' ‘सोप्पं नसतं काही’ म्हणत सगळंच ‘अवघड’ करून ठेवणारी “गोंधळलेली” मराठी सिरिज! – InMarathi

‘सोप्पं नसतं काही’ म्हणत सगळंच ‘अवघड’ करून ठेवणारी “गोंधळलेली” मराठी सिरिज!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

सिनेमा, नाटक, कलाविश्व, चित्रकला, साहित्य अशा वेगवेगळ्या माध्यमातून कायम आपल्या संस्कृतीला, समाजाला, रूढींना, परंपरांना निगेटिव्हलीच दाखवण्यात आलेलं आहे.

इतिहास उचलून पाहिलात तर तुम्हाला सगळ्याच कलाविश्वात वेस्टर्न कल्चरचेच गुणगान ऐकायला मिळेल. कारण नेहमीच या माध्यमातून प्रोग्रेसिव्ह विचारांच्या आड लपून आपल्याच देशाच्या इतिहासाला, संस्कृतीला व्हिलन करण्यात आलेलं आहे.

प्लॅनेट मराठी या नव्याकोऱ्या, पहिल्यावहिल्या ‘मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या एका सिरीजनेसुद्धा हीच परंपरा सुरू ठेवली आहे. मराठीचा स्वतंत्र असा ओटीटी प्लॅटफॉर्म येतोय हे ऐकून खरंच खूप उत्सुकता होती पण याच प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ‘सोप्पं नसतं काही’ या सिरीजने सगळ्या अपेक्षा धुळीला मिळवल्या आहेत हे नक्की.

 

soppa nasta kahi inmarathi

 

प्रोडक्शन व्हॅल्यू, चकाचक नेपथ्य, उत्तम टेक्निकल बाजू, मोठमोठे चेहेरे (मराठी इंडस्ट्रीपुरतेच मर्यादित असलेले!) हे सगळं असूनही ही सिरीज कुठेच आपल्याशी कनेक्ट होत नाही, मुळात या सिरीजच्या ट्रेलरवरूनच गहजब झाला होता हे तर सर्वश्रुत आहेच.

पॉलीगॅमी (एकाहून अधिक पार्टनरसोबत राहणे) या कन्सेप्टवर बेतलेली ही सिरीज बघताना साजुक तुपात घोळवलेली अल्ट बालाजीची ‘गंदी बात’ अशीच भावना मनात आली, फरक इतकाच की यात भडक दृश्य फारच कमी, पण कथेचा रोख तसाच.

मानवी उत्क्रांतीनंतर जी थेरं वेस्टर्न कल्चरच्या नावाखाली आपल्या देशात सुरू झाली, वाढली, ट्रेंड बनली त्यांना ग्लॉरिफाय करणं आणि पदोपदी वेस्टर्न कल्चरच कसं योग्य आहे आणि आपलाच समाज, किंवा पर्यायी माणूस आणि त्याचे विचार हे किती संकुचित झाले आहेत हे सिद्ध करायचा केविलवाणा प्रयत्न ही सिरीज करते.

शिवाय ७०% मॅमल्स हे एकाहून अधिक पार्टनरसोबत राहणं पसंत करतात (मॅमल्स म्हणजे दुसऱ्या जीवाला जन्म देऊ शकणारे प्राणी ज्यात सिंह, कुत्रा आणि मनुष्यसुद्धा मोडतात) ही अशी थिअरी सांगून Throuples वगैरे काय काय हाय फंडा शब्द वापरून ही सिरीज मानवाची तुलना थेट प्राण्यांशी करू पाहते तिथेच ती हास्यास्पद ठरते.

 

throuples inmarathi

 

ही सिरीज बघताना मला एकच प्रश्न पडला तो म्हणजे उत्क्रांती नक्की कोणाची झाली माणसाची का जनावरांची?

खरंतर मराठी प्लॅटफॉर्मवर असला प्रकार अपेक्षित नव्हता पण जेव्हा या सिरिजचा ट्रेलर आला तेव्हाच यात नेमका काय प्रकार असेल याचा अंदाज होता आणि नेमकं तसंच घडलेलं दिसतं!

सिनेमाची कथा फिरते ३ पात्रांभोवती. सुमित, अनुजा आणि सिद्धार्थ यांच्याभोवती. सुमित आणि अनुजा यांचं लग्न ठरलेलं असताना काही अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात आणि सुमित अनुजाला सोडून विरक्ती मिळवण्यासाठी हिमालयात निघून जातो.

अनुजाला त्यादरम्यान सिद्धार्थशी जोडली जाते आणि त्यांचं लग्न होतं, पण मनातून ती सुमितला विसरू शकत नाही. अचानक दीड वर्षानंतर सुमित पुन्हा त्यांच्या आयुष्यात येतो आणि त्यानंतर अनुजा त्या दोघांसमोर एकत्र रहायचा प्रस्ताव ठेवते आणि त्यानंतर जे घडतं ते नाट्य बघताना आपण अवघडले जातो आणि त्या सगळ्या प्रकारची किळसही वाटते.

 

series marathi inmarathi

 

कारण ज्या पद्धतीने मराठी बॅकग्राऊंडवर या सगळ्याचं चित्रण झालंय त्याच्याशी आपण कनेक्ट होऊच शकत नाही. मिडलक्लास किंवा हायर मिडलक्लास मराठी फॅमिलीमधलेसुद्धा तरुण अशा प्रकारची लाईफस्टाईल जगत नाहीत हे त्रिभुवनातलं सत्य आहे.

