' गणपती बाप्पाच्या नामस्मरणात 'मोरया' हा शब्द नेमका आला कुठून? वाचा

गणपती बाप्पाच्या नामस्मरणात ‘मोरया’ हा शब्द नेमका आला कुठून? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, बच्चेकंपनीचा लाडका बाप्पा आणि सगळ्यांचाच सुखकर्ता दुःखहर्ता असा हा गणपती बाप्पा म्हणजे जवळजवळ प्रत्येक हिंदू व्यक्तीचे श्रद्धास्थान आहे.

 

 

ganpati durva inmarathi
indiatv.in

 

कुठलेही मंगलकार्य गणपतीबाप्पाच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही. सर्व विघ्नांचा नाश करून भक्तांना सुख देणाऱ्या गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय कुठलीच पूजा संपन्न होत नाही. एवढेच काय तर अगदी प्रवासाला निघालो तरी “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” म्हटल्याशिवाय आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करत नाही.

आता तर गणेशचतुर्थी जवळ येते आहे. महाराष्ट्रात, देशातच नव्हे तर परदेशात, सगळीकडेच गणपतीबाप्पाचे साग्रसंगीत पूजन संपन्न होईल. लहानमोठे सगळेच आनंदात उत्साहात गणपतीबाप्पाचे स्वागत करतील आणि “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हा गजर आसमंतात निनादेल.

 

ganapati inmarathi

 

आज कुणी “गणपती बाप्पाSSSS ” म्हटले की आपल्या तोंडात “मोरयाSSS” असे आले नाही तरच नवल. पण या गजराची सुरुवात कशी झाली? गणपतीबाप्पाच्या नामाबरोबर मोरया हे नाव कसे जोडले गेले? ह्या मागे एक कथा आहे.

आपल्यापैकी अनेकांना संत मोरया गोसावी महाराजांचे नाव ठाऊक असेलच! इसवी सनाच्या चौदाव्या शतकात मोरया गोसावी महाराज होऊन गेले. ते गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते श्रीगणेशाचे परमभक्त होते. म्हणून त्यांचेच नाव आपण गणपतीबाप्पा बरोबर घेतो.

कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाच्या एका गावात वामनभट्ट शाळीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई राहत होते. सर्व कुलधर्म, कुलाचारांचे शास्त्रोक्त पालन करणाऱ्या या धार्मिक वृत्तीच्या जोडप्याला पुत्रसंतानाची प्राप्ती झाली नाही म्हणून ते उदासीने आयुष्य कंठत होते. अखेर निराश होऊन वामनभट्ट पत्नीसह घर सोडून निघाले. मजल दरमजल प्रवास करीत ते महाराष्ट्रातील मोरगावला आले.

कऱ्हा नदीच्या तीरावर असलेल्या श्रीगणेशाचे दर्शन घेऊन त्यांचे मन प्रसन्न झाले. श्रीगणेश आपल्याला नक्की पुत्ररूपी प्रसाद देईल अशी त्यांना अशा वाटू लागली आणि त्यासाठी त्यांनी खडतर तपश्चर्या केली. अखेर श्रीगणेशाची कृपा त्यांच्यावर झाली आणि एका तेजस्वी बुद्धिमान पुत्राची त्यांना प्राप्ती झाली.

 

ganesh inmarathi

 

प्रत्यक्ष श्रीगणेशाचा कृपाप्रसाद म्हणून त्यांनी पुत्राचे नाव “मोरया” असे ठेवले. पुढे आठव्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यावर मोरयाने वेदाध्ययन सुरु केले. वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर ते गुरूंच्या शोधात होते कारण गुरूशिवाय मार्ग दाखवणारे कुणी नाही अशी हिंदू संस्कृतीत धारणा आहे. अखेर त्यांच्या तपश्चर्येला फळ आले आणि त्यांना योगीराज नयनभारती गोसावी यांच्याशी त्यांचा परिचय झाला.

त्यांच्या उपदेशाने मोरयाने श्रीगणेशाचे साक्षात दर्शन घडावे म्हणून थेऊरच्या वनात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली. बेचाळीस दिवसांच्या घोर अनुष्ठानाने श्रीगणेश त्यांना प्रसन्न झाले आणि मोरया हे ‘मोरया गोसावी’ झाले. गोसावी म्हणजे ज्यांच्या स्वाधीन सर्व इंद्रिये असतात, ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर तपश्चर्येने विजय मिळवला असतो ते!

