' लैंगिक भावना काबू करण्यासाठी बनवलं गेलेलं कॉर्न फ्लेक्स आज आवडीने खाल्लं जातं… – InMarathi

लैंगिक भावना काबू करण्यासाठी बनवलं गेलेलं कॉर्न फ्लेक्स आज आवडीने खाल्लं जातं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कॉर्न फ्लेक्स म्हटलं की डोळ्यापुढे केलॉग्स कंपनीचे मक्याचे पोहेच येतात. आपण भारतीय लोक सकाळच्या न्याहारीला पोहे, उपमा, शिरा, थालीपीठ, घावनं, सांजा, लापशी, पेज अगदी काही नाही तर मऊ भात खात होतो.

आपल्याकडे भारतीय खाद्यसंस्कृतीत तर काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्यात नाश्त्याचे असंख्य पौष्टिक आणि रुचकर प्रकार आहेत. पण ग्लोबलायझेशनमुळे जगभरात बहुतांश सगळीकडे सकाळच्या नाश्त्याला खाल्ले जाणारे केलॉग्सचे कॉर्न फ्लेक्स आपल्याकडे सुद्धा आले आणि हळूहळू लोक आपल्याकडील पारंपरिक न्याहारी सोडून झटपट तयार होणारे कॉर्न फ्लेक्स खाऊ लागले.

 

kelloggs corn flakes inmarathi

 

केलॉग्सने नंतर विविध फ्लेवर्सचे कॉर्न फ्लेक्स बाजारात आणले. मग काळाची पावले ओळखून व्हीट फ्लेक्स, ओट फ्लेक्स, मल्टिग्रेन फ्लेक्स सुद्धा आणले. केलॉग्सच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक कंपन्यांनी विविध प्रकारचे, विविध चवींचे, विविध धान्यांचे फ्लेक्स बाजारात आणले. पण कॉर्न फ्लेक्सची सुरुवात करण्याचे श्रेय केलॉग्स कंपनीचे जन्मदाता जॉन हार्वे केलॉग्स यांनाच जाते.

केलॉग्स बंधू कोण होते…

१८९४ साली जॉन हार्वे केलॉग्स यांनी पहिल्यांदा कॉर्न फ्लेक्स बनवले, तेव्हा ते त्यांनी मिशिगनमधील बॅटल क्रिक सॅनिटेरियममधील रुग्णांसाठी एक हलके आणि पौष्टिक पदार्थ म्हणून तयार केले होते.

जॉन तेव्हा या ठिकाणी सुपरिटेन्डन्ट म्हणून काम करत होते. त्यांना वाटले की त्यांनी कॉर्न फ्लेक्स हा एक पौष्टिक पदार्थ तयार केला आहे. त्या रुग्णांनाही हा नवा पदार्थ आवडला. आणि डॉक्टर जॉन यांच्या भावाने म्हणजे विल केलॉग्स यांच्या भावाने मोठ्या प्रमाणावर कॉर्न फ्लेक्स बनवण्यासाठी आणि सामान्य लोकांना खाता यावे म्हणून ते बाजारात आणण्यासाठी केलॉग्स कंपनी तयार केली.

 

kelloggs inmarathi

 

कॉर्न फ्लेक्स बनवण्याच्या या पद्धतीचे त्यांनी १८९६ साली पेटंट घेतले. डॉक्टर जॉन आणि विल कीथ केलॉग्स हे १९८४ साली अमेरिकेत मिशिगन येथील बॅटल क्रिक या लहानश्या शहरात एक सॅनिटेरियम आणि हेल्थ स्पा चालवत होते.  जॉन तेथील अधीक्षक होते तर विल कीथ जमाखर्च सांभाळत असत.

या सॅनिटेरियममध्ये रुग्णांवर विविध उपचार केले जात असत. तसेच त्यांच्या व्यायाम आणि आहाराची काळजी घेतली जात असे. त्यांना वेळोवेळी मसाज दिले जात असत. त्यांच्या या सॅनिटोरियममध्ये १९१० आणि १९२० च्या दशकात राष्ट्राध्यक्ष वॉरेन हार्डिंग, अभिनेता जॉनी वीसम्युलर, हेन्री फोर्ड, अमेलिया इअरहार्ट, मेरी टॉड लिंकन यांच्यासारखी मोठी आणि प्रसिद्ध माणसे देखील उपचार घेत होती.

