' उशिराने (?) सुचलेलं शहाणपण! हाच निर्णय लवकर (!) घेतला गेला असता तर… – InMarathi

उशिराने (?) सुचलेलं शहाणपण! हाच निर्णय लवकर (!) घेतला गेला असता तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

अखेर विराटने त्याचा निर्णय घोषित केला. अनेक दिवस सुरु असणाऱ्या चर्चा, या नुसत्याच चर्चा किंवा अफवा नसून त्यात तथ्य होतं, हे स्पष्ट झालं. पुढच्या महिन्यात होणार असलेला टी-२० विश्वचषक संपला, की त्या संघाच्या कर्णधारपदाचा काटेरी मुकुट कुणा दुसऱ्याच्या डोक्यावर ठेवला जाणार. सध्या तरी रोहित शर्मा हाच सर्वोत्तम पर्याय दिसतोय असं म्हणायला हरकत नाही. पण ते असो, मुद्दा तो नाहीच.

 

virat and rohit inmarathi

 

आजचा मुद्दा हा आहे, की हा कठोर पण फायदेशीर निर्णय घ्यायला थोडा उशीरच झालाय. फायदा कुणाचा आहे विचारताय, भारतीय संघाचा तर आहेच पण स्वतः विराटचा सुद्धा खूप फायदा आहे हे मान्य नाही का तुम्हाला? डोक्यावरच ओझं जेवढं कमी होईल, तेवढं त्याचं अधिक लक्ष फलंदाजीवर राहील आणि त्याचा परफॉर्मन्स सुधारेल यात काहीच शंका नाही. कारण तो आहेच एक उत्कृष्ट फलंदाज…

 

virat kohli 2 inmarathi
the national

रोहित कर्णधार होईल हे चांगलंच आहे पण…

मगाशीच म्हणालो त्यानुसार रोहित शर्मा हाच सध्यातरी नवा कर्णधार म्हणून योग्य पर्याय वाटतोय. पण त्याचं वय बघता, तोही किती काळ कप्तानपदाची जबाबदारी पार पाडेल ही शंकाच आहे.

विराटने कर्णधारपद सोडण्याची तयारी आधीच दाखवली असती किंवा आधीच कर्णधारपद सोडलेलं असतं तर आज रोहित कप्तान असता आणि त्याच्या हाताखाली नवा कर्णधार तयार व्हायला सुरुवात झाली असती. पण आता या वर्षअखेरीस ही प्रक्रिया सुरु होईल.

 

rohit sharma inmarathi

 

म्हणजे उशीर झालाच की राव… असो हा उशीर सुद्धा फार त्रासदायक ठरू नये, अशी अपेक्षा करण्याएवढा वेळ अजून हातात आहे, त्यामुळे मनाचं तेवढंच काय ते समाधान…

विश्वचषकानंतरचा गोंधळ…

आता असं पहा, की विराटने अगदी वर्ल्डकप तोंडावर आलेला असताना हा निर्णय घेतलाय. म्हणजे आता तो आंतरराष्ट्रीय सामन खेळणार ते थेट विश्वचषकातलेच! मग आता गंमत पहा, जर उत्तम कामगिरी करून भारतीय संघाने विश्वचषक जिंकला, तर त्यात विराटच्या कर्णधारपदाचाही महत्त्वाचा वाटा असणार. मग अशा कर्णधाराने त्यानंतर कप्तानी का सोडावी हो?

 

virat kohli captain inmarathi

 

बरं दुर्दैवाने असं नाहीच घडलं, आणि भारतीय संघाला अपयश आलं, तर ‘इथेही रोहित असता तर…’ या शंकेला मोठा वाव आहे की मंडळी…

म्हणजे विश्वचषक घेऊन या किंवा नको, समोर कठीण प्रश्न उभे ठाकणारच आहेत. यापैकी कुठलाही प्रश्न उभा राहिला, तर त्याचं शंभर टक्के योग्य उत्तर कुणाकडेच नसणार.बरं चला एकवेळ हेही असो… कारण विषय आणखी खोल आहे.