श्रीगणेशाच्या तपश्चर्येने मोरया गोसावींना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आणि ते मोरगावला आले. त्यांच्या सिद्धीने, ज्ञानाने ते दीनदुबळ्यांचा उद्धार करू लागले, त्यांचे संकटनिवारण करू लागले. हळूहळू त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. परंतु या सगळ्या कार्यात त्यांना ध्यानधारणेसाठी वेळ मिळणे अवघड झाले.

 

morya gosawi inmarathi

एक दिवस अचानक ते मोरगाव सोडून चिंचवडजवळच्या वनात गेले आणि ध्यान करू लागले. परंतु त्यांना शोधत लोक तिथेही आले आणि त्यांना चिंचवड गावात आणले. त्यांना एक कुटी बांधून दिली आणि त्याच कुटीत राहून ते श्रीगणेशाची सेवा करू लागले.

प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवडहून पायीच मोरगावला जात आणि चतुर्थीला श्रीगणेशाची पूजा करत आणि पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत असत. असे म्हणतात की वयाच्या ११७ व्या वर्षापर्यंत ते नियमितपणे मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात जात असत. पण हळूहळू निसर्गनियमानुसार शरीर वार्धक्याकडे झुकले. वृद्धत्वामुळे त्यांना देवळात जाणे शक्य होत नव्हते. इतकी वर्षे ज्या श्रीगणेशाचे दर्शन घेणे चुकवले नाही आणि आता मात्र मोरयाचे दर्शन घडणार नाही म्हणून मोरया गोसावी महाराज दुःखी राहू लागले.

पण म्हणतात ना, देव आपल्या भक्तांची नेहेमीच काळजी घेतो. एक दिवस श्रीगणेशाने मोरया गोसावी महाराजांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या स्नान करताना मी तुला दर्शन देईन. दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडात स्नान करताना मोरया गोसावींनी पाण्यात डुबकी मारली, पाण्यातून बाहेर येताना त्यांच्या हातात श्रीगणेशाची एक लहानशी मूर्ती होती. अशाप्रकारे श्रीगणेशाने भक्ताला दिलेले वचन पूर्ण केले.

 

ganapati 1 inmarathi

 

ही मूर्ती मोरया गोसावी महाराजांनी देवळात स्थापन केली आणि श्रीगणेशाची यथासांग पूजा केली. हळूहळू चिंचवडचे प्रस्थ वाढू लागले. लोक लांबून श्रीगणेशाचे आणि मोरया गोसावी महाराजांचे दर्शन घेण्यास येऊ लागले. पण ह्यामुळे त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय येऊ लागला.

त्यांनी श्रीगणेशाचा धावा केला. मनापासून नाव घेतले तर देव कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतोच. तसेच मोरया गोसावी महाराजांना देखील श्रीगणेशाने दर्शन दिले आणि त्यांना विचारले की “बोल, तुझी काय इच्छा आहे? ” तेव्हा मोरया गोसावी महाराज म्हणाले की “मयुरेश्वरा, मला आता समाधी घेण्याची इच्छा आहे. यामुळे मला अखंड अद्वैत अवस्थेला पोहोचता येईल.” तेव्हा श्रीगणेश म्हणाले की, “तू आणि मी आपण दोन नाहीत. आपण एकच आहोत. मी अखंड तुझ्या हृदयात निवास करेन. जा, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व घडेल.” श्रीगणेशाने असा आशीर्वाद दिला आणि मग विदेही अवस्थेतील मोरया गोसावी महाराजांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला.

इसवी सन १५६१ मधील मार्गशीर्ष महिन्यातील वद्य षष्ठीला मोरया गोसावी महाराजांनी चिंचवडगावी पवनेच्या काठी संजीवन समाधी घेतली आणि लोकांनी मोरया नामाचा गजर सुरु केला.

 

ganpati bappa morya inmarathi

 

श्रीगणेश आणि त्यांचे परमभक्त मोरया गोसावी महाराज ह्यांच्या अद्वैताचे प्रतीक असलेला, चिंचवडमध्ये सुरु झालेला “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हा गजर हळूहळू सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आणि आता तर जगभर हा गजर केला जातो.  अशा प्रकारे मोरया गोसावी महाराजांचे नाव गणपतीबाप्पा बरोबर जोडले गेले.

पुन्हा एकदा एकमुखाने म्हणूयात, ”गणपत्ती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया”…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?