' माकडचाळे करणाऱ्या ‘अशा’ मंडळींमुळेच खऱ्या संगीताचा ‘सूर’ हरवलाय! – InMarathi

माकडचाळे करणाऱ्या ‘अशा’ मंडळींमुळेच खऱ्या संगीताचा ‘सूर’ हरवलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

भारतीय संगीत मेलंय, खरंच निदान माझ्यासाठीतरी नक्कीच भारतीय संगीत मेलंय आणि याला एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे परिवर्तन!

ही गोष्ट कोणत्याही क्षेत्रात उलथापालथ करू शकते, पण संगीत क्षेत्रात झालेलं परिवर्तन हे विनाशाकडेच जाणारं आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली जेव्हा नुकतंच कक्कर भावंडं आणि त्या हनी सिंगचं कांटा लगा हे ‘अजरामर’ ‘गीत’ व्हीडियो स्वरूपात सर्फिंग करताना आलं.

 

kanta laga inmarathi

 

भारतीय संगीत समृद्ध करणारे बरेच दिग्गज हे अजरामर गीत बघायला आज या पृथ्वीतलावर नाहीत याचा खूप आनंद झाला, पण याच परिवर्तनाचा फटका प्रत्येक पिढीला बसलाय, आणि याचाच अनुभव आपली पिढी घेत आहे.

खरंतर संगीत, काव्य, गीत ही आजची देण नाही, संगीताचा इतिहास हा बराच प्राचीन काळापासून आहे ज्याचे काही पुरावे आपल्या रामायण काळात बघायला मिळतात. तिथून पुढे तानसेनसारखे कलाकारांनी, अनेक संत महात्मा जसे की संत कबीर यांनी त्यांच्या दोहयातून, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून या भारतीय संगीताचा पाया रचला!

त्यानंतर हळूहळू शास्त्रीय संगीत, वेगवेगळी घराणी, त्यांच्या परंपरा आणि त्यांनी जपलेली विशिष्ट संगीत संस्कृती ही आपल्याला अनुभवायला मिळाली. आज याच काही घराण्यातून तावून सुलाखून निघालेले पंडित भीमसेन जोशी, पंडीत जितेंद्र अभिषेकी, पंडीत जसराज यांच्यासारखे दिग्गज आपल्याला लाभले.

 

bhimsen ji and jasraj ji inmarathi

 

म्हणूनच कदाचित आजही शास्त्रीय संगीत हा संगीताचा पाया मानला जातो, जर तोच पाया पक्का नसेल तर पुढे सगळंच कठीण ठरतं. आपण शाळेत शिकताना एक विषय हमखास असा असतो जो कठीण असतो पण त्याच्याशिवाय पुढे पास होणंदेखील अशक्य असतं!

तसंच काहीसं शास्त्रीय संगीताच्या बाबतीत आहे की ते भल्याभल्यांना जमत नाही पण ते पूर्ण शिकल्याशिवाय पुढची पाटी ही कायम कोरीच राहते. अर्थात हा समजही कालांतराने खोडून काढला गेला!

नाट्यसंगीत हा प्रकार आधीच रंगमंचावर येऊ घातला होता. बालगंधर्व आणि इतर रंगकर्मी मंडळींनी पाया रचून ठेवलाच होता, मग पहिले मुकपट, मग हळूहळू चित्रपट आणि मग त्यानंतर एक वेगळाच प्रकार सुरू झाला तो म्हणजे चित्रपट संगीत!

याच चित्रपट संगीताचा खेळ खंडोबा झाला असला तरी एक काळ असा होता की चित्रपट गाण्याशिवाय पूर्ण होत नसत, मुळात चित्रपटातील गाण्याच्या यशावर चित्रपटाचं यश ठरलेलं असायचं.

films inmarathi

 

ग्रामोफोन, मग हळूहळू रेडियो, दूरदर्शन, चित्रहार, टेपरेकॉर्डर, बिनाका गीतमालाच्या कॅसेट आणि सीडीज इथवरचा चित्रपट संगीताचा प्रवास हा बराच सुसह्य झाला. पण नंतर आलेल्या एमपी३, मोबाईल्स आणि आता स्मार्टफोन्सच्या जनरेशनने या संगीताचा हरवला तो कायमचा!

आजकाल गाणी ही सिनेमात नसून ती वेगळी रिलीज केली जातात, सिंगल्स या नावाखाली खपवून दुनियाभरचा सगळा थिल्लरपणा भरून ते गाणं इंटरनेटवर एकाच वेळेस करोडो लोकं जगभरातून बघतात, आणि मग त्या गाण्याचा बिझनेस सुरू होतो.

