' कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन लशींचे कॉकटेल अधिक प्रभावी आहे का? वाचा

कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन लशींचे कॉकटेल अधिक प्रभावी आहे का? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

२०१९ साल संपता संपता कोव्हीड १९ चीनच्या वुहानमधून संपूर्ण जगात पसरला. अख्ख्या युरोपमध्ये मृत्यूचे थैमान घातल्यानंतर साधारण फेब्रुवारी – मार्च २०२० मध्ये भारतात कोव्हीड १९ आला आणि तेव्हापासून आपले सामान्य जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

या  महामारीमुळे ह्या आधी कधीही घडले नव्हते असे संपूर्ण जग वेठीला धरले गेले. सगळीकडे लॉकडाऊन करावे लागले. याचा कोट्यवधी लोकांना फटका बसला. लोकांचे आयुष्य बदलले. कोट्यवधी लोकांच्या आयुष्याचे शारीरिक/मानसिक नुकसान तर झालेच शिवाय आर्थिक फटका किती बसला याची तर गणतीच नाही.

 

lockdown inmarathi
businessinsider.in

 

पहिली लाट, मग दुसरी लाट मग तिच्याहून घातक अशी तिसरी लाट अश्या आणखी किती लाटा झेलायच्या आहेत ते ईश्वरालाच ठाऊक. मास्क आणि सॅनिटायझर तर जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत.

जसे आयफोनचे दर वर्षी नवेनवे मॉडेल्स लॉन्च होतात तसेच हा नॉव्हेल कोरोनाव्हायरस देखील म्यूटेट होऊन स्वतःचे देखील नवेनवे व्हेरिएन्टस लाँच करत आहे. आधी अल्फा (B.1.1.7) मग बीटा (B.1.351) नंतर गॅमा (P.1) आणि आता आलाय तो डेल्टा (B.1.617.2) मग काय डेल्टा प्रो मॅक्स, डेल्टा प्रो मॅक्स प्लस सुद्धा येईलच. अर्थात ह्यावर देखील उपाय शोधणे सुरूच आहे.

 

vaccination drive in india

 

कोरोना व्हायरसवर जगभरात संशोधन सुरु आहे आणि लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. बाहेरच्या देशांत फायझर-बायोएन्टेक आणि मॉडर्ना या दोन लसी देण्यात येत आहेत. या दोन्ही लसी “मेसेंजर RNA व्हॅक्सिन” ह्या प्रकारात मोडतात. या तयार करण्यासाठी व्हायरसच्या जेनेटिक कोडमधील काही भाग वापरला जातो.

भारतात सुरुवातीला कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन लसी आल्या. आपल्यापैकी अनेकांचे दोन्ही डोस झाले आहेत. त्यातील भारत बायोटेकचे कोवॅक्सीन हे इनॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन आहे.

यात व्हायरसचा जो स्ट्रेन आहे तो डेड म्हणजेच इनऍक्टिव्ह आहे म्हणजेच यात कोरोनाव्हायरसचा निष्क्रिय अंश आहे पण तो कोरोनाव्हायरस विरुद्ध आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती तयार करतो. तर कोव्हीशील्ड लस ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निर्माण केली आहे.

 

vaccine tourism inmarathi

 

जगभरात ही लस Oxford AstraZeneca vaccine म्हणून ओळखली जाते. दोन्ही लसी तितक्याच फायदेशीर आहेत त्यामुळे संपूर्ण भारतात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे.

ही जागतिक महामारी आटोक्यात आणण्यात लसींची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. औषधे रोग झाल्यानंतर उपचार करण्यासाठी असतात तर लस ही आजार होण्यासच प्रतिबंध करत असल्याने ती घेणे अत्यावश्यक आहे.

जगातील किमान ७० टक्के लोकांनी लस घेतल्याशिवाय ही महामारी आटोक्यात येणार नाही असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. अब्जावधी लोकांनी लस घेतल्यानंतर ह्या व्हायरसविरुद्ध हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकेल आणि त्यानंतरच संपूर्ण जगातील लोकांचे आयुष्य पूर्वीसारखे रुळावर येऊ शकेल असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

पण आपल्याकडे यात देखील घोळ होतात. एकाच माणसाने दोन वेगवेगळ्या लसी घेतल्याच्या घटना आपल्याकडे घडल्या आहेत. पहिला डोस कोविशील्डचा आणि दुसरा डोस कोवॅक्सिनचा असे घेतले तर शरीरात लसींचे मिश्रण तयार होईल.

आपण वर बघितले की या दोन्ही लसी वेगवेगळ्या प्रकारे तयार केल्या आहेत. त्यामुळे यांचे जर चुकून शरीरात मिश्रण झाले तर काय होईल याची कल्पना आपल्याला अजून तरी नाही.

