' स्त्री-अत्याचारावर बेधडक भाष्य करणारा, न्यायदेवतेच्या डोळ्यात अंजन घालणारा ज्वलंत सिनेमा – InMarathi

स्त्री-अत्याचारावर बेधडक भाष्य करणारा, न्यायदेवतेच्या डोळ्यात अंजन घालणारा ज्वलंत सिनेमा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बी.आर चोप्रा हे नाव कानावर पडलं की, डोळ्यासमोर भारतीय चित्रपटसृष्टीतला सुवर्णकाळ उभा राहतो. दूरदर्शनवर रामायणानंतर सर्वात जास्त लोकप्रियता कोणत्या ‘शो’ला मिळाली असेल तर ती महाभारातला!

या महाभारताचे सर्वेसर्वा बी.आर.चोप्रा हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती सापडणं दुर्मिळच. भारतीय मनोरंजनविश्व आणि सिनेइंडस्ट्रीमध्ये मोलाचं योगदान देणारे बी.आर.चोप्रा हे लोकप्रिय झाले ते त्यांनी हाताळलेल्या विषयांमुळे!

 

b r chopra inmarathi

 

महाभारातासारखं ग्रँड चित्रण करणारी सिरियल असो किंवा नया दौरसारखा मैलाचा दगड ठरलेला सिनेमा असो, किंवा वक्तसारखा कौटुंबिक मूल्यं जपणारा सिनेमा असो , गुमराहसारखा संवेदनशील विषयावर भाष्य करणारा सिनेमा असो किंवा छोटी सी बातसारखा हलका फुलका सिनेमा असो, बी.आर.चोप्रा यांनी त्यांच्या प्रत्येक सिनेमातून समाजाला काहीतरी योग्य मार्गदर्शन मिळेल असेच सिनेमे दिले.

फक्त दिग्दर्शकच नव्हे तर एक निर्माते म्हणूनसुद्धा त्यांनी अशाच सिनेमांची निर्मिती केली जे सामाजिक विषयांवर भाष्य करणारे होते.

आज खरंतर त्यांची आठवण निघण्याचं एक वेगळंच कारण म्हणजे ८० च्या दशकात त्यांनीच दिग्दर्शित केलेला एक हटके सिनेमा म्हणजे ‘ईन्साफ का तराजू’! या सिनेमाचं नाव ऐकून बऱ्याच जणांच्या भुवया उंचावतील.

 

insaf ka tarazu inmarathi

 

हा सिनेमा, त्याची मांडणी, हे त्या काळाच्या मानाने खूपच बोल्ड होतं, शिवाय बी.आर.चोप्रासारख्या दिग्गज दिग्दर्शकाने बलात्कारसारखा सेनसीटिव्ह विषय हाताळणं हे आणखीनच बोल्ड होतं.

शिवाय यातल्या काही भडक अंगावर येणाऱ्या रेप सीन्समुळेसुद्धा हा सिनेमा बराच चर्चिला गेला होता!

आज या सगळ्याची आठवण निघण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे साकीनाका येथे झालेलं बलात्कार प्रकरण! मुंबईतल्या साकीनाका इथल्या या भयावह प्रकरणाने साऱ्या देशाचीच झोप उडवली आहे.

पीडित तरुणीच्या मृत्यूनंतरतर हे प्रकरण आणखीनच चिघळलं. सामाजिक, राजकीय सगळ्याच स्तरातून यावर टीका होताना दिसत आहे. लोकं त्यांच्या मनातली खदखद बाहेर काढतायत, आणि बलात्कारसारख्या भयावह अपराध करणाऱ्याला मृत्युदंड हीच एक शिक्षा ठोठावली पाहिजे अशी मागणी सगळ्या स्तरातून होताना दिसत आहे.

आपल्या न्यायवस्थेमधल्या पळवाटा, प्रत्येक गुन्हेगाराला त्याची बाजू मांडू देण्याची संधी या सगळ्या गोष्टीत मोठे बदल होणं गरजेचं आहे असं लोकांचं म्हणणं आहे, आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्हे करणाऱ्याला तर अशी कोणतीही संधी मिळता कामा नये असाच लोकांचा रोष आहे!

अगदी याच गोष्टीवर बेतलेला बी.आर. चोप्रा यांचा ‘ईन्साफ का तराजू’ या सिनेमातून त्या काळी समाजात पसरलेल्या याच विकृतीविषयी खूप बेधडकपणे भाष्य केलं गेलं होतं.

या सिनेमात राज बब्बरचं पात्र झिनत अमानच्या पात्रावर बलात्कार करतं, आणि जेव्हा कोर्टात केस उभी राहते तेव्हा राज बब्बर यांच्या पात्राची निर्दोष मुक्तता होते.