मग याच गाण्यांच्यामध्येच आपल्या एखाद्या जुन्या आवडत्या गाण्याचे हिडीस वर्जन ऐकायला मिळते ज्याला रिमेक का रीमिक्स असं म्हणतात आणि ते ऐकल्यावर त्या सेन्सोडाईनच्या जाहिरातीतल्या डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणेच ‘अशी एक तीव्र सणक डोक्यात जाते!’

खरं सांगायचं झालं तर माझ्यापिढीनेही रिमेक रीमिक्स किंवा अल्बम पाहिलेत किंबहुना माझ्या पिढीने म्हणजेच ९० च्या दशकातच भारतात पॉप कल्चर वाढलं, फोफावलं, त्याच काळात अल्बम, रीमिक्सची सुरुवात झाली. मग त्या काळातल्या आजच्या रीमिक्स मध्ये नेमका फरक काय?

त्या काळातल्या कलाकारांनी गाण्यांची नक्कल केली पण त्यांनी त्या गाण्याच्या आत्म्याला धक्का लावला नाही. फक्त युथला थीरकायला लावतील अशा तालावर ती गाणी पुन्हा रेकॉर्ड केली. पण आजची रीमिक्स म्हणजे त्या गाण्याचा आत्मा विकून खाऊन केलेली आहेत त्यामुळेच हे परिवर्तन विनाशाकडे जातंय असंच पदोपदी जाणवतंय!

आजच्या संगीत क्षेत्रातल्या लोकांची नावं जरी काढली किंवा त्यांची झलक जरी समोर आली तरी अजीर्ण होतं. टोनी कक्कर, नेहा कक्कर, बादशाह, हनी सिंग, अरमान मलिक, लुलिया वेंटुर, आणि त्यात नुकताच स्टार झालेला बसपन का प्यार वाला सहदेव, यांची नावं जरी ऐकली तरी पोट बिघडल्यासारखं वाटतं.

 

singers inmarathi

 

आपल्या भारतीय चित्रपट संगीताची धुरा पुढे या लोकांवर असणार ही न पचणारी गोष्ट आहे. यांच्या गाण्यात काय आहे? लॉजिक शून्य, गीत शून्य, संगीत शून्य! मग आहे तरी काय? उघड्या पोरी, महागड्या कार्स, कपडे, बूट, डिस्को लाइट, फॉरेनर डान्सर, दारू, सिगरेट, अफू चरस गांजा आणि बरंच काही!

बरं एवढं करून ही लोकं पुढच्या पिढीचे गायक घडवण्यासाठी जज होतात आणि जो तमाशा करतात तो तर आपण सगळेच टेलिव्हिजनवर बघतो, हे सगळे माकडचाळे बघताना कधी कधी असं वाटतं की यांच्यापेक्षा ती ढिनचॅक पूजा बरी!

अरे आपले संगीतातले पूर्वज नेमकं काय शिकवून गेलेत आणि केवळ परिवर्तनाच्या नावाखाली आपण लोकांना काय देतोय याची थोडी तरी लाज बाळगा रे!

आमच्या पिढीनेच पॉप कल्चर स्वीकारलं, तेव्हासुद्धा अलिशा चिनॉयच्या मेड इन इंडियावर लोकांनी टीका केली, उषा उत्थपच्या गाण्यांची हेटाळणी केली, लकी अलीसारख्या गायकाला गायक म्हणून ओळख देण्यास नकार दिला, अदनान सामीसारख्या गायकाला फक्त त्याच्या वजनामुळे ओळखलं जायचं, सोनू निगम, शानसारख्या गायकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी कित्येक वर्षं मेहनत घ्यावी लागली.

 

pop singers hindi inmarathi

 

आज याच लोकांचे आदर्श पुढे ठेवून कित्येक गायक येतात, या कलाकारांनी जो सन्मान मिळवला ते आजच्या या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या, डोक्याचं घरटं करून अतरंगी कपडे घालून हिडीस नृत्य करणाऱ्या माकडांना मिळवता येणार आहे का?

गायक तर सोडाच पण आजच्या काळात उत्कृष्ट संगीतकार तरी आहेत का? एक दोन अल्बम करून गायब झालेले संगीतकार नाही तर ज्यांनी त्यांचं सर्वस्व या क्षेत्रात झोकून दिलं.

ए.आर. रेहमान, शंकर-एहसान-लॉय, अमित त्रिवेदि, सलीम सुलेमान, अजय-अतुल असे काही हातावर मोजण्यासारखे संगीतकार सोडले तर असे कोण आहेत जे पुढची पिढी घडवतील?

रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून बसलेल्या संगीतकरांचं नावदेखील मी घेणार नाही कारण सर्वप्रथम इतरांचं परीक्षण करण्याआधी स्वतःचं परीक्षण करणं अत्यावश्यक आहे!

 

himesh and vishal inmarathi

 

संगीतकार म्हणून करियर घडवू इच्छित असणाऱ्या प्रत्येकाला आर. डी. बर्मन व्हायचं असतं, पण कक्कर भावंडं आणि हनी सिंगसारख्या मार्गदर्शनाखाली हिमेश रेशमियासारखेच संगीतकार बनू शकतात.

पंचमदा यांच्यावरसुद्धा पाश्चात्य संगीत चोरी केल्याचे आरोप झाले पण आज २०२१ मध्येसुद्धा आयफोनचा नवीन फोन लॉंच करताना अॅपलला पंचमच्या ‘दम मारो दम’चीच आठवण येते.

यावरूनच पंचमचं श्रेष्ठत्व तुम्हाला समजेल त्यामुळे ही पिढी पंचम यांच्या आसपास पोहोचायचं स्वप्नदेखील बघू शकणार नाही हे त्रिभुवनातलं सत्य आहे!

 

pancham da inmarathi

 

जी अवस्था गायक आणि संगीतकारांची तीच अवस्था गीतकारांची. ‘दम मारो दम’ पासून ‘चार बोटल वोडका’ हा प्रवास नेमका कसा झाला हे आपण याची दही याची डोळा पाहिलेलं आहे.

गुलजार, जावेद अख्तर, कैफि आजमी, मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी असे कित्येक दिग्गज जे काव्य रचायचे त्यात मानवी भावनांचे ९ रस उतरायचे त्यामुळेच ते काव्यदेखील मनाला भिडायचं!

म्हणूनच आज आपल्याला जुनी गाणी बरीचशी तोंडपाठ आहेत आणि नवीन गाणी कितीही वेळा ऐकली तरी ते शब्द तोंडात बसत नाहीत!

या गीतकारांपैकीसुद्धा एक गुलजार साहेबच रसिकांची नस ओळखून आहेत म्हणूनच “हमने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो” हे लिहिणाऱ्या गीतकाराला “बिडी जलईले” किंवा “कजरा रे” सारखी गाणी लिहिता येतात आणि लोकं अक्षरशः ती डोक्यावर घेतात!

 

gulzar inmarathi

 

जुन्या गाण्यांपैकीसुद्धा कैक गाणी ही वादग्रस्त होती, डबल मीनिंग होती, बोल्ड होती, पण ती गाणी लिहिणारे गीतकारही इतके हुशार होते की ते अशा शब्दांचा वापर करायचे ज्याणेकरून कुणालाच त्यावर आक्षेप घेता येत नसे.

इतक्या बारकाईने लिहिणारे गीतकार आजच्या काळात आहेत का? आमच्या जनरेशनने टीप टीप बरसा पानी, आजा मेरी गाडी में बैठ जा पासून  थेट भिगे होंट तेरेपर्यंत वेगवेगळे प्रयोग पचवले, पण या सगळ्यापलीकडे गेलेली आजची गाणी ही गाणी म्हणायच्या तरी लायकीची आहेत का? असा प्रश्न मनात हमखास येतोच!

एक काळ होता जेव्हा आम्ही चित्रपटाच्या गाण्यांची आतुरतेने वाट बघायचो. त्या अल्बमची कॅसेट, सीडी आणून घरच्या सिस्टिमवर पुन्हा पुन्हा ऐकण्यातली मजा आजच्या स्मार्टफोनवर ‘सिंगल्स’ किंवा ‘कव्हर’ वर्जन ऐकणाऱ्या पिढीला समजणार नाही.

 

cassetes inmarathi

 

शंकर-जयकिशन, मदन मोहन, एस.डी. पंचम, ओ.पी. नय्यर, रफी, किशोर, लतादी, आशाजी, मुकेश, मन्ना डे, तलत महमुद, पुन्हा होणार नाही, पण या आजच्या पिढीने किमान जतिन-ललित, नदीम-श्रवण, सोनू निगम, शान, लकी अली, मोहित चौहान, रेहमान, अजय-अतुल, यांच्याकडून काहीतरी धडे घ्यावे!

संगीत क्षेत्रात अनू मलिक, अलताफ राजापासून आजकालच्या हिमेश रेशमिया, प्रीतम अशा लोकांनीसुद्धा एक काळ गाजवला, निदान यांच्यासारखं तरी नक्कल करण्यात तरी पटाईत झालात तरी चालले पण ही बादशाह, कक्कर, हनी सिंग किंवा तो सहदेव ही घाण नको या क्षेत्रात हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?