात्र या नावामागील कारण अधिक भावणारं आहे. शिवलिला यांच्या पालकांना लग्नानंतर सातवर्ष मुल झालं नव्हतं. अनेक उपासतापास करूनही प्रयत्नांना यश येत नव्हतं. मात्र त्यांच्या आईला स्वप्नात दृष्टान्त मिळाला आणि त्यात शिवलिलामृत या ग्रंथाचे पारायण करावे असा संकेतही मिळाला. त्यानुसार १०८ वेळा शिवलीलामृत या ग्रंंथांचं पारायण केलं. आणि त्यानंतर त्या गरोदर राहिल्या.

सुरुवातीला ही बाब त्यांच्यासह घरच्यांच्या लक्षात आली नाही, मात्र डॉक्टरांकडून ही बातमी सांगितल्यानंतर त्यांच्या मातोश्रींना याचा खरा अर्थ लागला. म्हणूनच घरात लेकीचा जन्म झाल्यानंतर त्यांनी कृतज्ञतेच्या भावनेने तिचे नाव शिवलीला असं ठेवलं.

घरातूनच अध्यात्म, किर्तन यांचा वारसा धेऊन आलेली शिवलीला बिगबॉसमध्ये नेटाने लढेल तरीही भांडण, खेळ यांमध्येही ती आपले भान ढळू देणार नाही. तिच्यानिमित्ताने घरात किर्तनाचे रंग प्रेक्षकांना अनुभवता येतील अशी आशा प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?