' दाभोलकरांचा गौरव ‘यासाठी’…अनेकांचे डोळे खाडकन उघडणारा लेख! – InMarathi

दाभोलकरांचा गौरव ‘यासाठी’…अनेकांचे डोळे खाडकन उघडणारा लेख!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : राजेन्द्र मणेरीकर

===

कै. नरेन्द्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनी काल मी केलेल्या कवितेच्या निमित्ताने जे काही आक्षेप कुणी घेतले त्यापैकी एक दाभोलकरांचा गौरव केलाच का असा एक होता. ती कविताच खरे तर या प्रश्नाचे उत्तर आहे. तरीही कवितेत काय म्हटले आहे ते आधी सांगून दुसऱ्या आक्षेपाकडे जातो. कविता म्हणते

इये अंधश्रद्धांचिये नगरीं । अवतरलास तू लंडारि । उपयोजूनि वैखरी । जागविलेस जनां ॥
योजिल्या अपूर्व कार्यी । मिळाले गुणी अनुयायी । आत्मविश्वास तयां ठायी । निर्मिलास तू ॥
परंतु कोण्ही काय करावे । अडाण्यां कु्ण्ही आवरावे । तयां वाटले संपवावे । तुझिया देहा ॥
पाहा एक चिं गोळी पुरली । मृत्यूस कारण जाहली | तयें ठोकिली आरोळी । संपला रे हा ॥
परि स्थिती नव्हे ऐसी । देहा दिधले अग्नीसी । परि विचार लोकमानसी । राहिला रूजला ॥
देह येतील जातील । बळवंत असे काळ । मात्र आतां न उलटे फिरेल । चक्र ते चालते ॥
तरी ही केली आठवणी । लौकिकापार तुवां पाहूनी । देह जो लागला सत्कारणी । लोकां आदर्श जाहला ॥

***

लबाड लोकांचा शत्रू बनून तू ह्या अंधश्रद्धांनी भरलेल्या जगात आलास आणि आपली वाणी वापरून तू अंधश्रद्धा वापरून जे लोकांना लुबाडतात त्यांच्याविरुद्ध जनजागृती केलीस.

तुझे हे कार्य अपूर्व होते – अपूर्व म्हणजे पूर्वी कुणी न केलेले – (खरोखरच ह्या लबाडांविरूद्ध उभे राहिलेले व त्यासाठीच जन्म वेचलेले दुसरे उदाहरण नाही) – ह्या कार्यात तुला अतिशय गुणी असे अनुयायी मिळाले आणि तू ही त्यांच्यात ह्या लढाईसाठी आत्मविश्वास निर्माण केलास.

असे असले तरी कुणी काय करावे ह्यावर कुणाचेही किती नियंत्रण असणार? जे अडाणीच आहेत त्यांना आवर कोण घालणार? त्यांना वाटलं, तुला संपवून टाकावं! तुझा मृत्यू घडवून आणण्यास एक गोळी पुरली! मारणाऱ्यांनी आरोळी ठोकली, संपला रे हा संपला!

 

dabholkar inmarathi

 

परंतु, प्रत्यक्षात असे झालेले नाही. ज्याला चितेला अर्पण केला तो तुझा देह होता, विचार लोकांच्या मनात रूजला होता तो तसाच राहिला!

काळापुढे कुणाचे चालते? तुझ्यासारखे देह येत जात राहतील पण तू अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे चक्र चालू केलेस ते फिरतेच राहील, ते उलटे फिरविता येणार नाही.

ह्या कारणाने अन्य सामान्य जन जे साधे लौकिक आयुष्य जगतात त्यांच्या पार तू गेला आहेस. तुला मिळालेला देह तू सत्कारणी लावलास आणि आदर्श उभा केलास म्हणून ही रचना तुझ्या आठवणीसाठी केली.

****

मला वाटते, ज्यासाठी गौरव केला आहे त्याबद्दल वाद होऊ नये. दाभोलकरांनी ज्यात उडी मारली तो विषय सोपा नव्हता. सतत प्राण जाईल या तयारीनेच त्यांना काम करावे लागले आहे. जे लबाडी करून लोकांना लुटत असतात ते कधी एकटे नसतात. त्यांचे काम जवळजवळ उघड्यावरच चालत असते व त्यांना त्याची भीती वाटत नसते.

