' २ दिवसात ११०० कोटींची विक्री झालीय ‘या’ स्कूटरची, तुम्हीही घेणार का? – InMarathi

२ दिवसात ११०० कोटींची विक्री झालीय ‘या’ स्कूटरची, तुम्हीही घेणार का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘ऑनलाईन खरेदी – विक्री’ची सवय लागलेल्या भारतात ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही इतके दिवस जरा पिछाडीवर होती. गाडी कोणतीही असो, ती शोरूमला जाऊन बघायची, ‘टेस्ट ड्राईव्ह’ घ्यायची आणि मगच निर्णय घ्यायचा अशी आपली विचारसरणी आहे. पण, परवा ‘ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स’ने ऑनलाईन बुकिंगची सोय भारतीयांना प्रथमच उपलब्ध करून दिली आणि आपल्या पारंपरिक विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकलं.

दोन दिवसात ११०० कोटी रुपयांच्या ‘ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स’ची बुकिंग करून कंपनीने इतिहास रचला आहे. हा आकडा भारतात आजवर विक्री झालेल्या कोणत्याही गाडी, वस्तूच्या विक्रीपेक्षा अधिक आहे. इतकं काय आहे या स्कुटर मध्ये? कॅब बुकिंगची कंपनी ‘ओला’ ने कसं साध्य केलं ? जाणून घेऊयात.

 

ola scooter inmarathi

 

पेट्रोलची सतत वाढणारी किंमत यामुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांचं स्वागत करतीलच यामध्ये कोणालाही शंका नव्हती. पण, त्यासोबतच स्कुटर सारख्या वाहनाची विक्री इतक्या मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पध्दतीने सुद्धा होऊ शकते ही ऑटोमोबाईल क्षेत्रात होऊ घातलेल्या बदलाची नांदी आहे, असं म्हणता येईल.

स्कुटरची किंमत किती आहे ? कशी बुक करायची ?

‘ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स’ एस1 आणि एस1 प्रो च्या ऑनलाईन बुकिंगच्या तारखा कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या होत्या.  ४९९ रुपयांची टोकन रक्कम भरायची आणि ९९,००० रुपये (एस1) आणि १ लाख २९ हजार रुपये (एस1 प्रो) इतक्या किमतीची स्कुटर बुक करायची” अशी आकर्षक ऑफर ‘ओला’ने त्यांच्या मोबाईल ऍप्लिकेशन वरून उपलब्ध करून दिली होती.

आपलं बुकिंग पूर्ण करण्यासाठी आता २०,००० रुपयांची रक्कम ‘ऍडव्हान्स बुकिंग’ म्हणून देण्याची सूचना कंपनीने ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. दोन दिवस एकूण किती स्कुटर्स विकल्या गेल्या ? हे जरी कंपनीने स्पष्ट केलं नसलं तरी ‘एका सेकंदात ४ स्कुटर्स’ विकल्या गेल्या हे सांगून त्यांनी लोकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. दिवाळीचा मुहूर्त डोळ्यासमोर ठेवून पुढची बुकिंगची तारीख ही १ नोव्हेंबर ठरवण्यात आल्याचं कंपनीने आपल्या पत्रकात जाहीर केलं आहे.

‘ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स’ रोडवर कधी दिसणार ?

‘ओला इलेक्ट्रिक’चे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर वरूण दुबे यांनी सांगितलं आहे की, “१५ ऑक्टोबर पासून आम्ही स्कुटर्सची डिलिव्हरी सुरू करणार आहोत. बुकिंगच्या तारखेनुसार लोकांना स्कुटर मिळेल.”

 

ola inmarathi

 

तामिळनाडू मध्ये कंपनीने ‘ओला फ्युचर फॅक्टरी’ या नवाने ५०० एकर्स जागेत सुरू करण्यात आलेल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टचं नुकतंच उदघाटन करण्यात आलं आहे.

‘आशियातील सर्वात मोठी फॅक्ट्री’ म्हणून या प्लॅन्टचा उल्लेख करण्यात येत आहे. २४०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ‘ओला फ्युचर फॅक्टरी’ च्या ‘फेज १’ची सध्या सुरुवात करण्यात आली आहे.

 

ola 1 inmarathi

 

डिसेंबर २०२० मध्ये या प्लॅन्टची घोषणा करण्यात आली होती. एक वर्षात १ कोटी स्कुटर्स तयार करण्याची या प्लॅन्टची क्षमता असणार आहे. जगात तयार होणाऱ्या एकूण स्कुटर्स पैकी १५% स्कुटर्स ‘ओला फ्युचर फॅक्टरी’ मध्ये तयार होणार आहेत.

