' शिस्तबद्ध चारित्र्यहनन – “राजकीय शक्ती + माध्यम” युतीचा अभद्र डाव आणि जनतेची सहानुभूती – InMarathi

शिस्तबद्ध चारित्र्यहनन – “राजकीय शक्ती + माध्यम” युतीचा अभद्र डाव आणि जनतेची सहानुभूती

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पहिल्या महायुद्धाच्या काळात, इंग्लडमधील मजूर पक्षाचे डावे नेते रॅम्से मॅकडोनाल्ड ह्यांनी पहिल्या महायुद्धाला कडवा विरोध केला – म्हणून त्यांच्यावर “देशद्रोही” असल्याचा ठपका सर्व माध्यमांनी ठेवला. माध्यमांतर्फे हा प्रचार कसा शिस्तबद्ध रीतीने झाला, प्रत्येक बाजूने मॅकडोनाल्ड चं चारित्र्यहनन कसं केलं गेलं हे लोकसत्ताच्या, दिनांक ८ मे, २०१७ च्या, “प्रचारभान” ह्या सदरात आलं आहे.

ह्यात दोन गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्या –

१ –

मॅकडोनाल्ड यांच्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ते जातील तेथे त्यांच्या विरोधात निदर्शने करीत होते. त्यांच्या सभा उधळून लावत होते. तेथे कशा देशविरोधी घोषणा दिल्या जातात याची तिखटमीठ लावून वर्णने करीत होते. नोव्हेंबर १९१५ मधील त्या सभेत झाले ते असेच.

मॅकडोनाल्ड यांच्या संघटनेने लंडनमधील एका सभागृहात ही सभा ठेवली होती. … … … या सभेतील वक्त्यांवर नजर ठेवण्यासाठी तेथे एक गुप्तहेर पाठविण्यात आला होता. मेजर आर. एम. मॅके असे त्या लष्करी पोलीस अधिकाऱ्याचे नाव. त्याने दिलेला अहवाल नंतर ब्रिटिश लोकसभेत वाचून दाखविण्यात आला. ती घटना तशीच महत्त्वाची होती. सैनिकांनी जाऊन त्या सभेत गोंधळ केला होता. काय होता तो अहवाल? त्यात म्हटले होते, ‘मॅकडोनाल्ड यांनीच त्या सैनिकांना बाहेर काढावे अशी सूचना करून सैनिकांना भडकविले. त्या सभेत कोणी तरी प्रक्षोभक भाषा वापरली. कोणी ते मात्र समजले नाही.’ त्या लष्करी गुप्तचराने आणखी एक सनसनाटी माहिती दिली होती. त्या सभागृहात काम करणाऱ्या महिला ‘केवळ जर्मनांसारख्या दिसतच नव्हत्या, तर त्यांचे उच्चारही तसेच होते.’ म्हणजे त्या जर्मन होत्या. यातील एकही गोष्ट अर्थातच खरी नव्हती. पण हे कमीच की काय अशी एक बाब यानंतर दोन वर्षांनी समोर आली.

रॅम्से मॅकडॉनल्ड । moneyweek.com

ज्या विश्वासू हेराच्या माहितीवरून मॅकडोनाल्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आले होते, त्या मेजर मॅके यांना १९१७ मध्ये गैरव्यवहार आणि अधिकारांचा दुरुपयोग या आरोपांखाली अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत समजले, की गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना ऐकायलाच येत नव्हते. ते बहिरे होते! एका कर्णबधिराच्या सांगण्यावरून मॅकडोनाल्ड यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते.

आणि – २ –

मॅकडोनाल्ड यांना अनेक नागरिकांचा पाठिंबा होता. पुढे ते ब्रिटनचे पंतप्रधानही झाले. येथे प्रश्न असा येतो, की बहुसंख्य लोक युद्धज्वराने पछाडलेले असतानाही शांततावादी मॅकडोनाल्ड यांना पाठिंबा मिळत होता तो कसा? त्याचे कारण होते त्यांच्यावरील क्रूर शाब्दिक हल्ला! ‘जॉन बुल’ साप्ताहिकाने त्यांच्या आईच्या चारित्र्यावर चिखलफेक केली. ही उघडीनागडी पीतपत्रकारिता. त्या हल्ल्यामुळे अनेक नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूतीची भावना निर्माण झाली.

===

हे सर्व वाचताना मला २००२ आणि नरेंद्र मोदी आठवत होते.

ती काळीकुट्ट घटना घडल्या नंतर मी मोदींचा भयंकर दुस्वास करायला लागलो. ३-४ वर्ष गेली त्यात. परंतु पुढे पुढे मोदींना टार्गेट करण्याची पातळी इतकी नीचतम झाली की हळूहळू माझ्या मनात, माझ्याच नकळत मोदींबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झाला.

पुढे सर्व चौकश्यांमधून मोदी बाहेर पडल्यावर तरी तो विषय थांबायला हवा होता. परंतु तसं झालं नाही. “मौत का सौदागर” छाप प्रचारकी टगेगिरी सुरूच राहिली. आणि हे सर्व अंगावर घेऊन “मला सवा सौ करोड देशवासीयांचं भलं करायचं आहे”, हा एकच धोशा लावत मोदी मोठे होत राहिले. त्यांच्यात नम्रपणे टोपी नाकारण्याचं धैर्य होतं आणि त्याचवेळी “मुस्लिमांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात टॅब असावा” हे म्हणण्याचं भान ही होतं. टोपी-ईदच्या खानावळीत गुरफटलेल्या दांभिक सेक्युलॅरिझमची सवय झालेल्या मला हे रिफ्रेशिंग होतं.

modi muslims marathipizza

 

पण विरोधकांचे टिनपाट प्रचार थांबत नव्हते. एका नाजूक क्षणी, मुलाखतीत – गोध्रा बद्दल वाईट वाटलं का – ह्यावर उत्तर देताना “आपल्या नकळत एखादा कुत्रा आपल्या कार खाली मेला तर त्याचंसुद्धा आपल्याला वाईट वाटतं…इथे तर कित्येक माणसं मृत पावली…त्याचं वाईट वाटणारच ना…” असं ते बोलून गेले. आणि त्यावरून परत काहूर उठलं. मोदींना काय म्हणायचं होतं हे तो व्हिडीओ बघणारा प्रत्येक माणूस स्पष्ट समजू शकत होता. पण प्रोपागंडा करणाऱ्यांना ते समजलं नाही.

माझ्यासारख्या अनेकांनी मोदींच्या भाजपला मत देण्यामागे काँग्रेसचा भोंगळ कारभार जितका कारणीभूत होता – तितकाच ह्या प्रोपागंडाचा अतिरेकसुद्धा होता.

डेव्हिड आणि गोलिएथच्या लढाईत, सर्वसामान्य माणूस आपोआप डेव्हिड बद्दल हळवा होतोच. दिल्लीत केजरीवाल दुसऱ्यांदा जिंकले तेव्हा मी खुशीत “सश्याने शिकार केली वाघाची…अन…सिंहाला भिडे गाय…” हे स्टेटस टाकलं होतं फेसबुकवर. त्या मागे हीच डेव्हिड बद्दल सहानुभूतीची भावना होती.

काळ जसजसा बदलतो तस तसे डेव्हिड आणि गोलिएथ बदलत जातात…तसतसा प्रोपागंडा बदलत जातो…

आणि बदलत जाते, आपल्यासारख्या सामान्य नागरिकांची सहानुभूती…

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?