अर्थातच, कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय हे धंदे चालत नसतात. दाभोलकरांनी त्या साखळीवर घाव घातले, असे करणारा आपल्या इतिहासात तो पहिला माणूस होता. त्यांचे स्वच्छ चारित्र्य आणि सद्हेतू ह्यांचा प्रत्यय आल्याने त्यांना महाराष्ट्रात अक्षरशः खेडोपाडी अनुयायी मिळाले. दाभोलकरांनी त्यांना घडविले.

बारामतीचे वकील संजन मोरे म्हणतात :

कॉलेजला असताना अंनिसचं काम करायचो. साप पकडायचे आधीपासूनच knowledge होते. अंनिसमध्ये आल्यानंतर बल्बच्या काचा खाणे, उकळत्या तेलात हात घालून त्यातून पैशाचे नाणे काढणे, निखाऱ्यावरून चालणे या सारखे अघोरी चमत्कार कसे करायचे हे शिकलो. एका तडाख्यात गावातील सगळ्या घरातील भाकरी काळ्या कशा करता येवू शकतात हे शिकलो.

वाळत घातलेले दोरीवरचे कपडे लांबूनच कसे पेटवावे हे कळू लागले.. एखाद्या देवाच्या दगडी मुर्तीच्या डोळ्यातुन घळाघळा पाणी कसे आणावे हे शिकलो.. हात रूमालाची पक्की मारलेली गाठ स्पर्श न करता कशी सोडवायची ते शिकलो.

कोंबडीचे अंडे न फुटू देता बाटलीत कसे बंद करायचे ते शिकलो. चमत्कारामागचे विज्ञान कसे शोधून काढावे हे शिकलो. हवेतून हवी ती वस्तू कशी काढावी, बोट लावेल ती वस्तू गोड कशी करावी…

थोडक्यात चमत्कार करून लोकांना कसे मुर्ख बनवले जाते, त्यांना कसे लुबाडले जाते याचे ज्ञान अंनिसमध्ये मिळत गेले. यातला फक्त एकच चमत्कार करून लोक लक्षाधीश झालेले पाहिले. भिती घालून, दबाव टाकून लोकांना असहाय करून त्यांच्या अंधश्रध्दांचा व्यापार करणारे बुवा, बाबा, साधु महंत पाहीले.

 

anis inmarathi

 

पोटापाण्याचा प्रश्न अजीबात पुढे नव्हता. संमोहनाचा एक कार्यक्रम केला तरी आठवडाभर कशाची दादात नव्हती. संमोहन करून गावातल्या एका अध्यात्मात आकंठ बुडालेल्या श्रीमंत व्यक्तीस त्याच्या पूज्य देवतेचे दर्शन करून दिले तेंव्हा त्याने फक्त पाय धरणेच बाकी ठेवले होते. गावात येणारा सापाचा खेळ करणारा गारूडी, त्याला chemical वर आधारीत दोन चार चमत्काराचे प्रयोग शिकवले तर त्याने फिदा होवून मला चार हातचलाखीचे प्रयोग शिकवले.

मनात आणले असते तर चमत्कारामागच्या विज्ञानाचा गैर वापर करून अफाट पैसा कमावता आला असता. परंतू प्रत्येक अंनिसच्या कार्यकर्त्यास प्रबोधनाचा पुरोगामी किडा चावलेला असल्याने त्यांनी लोकांना या अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.. त्यासाठी त्यांनी लोकांचे शिव्याशाप खाल्ले. दाभोळकर तर बिचारे लोकांच्या मनातील अंधश्रध्दा दूर करता करता प्राणाला मुकले.

****

दाभोलकरांचा अजून एक मोठा विशेष आहे. तो म्हणजे त्यांनी अशी संघटना बांधली की जिच्यात जातपात नाही! दाभोलकरांना सर्व जातीपंथातले अनुयायी मिळाले, स्वतः दाभोलकरांना त्यातून कोणताही भौतिक लाभ मिळवायचा नव्हता आणि त्यांचे अनुयायीही तसेच निघाले. हे काम सामान्य नाही.

