' "सिनेमा मरतोय, नाटक मरतंय... 'उद्धव साहेब' आतातरी निर्णय घ्याच!"

“सिनेमा मरतोय, नाटक मरतंय… ‘उद्धव साहेब’ आतातरी निर्णय घ्याच!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

अक्षय कुमारने त्याचा नवीन सिनेमा बेल बॉटम जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करायचा निर्णय घेतला तेव्हा प्रत्येकालाच हायसं वाटलं होतं की चला आतातरी थिएटर सुरू होतील.

पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर सिनेमा बघायचा आनंद लोकांना मिळेल, बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा हाऊसफूलचे बोर्ड लागतील. एकंदरच कोरोना महामारीमुळे रखडलेल्या अर्थचक्राला पुन्हा चालना मिळेल. पण महाराष्ट्रातल्या लोकांच्या पदरी घोर निराशाच पडली.

 

bell bottom inmarathi

 

देशातल्या बऱ्याचशा राज्यात सिनेमागृह सुरू झाली पण महाराष्ट्र सरकारने अद्यापही सिनेमागृहं आणि नाट्यगृहं सुरू करायला परवानगी दिलेली नाही, आणि यामुळेच प्रेक्षक, थिएटरचालक तसेच कलाकार निराश झाले असून सगळ्यांनीच त्यांची खंत सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून व्यक्त केली.

गेलं दीड वर्षं थिएटर बंद असल्याने सगळेच थिएटरचालक ठाकरे सरकारवर संतापले आहेत. दीड वर्षापासून काहीच कमाई नाही तरीही प्रॉपर्टी टॅक्स, विजेचे बिल, भाडं हे सगळं भरूनही सरकार आपला विचार करत नाही अशी खदखद बऱ्याच थिएटर मालकांनी व्यक्त केली आहे.

शिवाय ज्या राज्यातून सर्वात जास्त बिझनेस होतो त्याच राज्यात सिनेमागृह बंद ठेवल्याने सिनेइंडस्ट्रीलासुद्धा खूप नुकसान होत आहेत.

गेली दीड वर्षं कलाकारांनी आणि बिझनेस लॉबीने कशीबशी कळ काढली, पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागल्याने अक्षय कुमारसारख्या कलाकारानेही आता थिएटरशिवाय काही पर्याय नाही म्हणत बेल बॉटम थिएटरमध्ये रिलीज करायचा निर्णय घेतला.

हे ही वाचा आपल्याकडे प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो?

कोरोनाच्या महामारीमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मची चांदी झाली, सुरुवातीच्या काळात बऱ्याच कलाकारांनी आपले सिनेमे ओटीटीवर रिलीज करून त्यातून आपला थोडाफार फायदा करून घेतला खरा, पण ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखंच!

 

ott films inmarathi

 

थिएटरमध्ये सिनेमा बघणं आणि छोट्या मोबाइलच्या स्क्रीनवर सिनेमा बघणं या दोन्हीमध्ये खूप फरक आहे आणि आता तोच फरक प्रकर्षाने जाणवू लागला असल्याने कलाकार आता पुन्हा थिएटरकडे वळताना दिसत आहेत.

कलाकार आणि निर्मात्यांच्या पाठीशी मात्र आपले सरकार खंबीरपणे उभे नसल्याने त्यांना या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोय.

आज भाजी मार्केट सुरू आहे, रस्त्यावर फेरीवाले सर्रास बसतायत, लोकल ट्रेन, बस सगळीकडे खचून गर्दी आहे, अत्यावश्यक सेवांमध्ये न येणारे उद्योगधंदेही अगदी जोमत सुरू आहेत, एकंदरच जनजीवन सुरळीत होत आहे, पण तरीही सिनेमागृहं सुरू करत नाहीत.

असाच एकंदर सूर सोशल मीडियावर बघायला मिळतोय. बाहेरच्या राज्यात थिएटर सुरू आहेत, तिथे कोरोना पसरत नाही का? असा प्रश्नही सिनेनिर्मात्यांकडून आणि थिएटर असोसिएशनकडून विचारला जातोय.

