' तालिबानी राज्यातील हे जाचक नियम करणार महिलांच्या आयुष्याचा नरक… – InMarathi

तालिबानी राज्यातील हे जाचक नियम करणार महिलांच्या आयुष्याचा नरक…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेले काही दिवस अफगाणिस्तान जगाच्या बातम्यांत झळकत आहे. कट्टरपंथीय अशी ओळख आणि चेहरा असणार्‍या तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा करून त्यांचा अनेक दशकांचा लढा संपवत विजय प्राप्त केलेला आहे.

 

taliban 2 inmarathi

 

मुस्लिम शरियतचं काटेकोर पालन करणार्‍या तालिबान्यांनी नव्वदच्या दशकात महिलांवर जाचक नियम लादले. बुरख्याच्या आत श्वास घेण्याचं स्वातंत्र्य सोडलं तर इतर फारशी स्वातंत्र्यं नसणार्‍या अफगाणी स्त्रीचं आता भविष्य काय असेल? आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

नव्वदच्या दशकात अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं धुमाकूळ घालायला सुरवात केली. आजवर जी अफगाण स्त्री जगातील इतर देशातील स्त्रीसारखीच स्वतंत्र विचाराची आणि व्यक्तीस्वातंत्र्य उपभोगणारी होती ती बुरखाबंद करून तिच्यावर जाचक नियम लादण्यात आले. हे सर्व नियम शरीयतमधे असल्याचं सांगत ते पाळणं बंधनकारक केलं गेलं. ज्या स्त्रिया नियमांचं उल्लंघन करतील त्यांना शरीयतमधे दिलेल्या शिक्षांना सामोरं जावं लागलं.

सार्वजनिकरित्या दगडांचा मारा करून हालहाल करून अर्धमेलं करणं किंवा पूर्णपणे मारून टाकणं, जाहीररित्या शिरच्छेद करणं, हातपाय कापणं अशा शिक्षा धार्मिक पोलिसांकडून दिल्या जात. साधी भाजी आणायला जायचं तरीही स्त्री एकटी घराबाहेर पडू शकत नसे. अगदी शेंबडं पोर असलं तरीही चालेल, मात्र एखादा पुरूष जातीचा मानव सोबत असल्याखेरीज स्त्री घराबाहेर पाऊलही ठेवू शकत नसे.

 

women inmarathi

 

गेली अनेक दशकं अफगाणी स्त्री हे हाल सहन करत आली याचं कारण कधीतरी तालिबान्यांचा नायनाट होईल आणि आपली या छळातून मुक्तता होऊन आपल्या आधीच्या पिढ्यातील स्त्रिया जगायच्या ते आयुष्य जगता येईल हा आशावाद! आता बदललेल्या राजकीय चित्रानं या आशावादाचं काय होईल? हा प्रश्न केवळ अफगाण स्त्रीपुरता उरला नसून जगभरातील मानवतावादी याबाबत चिंतेत आहेत.

तालिबानी म्हणलं की जगाच्या दृष्टीनं समानार्थी शब्द आहे क्रुरकर्मा, छळवाद! याचं कारण यांनी लादलेले कडक धार्मिक नियम. स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही असणारे जाचक नियम विशेषत: स्त्रीला माणूस म्हणून तर सोडाच पण जनावराच्या दर्जाचं जगणंही मुश्किल करणारे होते.

नवीन राजवट नेमकं काय करेल वगैरे हा भविष्यातला विषय असला तरीही यानिमित्तानं तालिबानी आणि स्त्रीविषयक धोरण यावर एक नजर फिरवणं गरजेचं आहे.

महिलांनी सायकल, मोटारबाईक चालवण्यावर बंदी (इतर वाहनांचं विषयच नाही). अगदी तालिबानच्या नियमानुसार सोबत माहरम (कुटुंबातील अशी पुरुष व्यक्ती जिच्या सोबत स्त्रीचं लग्न हराम मानलं आहे. अशी व्यक्ती जिच्यासमोर या स्त्रीनं बुरखा, हिजाब नाही घातला आणि शरीराचा चेहरा, हात पाय असे अवयव दिसले तरिही चालू शकतील) असेल तरीही तिला वाहन चालवण्याची परवानगी नाही.

