' Paragraph च्या ४ ओळींमध्ये उरकलेला ज्वलंत इतिहास, मराठवाडा मुक्तीसंग्राम… – InMarathi

Paragraph च्या ४ ओळींमध्ये उरकलेला ज्वलंत इतिहास, मराठवाडा मुक्तीसंग्राम…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – आनंद कुलकर्णी
===

“समजा जर मराठवाडा वेगळं राज्य झालंच तर आपल्याला राज्य म्हणून सांगायला काही इतिहासच नाही.  टिळक, गोखले, रानडे, शाहू, फुले, आंबेडकर, सावरकर इत्यादी इत्यादी जी काही मंडळी होती ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या, जे महाराष्ट्राचे आहेत हे आम्ही अभिमानाने सांगतो तसं मराठवाडा वेगळं राज्य झालच तर अवघडच कार्यक्रम होईल!

 

tilak and savarkar inmarathi

 

किमान महाराजांनी मराठवाड्यात यायला पाहिजे होतं! नंतर तर एवढं मोठं मराठा साम्राज्य झालं,  त्यातपण मराठवाड्याचं कुणी नाही! आपण अभिमानाने सांगावं असं काहीच नाही आपल्याकडं!” अश्या आमच्या पोरापोरात काही वर्षांपूर्वी गप्पा व्ह्ययच्या.

काही महिन्यांपूर्वी एका प्रकल्पाच्या निमित्ताने मी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि अक्षरशः उडालो. ते वाचत असताना लक्षात येत होतं की Main stream पातळीवर असलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या ताकदीचा असा समांतर इतिहास माझ्या मराठवाड्याला आहे.

मी ज्या गावात शिकलो आणि त्या गावातल्या ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत कधीकाळी मुक्तीलढ्याचे गांधी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ त्या शाळेत शिकवत होते, हा विचारच शहारे आणत होता. नंतर जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा पहिल्यांदा केसरीवाड्यात गेलो होतो तेव्हा जसं भारी वाटलं होतं किंवा साताऱ्यात आंबेडकर ज्या शाळेत शिकले ती शाळा पाहताना जसं वाटत होतं त्याच्यापेक्षा कैक पटीने भारी मला माझ्याच शाळेत जाताना वाटत होतं. तेव्हा पहिल्यांदा जाणवत होतं की मी कोणत्या ऐऱ्यागैऱ्या शाळेत शिकलो नाही मी त्या शाळेत शिकलोय ज्याची स्थापना स्वतः मुक्तीसंग्रामाचे अध्वर्यू स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली आणि ती अशीच नाही स्थापन झाली राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ म्हणून माझी शाळा उभी राहिली होती. यात कर्मदारिद्र्य हे होतं की ही जाणीव मला शाळेतून पास झाल्यावर ७-८ वर्षांनी म्हणजे आत्ता काही महिन्यांपूर्वी झाली.

हे वाचत असताना इतिहासाच्या पुस्तकात केवळ एका paragraph मध्ये उरकला जाणारा हा जाज्वल्य, प्रेरणादायी लढा आम्हाला कुणी सांगितलाच नाही आणि अर्थात आम्ही तो माहीत करून घ्यायचे कष्टही केले नाहीत याचं मला खूप जास्त वाईट वाटत होतं.

 

marathwada inmarathi

 

याच वाचनात मला समजलं की एक भगतसिंग तर माझ्या घरात होता… कारण या लढ्यात माझ्या आईचे सख्खे काका मुक्तीलढ्यात शहीद झाले होते. आम्ही आमचे आदर्श पुण्या – मुंबईत शोधतोय पण आम्हाला घरातले आदर्श माहीत नाहीत ही खरच किती कर्मदरिद्री गोष्ट आहे.

निजाम हा काही कुणी येडागबाळा नव्हता. तो अतिशय वाईट शासक आणि धूर्त राजकारणी होता. सातवा आणि शेवटचा निजाम जेव्हा सत्तेत आला तेव्हा सगळ्यात अगोदर त्याने सरकारात सगळ्या ठिकाणी मुस्लिम भरती सुरू केली. संपूर्ण राज्यभर “उर्दू माध्यम” कम्पल्सरी केलं. हैद्राबादला उर्दू माध्यमाचं पहिलं विद्यापीठ उभा केलं. ज्यात अगदी वैद्यकीय शिक्षणापर्यंतचं माध्यम आणि सगळं साहित्य उर्दूत उपलब्ध केलं. या भाऊचं स्वतःचं वेगळं चलन होतं. स्वतःचा वेगळा झेंडा होता. जास्तीत जास्त लोकं अशिक्षित राहिली पाहिजे याची संपूर्ण काळजी घेतली होती. हे करत असताना काही हुशार मुस्लिम पोरं हेरून त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवलं.  नंतरच्या काळात त्यांना सल्लागार म्हणून नेमलं.

