' “ऑस्कर”मध्ये सर्वप्रथम पाऊल ठेवणाऱ्या भारतीय अभिनेत्रीचा मृत्यू चटका लावून गेला – InMarathi

“ऑस्कर”मध्ये सर्वप्रथम पाऊल ठेवणाऱ्या भारतीय अभिनेत्रीचा मृत्यू चटका लावून गेला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हॉलीवूड, ऑस्कर या गोष्टींचं आपण भारतीयांना फार अप्रूप वाटतं. मुंबई फिल्म इंडस्ट्रीचं नाव बदलून ‘बॉलीवूड’ ठेवण्यामागे हेच कारण असावं. एखाद्या कलाकाराने हॉलीवूड मध्ये सुद्धा काम केलं आहे हे कळल्यावर लोकांच्या मनात त्या कलाकाराची प्रतिमा बदलते हे नक्की.

हॉलीवूड मध्ये असलेले प्रगत तंत्रज्ञान, सिनेमाकडे पाहण्याचा एक व्यवसायिक दृष्टिकोन, जास्तीचे मिळणारे पैसे, दिगदर्शकांची कलाकार निवडण्याची प्रामाणिक पद्धत यामुळे हे कौतुक योग्य आहे असं म्हणता येईल.

 

bollywood stars hollywood inmarathi

 

इरफान खान, प्रियांका चोप्रा, नसिरुद्दीन शाह सारख्या कलाकारांनी हॉलीवूडचे दरवाजे बॉलीवूडच्या कलाकारांसाठी आज खुले केले आहेत. पण, हॉलीवूडमध्ये काम करण्याची सुरुवात ही या आजच्या घडीच्या यशस्वी कलाकारांच्या आधी ‘पर्सिस खंबाटा’ या गुणी भारतीय अभिनेत्रीने केली आहे हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.

कोण आहे ‘पर्सिस खंबाटा’? कसं घडलं तिचं हॉलीवूड मधील करिअर ? जाणून घेऊयात.

१९७० च्या दशकात हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ‘पर्सिस खंबाटा’ ही मूळची मुंबईची होती. २ ऑक्टोबर १९४८ रोजी तिचा जन्म झाला होता. घरात एकुलती एक असलेली पर्सिस ही दोन वर्षांची असतांनाच तिच्या पालकांमध्ये मतभेद झाले आणि तिचे वडील घर सोडून निघून गेले होते.

 

parsis 1 inmarathi
idol birthdays

 

शाळेत असतांना असलेली अभिनयाची आवड आणि रंगमंचावर सहज होणारा वावर यामुळे वयाच्या १३ व्या वर्षी ‘रेक्सोना’ साबणाच्या जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली. निर्मात्यांनी केवळ ‘पर्सिस खंबाटा’चे फोटो बघून तिला ही संधी देण्याचं ठरवलं होतं.

१९६५ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी पर्सिस ला फेमिना मिस इंडिया या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मॉडेलिंगच्या स्पर्धेत सहभागी होऊन पहिल्यांदा तिला ‘रॅम्प वॉक’ करण्याची संधी मिळाली. १९६४ मध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती आणि पहिल्याच प्रयत्नात पर्सिस या स्पर्धेची विजेती ठरली होती. त्याच वर्षी झालेल्या ‘मिस युनिव्हर्स’ या जागतिक सौंदर्य स्पर्धेत ती तिसऱ्या क्रमांकावर होती.

‘पर्सिस खंबाटा’ हे नाव मॉडेलिंग जगात खूप प्रसिद्ध झालं होतं. ‘एअर इंडिया’, ‘रेवलॉन’, ‘गार्डन वरेली’ सारख्या नामवंत कंपन्यांनी तिला आपल्या ब्रँडच्या प्रमोशनसाठी साईन केलं.

 

parsis inmarathi 2
famous people

 

भारतातील इतर मॉडेलच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे ‘पर्सिस खंबाटा’ने सुद्धा बॉलीवूडमध्ये काम बघायला सुरुवात केली. के.ए. अब्बास यांच्या १९६८ मध्ये रिलीज झालेल्या ‘बंबई रात की बाहो मे…’ या सिनेमात त्यांना पहिलं काम मिळालं.

सिनेमाला बेस्ट सिनेमॅटोग्राफी चा पुरस्कार मिळाला. पण, ‘लिली’ नावाच्या कॅब्रे डान्सरच्या रोलने पर्सिसला काहीच फायदा झाला नाही. “बॉलीवूडमध्ये राहिलो तर असेच रोल करावे लागतील” अशी जाणीव ‘पर्सिस खंबाटा’ ला झाली आणि तिने हॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी तडक इंग्लंडला जायचं ठरवलं.

 

parsis inmarathi 3
the better india

हे ही वाचा – कोण म्हणतो मॉडेल्स बुद्धिमान नसतात? “प्रोफेशनल सुंदरी” चं अविश्वसनीय यश आपल्याला बरंच काही शिकवून जातं!