– टॅक्सीतून माहरमशिवाय प्रवासाची बंदी

– एकाच बसमधून पुरूष सहप्रवाशासोबत प्रवासास मनाई

– महिलांना नोकरीस मनाई

– मुलींना शिक्षणास बंदी

– घरातून बाहेर पडताना बुरखा बंधनकारक. हा बुरखा इतका शरीर झाकणारा हवा की डोळेही दिसता कामा नयेत. शरीराचा कोणताही अवयव दिसणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक/बंधनकारक

 

afganistan women inmarathi

 

– घरातून पाऊल बाहेर ठेवताना कुटुंबातील पुरूष सदस्याची सोबत बंधनकारक! जर रस्त्यावर एखादी स्त्री कुटुंबातील पुरुष सदस्याच्यासोबतीशिवाय किंवा बुरख्याशिवाय दिसली तर कडक शिक्षा

– सार्वजनिक ठिकाणी बोलताना तिचा आवाज परपुरुषाला ऐकू जाता कामा नये इतक्या हळू आवाजात तिनं बोललं पाहिजे

– रस्त्यावरून जाणार्‍याच्या नजरेस घरातील स्त्री पडू नये यासाठी घराच्या तळमजल्यावरील खिडक्यांच्या तावदानांना रंग लावणे किंवा पडदा कायम बंद ठेवणे बंधनकारक

– महिलांनी फोटो काढून पब्लिश करण्यास सक्त मनाई

– एखाद्या ठिकाणाच्या नावात असणारा महिला हा शब्द काढून टाकणे. लिखित स्वरूपातील महिला हा शब्दही पुरुषांच्या नजरेस पडता कामा नये

– महिलांना घराच्या बाल्कनीत उभं रहाण्यास सक्त बंदी

– रेडिओ, टेलिव्हिजन किंवा तत्सम सार्वजनिक माध्यमांत महिला उपस्थिती लावू शकत नाहीत.

ही बंधनं लक्षात घेता जर ती झुगारली तर त्याच्या शिक्षा काय असतील याचा विचारही न केलेला बरा. हात पाय तोडण्यापासून ते जाहिररित्या दगडानं ठेचून मारण्यापर्यंतच्या सर्व शिक्षा महिलांसाठी तालिबान्यांनी शरीयतचा आधार घेत तरतूद करुन ठेवल्या आहेत.

 

women 2 inmarathi

 

अलीकडेच उत्तर अफगाणिस्तानमधील बालकाहमधे एका महिलेला तंग कपडे घातल्याच्या गुन्ह्यामुळे आणि बाहेर फिरताना पुरुष सदस्य सोबत नसल्यानं निर्दयीपणे दगडानं ठेचून मारण्यात आलं.

एका स्त्रीनं नेलपॉलिश लावलेली नखं बुरख्याबाहेर दाखविल्यानं तिची बोटं छाटण्यात आली. २२५ महिलांना एकाचवेळेस पेहरावाच्याबाबतीत शरियाचा नियमभंग केल्याचं कारण दाखवत पाठ आणि पायांवर चाबकाचे फटके कातडी सोलवटून निघेपर्यंत दिले गेले.

जागतिक पातळीवर काम करणार्‍या केअरच्या महिला कर्मचार्‍यांनाही धार्मिक पोलिसांनी लोखंडाच्या कांबीनं आणि चामड्याच्या पट्ट्यानं मारण्यात आलं. काहीजणींना स्टेडियममधे हजारोंच्या साक्षीनं फाशी देण्यात आली.

हे चित्र असं असलं तरीही यातूनही काहीजणी बंडखोरीची मशाल पेटवत लपून छपून काम करतात, हक्कांसाठी जमेल तसं आणि जिवाची पर्वा न करता लढतात. मात्र त्या पकडल्या गेल्या की नावानिशी गायब होतात. अशा अनेकजणी आहेत ज्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणांहून बंदूकीच्या धाकावर घरी हाकलण्यात आलं.

