' ‘स्वस्त आणि स्टायलिश’ उत्पादनं बनवत, त्याने मोठमोठ्या कंपन्यांचा ‘आवाज’च दाबला… – InMarathi

‘स्वस्त आणि स्टायलिश’ उत्पादनं बनवत, त्याने मोठमोठ्या कंपन्यांचा ‘आवाज’च दाबला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

“अरे तुझ्या हेडफोन्समधून बीट्स कसले सॉलिड ऐकू येतात!”

“म्हणजे काय! म्हणून तर मी ‘बोट’चे घेतले.”

“यार हे जेबीएलचे हेडफोन्स किती महाग आहेत!”

“अरे बोटचे घे ना! जेबीएलपेक्षा स्वस्त पण क्वालिटी मस्त आहे.”

कॉलेजवयीन मुलांचे किंवा टिनेजर्सचे असे संवाद आपल्या कानांवर बऱ्याचदा पडतात. हल्ली स्मार्ट फोन म्हणजे जादूची डबी झाली आहे. म्हणाल ती गोष्ट मोबाईलवर उपलब्ध असते. अभ्यास असो की शॉपिंग, करमणूक असो की डॉक्टरांची अपॉइंटमेंट, सगळं आपण स्मार्ट फोनवर डिजिटली मॅनेज करतो.

 

using smartphone

 

हे सगळं करताना आपल्या फोनच्या आवाजाचा कुणाला त्रास नको आणि आपलीही प्रायव्हसी जपली जावी म्हणून बहुतांश लोक हेडफोन्स वापरतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे हेडफोन्स मार्केटमध्ये, ऑनलाईन उपलब्ध आहेत. पण सध्या चलती मात्र बोट कंपनीच्या हेडफोन्सची आहे. ही कंपनी एका भारतीय व्यक्तीने सुरु केली आहे आणि अवघ्या काही वर्षांतच बोटने भरभरून यश मिळवले आहे.

 

boat headphones inmarathi

 

उद्दिष्ट साध्य झालं…

२०१३ साली अमन गुप्ता आणि समीर अशोक मेहता या दोन तरुणांनी एकत्र येऊन इमॅजिन मार्केटिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड उर्फ बोट ही कंपनी सुरु केली. आणि वायर्ड आणि वायरलेस एअरफोन्स, हेडफोन्स, स्टिरिओ, ट्रॅव्हल चार्जर, इअरपॉड्स आणि केबल्स ही उत्पादने मार्केटमध्ये आणली.

बोट कंपनी सुरु करण्यामागे मुख्य उद्देश हा होता की ग्राहकांसाठी ट्रेंडी, खिशाला परवडणाऱ्या आणि स्टायलिश इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळाव्यात.

आज बोटने त्यांचे हे उद्दिष्टय साध्य केले आहे. त्यांच्या “प्लग इन टू निर्वाना” या टॅगलाईनप्रमाणेच उत्तम क्वालिटीच्या मोबाईल ऍक्सेसरीज वापरून ग्राहक खरंच खुश आहेत. त्यांच्या विक्रीचे आणि नफ्याचे आकडे याची ग्वाही देतात.

अशी साकारली कंपनी

बोटची सुरुवात करणारे अमन गुप्ता मूळचे दिल्लीचे आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर अमेरिकेतील केलॉग स्कुल ऑफ मॅनेजमेंटमधून जनरल मॅनेजमेंट आणि मार्केटिंग या विषयात एमबीए केले.

बोट हे स्टार्टअप सुरु करण्याआधी अमन गुप्ता हे हार्मन इंटरनॅशनल या अमेरिकन ऑडिओ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत डायरेक्टर ऑफ सेल्स म्हणून कार्यरत होते. तिथे काम करताना त्यांना जेबीएल, हार्मन कार्डन, एकेजी या ब्रॅण्ड्सच्या पोर्टफोलिओचा अभ्यास करण्याची आणि त्यांचे मार्केट जाणून घेण्याची संधी मिळाली.

 

jbl speaker inmarathi

 

जेबीएल, हार्मन कार्डन , एकेजी या ब्रँड्सची उत्पादने हार्मन इंटरनॅशनल ही कंपनी भारतात वितरित करते. अमन गुप्ता या कंपनीच्या नवी दिल्लीच्या ऑफिसमध्ये काम करत असत. कंपनीच्या ऑफलाईन वितरणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. क्रोमा आणि रिलायन्स डिजिटल या चेन्सद्वारे कंपनीची उत्पादने वितरित होत असत.