बाकी शेतकरी, कामगार , कष्टकरी यांच्यावर जुलूम केले हे वेगळं सांगणं नकोच! ब्रिटिश सरकारची तो उत्तम प्रकारे चाटू शकत होता. कसल्याही प्रकारचा लहानसा देखील बंड होणार नाही याची काळजी घेतली. उर्वरित देशात अटलिस्ट सरकारला विरोध करायला थोडा का होईना स्कोप होता… इथं असला विषयच नव्हता! सरकार विरुद्ध ब्र काढायची देखील कुणात हिम्मत नव्हती. असा सगळा उजेड असताना १९२५ सुमारास गांधीजी म्हणत होते, की भारतातील संस्थानं हे ” भारतीय स्वातंत्र्याचे अवशेष ” आहेत.

 

nizam inmarathi
indiatoday.com

 

१९३५-३६ पर्यंत तर मुक्तीलढ्यात काँग्रेसने उतरण्यासाठी स्वतः महात्मा गांधींचाच विरोध होता. थोडक्यात आम्हाला कुणी वालीच नव्हता आमचा आवाज दाबला गेला म्हणन्यापेक्षा आम्हाला आवाजच नव्हता. आम्ही कधी मागणी करूच शकत नव्हतो मॅक्स विनंती करायची ताकद आमच्यात होती. कसलंच बॅकअप नसून देखील काही मंडळी नेटाने लढा देत होती.  त्यात मग किमान राष्ट्रीय शिक्षण देता येतं का?! याचे प्रयत्न झाले त्याची चळवळ उभी राहिली.

यात मग योगेश्वरी सारख्या संस्था उभ्या राहिल्या. मग स्वामीजी सारख्या सन्यासी माणसाचं नेतृत्व उभं राहिलं. अखेर महात्मा गांधी साहेबांना १९३६-३७ च्या दरम्यान पटलं की बाबा निजाम पण तितकाच हरामी आहे किंबहुना जास्तच! मग त्यांनी मुक्तिलढ्याला पाठिंबा दिला.

 

gandhiji inmarathi
betterindia.com

 

इकडे निजामाने हैद्राबाद स्टेट काँग्रेसची भ्रूणहत्या केली. स्थापनेअगोदरच डायरेक्ट बंदी! स्वामीजी सारख्या लोकांना अटकसत्र सुरू झालं. मग कुठं मुक्तीलढ्याने पेट घ्यायला सुरुवात झाली. आर्य समाजाने सशस्त्र आंदोलन करायला सुरु केलं.

तिकडं हिंदू महासभेचे आंदोलन सुरू झालं. मग कम्युनिस्ट देखील पेटायला सुरू झाले. मग काँग्रेसचं आंदोलनही तेव्हाच सुरू झालं. मग गांधीजी म्हणाले आर्य समाज आणि हिंदू महासभा धार्मिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढत आहे आपली मागणी राजकीय आहे. चळवळीला धार्मिक रंग नको म्हणून आंदोलन मागं घ्या! मग इच्छा नसताना आंदोलन मागे! गंमत ही आहे की उर्वरित देशात किमान काँग्रेस स्थापनेला मान्यता होती इकडं निजाम साहेबांनी मुळावरच घाव घातला. मान्यताच दिली नाही. दरम्यान हे लढे वाढू लागले. तिकडं ” इत्तेहाद्दुल मुसलमिन ” ही संघटना स्थापन झाली आणि त्यांची “रझाकार” नावाची सिस्टीम सुरू झाली. ते ” सब कूछ इस्लाम ” यावरच होते.  ती राज्यातील अधिकृत “दहशतवादी संघटना” होती.  जे मुस्लिम त्यांना विरोध करतील अर्थात ते देखील “काफिर”च! आजच्या भाषेत सांगायचं तर सगळा “डर का माहोल” होता.

त्या दरम्यान निजामशेठनी वेगळा देशच मागायला सुरुवात केली. आपल्याला पाकिस्तान, आझाद काश्मीर किंवा खलिस्तान चा विषय माहीत असतो. महाराज ” उस्मानिस्तान ” नावाचा पण एक विषय अस्तित्वात होता. त्यासाठी निजाम सगळा आटापिटा करत होता. आपल्याकडं चार शहाणे लोकं नसते तर हा गेम पण यशस्वी झाला असता.

तुर्कस्तानच्या खलिफाची मुलगी आणि पुतणी निजमाने सून करून घेतली होती. काही देशांमध्ये मोठी investment करून ठेवली होती. जेणेकरून वेगळ्या देशाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला पाहिजे. बाकी छोट्या मोठ्या चळवळी दडपून टाकणं चालूच होतं. १९३७-३८ च्याच वेळी विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम्” चळवळ चालू केली. पोरांना वाटलं आपल्याला कॉलेज मधून काढून टाकतेल आपण राज्याबाहेर बनारस हिंदू विद्यापीठ सारख्या राष्ट्रीय वृत्तीच्या विद्यापीठात प्रवेश घेऊ. निजाम साहेबांनी शाळा काय केली की पंडित मदनमोहन मालवीय साहेबांसोबत डील केली मी पाच लाख डोनेशन देतो पोरांना प्रवेश द्यायचा नाही. झालं… लटकले पोरं! तर असा होता निजाम!