 

talibani inmarathi
indian express

अफगाणी स्त्रीचा संघर्ष कमी कधीच नव्हता आता तो आणखीनच वाढेल यात उर्वरीत जगाला अजिबात शंका नाही. म्हणूनच सगळं जग सध्या या महिलांच्या जगण्याच्याबाबतीत चिंतेत आहे.

सध्यातरी तालिबाननं जगाच्या या चिंतेला उत्तर म्हणून अफगाणिस्तानमधील स्त्रियांना सर्वप्रकारचं स्वतंत्र्य निश्चितच दिलं जाणार असल्याची ग्वाही दिलेली आहे. मात्र हे स्वातंत्र्य उर्वरीत जगाच्या कायद्यानुसार नसून शरीयतमधे जे सांगितलेलं आहे त्यानुसार असणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी अलिकडेच तालिबानची महिलाविषयक भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी महिलांना आता काम करण्याचं स्वातंत्र्य असेल मात्र त्या सहाय्यकाच्या भूमिकेत काम करू शकतील, शिवाय कोणकोणत्या क्षेत्रात त्या काम करू शकतात यावर विचार करून त्यानुसार निर्णय घेता येईल असं सांगितलं. शरीयतच्या चौकटीत राहून महिला शिक्षणही घेऊ शकतील आणि नोकरीही करू शकतील. ही अफगाणी स्त्रीसाठी दिलासा देणारी बाब म्हणायला हवी.

धार्मिक पुस्तकांखेरीज इतर पुस्तकांचं आणि बाहेरच्या जगाचं तोंडही पहाण्याची परवानगी नसणार्‍या स्त्रीला किमान आता हे स्वातंत्र्य तरी मिळेल.

पूर्वी सोबत पुरूष नसेल तर महिलांना एकटं बाहेर पडण्याची परवानगी नव्हती हे सध्याच्या तालिबानी राजवटीला बहुतेक माहित नसल्यानं त्यांनी असं काही नव्हतंच आणि महिलांना आधीही पूर्ण स्वातंत्र्य होतं आणि पुढेही राहिल अशी ग्वाही दिली. अफगाण स्त्रीचं सर्वतोपरी अफगाणी पुरूषाकडून रक्षण केलं जाईल याची ग्वाही नविन सरकार देत आहे. शाळा, महाविद्यालयात जाणार्‍या मुलिंना बुरख्याऐवजी हिजाबचं स्वातंत्र्य देण्यात आल्याचंही नवीन राजवटीनं सांगितलं मात्र अफगाणीस्तानमधील पुरोगामी कुटुंबांची प्रतिक्रिया याच्याशी विसंगत आहे. त्यांच्यामते तालिबान्यांच्या करनी आणि कथनीमधे जमीन-अस्मानाचा फरक आहे.

 

afgan women inmarathi
al zajeera

गेले काही दिवस सोशल मिडियावरून मिळेल त्या वाहनानं अफगाणीस्तानमधून पलायन करणार्‍या हजारोंचे फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्याची गोष्ट ही की यात स्त्री मात्र दिसत नाही. जवळपास सगळ्या फोटोत अफगाणी पुरूष दिसत आहेत. याचा अर्थ आता मागे जी जनसंख्या उरेल त्या बहुतांश स्त्रियाच असतील.

शिक्षण नसणार्‍या, बाहेरच्या जगाच्या गंधही नसणार्‍या, सतत पुरुषी वर्चस्वाखाली राहून दबलेल्या, पिचलेल्या अशा बहुसंख्य लोकसंख्येचं नवीन अफगाण सरकार काय करेल? हा खरा प्रश्न आहे.

आधीचं तालिबान आणि आताचं तालिबान यात अफगाणी सुरक्षित जनतेला फारसा फरक जाणवत नाही मात्र राज्यकर्त्यांचा दावा वेगळा आहे. या बदललेल्या आणि धक्कादायक चित्रानं पुन्हा एकदा अफगाणी स्त्री हा कथा, चित्रपटांचा विषय बनू पहात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?