' महाराष्ट्राला ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी जीवाचं रान करणारा निसर्गवेडा सयाजी! – InMarathi

महाराष्ट्राला ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी जीवाचं रान करणारा निसर्गवेडा सयाजी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सातार्‍याजवळच्या खेड्यातला एक मुलगा घरच्या परिस्थितीमुळे सातार्‍यात येतो काय, दिवसभर वॉचमन म्हणून काम करुन रात्र रात्र जागून पदवी घेतो काय, हौशी नाटकं करता करता समांतर नाटकांत येतो काय, तिथून मराठी आणि पुढे हिंदी सोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीही गाजवतो काय, सगळंच एखाद्या चित्रपटातल्या कथेत शोभावं असं आहे. या मुलाचं नाव आहे, सयाजी शिंदे.

सातार्‍यात आल्यावर सयाजी सुनिल कुलकर्णी या रंगकर्मींच्या सहवासात आले आणि खर्‍या अर्थानं इथून त्यांच्या “फेम”चा प्रवास सुरू झाला.

 

sayaji shinde inmarathi

 

सयाजी यांनी नियमितपणे नाटकांतून भूमिका करायला सुरवात केली आणि त्यांच्या अभिनयानं त्याची दखल घ्यायला भाग पाडलं. सयाजीलाही आपल्यातल्या अभिनयगुणांना अजून झळाळी यायला हवी असं वाटू लागलं आणि त्यांनी मुंबई गाठली.

इथे अनेक थिएटर वर्कशॉप्समधून त्यांनी अभिनयाचं रितसर शिक्षण घेतलं. यानंतर अनेक दिग्गजांसोबत त्यानं मराठी रंगभूमीवर काम करायला सुरवात केली. थिएटर करत असतानाच त्यांना अबोली हा चित्रपट मिळाला.

या चित्रपटातील त्यांची भूमिका बरीच गाजली आणि तिचं कौतुकही झालं इतकंच नाही तर सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कारही त्यांना मिळाला.

नोकरी सांभाळत थिएटर आणि मराठी चित्रपट करत असतानाच त्यांना पहिला हिंदी सिनेमा मिळाला, शूल. या चित्रपटानंतर सयाजी नावाचं वारं चित्रपटसृष्टीत जोरात वाहू लागलं.

 

shool inmarathi

 

चित्रपटांतून अफाट यश मिळवलेल्या सयाजींचे पाय आजही जमिनीत घट्ट रोवलेले आहेत. ते ज्या मातीतून बनले त्या मातीशी त्यांची नाळ तुटलेली नाही.

कृत्रिम दुनियेत राहताना त्यांची निसर्गाशी असणारी बांधिलकीही पूर्वीसारखीच आहे आणि या बांधिलकीतूनच त्यांनी एक अनोखा उपक्रम काही वर्षांपूर्वी हातात घेतला.

प्रत्येक शाळेत नर्सरी असा उपक्रम आणि सयाजी उद्यान या उपक्रमांद्वारे त्यांनी वृक्षरोपण मोहिम हाती घेतलेल्या, याला आता चार वर्षं झाली आहेत. एव्हाना या रोपट्यानं आता चांगलंच मूळ धरलं आहे.

शाळकरी वयापासूनच मुलांना निसर्गाचं महत्व पटावं, त्यांची आणि निसर्गाशी ओळख व्हावी आणि हे नातं आयुष्यभर जपण्याचं भान यावं या दृष्टीकोनातून हा उपक्रम राबविण्याचं त्यांना सुचलं.

 

tree plantation inmarathi

हे ही वाचा १,०८,००० झाडं लावून भूतान ने साजरा केला राजकुमाराचा जन्म

शाळाशाळांमधून नर्सरीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानं रोप लावणं आणि कालांतरानं हे रोप विद्यार्थ्यानी आपापल्या घराच्या परिसरात लावून त्याई कायमस्वरूपी देखभाल करणं असं या उपक्रमाचं स्वरुप आहे.

मुलांना वृक्षारोपणाची केवळ माहिती न देता किमान एका झाडाची कायमस्वरूपी जबाबदारी घ्यायलाही शिकवणं हा उद्देश ठेवून या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

काही शहरांमधून वनस्पती संवर्धन मोहिम राबविण्यात येते, अशाठिकाणी उद्यानं बांधून त्याची देखभाल करण्यात येते शिवाय ट्री-स्टोरी फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्थाही त्यांनी सुरू केलेली आहे. निसर्गप्रेमी आणि समविचारी लोकांना एकत्र आणून ही संस्था कार्य करत असते.

हे सगळं ते ज्या कसोशीने करतात त्याचं उदाहरण म्हणजे, जर सयाजींना कोणी वृक्षारोपणासाठी आमंत्रित केलं तर ते त्या ठिकाणी जाण्याआधी आधी लावलेल्या झाडांची काळजी कशाप्रकारे घेतली जात आहे याची पूर्ण चौकशी करतात.

 

sayaji inmarathi

 

या सगळ्या उपक्रमाची सुरवात २०१६ साली त्यांनी सातार्‍यात आपल्या मित्रांसमवेत केली. लहानपणापासून सरपण गोळा करण्याच्या निमित्तानं ते आजूबाजूच्या रानात, जंगलात जात असे.

अलिकडच्या भेटीत त्यांच्या लक्षात आलं की जंगल विरळ होत आहे. यानं चिंतीत होत त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना एकत्र आणत एकाचवेळेस तब्बल २० हजार झाडं लावली होती.

पुढे या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक पाऊलं उचलली आणि दोन तीन उपक्रमांना आकार दिला.

 

sayaji tree plantation inmarathi

 

बॉलिवूड, टॉलीवुड सगळीकडेच आपल्या अभिनयातून स्वतःची छाप सोडणाऱ्या आणि एवढी प्रसिद्धी मिळूनही समाजासाठी आणि निसर्गासाठी कायम झटणाऱ्या निसर्गवेड्या सयाजींना मानाचा मुजरा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?