' मारणाराही कार्यकर्ता आणि मार खाणाराही कार्यकर्ताच...वाचा एक परखड मत

मारणाराही कार्यकर्ता आणि मार खाणाराही कार्यकर्ताच…वाचा एक परखड मत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखिका – – अॅड अंजली झरकर

===

महाराष्ट्रात सध्या नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पेटलेल्या वादावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

 

rane inmarathi

 

या पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्याला पोलीस मारतानाचा आणि नंतर तो कार्यकर्ता हॉस्पिटलाईज्ड झाल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटो वरून दोन्ही बाजूचे पक्षांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर मीम्स बनवत आहेत. परंतु त्या कार्यकर्त्याचे झालेले आर्थिक शारीरिक नुकसान याबद्दल कोणीही बोलणार नाही.

“मी माझ्या पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता आहे” असे आपण अनेक वेळा राष्ट्रीय पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांना व्यासपीठावरून बोलताना ऐकतो. आता हे नेते जर कार्यकर्ते झाले तर मग रस्त्यावर उतरून मार खाणारे लोक नक्की कोण असतात ?असा प्रश्न पडतो. कारण आजपर्यंत आपल्यापैकी कोणीही खडसे, भुजबळ, पवार, फडणवीस, ठाकरे, यांच्यापैकी कोणालाच रस्त्यावर मार खाताना बघितलेले नाही, पोलिसांच्या लाठ्या झेलताना बघितलेले नाही. पण यांच्या एका शब्दावर स्वतःचं आयुष्य बरबाद करणारे अनेक कार्यकर्ते आपण बघत असतो. हे कार्यकर्ते तात्पुरते त्या क्षणाचे हिरो बनलेले असतात.

 

karyakarta inmarathi

 

संपूर्ण मीडिया कव्हरेज त्यांना मिळत असते मात्र त्यानंतर यांचे पुढे काय होते हे कधीही समजत नाही. स्वतःवर झालेल्या पोलीस केसेस यांना स्वतःच्या खर्चाने चालवाव्या लागतात. त्यासाठी वर्षानुवर्षे कोर्टाच्या पायऱ्या घासाव्या लागतात. अनेक कार्यकर्त्यांना आर्थिक मदत मिळत नाही. क्रिमिनल चार्जेस लागल्यावर जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्या पाठीमागचा पोलिसांचा ससेमिरा चालू राहतो याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीवर होतो. ही मुले नंतर नोकरी मिळवण्यासाठी पात्र राहत नाहीत.

पक्षीय कार्यकर्त्यांची तळाची आणि मधली फळी गरीब घरातून येणाऱ्या मुलांची तयार झालेली असते परंतु तळाच्या फळीतुन वरच्या फळीत जाणाऱ्यांची संख्या अत्यंत नगण्य राहते. बाकी त्यातून कधीतरी आपल्या सेवेचे फळ मिळेल म्हणून प्राणपणाने पडेल ती कामे करणारे कार्यकर्ते तयार होतात. यांच्यावर सभा भरविणे, सभेसाठी गर्दी खेचून आणणे, दंगली घडवून आणणे, एखादा मुद्दा उचलून त्यासंदर्भात मिडियामध्ये प्रक्षोभकपणे बोलणे इत्यादी कामे सोपवली जातात. हे करत असताना या कार्यकर्त्यांना अर्थातच चारही बाजूंना शत्रू तयार झालेले असतात.

स्वतःची मते उघडपणे मांडल्यामुळे माणूस एका अर्थाने (vulnerable) झालेला असतो. याच्यात वर्षानुवर्षे कुठलाही बदल होत नाही. वरिष्ठ पातळीवर चालणारे राजकारण तळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत झिरपून कधीही येत नाही.

एका रात्रीत विरोधी नेत्यांबरोबर सरकार बनवले जाते किंवा पाडले जाते. यामध्ये सगळ्यात तोंडघशी पडतात ते तळागाळातले कार्यकर्ते! इतके दिवस ज्यांना शिव्या दिल्या इतके दिवस ज्यांच्या शिव्या खाल्ल्या आता त्याच पक्षातल्या लोकांबरोबर मिळतेजुळते कसे घ्यायचे हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडतो.

 

mahavikas aghadi inmarathi

 

२०१४ च्या निवडणुकीनंतर सोशल मीडियाचे प्रस्थ भारतीय राजकारणा मध्ये प्रचंड वाढलेले आपण बघितलेले आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईलचे डबडे आणि स्वस्त इंटरनेट पॅकेजेस आल्यामुळे आता कुणीही फुल टाइम ऑनलाईन कार्यकर्ता बनू शकतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फेसबुक ट्विटरवर पडीक राहणे, पक्षाच्या आणि नेत्याच्या समर्थनासाठी पोस्ट खरडत बसणे, वेगवेगळ्या प्रकारचे मीम तयार करून व्हायरल करणे, विरोध करणाऱ्या लोकांशी ऑनलाइन भांडणे उकरून काढणे अशी कामे या कार्यकर्त्यांकडे असतात. यातील कित्येक तरुणांवर सायबर क्राईमची नोंद झालेली आहे आणि यांचे नाव देखील ब्लॅक लिस्ट करण्यात आलेले आहे परंतु याची त्या तरुणांना पर्वा नाही.

