' अमूल ब्रॅंडला टक्कर देणारं हे आईसक्रीम महाराष्ट्रात झालंय सुपरहिट!

अमूल ब्रॅंडला टक्कर देणारं हे आईसक्रीम महाराष्ट्रात झालंय सुपरहिट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोणत्याही नवीन क्षेत्रात व्यवसाय सुरू करतांना स्पर्धा ही अनिवार्य असते. वस्तू असो किंवा सेवा कोणीतरी आधी ती सुरू केलेलीच असते. स्पर्धा जितकी तीव्र असते, तितकी तुम्हाला तुमचं वेगळेपण सिद्ध करण्याची गरज असते.

हे वेगळेपण कधी किंमतीवरून ठरतं, तर कधी कामाच्या पद्धतीमुळे. प्रत्येकाला संधी मिळत असते हे नक्की. प्रस्थापित असलेल्या बाजारात सुद्धा तुम्ही तुमची ओळख निर्माण करु शकतात याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘अरुण आईस्क्रीम’.

 

arun icecream inmarathi

 

भारतीय डेअरी उत्पादनांमध्ये अमूल, क्वालिटी वॉल्स, वाडीलालसारख्या कंपनींने आपलं बस्तान बसवलं होतं. त्याच मार्केटमध्ये तामिळनाडूच्या ‘अरुण आईस्क्रीम’ने आपली उत्पादन आणली आणि कोणत्याही स्पर्धेची काळजी न करता आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मार्केटमध्ये आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं हे कौतुकास्पद आहे.

७२ वर्षीय आर.जी.चंद्रमोगन हे अरुण आईस्क्रीम तयार करणाऱ्या हॅट्सन ऍग्रो प्रॉडक्ट्सचे संस्थापक आहेत. आज १०,००० कोटी रुपये इतका टर्नओवर असलेली हॅट्सन ही कंपनी आर.जी.चंद्रमोगन यांनी कोणत्या परिस्थितीत सुरू केली हे खूप प्रेरणादायी आहे.

सुरुवात :

आर. जी. चंद्रमोगन यांचा जन्म तामिळनाडू मधील विरुधानगर जिल्ह्यायातील थिरूथांगल या गावात झाला होता. घरातील आर्थिक अडचणींमुळे चंद्रमोगन यांना लहानपणीच शाळा सोडावी लागली होती.

१९७० मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी चंद्रमोगन यांनी आपलं रहातं घर विकून ‘हॅट्सन ऍग्रो प्रॉडक्ट्स’ची सुरुवात केली होती. १३,००० रुपयांची आर्थिक गुंतवणूक आणि केवळ ३ जणांची साथ या जोरावर ही कंपनी उभी करण्याची हिंमत स्टार्टअपचा बोलबाला नसलेल्या त्या काळात चंद्रमोगन यांनी केली होती.

 

r g chandramogan inmarathi

सुरुवातीचे १० वर्ष हे हॅट्सन आणि चंद्रमोहन यांच्यासाठी खूप संघर्षाचे होते. ‘अरुण आईस्क्रीम’ लोकांना माहीत व्हावं म्हणून ही टीम सायकल वरून, छोट्या गाडीमधून लोकांपर्यंत आईस्क्रीम पोहोचवायची.

१९८६ पर्यंत कंपनीने शेतकरी आणि आपल्यातील एजंट लोकांना काढून टाकलं आणि कंपनीचा नफा वाढवला. ३ लोकांपासून सुरू झालेली ही कंपनी आज ८,००० लोकांपर्यंत पोहोचली आहे.

‘अरुण’ हे आईस्क्रीमचं नाव का ठेवलं ? या प्रश्नाचं उत्तर देतांना आर.जी. चंद्रमोगन हे उत्तर देतात की, ” जितकी सूर्याची तीव्रता असेल तितके लोक आईस्क्रीम जास्त घेतील” म्हणून त्यांनी आईस्क्रीमला ‘अरुण’ हे नाव दिलं आहे.

मार्केटिंग कसं केलं?

४,००० पेक्षा अधिक व्यवसायिक कार्यरत असलेल्या डेअरी प्रॉडक्ट्सच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणं हे अरुण आईस्क्रीमसाठी सोपी गोष्ट नव्हती.