दोन्ही केलॉग्स बंधू अत्यंत धार्मिक होते. आणि ते सेव्हन्थ डे ऍडव्हेण्टिस्ट चर्चचे कट्टर अनुयायी होते. ते बायबलची शिकवण अत्यंत कट्टरपणे आणि कसोशीने पाळत असत. त्यांच्या अनेक उपचार पद्धतींवर त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा पगडा होता त्यांशी श्रद्धा होती की शरीर हे एक मंदिर आहे आणि त्याचे पावित्र्य जपले गेलेच पाहिजे.

 

holy bible inmarathi

 

ते स्वतः सुद्धा कॅफिन, मद्य आणि निकोटीन पासून चार हात लांब राहत असत आणि रुग्णांना सुद्धा ह्या तामसिक पदार्थंपासून लांब ठेवण्याचा त्यांचा कटाक्ष होता. ते स्वतः कट्टर शाकाहारी होते.

डॉक्टर जॉन हे इतके कट्टर होते, की त्यांची श्रद्धा अशी होती की “सेक्स” सुद्धा एक गलिच्छ आणि घातक प्रकार असून शरीराचे पावित्र्य जपण्यासाठी “सेक्स” टाळला पाहिजे असा त्यांचा विचार होता. शारीरिक संबंध तर लांब राहिले, पण लोकांनी हस्तमैथुन या गलिच्छ प्रकारापासून लांब राहायला हवे असा त्यांचा प्रयत्न असायचा.

जॉन यांनी विवाह तर केला. पण ते कायम त्यांच्या पत्नीपासून लांबच राहिले. त्यांनी तिला स्पर्श सुद्धा केला नाही. इतकेच काय तर त्यांच्या खोल्या सुद्धा वेगवेगळ्या होत्या. त्यांनी त्यांची सगळी मुले दत्तक घेतली होती.

हस्तमैथुनाला टोकाचा विरोध

केलॉग्स हे त्यांच्या ब्रह्मचर्याच्या पुरस्कारामुळे, शरीरसंबंधांचा निषेध केल्यामुळे आणि हस्तमैथूनाच्या भयावह परिणामांबद्दल जनजागृती केल्यामुळे देशभरात प्रसिद्ध झाले होते.

त्यांचे असे मत होते, की हस्तमैथुनामुळे अपस्मार, मूड स्विंग आणि स्मृतिभ्रंश सुद्धा होतो. ‘प्लेगसारखे आजार आणि युद्ध यामुळेही जितके नुकसान होत नाही तितके नुकसान हस्तमैथुन केल्यामुळे होते. लोक अक्षरश: स्वतःच्याच हाताने स्वतःचा जीव घेतात.’ असं त्यांचं म्हणणं होतं.

 

kiara advani inmarathi

 

शाकाहारी जेवणामुळे सुद्धा शारीरिक संबंध किंवा हस्तमैथुनाची इच्छा कमी होते, अशी त्यांची मान्यता असल्यामुळे ते शाकाहाराचे खंदे पुरस्कर्ते होते.

त्यांच्या मते मांस आणि मसालेयुक्त पदार्थ खाल्ल्याने मनुष्याच्या मनात वासना तयार होतात आणि म्हणूनच त्यांच्या सॅनिटेरियममध्ये ते मांस आणि मसालेदार पदार्थ रुग्णांना देत नसत. रुग्णांच्या मनात ‘भलतेसलते’ आणि ‘घाणेरडे’ विचार येऊ नये म्हणून रुग्णांना बिन मसाल्याचे बेचव जेवण देण्यात येत असे.

त्यांना याची प्रेरणा प्रेस्बिटेरियन धार्मिक धर्मांध सिल्वेस्टर ग्रॅहम यांच्याकडून मिळाली. ग्रॅहम यांनीच लोकांमधील शरीरसंबंधाची आणि हस्तमैथुनाची इच्छा कमी व्हावी म्हणून अख्ख्या गव्हापासून बनलेल्या बेचव अशा ग्रॅहम क्रॅकरचा शोध लावला.

कॉर्न फ्लेक्सचा जन्म

त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन केलॉग्ज यांनी ‘अँटी सेक्स फूड’ बनवण्याच्या प्रयत्नात मक्याचे पीठ आणि ओट्सचे पीठ एकत्र करून त्यात काही सुकामेवा घातला आणि नंतर त्या गोळ्याची बिस्किटे बनवली. नंतर त्याचे तुकडे करून त्यांना ‘ग्रॅन्युला’ असे नाव दिले.