या तरुणांचे सखोल वाचन नसते, त्यांचा ग्राउंड लेवलचा अभ्यास नसतो, कधी तळागाळात उतरून काम करण्याचे प्रसंग येत नाहीत, कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी लागणारे सखोल ज्ञान आणि चाणाक्ष बुद्धिमत्ता तयार होत नाही. हा असा समूह उथळ पाण्यातील बेडके बनून जगत राहतो. वरिष्ठ नेत्यांचे राजकारण यांच्या शोषलेल्या आयुष्यावर आरामात पुढे जात राहते

जरा आठवतय का ? जेंव्हा सुरेश कलमाडींवर राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारांचे आरोप लागलेले होते तेव्हा त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं त्यावेळी ते बोलले होते की “जर मी नको असेल तर माझ्या पत्नीला तिकीट द्या तिने तर कुठला गुन्हा केलेला नाही?” अजून थोडं आठवा, प्रमोद महाजन यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर त्यांच्या जागी त्यांची मुलगी निवडून आणण्यासाठी प्रथम पसंती पक्षाने दिली परंतु त्याठिकाणी कार्यकर्त्याचा विचार झाला नाही. तीच गोष्ट गोपीनाथ मुंडे यांची! अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळ्यात जेव्हा पायउतार व्हावे लागले तेव्हा त्यांनीही आपल्या पत्नीचे नाव पुढे केले होते. “माझ्या उद्धव ला सांभाळा.” ही साद आजही सच्चा कार्यकर्त्यांच्या कानात घुमत असेलच.

 

nepotism in politics inmarathi

 

बारामती मतदार संघात स्पर्धा नको म्हणून पवार कुटुंबियाच्या पुढच्या पिढीसाठी वेगळे सुरक्षित मतदार संघ तयार करण्यात आले, २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जेव्हा देवेंद्र फडणवीस “आम्ही महाराष्ट्रातून राष्ट्रवादीला संपवणार” असे सभेतून सांगायचे तेव्हा व्यासपीठावर त्यांच्या पाठीमागे जवळपास सगळी त्यांनी राष्ट्रवादी मधून आयात केलेली मंडळी बसून भाषण ऐकत असायची.

राजकारणाचे हे चित्र जर पहिले तर या सगळ्या गदारोळात मध्ये तो कार्यकर्ता कुठे दिसतो जो वयाच्या २० व्या वर्षापासून पक्षासाठी राबतोय, पक्षासाठी लाठया खातोय, पक्षासाठी पोलीस केसेस अंगावर घेतोय, पक्षासाठी रात्रंदिवस झटतोय पक्षासाठी संघटनात्मक बांधणी करतोय?

असा कार्यकर्ता गेली अनेक वर्षे स्वतःच्या दहा बाय दहाच्या टीचभर खोलीत आठ-दहा माणसांचं खटलं घेऊन राहतो. वृद्ध वडिलांची पेन्शन, बायकोची नोकरी आणि आईने सुरू केलेले जेवणाचे डबे यातून येणाऱ्या पैशांवर जगतो. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाची स्वप्ने त्याला पडत नाहीत. स्वतः काम धंदा करून पैसे कमावण्यासाठी त्याला पक्ष कार्यातून वेळ मिळत नाही. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या नेत्याच्या घरातल्या तीन पिढ्या सत्तेवर बसलेल्या त्याने बघितलेल्या असतात पण तरीही त्याची भविष्याची आशा सुटत नाही. येणारा दिवस कदाचित आपल्याला आपल्या कष्टाचे फळ देऊन जाईल या खोट्या आशेवर तो निमूटपणे रोज सकाळी पक्षाचे कार्यालय झाडायला तितक्याच उत्साहाने जात राहतो.

 

shivsainik inmarathi

 

राणे आणि ठाकरे यांच्यामध्ये आज पेटलेला वाद उद्या संपेल. निवडणुका लागल्यानंतर वरिष्ठ पातळीवर वेगळे निर्णय घेतले गेले तर आज शत्रू बनून वागणारे नेते उद्या गळ्यात गळे घालून फिरतील बाकी मार खाऊन घरी बसलेल्या कार्यकर्त्यांचे काय?

जर भारतीय राजकारणाचा चेहरा खरोखर बदलायचा असेल तर अगोदर तळागाळातल्या कार्यकर्त्यांना धूर्त बनावं लागेल. तृणमूल काँग्रेसच्या खासदार बनलेल्या महुवा मोईत्रा यांचे उदाहरण डोळ्यासमोर येतंय का? महुवा असेल किंवा परदेशात उत्तम कारकीर्द गाजवून आल्यानंतर भारतीय राजकारणात नवी सुरुवात करणारे शशी थरूर असतील उत्तम शिक्षण,उत्तम नोकरी, उत्तम रीतीने कमावलेला पैसा आणि त्याच्या नंतर त्यांनी राजकारणात घेतलेली उडी हाखरा प्रवास खरे तर बहुसंख्य कार्यकर्त्यांचा व्हायला हवा. भले परदेशातील डिग्री नसेल परंतु देशात राहून उत्तम शिक्षण घेऊन स्वत:ची वैचारिक बैठक पक्की करून राजकारणात येणाऱ्या कार्यकर्त्यांची नवीन पिढी उदयास आली पाहिजे.

 

karyakarta 1 inmarathi

 

अगोदर मेनस्ट्रीम मध्ये स्वतःची जागा बनवली, शिक्षण घेतले, पैसा कमावला आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला असे किती लोक समाजामध्ये दिसतात? स्वत:च्या आयुष्याचा पाया पक्का करून राजकारणात आले, तिथे स्वतःला झोकून दिले, पक्षीय नेत्यांना जाब विचारला, त्यांच्या मुला-बाळांच्या सतरंज्या न उचलता स्वतःच्या हक्कासाठी भांडले जोपर्यंत अशा कार्यकर्त्यांची अशी एक फळी बनणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारतीय राजकारण लोकाभिमुख बनेल असं वाटत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?