' लाडक्या बाप्पाच्या ‘एकदंत’ या नावामागच्या ४ आख्यायिका तुम्हाला माहीत आहेत का? – InMarathi

लाडक्या बाप्पाच्या ‘एकदंत’ या नावामागच्या ४ आख्यायिका तुम्हाला माहीत आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सप्टेंबर महिना आला की आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा आता आपल्या भेटीला येणार या आनंदात सगळे न्हाऊन निघतात. अगदी महिनाभर आधीपासून बाप्पाच्या स्वागताची जैय्यत तयारी घराघरात सुरु होते. घराची साफसफाई, सुंदर मखर बनवणे, वेगवेगळी सजावट करणे, हे सगळं सुरु होतं.

जिथे तिथे लोक उत्साहात सगळी कामं उरकून गावाला जाण्याची तयारी करत असतात. सगळं वातावरण मंगलमय आणि प्रसन्न होतं. गणपती, जशी बुद्धीची मांगल्याची देवता आहे बाप्पा हा त्याच्या भक्तांचा मित्र सुद्धा आहे.

 

ganpati bappa inmarathi
ndtv.in

 

गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचाच लाडका. त्याचं शीर हत्तीसारखं का आहे, त्याच्या हातात मोदक का असतो, त्याचे कान मोठे सुपासारखे का असतात, या सगळ्यामागे काही ना काही संदेश आणि अर्थ दडलेले आहेत. गणपती बाप्पाची इतकी वेगवेगळी नावं का पडली याच्याही अनेक सुंदर आहेत.

तसंच त्याचं नाव एकदंत का पडलं, बाप्पाला एक दात का नाही याच्याही काही आख्यायिका प्रसिद्ध आहेत आणि आज आपण त्याच जाणून घेणार आहोत. आपल्या लाडक्या बाप्पाला एक दात का नाही, चला जाणून घेऊया यामागील काही रंजक कथा.

१. परशुराम आणि गणपतीचे युद्ध –

ब्रह्मांड पुरणाच्या उपोद्घत पदानुसार एकदा भगवान परशुराम, जे श्री विष्णूचे सहावे अवतार आहेत, आपल्या शत्रूंशी युद्ध करत होते. त्यांचे शत्रू म्हणजे आपल्या अधिकारानी उत्पात घालून भोळ्या प्रजेला त्रास देणारे क्षत्रिय राजा.

त्या युद्धातसुद्धा ते विजयी झाले. आपले आराध्य भगवान शंकर यांचा आशीर्वाद घेण्याच्या इच्छेने ते कैलासाकडे निघाले. तिथे पोहोचताच, गणेशाने त्यांना अडवलं.

आपले पिता शंकर हे आपल्या माता पार्वती यांच्याबरोबर विश्राम करत आहेत, त्यामुळे त्यांच्या विश्रामवेळेत कोणीही त्यांना भेटून त्यांची शांतता भंग करू नये म्हणून श्री गणेश कोणालाच आत जाऊ देत नव्हते.

 

ganpati and parshuram inmarathi

 

या बालकाच्या आडमुठेपणावर आणि हट्टावर क्रोधीत होऊन, श्री परशुरामांनी बाप्पाला आपल्याशी युद्ध करण्याचं आव्हान दिलं. बाप्पाने ते स्वीकारलं आणि त्यांच्यात युद्ध सुरू झालं. श्री गणेश, परशुरामाच्या प्रत्येक वाराला प्रत्युत्तर देऊन जिंकत होते.

अशातच भगवान परशुरामांनी, भगवान शंकरांनी त्यांना दिलेल्या कुऱ्हाडीचा वापर केला. ही कुऱ्हाड आपल्या वडिलांची भेट आहे म्हणून तिच्यावर उत्तर न देता श्री गणेशांनी तो वार आपल्या दातावर झेलून घेतला. आणि त्यांचा दात भंगून जमिनीवर कोसळला.

२. श्री गणेश आणि महाभारत –

ब्रम्हदेवाने महर्षी व्यास यांना महाभारत लिहिण्याची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा, त्यांना आपण जे सांगू ते योग्यपणे समजून लिहिणारा एक सहाय्यक हवा होता. त्यासाठी त्यांनी भगवान शंकराकडे श्री गणेशाला आपल्याला मदत करू देण्याची परवानगी मागितली.