 

cinemas inmarathi

 

सरकारने घालून दिलेले नियम पाळून थिएटरचालक उद्योग पुन्हा सुरू करायच्या तयारीत आहेत. नुकसान झेलूनही ५० % क्षमतेवर ते थिएटर सुरू करायची तयारी दाखवत आहेत, पण आपल्या महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारकडून कोणताच आशेचा किरण दिसत नसल्याने सगळेच संतप्त झाले आहेत.

जी अवस्था सिनेमागृहांची तीच नाट्यगृहांची. आधीच महाराष्ट्रात नाटकं फार कमी होतायत, त्यातही कोरोनानंतर नाट्यसृष्टी पूर्णपणे ठप्प आहे. मध्यंतरी काही काळासाठी का होईना सिनेमागृह सुरू करायची परवानगी मिळाली होती.

पण नाटकांच्या बाबतीत ती सूटही अजून सरकारने दिलेली नाही. मुळातच नाटक ही गोष्ट खर्चिक आणि नाट्यगृह संभाळणं हे तर आणखीनच खर्चिक, त्यामुळे ही सगळी कसरत करताना कलाकारांची होणारी फरफट सरकारला दिसत नाही का?

एका नाट्यगृहाचा भार पेलण्यासाठी किमान ६० ते ७० लोकांची गरज असते. त्यांची होणारी  फरफट, बॅकस्टेज कलाकारांची झालेली दुरवस्था हे सगळं सरकार बघून न बघितल्यासारखं करतंय याचं जास्त दुख आहे.

शिवाय मनोरंजन विश्वातले कलाकार अत्यावश्यक किंवा इतर कोणत्याच निकषांत बसत नसल्याने सरकारकडून या काळात त्यांना मदतही मिळाली नाही!

 

shivaji mandir inmarathi

 

सिनेमा किंवा नाटक ही आपल्या देशाची सांस्कृतिक, सामाजिक ओळख आहे, तीच ओळख मारून कशी चालेल? सरकारने याबाबतीतली त्यांची धोरणं वेळीच बदलली नाही तर येणारा काळ सिनेमागृह आणि नाट्यगृहांसाठी खूप कठीण जाणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे आधीच लोकांची मानसिकता बदलली आहे. सगळंकाही बोटाच्या एका क्लिकवर उपलब्ध होत असताना बाहेर जाऊन १००० रुपये खर्च करून सिनेमा किंवा नाटक बघणारी लोकं आता डिजिटल माध्यमांकडे वळली आहेत.

वर्षाचे पैसे भरून फक्त भारतातल्या नव्हे तर जागतिक कंटेंटचाही आस्वाद घेता येतो हे समजल्यापासून ओटीटीची चांगलीच चलती झालेली दिसतीये. आधीच पायरसीमुळे सिनेविश्वाचे बरेच नुकसान झाले आहे आता नवीन येऊ घातलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे येणारा काळ हा कठीण असणार आहे यात काहीच शंका नाही.

 

ott platforms inmarathi

हे ही वाचा मनोरंजनाचा एक वेगळाच अनुभव देणाऱ्या ह्या १० वेब सिरिज नाही बघितल्या तर मग काय बघितलं?

कोरोना महामारीतून आता कुठे देश बाहेर पडू बघतोय, लसी उपलब्ध आहेत, उपचार होत आहेत, त्यामुळे एकंदरच या सगळ्या मनोरंजन विश्वाचा विचार करता महाराष्ट्र सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करणं गरजेचं आहे.

कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार (आणणार?) असल्याची भाकीतं आपण रोजच समाजमाध्यमातून ऐकत आहोत, त्यामुळे जर पुन्हा महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचा अघोरी पर्याय समोर ठेवला तर मनोरंजन विश्व नक्कीच रसातळाला जाईल.

त्यामुळे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सगळ्यांच्या हिताचा विचार करून निर्णयात बदल करावा ज्यामुळे कुणावरच अन्याय होणार नाही, आणि राज्याची आर्थिक गाडी पुन्हा रुळावर यायला मदत होईल!

 

uddhav thackrey inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?