त्यामुळे यात दाखवलेली पात्रं, त्यांची लाईफस्टाईल, त्यांचे विचार, त्यांची डिसीजन घेण्याची क्षमता यातल्या कोणत्याच गोष्टीशी आपण जोडले जात नाही. २ पार्टनरसोबत राहणं पसंत करणारी मुलगी ही तर खूप दूरची गोष्ट पण त्या कोणत्याही पात्राकडे बघून आपल्याला ते पात्र आसपास बघितल्याचंही अजिबात आठवणार नाही.

यातलं एक पात्रं संगीतक्षेत्रात काम करणारं, एक कॉर्पोरेट जॉब करणारं, एक पेंटर असं असलं तरी त्यांच्या दैनंदिन आयुष्यात त्यांच्या कामाला काहीच महत्त्व नाहीये.

संपूर्ण दिवसभर हे तिघे, एकतर कॉफीचे मग हातात घेऊन किंवा वाईनचे ग्लास हातात घेऊन या सगळ्या प्रकरणाशी डिल करताना दाखवलं जातं तिथेच ही सिरिज खूप बेगडी असल्याचं जाणवतं.

तुम्ही एक प्रोग्रेसिव्ह विचार जरी कथानकातून मांडत असाल तरी त्याला वास्तवाचा काहीतरी आधार घ्याल की नाही?

बरं या सिरिजमधलं अनुजा हे पात्र जे दोन पुरुषांसोबत संसार थाटायचा जो नोबेल विचार आपल्यासमोर ठेवते तेव्हा तीच अनुजा आपल्या मैत्रिणीला वेगवेगळ्या लोकांसोबत रिलेशनशीप्स ठेवण्यावरून ‘बच्चन’ देते.

आणि तिने घेतलेला निर्णय कसा योग्य आहे? यामागे फक्त फिजिकल कारणं नसून त्यामागे एक इमोशनल थॉट आहे आणि हेच प्रेम आहे असं सगळं पटवून आपली मैत्रीण जे करतीये ती फक्त चंगळ आहे असा एक आव जो ती अनुजा आणते ते पाहताना तर हसावं का रडावं असाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.

 

soppa nasta kahi inmarathi 2

 

स्वतःची आयडियोलॉजी पटवून देण्यासाठी ही लोकं कोणत्याही थराला जाऊ शकतात याचं धडधडीत उदाहरण म्हणजे ही सिरिज!

माझा खरंतर या आयडियोलॉजीलाही विरोध नाही, तुम्हाला जे दाखवायचं आहे ते दाखवा, तुम्हाला तेवढं स्वातंत्र्य आहे पण निदान ते दाखवताना इतर लोकं कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करायचा अट्टहास तरी करू नका.

ही सिरिज नेमकी हीच गोष्ट करते, एका फेअरीटेलसारखी पात्रं घेऊन, त्यांना थोडंसं मराठी बॅकग्राऊंड देऊन, वेस्टर्न कल्चरची फोडणी देऊन कॉमन मॅनच्या भाषेत ‘थ्रीसम’ या गोष्टीला जस्टीफाय किंवा ग्लोरिफाय करायचं काम ही सिरिज करते.

खरंतर ज्याला जशी लाईफस्टाईल जगायची आहे तशी जगू द्यावी, sexual preference, habits या खूप वैयक्तिक गोष्टी आहेत आणि त्या सगळ्याचा आपल्या भारतीय संस्कृतीत, इतिहासात कायम आदरच केला गेला आहे.

त्यामुळे या सगळ्याला वेस्टर्न कल्चरचं स्पष्टीकरण देऊन त्या गोष्टी कशा योग्य आहेत आणि आपली भारतीय सभ्यता किती चुकीची आहे, विचार कसे बुरसटलेले आहेत हे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न करणारी ही सिरिज बघताना फार त्रास होतो.

western culture inmarathi

 

कथा, मांडणी, सादरीकरण, अभिनय, संगीत, या सगळ्याचबाबतीत सिरिज वरचढ ठरते यात वाद नाही, शिवाय शशांक केतकर, अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडे सारखे चेहेरे बघताना एक वेगळंच समाधान मिळतं.

व्हिज्यूअली सिरिज खूपच सुरेख आहे यात काहीच शंका नाही, पण त्यातून मांडल्या गेलेल्या गोष्टी ज्यापद्धतीने सादर केल्या आहेत ते काही केल्या पटत नाही, रुचत नाही.

त्यांना जी गोष्ट सांगायची आहे किंवा ज्या गोष्टी जस्टीफाय करायच्या आहेत त्यांचं त्यांना स्वातंत्र्य आहे पण त्यालाही एक पद्धत असते, आणि कदाचित तीच गोष्ट चुकीच्या पद्धतीने मांडली गेल्याने या सिरिजचा तिटकारा येतो.

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मची ही सुरुवात आहे त्यामुळे याकडे कानाडोळा करता येईल, पण केवळ हिंदीच्या पावलावर पाऊल ठेवून असाच कंटेंट याही प्लॅटफॉर्मवर येत राहिला तर मात्र याचा अल्ट बालाजी किंवा उल्लू व्हायला वेळ लागणार नाही!

 

planet marathi inmarathi
planetmarathi.org

 

आय होप याहून चांगला कंटेंट या प्लॅटफॉर्मवर येईल आणि पैसे घालून चांगल्या कंटेंटच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रेक्षकवर्गाला हा प्लॅटफॉर्म आपलासा वाटेल हीच अपेक्षा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?