' ‘हिटमॅन’ रोहितच का असावा भारताचा नवा कर्णधार? ही ३ कारणं माहित हवीतच… – InMarathi

‘हिटमॅन’ रोहितच का असावा भारताचा नवा कर्णधार? ही ३ कारणं माहित हवीतच…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

विराटने वर्ल्डकप नंतर टी-२० च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आणि मग गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडेच पुढचा कर्णधार कोण या चर्चेला उधाण आलं.

 

sad virat kohli inmarathi

 

कुणी उपकर्णधार असणाऱ्या रोहितलाच या भूमिकेत बघू लागलं, तर कुणी के एल राहुल, श्रेयस अय्यर या ताज्या दमाच्या, तरुण तडफदार खेळाडूंची सुद्धा नावं चर्चेत आणली.

या सगळ्या चर्चांचा एकूण सूर मात्र, रोहितनेच भारतीय टी-२० संघाचा पुढचा कर्णधार व्हावं याच बाजूला जास्त झुकलेला दिसतोय. याचं एक कारण तर अगदीच स्पष्ट आहे, ते म्हणजे रोहित शर्मा म्हणजेच हिटमॅन सध्या उपकर्णधार असणं. या न्यायाने विराटचा वारसदार तोच ठरतोय.  पण हिटमॅन हाच विराटचा डेप्युटी असावा, याचं हे एकच कारण नाही.

 

rohit and virat inmarathi

 

आणखीही काही कारणं आहेत, ती सुद्धा जाणून घेऊयात.

दबावाखाली उत्तम फलंदाजी…

काही खेळाडू असे असतात, ज्यांना कामगिरी सुधारण्यासाठी दडपणाची आवश्यकता असते. दडपणाखाली अशा खेळाडूंचा खेळ अधिक बहरतो आणि ते आधी रंगात येतात. हिटमॅन त्यांच्यापैकीच एक आहे.

सगळ्यात छोट्या फॉरमॅटमधील १९ सामन्यांमध्ये कप्तानीचा अनुभव असणाऱ्या रोहितने त्याच्या कारकिर्दीतील चारपैकी २ शतकं ही कर्णधार म्हणून केलेली आहेत. शिवाय ५ अर्धशतकांसह त्याने एकूण ७०० हून अधिक धावा करताना कप्तानपदाची धुरा सांभाळली आहे.

 

rohit hitman inmarathi

 

रोहित शर्मा व्यतिरिक्त कुठल्याही खेळाडूला कर्णधार असताना दोन आंतरराष्ट्रीय टी-२० शतकं झळकावण्याची किमया करता आलेली नाही.

विश्वास आणि खेळ समजून घेण्याची कला

कुठल्याही परिस्थितीत सुरु असलेला खेळ नीट समजून घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता रोहितकडे आहे. ‘शर्माजी का बेटा बडा होशियार हैं’ असं म्हणायला काहीच हरकत नाही. सामना नक्की कोणत्या वळणावर आहे, अशावेळी काय निर्णय घ्यायला हवेत, याविषयीची रोहितची आकलन क्षमता उत्तम आहे.

एवढंच नाही, तर कुठलाही निर्णय घेत असताना, त्यामुळे खेळाडूवर दबाव येणार नाही याची काळजी तो घेतो. एखाद्या खेळाडूची कामगिरी थोडीशी वाईट झाली, तर त्याच्याशी चर्चा करून, त्याचा आत्मविश्वास डळमळू न देता त्याच्यावर विश्वास टाकण्याचा रोहितचा स्वभाव आहे. याविषयी अनेक खेळाडूंनी भाष्य केलेलं आहे.

 

rohit sharma as captain inmarathi

 

असे गुण असल्यामुळे, त्याचं नेतृत्व उत्तम ठरतं. संघातील वातावरण खेळीमेळीचं ठेवण्याची त्याच्याकडे असणारी हातोटी संघासाठी नेहमीच लाभदायक ठरू शकते.

भारताचा सर्वाधिक अनुभवी आणि यशस्वी कर्णधार

भारताने २००७ साली पहिलावहिला टी – २० विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी माहीच्या टीममध्ये असलेला, मिसरूडही न फुटलेला एक शिलेदार तुम्हाला आठवत असेल. अवघ्या १७ वर्षांचा पोरगा खास छाप सोडून गेला. अगदी तेव्हापासून रोहित शर्मा भारतीय संघाचा सदस्य आहे.

 

young rohit sharma inmarathi

 

टी-२० चा भरपूर अनुभव आणि आयपीएलमधील कर्णधारपद हे मुद्दे सुद्धा यात फार महत्त्वाचे आहेत. आयपीएलमध्ये त्याने त्याचा दबदबा सिद्ध केलाय. सध्या भारतासाठी खेळत असणाऱ्या खेळाडूंपैकी सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून त्याचंच नाव समोर येतं.

रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला २०१३ पासून ५ वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. त्याची नेतृत्व क्षमता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा दिसली आहे. १९ टी-२० सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करताना, १५ सामने त्याने जिंकले आहेत. भारताच्या यशस्वी टी-२० कर्णधारांच्या यादीत माही आणि विराटनंतर त्याचंच नाव दिसतं.

 

rohit sharma ipl captain inmarathi

वनडेसह मर्यादित षटकांच्या एकूण २९ सामन्यात त्याने भारताचं नेतृत्व केलं आहे. त्यात २३ सामन्यात विजय मिळवण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे.

एकुणात काय, तर रोहित शर्मा हा विराटचा वारसदार म्हणून सर्वोत्तम पर्याय ठरतोय यात तुम्हालाही काही शंका नसेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?