 

covaxin inmarathi

हे ही वाचा – लसीकरणाच्या सर्टिफिकेटमध्ये घोळ झालाय? आता फिकर नॉट… अशी करता येणार दुरुस्ती..

जरी असा घोळ झाला तरी त्यातून आजवर तरी गंभीर काही उद्भवल्याची नोंद नाही. परंतु तज्ज्ञ वारंवार हेच सांगत आले आहेत की कृपया एकाच प्रकारची लस घ्या. एक डोस या लसीचा आणि दुसरा डोस वेगळ्याच लसीचा असे करू नका.

काही देशांत यावर संशोधन सुरु आहे की जर दोन लसी एकत्र केल्या तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील. अजूनपर्यंत तरी याचे काही गंभीर परिणाम दिसले नाहीत.

भारतात देखील सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या तज्ज्ञांनी कोवॅक्सीन व कोविशील्ड एकत्र करून दिल्यास त्याचा कितपत उपयोग होऊ शकेल यावर संशोधन करण्यास सुचवले आहे.

काही रिपोर्ट्सनुसार वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने हे संशोधन करण्याची इच्छा व्यक्त केली असून ३०० निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.

 

vaccine 44

 

कोव्हीशील्ड लस ही साधे सर्दी पडसे ज्या विषाणूमुळे होते त्याच्या कमकुवत स्ट्रेनपासून तयार केली आहे. ही लस घेतल्यानंतर शरीरात SARS-CoV-2 म्हणजेच कोरोनाव्हायरसविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती तयार होते. तर कोवॅक्सिन लस ही कोरोनाव्हायरसपासूनच तयार केली आहे.

यात कोरोनाव्हायरसचा निष्क्रिय अंश आहे. त्यामुळे या दोन्ही लसींचे मिश्रण शक्यतोवर करू नका, असे सुरुवातीला तज्ज्ञांचे म्हणणे होते. परंतु मे महिन्यात नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल म्हणाले की हे मिश्रण करणे शक्य आहे आणि यावर अधिक संशोधन करण्याची गरज आहे.

सध्या जगभरात दोन प्रकारच्या लसींचे मिश्रण होण्यावर संशोधन सुरु आहे. फायझर आणि ऍस्ट्राझेनेका यांच्या मिश्रणावर चाचण्या सुरु आहेत. तसेच स्पुटनिक – ५ व ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेका यांच्या मिश्रणावर देखील संशोधन सुरु आहे. या संशोधनातून असे निष्पन्न निघाले की अजून तरी या मिश्रणाचा काही गंभीर परिणाम झालेला आढळला नाही.

युके मध्ये झालेल्या एका चाचणीत ८०० लोकांना पहिला डोस (प्राईम डोस) ऍस्ट्राझेनेकाचा देण्यात आला आणि दुसरा डोस (बूस्ट) फायझरचा देण्यात आला. याचा त्या लोकांवर काही गंभीर परिणाम झाला नाही.

एका स्पॅनिश संशोधनातून असे निष्पन्न झाले की, ऍस्ट्राझेनेका व्हॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर जर दुसरा डोस फायझरचा घेतला तर तर शरीरात जास्त प्रमाणात अँटीबॉडीज (प्रतिपिंड) तयार होतात.

 

cowaxin inmarathi
india.com

 

भारतात यावर आधी संशोधन झाले नसले तरी काही लोकांच्या निष्काळजीमुळे मे महिन्यात २० लोकांना आधी कोवॅक्सीनचा डोस दिल्यानंतर दुसरा डोस कोविशील्डचा देण्यात आला.

हा घोळ लक्षात आल्यानंतर आयसीएमआरने त्या वीसपैकी अठरा लोकांची चाचणी करून त्यांच्या शरीरावर याचा काय परिणाम झाला आहे याचा अभ्यास केला. तेव्हा असे लक्षात आले की एकाच प्रकारची लस घेतल्यानंतर शरीरात जितक्या अँटीबॉडीज तयार होतात त्यापेक्षा जास्त अँटीबॉडीज या  १८ लोकांच्या शरीरात तयार झालेल्या आढळल्या. त्यामुळे आता यावर अधिक संशोधन सुरु झाले आहे.

अर्थात जोवर संशोधन पूर्ण होऊन त्यावर काही निष्पन्न निघत नाही, जोवर लसींचे मिश्रण फायदेशीर आहे आणि त्यामुळे काही गंभीर परिणाम होणार नाहीत अशी खात्री तज्ज्ञ देत नाहीत, तोवर लोकांनी आपल्याच मनाने दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेऊन स्वतःवर किंवा इतरांवर प्रयोग करू नयेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?