हा प्रकार केलॉग्ज यांच्या आधीच एका माणसाने बनवला होता. आणि त्याने केलॉग्जला कारवाईची धमकी दिली म्हणून केलॉग्जने त्यांच्या पदार्थाचे नाव ‘ग्रॅनोला’ असे केले. त्यानंतर केलॉग्ज बंधूंनी अनेक ‘सात्विक’ पदार्थांचे प्रयोग केले.

एक दिवस त्यांना गव्हाचा काहीतरी पदार्थ तयार करताना अचानक बाहेरून बोलावणे आले आणि ते पदार्थ तसाच ठेवून गेले. परत आल्यानंतर त्यांनी तो गहू रोलर्समधून फिरवला आणि प्रत्येक गव्हाचे पोहे तयार झाले होते. त्यांना वाटले हा पदार्थ अतिशय पौष्टिक आणि सात्विक आहे. १८९८ साली त्यांनी हाच प्रयोग गव्हाऐवजी मक्यावर केला आणि ‘कॉर्न फ्लेक्स’चा जन्म झाला.

 

corn flakes inmarathi

 

जॉन केलॉग्ज यांनी लगेच हे कॉर्न फ्लेक्स त्यांच्याकडील रुग्णांना देण्यास सुरुवात केली. जेणेकरून त्यांची शरीरसंबंधांची इच्छा कमी होईल. विल यांचा मात्र धर्माकडे कल कमी असून व्यापाराकडे जास्त कल होता. त्यामुळे त्यांनी त्यात व्यापाराच्या दृष्टीने विचार केला आणि कॉर्न फ्लेक्सची लाकडाच्या भुश्यासारखी चव बदलण्यासाठी त्यात थोडी साखर घालण्याविषयी सुचवले.

अर्थातच जॉन यांना हा सल्ला पटला नाही. आणि या कॉर्न फ्लेक्सचे पेटन्ट त्यांनी घेतले. काही काळानंतर व्हीट फ्लेक्सचे उत्पादन बंद झाले आणि सगळे लक्ष कॉर्न फ्लेक्सवरच केंद्रित करण्यात आले.

कॉर्न फ्लेक्सना अधिक चविष्ट केलं गेलं

सुरुवातीला त्यात साखर नसल्याने फार कुणी कॉर्न फ्लेक्स विकत घेत नसत. नंतर वैतागून १९०६ साली व्हीके केलॉग्स यांनी स्वतःच्या भावाकडून कॉर्न फ्लेक्सचे हक्क विकत घेतले. पण लोकांना हे ब्रेकफास्ट सिरियल्स विकायचे असल्यास त्यांची चव बरी असायला हवी म्हणून त्यात साखर घातली गेली.

 

corn flakes bowl inmarathi

 

दोन्ही भावांत ‘केलॉग्ज’ नावावरून भांडण झाले आणि नंतर व्हीके केलॉग्ज यांनी त्यांच्या कंपनीचे नाव केलॉग सिरीयल कंपनी असे केले. त्यांनी १९१५ साली ब्रॅन फ्लेक्स सुद्धा बाजारात आणले आणि १९२७ साली राईस क्रिस्पीज सुद्धा आले. अजूनही झटपट खाता येणारा पदार्थ म्हणून कॉर्न फ्लेक्स आणि राईस क्रिस्पीज जगभरात घराघरांत सकाळच्या नाश्त्याला खाल्ले जातात.

भारतात कॉर्न फ्लेक्स म्हटले, की लोकांना केलॉग्जच माहिती आहे. तर अशारीतीने लोकांना ब्रह्मचर्याकडे वळवण्यासाठी तयार करण्यात आलेले कॉर्न फ्लेक्स आज लाखो लोक रोज सकाळी नाश्त्याला खातात.

तरीही जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे हे बघून जॉन केलॉग्जचा आत्मा मात्र नक्कीच अस्वस्थ होत असणार! याबाबत तुमचा अनुभव काय सांगतो? सकाळी सकाळी नाश्त्याला कॉर्न फ्लेक्स खाल्यावर दिवसभरात मनात ‘तसले भलतेसलते’ विचार तर येत नाहीत ना?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?