अरुण आईस्क्रीमने आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा या राज्यांची निवड केली. आईस्क्रीम तयार करण्याची फॅक्टरी ही कांचीपुरम, सालेम, मदुराई आणि बेळगाव या ठिकाणी आहे.

 

ice cream factory inmarathi

 

दक्षिण भारतात असलेल्या १००० पेक्षा अधिक कंपनी पार्लर मुळे ‘अरुण आईस्क्रीम’ हे खूप लोकप्रिय झालं आहे.

आर. जी. चंद्रमोगन यांनी अरुण आईस्क्रीमची विक्री महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून केली. कारण, ते नवीन गोष्ट वापरण्यासाठी नेहमीच तयार असतात. १९७० मध्ये सुरू केलेल्या अरुण आईस्क्रीमला चांद्रमोगन यांनी १९७४ पर्यंत तामिळनाडू मधील प्रत्येक कॉलेजच्या कँटीन पर्यंत पोहोचवलं.

छोटे दुकानदार हे चंद्रमोगन यांचं दुसरं लक्ष्य होतं. ‘फ्रेश आईस्क्रीम फ्रॉम मद्रास’ ही टॅगलाईन आपल्या राज्यातील लोकांबद्दल कडवट असलेल्या लोकांना भावली आणि त्यांनी आईस्क्रीम म्हणजे ‘अरुण’ हे समीकरण आपल्या डोक्यात पक्कं केलं.

लग्न समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांना आईस्क्रीम बॉक्सचा पुरवठा करून अरुण आईस्क्रीम हे अजून लोकप्रिय होत गेलं. त्यासाठी चेन्नईत सगळीकडे होर्डिंग्ज लावून चंद्रमोगन यांनी जाहिरात केली.

पहिल्या वर्षाचा टर्नओवर दीड लाख असलेल्या हॅट्सनने १९९० पर्यंत ३ कोटी रुपयांचा पल्ला गाठला होता. मागील ४० वर्षात हॅट्सन ऍग्रो प्रॉडक्ट्सने चार लाख शेतकऱ्यांना आपल्यासोबत जोडलं आहे.

त्यामुळे, अरुण आईस्क्रीमला वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य झालं आहे.

अरुण आईस्क्रीमचे जुन्या पद्धतीचे पार्लर, एक सारख्या दिसणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्या आणि कप मध्ये आईस्क्रीम खाण्याची सोय यामुळेसुद्धा ‘अरुण’ हा ब्रँड लोकांच्या पसंतीस पडला असं मार्केटिंग तज्ञांचं मत आहे.

 

arun ice cream inmarathi

अरुण आईस्क्रीमचे नवीन सुधारित पार्लर हे दिवसा आईस्क्रीम वितरणाचं काम करत असतात आणि संध्याकाळी आईस्क्रीम पार्लर म्हणून त्याच जागेचा उपयोग कंपनी करून घेत असते.

आईस्क्रीम व्यतिरिक्त, कंपनी आज दही, दूध, तूप सारख्या वस्तू विकून मार्केट मधील आपली पकड मजबूत करत आहे. तामिळनाडू मध्ये २३०० पेक्षा अधिक पार्लर असलेल्या अरुण आईस्क्रीमने नुकतंच महाराष्ट्र आणि ओरिसामध्येसुद्धा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

दक्षिण भारतात अरुण आईस्क्रीमची वाढती लोकप्रियता बघता अमूल सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडची सुद्धा झोप उडाली आहे. येत्या काळात ‘अमूल विरुद्ध अरुण’ ही आईस्क्रीम स्पर्धा तीव्र होत जाणार हे नक्की.

 

arun ice cream 2 inmarathi

 

ग्राहकांना नवनवीन आईस्क्रीम प्रकार त्या निमित्ताने टेस्ट करायला मिळतील ही त्यांच्यासाठी आनंदाची बाब असेल. नियोजनबद्ध पद्धतीने व्यवसाय केल्यास प्रस्थापित ब्रँड वर मात करणं सुद्धा शक्य असतं हे अरुण आईस्क्रीम ने खरं करून दाखवलं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?