' १९३५ पासून लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कांबळी परिवाराचा इतिहास!

१९३५ पासून लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कांबळी परिवाराचा इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे लालबागचा राजा असे समीकरण आता रूढ झाले आहे. दरवर्षी या गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणपतीच्या दर्शनाला सर्वसामान्य नागरिकांपासून ते अमिताभ बच्चनसारखे कलाकार, मान्यवर, आणि नेते मंडळीही आवर्जून येत असतात.

यामुळेही या गणपतीची प्रसिद्धी जोरदार होत असते. जशी पुण्याच्या दगडूशेट हलवाई गणपतीची मूर्ती प्रसिद्ध झाली आहे तशीच आता लालबागच्या सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्ती सगळीकडे लोकप्रिय झाली आहे.

 

lalbaug raja inmarathi

 

सर्वसाधारणपणे गणपतीची मूर्ती त्याच्या लंबोदर रूपामध्ये साकारण्याचा प्रघात आहे. वेगवेगळ्या श्लोकांमध्ये गणपतीचे वर्णन तसेच केले आहे. पण लालबागच्या राजाची मूर्ती काहीशी वेगळी जाणवते.

या मूर्तीची प्रमाणबद्धता मुनुष्याप्रमाणेच असून मूर्तीच्या डोळ्यांतील जिवंतपणा लक्षवेधी असतो. तीन पिढ्यांपासून ही मूर्ती घडविणाऱ्या कांबळी कुटुंबाने हे वैशिष्ट्य जपले आहे.

१९३२ मध्ये जेव्हा लालबाग मार्केट बंद करण्यात आले तेव्हा तेथील व्यापारी आणि कोळी समुदायाने गणपतीबाप्पांना रोजीरोटी सुरू राहण्यासाठी साकडे घातले. सुदैवाने दोन वर्षातच मार्केट पुन्हा सुरू करण्यात आले.

भाविकांनी कृतज्ञतेने गणेशाची उत्सवी प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले. १९३४ साली या मंडळाची स्थापना होऊन गणेशोत्सव उत्साहाने साजरा होऊ लागला.

१९३५मध्ये मधुसूदन कांबळी यांनी गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केली. पुढे वर्षानुवर्षे त्यांनी, त्यांच्या मुलाने आणि नातवांनी हे काम सुरूच ठेवले. आता पुढची पिढीही हा वारसा जपण्यास सज्ज झाली आहे.

 

kambli family inmarathi

 

७७ वर्षांचे मूर्तिकार रत्नाकर मधुसूदन कांबळी काहीशा गमतीने म्हणतात, की हा गणपती सडसडीत गणपती आहे! सुरुवातीला पाच फूट उंचीची असणारी लालबागच्या राजाची मूर्ती आता भव्य अशी १४ फूट उंच असते.

पूर्वी दरवर्षी सजावटीचे वेगवेगळे देखावे असत. त्या त्या विषयानुसार गणपतीची वेशभूषा कधी धोतर झब्बा तर कधी कफनी, कधी पितांबर शेला तर कधी मखमली अंगरखा सुरवार अशी वेगवेगळी असे.

पुराणे, संतांच्या जीवनातील तसेच ऐतिहासिक प्रसंगांचे देखावे केले जात. त्यानुसार कधी कधी गणेशाला कृष्णाच्या, रामाच्या रूपात दाखविले जाई. एकवर्षीतर चक्क महात्मा गांधींच्या रूपात गणेशमूर्ती साकारण्यात आली होती.

गणेशाच्या पायांची स्थितीही वेगवेगळी असे. कधी डावा पाय कधी उजवा पाय दुमडलेला असे तर आता गेल्या काही वर्षांपासून मूर्ती ठराविक प्रकारची असायला लागली आहे.

 

lalbaug ganpati inmarathi

 

कांबळी परिवाराने तर या मूर्तीच्या चेहऱ्याचा कॉपीराईटही नोंदवला आहे. आता सजावटीसाठी व्हिडिओ प्रोजेक्शन्स, स्मोक मशिन्स अशा आधुनिक तंत्राचा वापर केला जातो. गणेशाचे आसन दरवर्षी वेगळ्या संकल्पनेचे बनवले जाते.