‘एकच कर्णधार’ हा अट्टाहास कशासाठी?

विराट आणि रोहितलाही आता बाजूला ठेऊ. थोडं मागे मागे जाऊ. मी नव्वदीच्या दशकात जन्माला आलोय, अनुभवाने कमी, पावसाळे (म्हणजे क्रिकेटचे सिझन सुद्धा) कमी पाहिलेला माणूस; पण तुम्ही सुद्धा आठवून बघा, क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे भारतीय कर्णधार असणं तुम्ही कितीवेळा पाहिलंय? एखादा खेळाडू सगळे फॉरमॅट खेळतच नाहीये, अशी काही उदाहरणं सोडली, तर हे असं घडलेलं फारसं पाहायला मिळालं नसणार.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेचे संघ पहा. त्यांच्या यशाच्या सूत्रांमध्ये एक महत्त्वाचं सूत्र आहे, ते म्हणजे वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळणारे वेगवेगळे खेळाडू…

 

england team inmarathi

 

भारतीय निवड समिती, BCCI आणि एकूणच भारतीय क्रिकेटची मानसिकता, हीच हिंमत साधी कर्णधाराच्या बाबतीत सुद्धा दाखवत नाही, हे आपण आजवर पाहत आलोय. थोडक्यात काय, तर विराट की रोहित, की आणखी कुणी हा दुय्यम मुद्दा आहे. उशीर फक्त विराटला झालेला नाही, उशीर झालाय तो भारतीय क्रिकेटसाठी, भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी शुभ चिंतणाऱ्या प्रत्येकाला…

स्प्लिट कॅप्टन्सी हवी होती

‘स्प्लिट कॅप्टन्सी’चा पर्याय खूप आधीच अमलात आणला गेला पाहिजे होता. अजिंक्य चांगला खेळात असतानाच, त्याला कसोटी कर्णधार करणं अशक्य नव्हतं. कदाचित त्या (योग्य प्रमाणातील) दडपणाखाली त्याचा खेळ अधिक बहरलाही असता.

 

ajinkya rahane inmarathi

रोहित टी-२०, विराट वनडे आणि अजिंक्य टेस्टचा कर्णधार ही गोष्ट सत्यात आणता आली असती. विराटची कुवत नाही म्हणून नव्हे, तर त्याच्यावर किंबहुना कुठल्याच खेळाडूवर अतिरिक्त दडपण यायला नको म्हणून…

असं घडलं असतं तर कदाचित तिघांवरील दडपण काहीसं कमी असलं असतं, आणि तरीही दुसऱ्या फॉरमॅटचा कर्णधार दुसरा आहे, याचं दडपण तिघांच्याही मनावर राहून खेळी उंचावला असता.

 

virat rohit and ajinkya inmarathi

 

‘अजिंक्यची संघातील जागाच धोक्यात आहे’ अशी स्थिती कदाचित पाहावी लागली नसती, विराटच्या ७० शतकांच्या जागी कदाचित ७५-८० चा आकडा आजच पाहायला मिळाला असता. रोहितने टी-२० फॉरमॅटमध्येही एखादं द्विशतक (वेड्या मनाला वाटतं, की तो हेदेखील करू शकतो.) झळकावलेलं असतं.

काय सांगावं, कदाचित आणखी एखादा टी-२० किंवा वनडे वर्ल्डकप सुद्धा भारताने खिशात घातलेला असता. विराटला अजून जमलं नाही ना राव ते!

इथे थोड्या अंधश्रद्धेच्या, म्हणजेच ‘जेंटलमन्स गेम’ असणाऱ्या ‘सोफिस्टिकेटेड’ क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं, तर मी सुपरस्टीशियस होऊन म्हणतोय की, विराट याबाबतीत कमनशिबीच ठरलाय नाही का…!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?