' कुणी स्वतःच्या तर कुणी पालकांच्या इच्छेखातर – हे बॉलिवूड स्टार चक्क इंजिनियर्स आहेत – InMarathi

कुणी स्वतःच्या तर कुणी पालकांच्या इच्छेखातर – हे बॉलिवूड स्टार चक्क इंजिनियर्स आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साधारण नव्वदीच्या दशकापर्यंत किंवा अगदी दोन हजार सालापर्यंत भारतीय मध्यमवर्गीय पालकांच्या दृष्टीने करियर मध्ये, मुला/मुलीं साठी केवळ दोनच पर्याय उपलब्ध होते ते म्हणजे एक तर डॉक्टर किंवा इंजिनिअर!

जर पाल्य बारावी नंतर उत्तम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवू शकला तर पालकांना आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाल्याचा भास व्हायचा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मेडिकलला प्रवेश मिळणं तुलनेने कठीण होतं शिवाय त्याला लागणारी प्रचंड फीस सामान्य पालकाच्या आवाक्याबाहेर होती.

इंजिनिअरिंग च्या बाबतीत सुद्धा प्रवेश शुल्काचा विषय होताच पण पालक अगदी भविष्य-निर्वाह निधीतून पैसे काढून वैगेरे सोय करण्यास तयार होते.

याचं कारण म्हणजे इंजिनिअर झाल्यावर मिळणारी चांगल्या पगाराची नोकरी!

 

engineering inmarathi
interestingengineering.com

 

अर्थात हा दावा आजच्या घडीला हास्यास्पद वाटत असला तरी, १५-२० वर्षांपूर्वी अभियांत्रिकी पदवी धारकांना बरे दिवस असायचे.

त्यामुळेच या दोन पैकी एका अभ्यासक्रमांना जर आपला पाल्य पात्र ठरला तर पालकांना कृतकृत्य वाटणं स्वाभाविक होतं.

सहाजिकच विद्यार्थ्यांसमोर सुद्धा आपल्या आवडीपेक्षा ह्या शाखांचं शिक्षण घेण्याला प्राधान्य दिलं जाऊ लागलं. जर तुम्ही इंजिनियर असाल तर तुम्ही ह्या सगळ्या प्रवासाची मेहनत नक्की समजू शकाल.

घराबाहेर हॉस्टेल किंवा रुम वर राहून पूर्ण केलेलं इंजिनिअरिंग चे ४ वर्ष. सबमिशन्स, प्रोजेक्टस आणि रात्र रात्र जागवून केलेला अभ्यास.

हा कोर्स एकप्रकारे जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्याचंच प्रशिक्षण देतो! असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

तर एकदाचं इंजिनिअरिंग झाल्यावर आपापल्या आवडत्या क्षेत्रात पीजी करण्याचा ट्रेंड सध्या दिसून येतो. पण एखादा इंजिनियर जर कला- सिनेमा क्षेत्रात गेला तर त्याच्या पालकांची प्रतिक्रिया १५-२० वर्षांपूर्वी काय असेल?

आपला पोरगा-पोरगी वाया गेला/गेली! कारण सिनेमा क्षेत्र म्हणजे एक तर आयुष्यात काहीही न जमणाऱ्यांचा किंवा अतिश्रीमंत लोकांनी छंद म्हणून उघडलेला उद्योग!

 

film sector inmarathi
bangkok.unesco.org

 

अशीच मध्यमवर्गीय धारणा होती.आजकाल शहरात जरी परिस्थिती बदलली असली आणि लोकं करियर साठी इतर पर्यायांचा सुद्धा विचार करत असले तरी ,अजूनही भारतातील छोट्या शहरात ही मानसिकता आहे.

पण तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल की आपल्या बॉलिवूड मधील काही कलाकार हे इंजिनियर सुद्धा आहेत! त्यात काहींनी आवड म्हणून इंजिनिअरिंग केलं ,काहींनी पालकांच्या इच्छेचा मान ठेवायचा म्हणून.

पण नंतर त्यांनी आपली आवड ओळखून त्यातच आपलं करियर घडवलं.

चला तर मग जाणून घेऊयात अश्याच धडपड्या इंजिनियर्स बद्दल ज्यांनी हात काळे करण्याऐवजी तोंडाला रंग फासून(मेक-अप करून) अभिनय केला!

 

१. आर. माधवन :

 

r madhavan inmarathi

 

आर. माधवनने आपल्या कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज मधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केलं. तसा लहानपणापासूनच तो अभ्यासू मुलगा होता त्यामुळे अभिनय वैगेरे गोष्टीत करियर घडवण्याच्या गोष्टी तश्या लांबच.

कॉलेज तर्फे त्याला एका वर्षासाठी कॅनडाला पाठवण्यात आलं होतं.कॉलेज कडून खास शिष्यवृत्ती देऊन!