रत्नाकर कांबळी यांनी जुन्या आठवणी जागवताना सांगितले की पूर्वी मूर्ती रंगविण्याचे रंग तयार मिळत नसत. प्रत्येक रंग स्वतंत्रपणे तयार करावा लागे. हे अतिशय कौशल्याचे आणि वेळखाऊ काम असे. त्यांचे वडील मधुसूदन कांबळी यांनी ही मूर्तिकला खडतर परिश्रमांनी कमावली.

मूर्तिकार सदाशिव मुणगेकर यांच्या कारखान्यात ते नेहमी जात असत आणि तेथील काम बारकाईने बघत असत. त्यांची ही जिज्ञासा पाहून मुणगेकरांनी त्यांना मदतनीस म्हणून घेतले आणि मूर्ती घडविण्याचे सर्व तंत्र शिकवले.

१९२० पासून मधुसूदन कांबळी यांनी स्वतंत्रपणे मूर्ती घडविण्यास सुरुवात केली. त्यांचे बंधू व्यंकटेश कांबळीही या कामात सहभागी झाले. १९५२ मध्ये मधुसूदन कांबळी यांचे निधन झाल्यावर व्यंकटेश यांनी कांबळी आर्ट्‌सची सूत्रे हातात घेतली.

मधुसूदन यांचे पुत्र रत्नाकर यांनी सुप्रसिद्ध सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयातून कमर्शिअल आर्ट्‌सची पदवी घेतली. त्यानंतर तेही याच कामात सहभागी झाले.

 

ratnakar kambli inmarathi

 

कांबळी कुटुंबाच्या मूर्तिकलेतील कौशल्याचे अनेक जण चाहते आहेत. शिल्पा शेट्टी, संजय नार्वेकर, केदार शिंदे इ. मान्यवरांकडे लालबागच्या राजाची कांबळी यांनी साकार केलेली छोटी मूर्ती आहे.

कांबळी आर्ट्‌स या संस्थेद्वारे या कुटुंबाने घडविलेल्या मूर्ती देशभरातच नाही तर ऑस्ट्रेलिया, स्विझर्लंड, हॉलंड, फ्रान्स, अमेरिका अशा विदेशांमध्येही पोहोचल्या आहेत. दरवर्षी रामनवमीला शिर्डी येथे कांबळी परिवारातर्फे आकर्षक आणि भव्य अशी कमान तयार करण्यात येते.

कांबळी कुटुंबाने या मूर्ती साकारण्याच्या कामाला अत्यंत श्रद्धेने सुरुवात केली. मधुसूदन कांबळी तर कोणताही आर्थिक मोबदला न घेता हे काम करत असत.

असे असले तरी १९९० ते ९९ या काळात काही गणेशोत्सव मंडळातील काही अंतर्गत मतभेदांमुळे मूर्ती साकारण्याचे काम कांबळी यांना देण्यात आले नव्हते. पण हा निर्णय भाविकांना आवडला नाही. अखेर मंडळाने आपला निर्णय मागे घेऊन पुन्हा कांबळी यांच्याकडे हे काम सोपविले.

आता गेली अनेक वर्षे कांबळी परिवार गणपती बाप्पावरील श्रद्धेने ही मूर्ती साकारण्याचे काम करत आहे. रत्नाकर कांबळी यांची मुलेही हा वारसा चालवण्यासाठी सिद्ध झाली आहेत. आपल्या वडिलांना मदत करत आहेत.

 

kambli family inmarathi 2

या गणेश चतुर्थीला लाखो भाविकांची पावले लालबागकडे वळतील. अनेक तास रांग लावून ते त्यांच्या आराध्य दैवताचे दर्शन घेतील. त्याच्या पाया पडतील.

आपल्या सुखसमृद्धीसाठी त्याला साकडे घालतील. कांबळी परिवाराने घडवलेल्या लालबागच्या राजाला भेटून धन्य होतील. पुढच्या वर्षी येण्याचा संकल्प करतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?