 

insaf ka tarazu 2 inmarathi

 

आजही आपल्या समाजात हेच चित्र बघायला मिळतंय, देशात होणाऱ्या एकूण बलात्कारांपैकी मोजक्याच केसेस रिपोर्ट केल्या जातात, काहींना शिक्षा होते तर काही आरोपी हे मोकाट सुटतात.

आणि याच सिस्टिममधल्या लुपहोल्सचा वापर करून ही जंगली श्वापदं आणखीन निरपराध स्त्रियांचे लचके तोडतात, हीच गोष्ट बी.आर.चोप्रा यांनी त्या काळात मांडली होती.

कोर्टातून बाहेर पडल्यानंतर राज बब्बरचं पात्र झिनत यांनी निभावलेल्या पात्राच्या बहिणीवरसुद्धा बलात्कार करतं, या बहिणीचं पात्र पद्मिनी कल्हापुरे यांनी साकारलं होतं, आणि मग योग्य वेळेत न्याय न मिळाल्याने आणि आपल्या बहिणीचंही आयुष्य उध्वस्त झाल्याने झिनतचं पात्रं राजच्या पात्राची हत्या करून बदला घेते.

यानंतर झिनतच्या पात्रावर कोर्टात केस उभी राहते तेव्हा ते पात्र थेट कोर्टालाच या खुनाची दोषी ठरवते, त्या वेळेस जर कोर्टाने योग्य तो निर्णय घेतला असता तर आज तिच्यावर ही वेळ आलीच नसती असं म्हणत या सगळ्यासाठी ती कोर्टालाच जवाबदार धरते.

 

zeenat aman inmarathi

 

कोर्ट तिचं म्हणणं ऐकून घेतं आणि “कोर्ट जर पीडित स्त्रीला न्याय देऊ शकत नसेल तर तिला शिक्षा देण्याचाही कोर्टाला अधिकार नाही” असं न्यायाधीशांच्या वक्तव्यावर हा सिनेमा संपतो!

८० च्या काळात इतकं बोल्डपणे भाष्य करणारा बहुदा हा पहिलाच सिनेमा असेल आणि यातही बी.आर.चोप्रा यांनी समाजाला आरसा दाखवत कटू सत्य लोकांपुढे मांडलं!

त्यानंतर अशाच धर्तीवर बरेच सिनेमे आले, अंधा कानून, दामिनी, सातच्या आत घरात पासून ते अगदी थेट पिंक पर्यंत अशा वेगवेगळ्या सिनेमातून समाजातलं हे भीषण वास्तव पडद्यावर दाखवलं गेलं. 

पण दुर्दैव असं की “तारीख पे तारीख” किंवा “नो मीन्स नो” हे असे संवाद फक्त सिनेमाच्या पडद्यापुरतेच मर्यादीत राहिले. खऱ्या जीवनात या अशा फार कमी घटना घडल्या जिथे बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला कडक शिक्षा झाली!

 

court scene inmarathi

 

बऱ्याच घटनांमध्ये स्त्रिया गप्प बसून चाललेला अन्याय सहन करत होत्या, किंवा स्वतःचं आयुष्य संपवत होत्या, पण या सगळ्याविरोधात कायदा हातात घेऊन कारवाई करणाऱ्या या स्त्रिया आपल्याला फिल्मी पडद्यावरच जास्त बघायला मिळाल्या.

साकीनाका इथे झालेल्या प्रकरणानंतर महिलांची सुरक्षा हा प्रश्न आता आणखीनच ऐरणीवर आला आहे. खरंतर दिल्लीतल्या निर्भया प्रकरणानंतरच असली मानसिकता असलेल्या नराधमांना जरब बसणं गरजेचं होतं, पण त्या प्रकरणातही न्याय मिळायला उशीरच झाला.

आणि आता न्यायदानाच्या याच पद्धतीवर लोकं संतापले असून बलात्कार करणाऱ्याला काडीचीही दया-माया न दाखवता सरळ त्याच्यावर कारवाई व्हावी याकडेच लोकांचा सर्वाधिक रोष आहे.

 

rape victim inmarathi

 

‘ईन्साफ का तराजू’ मध्ये झिनत अमानच्या पात्राने कायदा हातात घेतला, पण येणाऱ्या काळात आपल्या न्यायदानाच्या प्रक्रियेत काहीच सुधारणा झाली नाही तर उद्या प्रत्येक स्त्री याबाबत कायदा हातात घेईल तेव्हा सगळ्याच गोष्टी फार कठीण होऊन बसतील.

हे वास्तव ८० च्या दशकातच बी.आर.चोप्रा यांनी मांडलं होतं, आणि तेच आजच्या काळातही तंतोतंत लागू होतंय, ही गोष्ट सगळ्यांनाच विचार करायला लावणारी आहे त्यामुळे निदान बलात्काराच्या बाबतीत तरी “Zero Tolerance” हे धोरण भारतातही राबवायलाच हवं, तरंच थोडंफार चित्र बदलेल.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?