त्यावेळी तो कॉलेजचा सांस्कृतिक दूत होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तेव्हाच्या काही उत्कृष्ट एनसीसी कँडेट्स पैकी तो एक होता!

आर.माधवन ने नंतर जन-संवाद विषय घेऊन मास्टर्स केलं. मुंबई ला राहत असताना त्याला मॉडेलिंग करण्याची इच्छा होऊ लागली.

अगोदर मॉडेलिंग आणि नंतर हळू हळू अभिनय क्षेत्र करत त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण सुद्धा केलं.

 

२. सोनू सूद :

 

sonu sood inmarathi 2

 

कोरोना लॉकडाउन काळात स्वखर्चाने परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी, सुरक्षित परत पाठवणारा कलाकार म्हणून सगळ्या देशात त्याची चर्चा आहे.

बऱ्याच राजकीय नेत्यांनी,कलाकारांनी सोनू सूद चं कौतुक ही केलं आहे.

नागपूरमध्ये जन्मलेला आणि तिथेच पालनपोषण झालेल्या सोनूला पहिल्यापासून ऍक्टर व्हायचं होतं! पण घरच्यांना सांगायला तो घाबरत होता किंवा योग्य वेळेची वाट पाहत असावा.

सामान्य भारतीय मुलांप्रमाणे त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं.

नंतर नागपूरच्या नामांकित ‘यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ मधून त्याने अभियांत्रिकीची पदवी सुद्धा यशस्वी पणे पूर्ण केली!

त्या नंतर त्याच्या सिनेमात कलाकार, नट बनण्याच्या इच्छेने परत उचल घेतली आणि त्यानं नंतर मुंबई गाठली.

सिनेक्षेत्रात पदार्पण करण्यासाठी पहिली पायरी असलेलं मॉडेलिंग त्यानं सुरू केलं आणि नंतर दाक्षिणात्य सिनेमात त्याला पहिल्यांदा काम मिळालं तिथे यशस्वी झाल्यावर बॉलिवूड मधली त्याची कामगिरी सर्वश्रुत आहेच!

 

३. तापसी पन्नू :

 

tapsee pannu inmarathi
bebeautiful.in

 

तापसीचा अभिनय क्षेत्रात येण्याचा इरादा वैगेरे नव्हता. दिल्लीच्या गुरू तेग बहाद्दूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजिमधून ‘संगणक अभियांत्रिकी’चं प्रशिक्षण घेत होती.

याच दरम्यान कॉलेजच्या प्राध्यापकांसोबत कुठल्यातरी मुद्द्यावरून वाद-विवाद झाला.

मग काय! त्यांनी आपल्याला परीक्षेत नापास करू नये म्हणून हिने आपल्या वर्गातील बाकी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ‘फॉन्ट स्वॅप’ नावाचं एक मोबाईल अँप बनवलं!

इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर तिला एमबीए करायचं होतं.पण परसेन्टाईल थोडं कमी आलं. या दरम्यान अधिकच्या ‘ शॉपिंग मनी ‘साठी तिने मॉडेलिंग सुरू केलं.

तिचा मॉडेलिंगचा अल्बम पाहून सुप्रसिद्ध सिनेनिर्माते वेत्रीमारन यांनी फोनवरच तिला ‘आडूकलम’ सिनेमा करता विचारलं.

 

४. क्रिती सेनन :

 

kriti sanon inmarathi
nationalheraldindia.com

 

क्रितीच शालेय शिक्षण दिल्लीच्या डीपीएस आर.के.पुरममधून झालं. त्यानंतर नोएडाच्या जेपी (jaypee) इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलजी मधून ‘ईएन-टीसी’ या इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

मात्र अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होताच नोकरी ऐवजी तिने मॉडेलिंग सुरू केलं. २०१२ मधे एक तेलगू सिनेमा बनत होता ‘१:नेनोक्कडीने’ त्यात महेश बाबू ,काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होते.

परंतु काही कारणाने काजल त्या सिनेमापासून वेगळी झाली आणि तिच्या जागी वर्णी लागली ती कृती ची! या प्रकारे इंजिनियर कृती चं सिनेसृष्टीत पदार्पण झालं.

 

५. कार्तिक आर्यन :

 

kartik aryan inmarathi
divasdias.com

 

कार्तिकला उच्च माध्यमिक शाळेत असल्यापासूनच नट बनायचं होतं. त्याने तशी इच्छा सुद्धा पालकांकडे बोलून दाखवली होती.पण त्याच्या पालकांची इच्छा होती की आपल्या पोरानं इंजिनियर-डॉक्टर बनावं.

शेवटी त्यांच्या इच्छेखातर त्याने इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतला. परंतु जाणूनबुजून मुंबईत! त्याला नवी मुंबईतील डॉ. डी. वाय.पाटील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.