‘ओला’ ची स्पर्धा कोणासोबत असेल ?

आथर एनर्जी, हिरो इलेक्ट्रिक, बजाज आणि टिव्हीएस मोटर्स कंपनीने आधीच इलेक्ट्रिक स्कुटर्सची विक्री करण्यास आधीच सुरुवात केली आहे. ‘ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स’ला या कंपनीचं बाजारात आव्हान असणार आहे. यासोबतच, PurEv या कंपनीने सुद्धा ९.८% इतका मार्केट शेअर नोंदवून ‘ओला’ साठी कडवं आव्हान उभं केलं आहे.

 

scooter inmarathi

 

बजाज कंपनी ५.३४% आणि टिव्हीएस ४.८% इतक्या मार्केट शेअरने या स्पर्धेत आपलं स्थान टिकवून आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांची भारतातील मागणी:

२०२१ च्या पहिल्या सात महिन्यात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या ही २०२० च्या पूर्ण वर्षांपेक्षा अधिक होती.

आकड्यात सांगायचं तर, २०२० मध्ये एकूण १,१९,६४७ इतक्या इलेक्ट्रिक स्कुटर्सची विक्री झाली होती. जानेवारी ते जुलै २०२१ मध्ये १,२१,१७० इलेक्ट्रिक स्कुटर्सची विक्री भारतात झाली आहे.

इलेक्ट्रिक गाड्यांना सरकारकडून मिळणारी कर सवलत, कमी झालेली किंमत, पेट्रोलच्या दराचा उडालेला भडका यामुळे सुद्धा लोकांचा इलेक्ट्रिक स्कुटर्स विकत घेण्याकडे लोकांचा कल आहे.

 

petrol hike inmarathi

 

भावेश आग्रवाल यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवतांनाच हे ठरवलं की, जगभरात स्कुटर्स पाठवण्यासाठी भारतातूनच उत्पादन केलं जाईल. भारतातील राज्यांपैकी उत्तरप्रदेशातून १७% इतक्या सर्वाधिक बुकिंग झाल्या आहेत. त्या खालोखाल कर्नाटक १५%, तामिळनाडू १२% आणि महाराष्ट्र १०% यांनुसार ओला इलेक्ट्रिक स्कुटर्सचं स्वागत केलं आहे.

बुकिंगच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ सप्टेंबर रोजी ६०० कोटी रुपये इतकी गुंतवणूक २४ तासात ‘ओला’ मध्ये झाली याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

‘ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे भारताचं २०३० साठी नियोजित केलेलं ‘संपूर्ण इलेक्ट्रिक गाड्यांचं लक्ष’ साध्य होण्याची आशा निर्माण झाली आहे. पेट्रोल आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे.

एकदा चार्जिंग केल्यावर १८१ किलोमीटर प्रवास करू शकणारी ‘ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स’ला समोर येत्या काळात मुबलक प्रमाणात सर्विस सेंटर असणं, ग्राहकांना स्पेअर पार्ट्स उपलब्ध करून देणे अशी आव्हानंसुद्धा असतील. पण, कॅब सर्व्हिस, फूड डिलिव्हरी सर्विस, मोबाईल वॉलेट सारख्या यंत्रणा सोबत असलेल्या आणि ३००० पेक्षा अधिक कर्मचारी असलेला ‘ओला’ उद्योग समूह कडून आव्हानं लीलया पेलली जातील असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

 

bhavesh ola inmarathi

 

२०१० मध्ये सुरू झालेल्या ‘ओला’ या भारतीय कंपनीने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड मध्ये सुद्धा आपल्या ऑटो, टॅक्सी सर्विस सुरू करून आपली जागतिक ओळख निर्माण केली आहे. आज भारताप्रमाणेच या देशातही १०,००० पेक्षा अधिक टॅक्सी ड्रायव्हर्स ला ‘ओला’ मुळे उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली आहे.

१५ ऑगस्ट २०२१ रोजी उदघाटन झालेल्या ‘ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स’ सुद्धा लोकांचा विश्वास कमावतील आणि वाहन चालवणं हा एक सुखद अनुभव आहे हे लोकांना पटवू शकतील अशी आशा करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?