****

असे असूनही त्यांच्याबद्दल अप्रीति वाटणारे खूप आहेत. त्यांचा अनेकांना खूप राग येतो. दाभोलकरांनी या कशाची एका मर्यादेपलीकडे पर्वा केली नाही. कार्यकर्त्याला तशी करून चालतच नाही. जो स्वतः काहीच काम करत नाही, केवळ आक्षेपच घेत बसतो त्याची एका मर्यादेपलीकडे पर्वा केली तर कोणत्याच क्षेत्रात मनुष्य पुढे जाणार नाही.

काही आरंभशूर असतात, काही मध्येच कार्य सोडून देतात आणि काहीच आरंभिलेले कार्य शेवटपर्यंत करीत राहतात. अशा शेवटपर्यंत टिकणाऱ्या लोकांनाच श्रेष्ठ म्हणावे असे सांगणारा एक संस्कृत श्लोक आहे. दाभोलकर असे श्रेष्ठ होते.

हे कार्य करीत असताना दाभोलकरांच्या लक्षात आले की हा अंधश्रद्धांचा व त्याआधारे लुबाडणूक करण्याचा कार्यक्रम धर्माच्या नावे चालतो. त्यांना असे वाटले – अन्य अनेकांप्रमाणे – की धर्मच अन्यायाचे मूळ आहे. म्हणून धर्मचिकित्सा केली पाहिजे असे म्हणू लागले व तसे लिहूबोलू लागले.

 

hindu inmarathi

 

माझ्या कवितेवर आक्षेप येण्याचे मुख्य कारण इथेच आहे. या संबंधाने खूप वादविवाद होऊ शकतात. व्यक्तिशः मला ते असताना त्यांच्याशी वाद करावा वाटे, आज समितीशी करावा वाटतो. तो वाद कसा होईल ह्याची मी कल्पना करतो आणि माघार घेतो. माझी सर्वांना विनंती अशी की आपणही अशी कल्पना करावी आणि मग पुढे जाता आले तर पुढे जावे.

मी आणि अंनिस ह्यांच्यातील काल्पनिक संवाद :

मी: आपण ज्याला धर्म म्हणता तो धर्म नसून अधर्म आहे. तुम्ही अधर्माला धर्म म्हणता त्यामुळे सामान्यांचा बुद्धिभेद होतो आणि तुमच्याबद्दल अप्रीति निर्माण होते. हे टाळता येणार नाही का? धर्म म्हणजे काय हे सांगायचे नाही, अधर्माला धर्म म्हणून पुढे करायचे ह्याने धर्माची हानी होते. ज्याने समाजाची धारणा होते तो धर्म ही व्याख्या डॉ. आंबेडकरांनी स्वीकारली होती व आपल्या अनुयायांना धर्मदीक्षा दिली होती. तुम्ही धर्म ह्या संकल्पनेवरच प्रहार करता, त्याने समाजाची धारणा बिघडते असे आम्हाला वाटते. धर्म ही एक उत्तुंग कल्पना आहे तिचा तुमच्यामुळे अपप्रचार होतो, समाजातील एक वर्ग सतत तुमच्याविरुद्ध राहतो. तुम्ही धर्म म्हणजे काय हे सांगून, लबाडी हा अधर्माचा भाग आहे अशी मांडणी केलीत तर बरे होईल.