१९७५ पर्यंत छोटे मोठे कामं मिळाल्यानंतर ‘पर्सिस खंबाटा’ला ‘स्टार ट्रेक : द मोशन पिक्चर’ या टेलिव्हिजन सिरीजमध्ये काम करण्याची पहिली मोठी संधी मिळाली. पाच वर्षांचा हा करार होता.

निर्मात्यांनी या विषयावर टेलिव्हिजन सिरीजवर त्याच कलाकारांसोबत सिनेमा करायचं ठरवलं. २९ वर्षीय पर्सिसने या संधीचं सोनं केलं. ‘पर्सिस खंबाटा’ने या रोल साठी केलेला ‘हेअरकट’ हा त्या काळात चांगलाच गाजला होता.

‘स्टार ट्रेक’ नंतर पर्सिसने कधीच मागे वळून बघितलं नाही. आपल्या कामाबद्दल असलेली निष्ठा, कथा समजून त्यानुसार काम करण्याची पद्धत यामुळे ‘पर्सिस खंबाटा’ या १९८० मधील लॉस एंजेलीसमध्ये आयोजित केलेल्या ऑस्कर पुरस्काराचे वितरण केले होते.

१९८० मध्येच ‘पर्सिस खंबाटा’ यांना सिल्व्हेस्टर स्टेलॉन यांच्यासोबत ‘नाईट हॉक्स’ या सिनेममध्ये काम करण्याची संधी मिळाली. ‘वॉरीयर ऑफ द लॉस्ट वर्ल्ड’ आणि ‘मेगा फोर्स’ या ‘सायफाय’ सिनेमांमध्ये सुद्धा पर्सिसने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

 

parsisi inmarathi
the print

 

आपल्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असतांना ‘पर्सिस खंबाटा’ने कृष्णवर्णीय लोकांनासुद्धा सिनेमात काम मिळावं यासाठी निर्मात्यांना उद्युक्त केलं. सर्वकाही सुरळीत सुरू होतं, पण पर्सिस च्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं.

१९८० मध्ये जर्मनीत असतांना पर्सिसच्या कारला दुर्दैवी अपघात झाला. तिच्या डोक्यावर जबर जखम झाली. या अपघातातून सावरण्यासाठी तिला तिच्या करिअरची ३ वर्ष द्यावी लागली. हॉलीवूडमध्ये पुन्हा काम सुरू करणार त्याचवेळेस १९८३ मध्ये पर्सिसला ‘कोरोनरी बायपास सर्जरी’ला सामोरं जावं लागलं होतं. पर्सिसला आपल्या कामावर परतता आलंच नाही.

१९८५ मध्ये ‘पर्सिस खंबाटा’ मुंबईला परतल्या. ‘शिंगोरा’ या हिंदी सिरीजमध्ये त्यांनी काही काळ काम केलं. हॉलीवूड मधील ‘माईक हॅमर’ आणि ‘मॅकगिवर’ या दोन सिरीजमध्ये त्यांनी काम केलं. १९९३ मधील ‘लॉइस अँड क्लार्क’मधील छोटा रोल हे त्यांचं हॉलीवूडमधील शेवटचं काम होतं.

 

persis inmarathi 1
Pinterest

 

१९९७ मध्ये ‘पर्सिस खंबाटा’ने ‘प्राईड ऑफ इंडिया’ नावाचं एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकात पर्सिसने मिस इंडिया ही स्पर्धा जिंकलेल्या सर्व विजेत्यांची आणि त्यांनी केलेल्या तयारी बद्दलची माहिती मॉडेलिंग इंडस्ट्री साठी उपलब्ध करून दिली आहे.

भारतात वास्तव्य असतांना १९९८ मध्ये त्यांना छातीच्या दुखण्यामुळे त्यांना दक्षिण मुंबईच्या ‘मरीन हॉस्पिटल’मध्ये भरती करण्यात आलं. १८ ऑगस्ट १९९८ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. मृत्यूच्या वेळी ‘पर्सिस खंबाटा’ यांचं वय ४९ वर्ष इतकं होतं.

‘पर्सिस खंबाटा’ यांच्या कार्याचा गौरव म्हणून १९९९ मध्ये भारत सरकारने ‘पर्सिस खंबाटा मेमोरियल अवॉर्ड’ची सुरुवात केली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधील पदवीधर विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि वार्षिक शिष्यवृत्ती या स्वरूपात हा पुरस्कार देण्यात येतो.

‘पर्सिस खंबाटा’ यांच्या कमी वयात झालेल्या निधनामुळे भारताच्या हॉलीवूडमधील स्थानासाठी काही काळ ब्रेक लागला होता. पण, ‘शो मस्ट गो ऑन’ या वाक्याप्रमाणे इतर भारतीय कलाकारांनी पर्सिसच्या कामातून प्रेरणा घेतली आणि हॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

 

priyanka chopra inmarathi

 

‘स्टारट्रेक’मधील ‘लिऊटनंट लिया’ या पात्राच्या नावाने तिची हॉलिवूडमध्ये असलेली ओळख हीच ‘पर्सिस खंबाटा’च्या कामाची खरी पावती आहे म्हणता येईल.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?