या उत्पादनांना भारतात कसा प्रतिसाद मिळतो आणि भारतीय ग्राहकांची काय गरज आहे याचा अभ्यास अमन गुप्ता यांनी केला आणि भारतीय ग्राहकांसाठी भारतीय बनावटीच्या फॅशनेबल, स्वस्त आणि टिकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात आणण्यासाठी त्यांनी स्वतःची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.

२०१६ साली अमन गुप्ता आणि समीर मेहता यांनी एकत्र येऊन बोट हे स्टार्ट अप सुरु केले. सुरुवातीला बोटमध्ये केबलची निर्मिती आणि विक्री होत असे. हळूहळू उत्पादनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि कंपनी सुरु होऊन अवघ्या चारच वर्षांत बोटने मार्केटमध्ये वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली.

 

boat electronic brand inmarathi

 

बोटची मुंबई आणि दिल्लीत ऑफिसेस आहेत आणि आज त्यांचे आठ लाखांहून अधिक जास्त ग्राहक आहेत. एकदा तुम्ही बोटचे उत्पादन घेतले की तुम्ही बोट परिवाराचा एक भाग बनता आणि तुम्हाला प्रेमाने “बोटहेड” असे संबोधले जाते. बोटच्या स्वस्त, फॅशनेबल आणि टिकाऊ उत्पादनांना मिळणारा वाढता प्रतिसाद बघून जेबीएल सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सना त्यांच्या उत्पादनांची किंमत कमी करावी लागली आहे.

बोटच्या या यशाचे रहस्य काय?

बोटने हे यश एका रात्रीत मिळवलेले नाही. या प्रवासात अमन गुप्ता आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले, प्रसंगी त्याग केला, काळवेळेचे भान ठेवता सतत यशाचा ध्यास घेऊन मेहनत केली. काळानुरूप उत्पादनांत, कंपनीच्या धोरणांत आवश्यक ते बदल केले.

त्यांनी काळजीपूर्वक मार्केटचा अभ्यास करून अनेक धोरणे आखली. के एल राहुल, हार्दिक पंड्या यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींना त्यांच्या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले आणि उत्पादनांची जाहिरात केली.

 

hardik and rahul inmarathi

 

मार्केटमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या इ-कॉमर्स वेबसाईट्सबरोबर भागीदारी केली आणि ऑनलाईन जाहिरातीवर भर दिला. तसेच “क्रोमा” या प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स चेनबरोबर एकत्र येऊन त्यांनी मार्केटिंगवर भर दिला.

त्यांचे पहिले उत्पादन ऍपलची न तुटणारी चार्जिंग केबल हे होते. त्याबरोबरच त्यांच्या लक्षात आले लोकांना नाजूक वस्तूंपेक्षा टिकाऊ वस्तूंची गरज आहे ज्या पडल्या तरी खराब होणार नाहीत, फार काळजीपूर्वक वापराव्या लागणार नाहीत. ही गरज ओळखून बोटने ‘फॉल-प्रूफ हेडफोन्स’ लाँच केले. आणि नंतर त्यांनी इअरफोन्स ‘बासहेड्स’ म्हणून लाँच केले.

२०१८ साली त्यांनी स्पिकर्स आणले आणि २०१९ साली साउंडबार्स आणि होम-ऑडिओ सिस्टिम्स बाजारात आणल्या. हे सगळे प्रॉडक्ट्स तरुणांना आवडतील अशा आकर्षक रंगांत आणि रफ-टफ वापरासाठी निर्माण केले. बोटचे स्पोर्ट्स इअरफोन्स आणि ब्ल्यूटुथ स्पिकर्स तर तरुणाईने अक्षरश: डोक्यावर घेतले.

 

boat collage inmarathi

 

अशाप्रकारे त्यांच्या मेहनतीला यश मिळाले. २०२० मध्ये बोटने ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्या आधी २०१९ साली त्यांनी २३९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. म्हणजे २०२० साली त्यांचा व्यवसाय १०४ टक्क्यांनी वाढला होता.

गेली पाच वर्षे हे भारतीय कंपनी नफ्यात चालते आहे आणि दिवसाला १०,००० उत्पादनांची आणि वर्षाला ४ ते ५ दशलक्ष उत्पादनांची विक्री करण्याच्या टप्प्यावर ते लवकरच पोचतील असा त्यांचा विश्वास आहे.

एक भारतीय कंपनी इलेक्ट्रॉनिक्सबाबतीत परदेशी कंपन्यांना तगडी टक्कर देते हे बघून प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटेल. हळूहळू बोटने परदेशात देखील मार्केट काबीज करावे हीच शुभेच्छा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?