या वेळी बाप्पाने एक अट ठेवली की जर महर्षी व्यास, महाभारताचे श्लोक सांगता सांगता एकदा जरी थांबले किंवा अडखळले तर बाप्पा ते काम तिथेच अर्धवट सोडून निघून जाईल.

 

mahabharat ganpati inmarathi

 

महर्षींनी ही अट मान्य केली व स्वतः एक अट ठेवली की लिहिणाऱ्याला ते जे सांगतायत त्याचा अर्थ समजून घेऊन महाभारत लिहावं लागेल. अर्थ न समजून घेता लिहिणे चालणार नाही. बाप्पाने अट मान्य केली आणि लिखाणकाम सुरु झाले.

श्री गणेश सगळ्यांचे अर्थ समजून घेऊन लिहीत होते, कधी कधी तर महर्षींनी ती ओळ पूर्ण करण्याआधीच त्यांची लिहून झालेली असायची. त्यांच्या लिखाणाच्या या वेगामुळे ते ज्या लेखणीचा ते वापर करत होते ती अक्षरशः झिजत होती.

हे होऊ न देण्यासाठी श्री गणेशांनी आपला दावा दात उपटला व त्याचा लेखण म्हणून वापर केला. तेव्हापासून त्यांना एकदंत असं नाव देण्यात आलं.

३. गणपती आणि चंद्राचा वाद –

अशीही एक कथा आहे, की कुबेराकडून भोजन करून जेव्हा श्री गणेश आपल्या वाहनावरून म्हणजे आपल्या उंदरावरून घरी जात होते, तेव्हा त्या उंदराला वाटेत एक साप दिसला. त्या सापाला घाबरून तो उंदीर झाडा आड लपण्यासाठी पळू लागला. यामुळे बाप्पा जमिनीवर पडले.

गोल मटोल श्री गणेशाला असा जमिनीवर पडलेलं बघून आकाशात असणारा चंद्र हसू लागला. त्यांच्या शरीर यष्टीची टिंगल करू लागला. त्यावर क्रोधीत होऊन, बाप्पाने आपल्या डाव्या दाताला उपटून चंद्रावर त्याने प्रहार केला, आणि चंद्राचे दोन तुकडे करून टाकले. आणि तुला कोणीच बघणार नाही, तुझा प्रकाश नाहीसा होईल असा शाप दिला.

 

ganpati and moon inmarathi

 

यावर चंद्र घाबरला आणि बाप्पाला शरण आला. मला माफ करा, मला दिलेला शाप परत घ्या अशी गया वया करू लागला. बाप्पाने त्याचा शाप कमी करत, तुझं रूप रोज बदलेल, आणि एक दिवस तू नाहीसा होशील, पुन्हा मूळ स्वरूपात येशील तेव्हापासून बाप्पाचं नाव एकदंत पडलं.

४. अद्वैताचं प्रतीक –

बाप्पाचं रूप हे प्रतिकात्मक सुद्धा आहे. त्याच्या प्रत्येक शस्त्रामागे, त्याच्या दिसण्यामागे अनेक अर्थ दडलेले आहेत. तसाच एक अत्यंत महत्वाचा अर्थ बाप्पाला केवळ एकच दात असण्यामागेसुद्धा आहे.

 

ekdanta inmarathi

बाप्पाचं एकदंत रूप, हे अद्वैताचं प्रतीक आहे. अद्वैत म्हणजे ज्याच्यासारखं जगात कोणीच नाही. आपण रोजच्या गडबडीत स्वतःचं अस्तित्व विसरून जातो. सतत कशा ना कशात गुरफटलेले असतो. आपण, आपलं हे शरीर, हे जग, धन दौलत, हे सगळंच क्षणिक आहे हे आपण विसरून बसतो.

ज्यामुळे आपल्यात अहंकार, लोभ, द्वेष, मत्सर अशा विकृती जन्म घेऊ लागतात. पण एकदंत हे रूप, आपल्याला सदैव त्या अद्वैताची आठवण करून देतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?