मुंबईत यायला मिळाल्याने कार्तिक खुश होता कारण त्याला आता ऍक्टर होण्यासाठी प्रयत्न करता येणार होते.

कॉलेजला जाण्याऐवजी तो बांद्रा-अंधेरीत ऑडिशनसाठी फिरू लागला.

त्यातच फेसबुकवर एक जाहिरात पाहून त्याने आपले फोटो इमेल केले आणि त्याला पहिला ब्रेक ‘प्यार का पंचनामा’ सिनेमाच्या रुपात मिळाला.

 

६. विकी कौशल :

 

vicky kaushal 1 inmarathi
orissapost.in

 

विकीचे वडील अगोदर स्टंटमन म्हणून काम करायचे . नंतर ते एक्शन कोरियोग्राफर सुद्धा झाले. मुलाच्या करियर बाबत त्यांचे विचार सुद्धा सर्वसाधारण भारतीय पालकांप्रमाणेच होते.

त्यांची इच्छा होती की पोरांनं इंजिनिअरिंग करावं.

म्हणून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर विकी ने राजीव गांधी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स एंड टेली-कम्युनिकेशन'(EnTC) इंजीनियरिंग साठी प्रवेश घेतला आणि शिक्षण पूर्ण सुद्धा केलं.

परंतु त्यानंतर विकीला इंजिनियरची नोकरी करण्यात रस नव्हता म्हणून मग त्याने अनुराग कश्यप सोबत ‘गैंग्स ऑफ वासेपुर’ सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून कामं केलं.

या दरम्यान तो कलाकारीचे गुण सुद्धा आत्मसात करू लागला.

अनुरागच्याच दोन चित्रपटात छोट्या भूमिका केल्यानंतर त्यानेच प्रदर्शित केलेल्या ‘मसान’ मधून रीतसर नट म्हणून कलाक्षेत्रात पदार्पण केलं.

 

७. शंकर महादेवन :

 

shankar mahadevan inmarathi
Indiatoday.com

हो गायक शंकर महादेवन! चकित झालात ना हे नाव वाचून! सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन कला क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी संगणक अभियांत्रिकीचं रीतसर शिक्षण पूर्ण केलं होतं.

एवढंच नाही तर एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून त्यांनी काम सुद्धा पाहिलं.

 

८. रितेश देशमुख :

 

ritesh deshmukh inmarathi
filmfare.com

 

हिंदी-मराठी सिनेमात नट म्हणून मोठा पडदा गाजवलेल्या रितेशची शैक्षणिक पार्श्वभूमी सुद्धा तगडी आहे बरं का!

आर्किटेक्टची रीतसर पदवी घेतल्या नंतर त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशन सुद्धा केलं आहे!

 

९. अक्कीनेनी नागार्जुन :

 

nagarjuna inmarathi
zeenews.india.com

 

दक्षिणेचा सुप्रसिद्ध नट, निर्माता आणि छोट्या पडद्यावर सुद्धा निर्माता बनलेला नागार्जुन सुद्धा इंजिनियर आहे. त्याने ऑटो मोबाईल क्षेत्रातून अभियांत्रिकी ची पदवी पूर्ण केलीये.

 

१0. अमिषा पटेल :

 

ameesha patel inmarathi
tellychakkar.com

 

अमिषाला शालेय शिक्षण पूर्ण होताच सिनेमात काम करण्याची ऑफर आली होती परंतु तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं होतं.

अमेरिकेत तिने बायोटेक्नॉलजीमध्ये इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला परंतु दोन वर्षात हा कोर्स अर्धवट सोडून तिने अर्थशास्त्र विषयात पुढील अभ्यास करण्याचं ठरवलं.

शेवटी त्याच विषयात तीने ‘टफ्ट विद्यापीठातुन’ अर्थशास्त्र विषयात सुवर्ण पदकासह पदवी पूर्ण केली.

त्यानंतर मायदेशात परत आल्यावर पहिल्यांदा ‘कहो ना प्यार है’ आणि नंतर ‘गदर’ सारख्या दमदार सिनेमे केले.

थोडक्यात काय ,तर तुम्ही शिक्षण कुठल्याही क्षेत्राचे घ्या पण जर तुम्ही तुमचं आवड असलेलं क्षेत्रच जर करियर म्हणून निवडलं तर तुम्ही नक्कीच यश गाठू शकता.

जर आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेता आलं तर दुग्धशर्करा योगच!

थ्री इडियट्स मधला फुंसुख वांगडू म्हणतो ना की “तुम्हारे अंदर की पैशन को फॉलो करो.. कामयाबी झक मारके तुम्हारे पीछे आयेगी”

वरील उदाहरणे सुद्धा याच गोष्टीचा प्रत्यय आणून देतात.अर्थात करियर मध्ये यशस्वी होण्यासाठी मेहनतीला पर्याय नाहीच हे ही तितकंच खरं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?