 

madan mohan malvia inmarathi

 

आंदोलन चालू झालं. इंग्रजांच्या आणि एकंदर राष्ट्रीय पातळीवरच्या दबावामुळे त्याला काँग्रेसला मान्यता द्यावी लागली. इकडं काँग्रेसला मान्यता मिळाली आणि तिकडं कासिम रिझवी नावाच्या मेन व्हीलन चा उदय झाला. त्याने इत्तेहाद्दुल मुसल्मिन ची कमांड घेतली. या सरांचं वास्तव्य लातुरात होतं काहीकाळ! नंतरच्या काळात हे सनदशीरपणे पाकिस्तानात पळून गेले. हा नंतर निजामाला सुद्धा गिणत नव्हता. त्याने हिंदू लोकांवर प्रचंड प्रमाणात अत्याचार केले. त्याच्या तुलनेत निजाम चर्चा करायला तरी तयार असायचा. पण हे भाऊ म्हणजे पूर्ण व्हीलन!

रझाकारानी संस्थांनामधील कितीतरी हिंदू गावं शब्दशः बेचिराख केले. असंख्य हिंदूंच्या कत्तली केली. असंख्य स्त्रियांवर बलात्कार केले. गावच्या गावं जाळून टाकले. निजाम हे फक्त उघड्या डोळ्यांनी बघत होता आणि अर्थात पाठिंबा देत होता. त्या सगळ्या कथा वाचल्या तर डोळ्यांना पाण्याच्या धारा लागतात. याही परिस्थितीत आमचे लोकं लढत होते. रझाकारांच्या या अमानुषतेविरोधात लढलेल्या वीरगाथा वाचल्या तर स्फुरण चढतं आणि हो अभिमान वाटतो की मी अशा शूर वीर लोकांच्या मातीत जन्माला आलो. लाज याची वाटते की हे मला आत्ता कळतंय की माझ्या जगण्यासाठी या शूरांनी मरण पत्करलं आहे.

अनेक सशस्त्र लढे या दरम्यान दिले गेले. आम्हाला काकोरी कटाबद्दल माहीत असतं पण तुलनेत त्यापेक्षा मोठा आणि यशस्वी असलेला उमरी बँकेचा दरोडा माहीत नाही. आम्हाला आमचेच क्रांतिकारक माहीत नाहीत. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशपातळीवरच्या काँग्रेसने जसे क्रांतिकारक वाऱ्यावर सोडले तसं हैद्राबाद काँग्रेसने केलं नाही. देशात हैदराबाद काँग्रेस एकमेव होती आणि स्वामीजी एकमेव नेता होता ज्याने सशस्त्र लढ्यांची अधिकृत जबाबदारी स्वीकारली. पटेलांनी सेना घुसवून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद मुक्त होणं हा ‘ event ‘ म्हणजे हा लढा नाही. अनेकांच्या प्राणांची आहुती आणि देशकार्यासाठी आयुष्य अर्पण केलेल्या लोकांचा हा लढा आहे. जे

व्हा उर्वरित देश स्वातंत्र्य अनुभवत होता तेव्हा आम्ही गुलामीत खितपत पडलो होतो. रझाकारांचे अत्याचार सहन करत होतो. आमचे लोकं या अत्याचाराविरोधात प्राण पणाला लावून लढत होते. या सगळ्याच्या स्मरणाचा आज दिवस आहे.

 

mukti sangram inmarathi

 

स्वातंत्र्याच्या उंबरठयावर झालेल्या हिंदू मुस्लिम कत्तलीवर बोललं जातं. पण रझाकारांच्या काळात मुस्लिमांनी हिदुंवर केलेल्या आणि रझाकार गेल्यावर हिंदूंनी मुस्लिमांवर केलेल्या अत्याचाराचाही रक्तरंजित इतिहास मराठवाड्याला आहे. रंगनाथ तिवारी सरांची “उत्तमपुरुष एकवचन” नावाची कादंबरी वगळता कुठली कादंबरी देखील यावर नाही.

मराठवाड्यातच या मुक्ती लढ्याबद्दल बोललं जात नाही. आमच्या पोरांना हे माहीतच नसतं. पण आपली जबाबदारी आहे की आपला इतिहास पोहचला पाहिजे. आपला इतिहास काही येड्या गबाळ्या लोकांचा इतिहास नाही. तो शूरवीरांचा इतिहास आहे. त्या इतिहासाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.

माझा मराठवाडा मुक्त होण्यासाठी जे जे लढले अश्या सगळ्यांना वंदन व सगळ्यांना मुक्तीसंग्रामदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?