अंनिस: आम्हाला काम करताना जे काही दिसले ते पाहून आमची भाषा व विचारांची मांडणी करण्याची पद्धत पडून गेलेली आहे. तुम्ही काल्पनिक गोष्टीवर बोलत आहात आणि आम्ही प्रत्यक्ष रणभूमीवरून तुमच्याशी बोलत आहोत. तुमचे म्हणणे तात्त्विक भूमिकेा म्हणून जर योग्य आहे असे तुमचे मत असेल तर तुम्हीच ते लोकांना सांगितले पाहिजे. जर धर्म हा तुमचा विषय असेल तर तो समजावून सांगणे, तो लोकांमध्ये रूजविणे इतकेच नव्हे तर तुमच्या भाषेतील अधर्म होऊ न देणे हे तुमचेही काम आहे, तुम्ही ते केले पाहिजे. तुम्ही आमच्याबरोबर गावोगावी चला, वास्तव पाहा. त्या वास्तवावर उपाय शोधा. तुमचा मार्ग अधिक योग्य वाटला तर तो लोक जरूर स्वीकारतील. आमच्या पद्धतीने काम करून आम्ही आज अनेकांना शासन होईल असा प्रयत्न केला आहे. ज्यांच्यावर केसेस केल्या आहेत त्यांची नावे तपासा. त्यात हिंदुमुस्लिम दोन्ही आहेत, किंबहुना लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिम जास्त आहेत. धर्माच्या नावाखाली होणारे शोषण आम्हाला पाहावत नाही म्हणून आम्ही काम करतो. तसे काम धर्माची उत्तुंग कल्पना सांगून तुम्हीही करू शकता. हे काम करणारा धर्मनिष्ठ माणूस उभा राहिला की, मणेरीकर, तुमची चिडचिड थांबेल. तोवर आम्हाला आमच्या पद्धतीने काम करू द्या.

***

मणेरीकरच्या मनात अजून अनेक विषयांवर वाद घालायचे आहे पण त्याला कळले आहे की निष्काम कार्य करणाऱ्याशी वाद करता येत नाही. आपले बरोबर आहे असे आपल्याला वाटते पण आपण रणांगणावर टिकू शकत नाही.

आपण समविचारी लोकांना एकत्र आणू शकत नाही. एकही माणूस अापला अनुयायी होण्यास तयार नाही. योग्य काम करणाऱ्यास अडविणे हा अधर्म आहे.

धर्माबद्दल जे बोलतात त्यांनीच धर्माचा बारकाईने अभ्यास केलेला नसतो, कुणीही शंकराचार्य अभ्यासलेले नसतात, आपल्यातीलच अनंत मतभेद आपण मिटवू शकत नाही आणि दाभोलकरांबरोबर असलेल्या मतभेदांमुळे आपण इतक्या खालच्या पातळीला जातो की योग्य कारणासाठी केलेला त्यांचा गौरवही आपल्याला सहन होत नाही.

 

narendra dabholkar inmarathi

 

आपण, आपल्या घरचे, आपले नातेवाईक, आपले शेजारी, आपला समाज, आपले राज्य, आपले राष्ट्र आणि हे मानवी विश्व असे आपले विस्तारित कुटुंब आहे.

ज्याच्याबरोबर आपले मतभेद नाहीत असे आपल्या जवळचे ह्यांत किती आहेत? तरी आपण रोजच्या जीवनात अनेकांचे छोट्या छोट्या कामासाठी कौतुक करतो. परीक्षेत चांगले गुण मिळविणाऱ्याला आपण बक्षीस देतो. हेच योग्य आहे.

व्यासांच्या, ज्ञानेश्वरांच्या दर्जाचे लिही मग तुझे कौतुक करू असे आपण म्हणत नाही. हेच योग्य आहे. प्रत्येकात काही दोष असणारच, ही सृष्टीच तशी आहे. आपल्यातही खूप दोष आहेत. तरी एकमेकांना धरून राहण्यातच आपले भले आहे.

एकमेकांना योग्य प्रकारे धरून राहून समाजात स्वास्थ्य राखणे व आपली स्वतःची व प्रत्येकाची उन्नती होईल असे पाहणे ह्या करिता सर्व लोक जिचे पालन करतात त्या व्यवस्थेला धर्म म्हणतात – अशी आदि श्री शंकराचार्यांनी केलेली व्याख्या आहे.

 

aadi shri shankaracharya inmarathi

 

व्यक्तिशः मला असे वाटते की दाभोलकर त्यांच्या नकळत या व्याख्येला धरून जगले म्हणून दाभोलकर हे एक अत्यंत धार्मिक व्यक्ती होते. ते धार्मिक होते म्हणूनच त्यांचा गौरव केला पाहिजे, जसा माझ्या कुवतीनुसार मी काल केला.

अधर्मी माणसाचे काय व कसे करावे हा विषय वेगळा आहे, त्याचा इथे संबंधच नाही. मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरेसे आहे.

आपला,
राजेन्द्र मणेरीकर

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?